'गर्भाशयातच त्याची पिल्लं एकमेकांना खातात'; कोट्यवधी वर्षांचा रहिवासी शार्कची 9 खास वैशिष्ट्ये

फोटो स्रोत, Jayne Jenkins/ Ocean Image Bank
- Author, जॉसलिन टिम्पर्ली, सोफिया क्वाग्लिया, कॅथरीन लॅथम आणि स्टीफन डाउलिंग
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
शार्क म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो समुद्रातील अवाढव्य असा धोकादायक शिकारी मासा. पण इतकीच त्याची ओळख नाही.
मानवामध्ये आणि समुद्रातील या बलाढ्य शिकाऱ्यांमध्ये आपल्याला वाटतं त्यापेक्षा जास्त साम्य आहे. आणि आपल्यासारखंच त्यांनाही माइल्स डेव्हिसचं जॅझ संगीतही आवडू शकतं.
शार्क हे पृथ्वीवरील सुरुवातीच्या काळातील म्हणजेच सर्वात प्राचीन पाठीचा कणा असलेल्या शिकारी प्राण्यांपैकी आहेत. कोट्यवधी वर्षांच्या उत्क्रांतीदरम्यान त्यांनी अनेक आश्चर्यकारक गुण विकसित केले आहेत.
शार्कबद्दलच्या आश्चर्यकारक आणि विलक्षण अशा 9 गोष्टी जाणून घेऊया.
1. अनेक प्रजाती नष्ट, शार्क मात्र टिकून
शार्क किंवा त्यांच्या निकटच्या पूर्वजांनी पृथ्वीवरील पाचही मोठ्या महाविनाशांचा सामना करून आपलं अस्तित्व टिकवलं आहे. यामध्ये 'ग्रेट डायिंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्मियन-ट्रायासिक महाविनाशाचाही समावेश आहे.
हवामानातील भीषण बदलामुळे पृथ्वीवरील बहुतांश जीवसृष्टी नष्ट झाली होती. त्यात समुद्रातील सुमारे 90 टक्के जीवांचा मृत्यू झाला होता.
परंतु, शार्कचे अस्तित्व मात्र टिकून राहिले. आज ते जगभरातील जवळपास प्रत्येक समुद्रात आढळून येतात.
2. शार्क गणितातही हुशार असतात
शार्क हे केवळ उपजत प्रवृत्ती म्हणजेच सहजप्रवृत्तीने वागणारे आणि कायम भुकेले शिकारी असतात, असा अनेकांचा समज आहे. परंतु, संशोधन वेगळंच सांगतं. शार्क खूप हुशार असतात आणि नवीन गोष्टी पटकन आत्मसात करतात.
वेगवेगळे आवाज, सूक्ष्म फरक असलेले नमुने आणि रंगीत भूमितीय आकार यातील फरक ही ओळखू शकतात.
एका प्रसिद्ध प्रयोगात, तरुण ग्रे बांबू शार्क सुमारे वर्षभर विविध आकार आणि डोळ्यांना भ्रम निर्माण करणाऱ्या म्हणजे दृष्टीभ्रमांशी संबंधित चित्रांची (ऑप्टिकल इल्युजन) माहिती लक्षात ठेवू शकतात, असे दिसून आले.
त्याचबरोबर त्यांना साधं गणितही समजतं. उदाहरणार्थ, ते 3 आणि 5 किंवा 4 आणि 7 यांसारख्या संख्यांमधील फरक ओळखू शकतात. पण 4 आणि 5 सारख्या अगदी जवळच्या संख्यांमधील फरक ओळखणं त्यांच्यासाठी कठीण असतं.
3. शार्क्सना जॅझ संगीतही आवडतं
पोर्ट जॅक्सन शार्कच्या बाबतीत मात्र जॅझमधला 'स्विंग' विशेष आवडतो.
ऑस्ट्रेलियामध्ये आढळणाऱ्या आणि समुद्राच्या तळाशी राहणाऱ्या या शार्कना एक आव्हान देण्यात आलं. संगीत सुरू झाल्यावर त्यांनी टँकमधील एका ठराविक जागी पोहोचायचं, आणि तसं केल्यावर त्यांना बक्षीस म्हणून अन्न दिलं जाणार होतं.
सिडनीच्या मॅक्वेरी विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या या अभ्यासातून असं दिसून आलं की, जॅझ संगीत सुरू असताना शार्क अन्न मिळणाऱ्या ठिकाणी जात असल्याचं दिसून आले. परंतु, शास्त्रीय (क्लासिकल) संगीताच्यावेळी त्यांनी असं केलं नाही.
संशोधक कुलम ब्राऊन यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं की, "क्लासिकल संगीत सुरू झाल्यावर आपल्याला काहीतरी करायचं आहे, हे शार्क्सना समजत होतं. परंतु, दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, हे त्यांच्या लक्षात आलं नाही."

फोटो स्रोत, Hannes Klostermann/ Ocean Image Bank
4. शार्क माशांनाही माणसांसारखी बेंबी असते
काही शार्क अंडी घालतात. परंतु, बुल शार्क आणि हॅमरहेडसारखे अनेक शार्क आपल्या पिल्लांना गर्भाशयात वाढवतात आणि मानवांप्रमाणेच नाळेद्वारे त्यांना अन्न पुरवतात.
त्यामुळे जन्मानंतर काही आठवडे किंवा काही महिने त्यांच्या पोटावर बेंबीची (नाभी) खूण दिसते. नाळेची जखम भरल्यानंतर ती खूण हळूहळू नाहीशी होते, म्हणजेच बरी होते.
काही शार्क मासे अंडीही घालत नाहीत आणि इतर सस्तन प्राण्यांसारखे पिल्लांना गर्भाशयात वाढवतही नाहीत. त्यांच्या शरीरातच अंड्यांमध्ये पिल्लांचा विकास होतो आणि ती अंडी आईच्या शरीरातच फुटतात. त्यामुळे ही पिल्लं थेट जिवंत जन्माला येतात.
उदाहरणार्थ, स्पायनी डॉगफिश शार्क अशा प्रकारे पिल्लांना जन्म देतात. या शार्कचा गर्भधारणेचा काळ तब्बल दोन वर्षांपर्यंत असू शकतो.
5. गर्भाशयातच शार्कची पिल्लं एकमेकांना खातात
सँड टायगर शार्कच्या पिल्लांचा आईच्या पोटात असतानाच जगण्यासाठी संघर्ष सुरू होतो.
मादी सँड टायगर शार्कला दोन गर्भाशय असतात आणि प्रत्येक गर्भाशयात 5 पिल्लं वाढू शकतात. मात्र, वाढ होत असताना ही पिल्लं आपल्या भावंडांनाच खातात.
शेवटी प्रत्येक गर्भाशयात केवळ एकच पिल्लू जिवंत राहतं. या प्रक्रियेला इंट्रायुटेरिन कॅनिबॅलिझम किंवा अॅडेल्फोफॅगी म्हणतात. याचा अर्थ 'स्वतःच्याच भावंडांना खाणं' असा होतो.
आपल्या भावंडांना खाऊन पोट भरल्यानंतर, सँड टायगर शार्कची पिल्ले त्यांच्या आईकडून सतत सोडल्या जाणाऱ्या फलित न झालेल्या अंड्यांचा आहार मिळतो. यामुळे जन्माला येईपर्यंत ती मजबूत आणि सशक्त बनतात.
6. शार्कचेही जिवलग मित्र असतात
शार्क नेहमी एकटेच शिकार करतात, असा समज आहे. परंतु, प्रत्यक्षात तसं नाही. ग्रे रीफ शार्क चार वर्षे त्याच मित्रांच्या गटासोबत राहू शकतात. ते कधी लहान गटांमध्ये विभागले जातात, आपापल्या वाटेने जातात आणि नंतर पुन्हा एकत्र येतात. हा क्रम वेगवेगळ्या ऋतूंमध्येही सुरूच राहतो.
तरुण लेमन शार्कही समूहाने राहणं पसंत करतात. ते एकमेकांकडून नवीन गोष्टी शिकतात. उदाहरणार्थ, अन्न कसं शोधायचं किंवा शिकाऱ्यांपासून स्वतःचा बचाव कसा करायचा. ते सहसा आपल्याच आकाराच्या आणि पूर्वी भेटलेल्या किंवा ओळखीच्या लेमन शार्कसोबत राहणं पसंत करतात.
ग्रेट व्हाईट शार्कचेही जिवलग मित्र असू शकतात. हे शार्क नेहमी एकटे राहतात, असा सामान्यपणे समज आहे. परंतु, सायमन आणि जेकिल नावाचे दोन ग्रेट व्हाईट शार्क तब्बल 6 हजार किलोमीटरचा प्रवास एकत्र करताना दिसले होते. या संपूर्ण प्रवासात ते एकदाही एकमेकांपासून वेगळे झाले नव्हते.

फोटो स्रोत, Hannes Klostermann/ Ocean Image Bank
7. शार्कचे शरीर सूक्ष्म दातांनी झाकलेले असते
शार्कची त्वचा खास मानली जाते. 18 व्या शतकात इटलीमध्ये कारागीर महागड्या स्ट्रॅडिव्हेरियस व्हायोलिनच्या नाजूक कडा गुळगुळीत करण्यासाठी तिचा वापर करत असत.
तर व्हिक्टोरियन काळातील ब्रिटनमध्ये फर्निचर बनवणारे कारागीरही 'शॅग्रीन' नावाने ओळखल्या जाणाऱ्या या त्वचेचा वापर करत असत.
शार्कच्या त्वचेवर माशांसारखे खवले नसतात. त्याऐवजी त्यावर 'डेंटिकल्स' नावाचे असंख्य सूक्ष्म दात असतात. शार्क पुढे पोहताना हे दात पाण्याच्या प्रवाहामुळे सपाट होतात. त्यामुळे पाण्याचा रोध कमी होतो आणि शार्क अधिक वेगाने पोहू शकतात. जर ही त्वचा विरुद्ध दिशेने हाताने स्पर्श केली, तर ती अतिशय खरखरीत म्हणजे सँडपेपरसारखीच वाटते.
शार्कला एखादी अनोळखी वस्तू दिसली की तो कधी कधी तिला आपल्या शरीराने हलकासा धक्का देतो. त्यामुळे त्या वस्तूचा पोत आणि ती कठीण किंवा मऊ आहे, याचा अंदाज त्याला येतो. म्हणजे ती वस्तू खाण्यायोग्य आहे की नाही, हे तपासण्याची (टेस्टिंग) ही त्याची एक अत्यंत सोपी पद्धत आहे.
8. शार्क तुमच्या हृदयाची धडधड ओळखू शकतात
शार्क माशांना एकूण 8 प्रकारच्या संवेदना किंवा ज्ञानेंद्रिये असतात. माणसांप्रमाणे पाहणे, ऐकणे, वास घेणे आणि स्पर्श या नेहमीच्या संवेदनांबरोबरच त्यांच्याकडे काही खास संवेदनाही असतात.
त्यामुळे ते पाण्यातील दाबातील बदल, विद्युत संकेत आणि अगदी पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्रही ओळखू शकतात.
शार्कच्या शरीराच्या दोन्ही बाजूंना लॅटरल लाईन (पार्श्व रेषा) नावाच्या सूक्ष्म छिद्रांच्या रांगा असतात. या छिद्रांमध्ये द्रव आणि संवेदनशील पेशी असतात. शार्कच्या सभोवतालच्या पाण्यात हालचाल झाली की या केसांसारख्या दिसणाऱ्या पेशी हलतात. त्यामुळे शार्कला पाण्यातील कंपने आणि हालचाली सहजपणे जाणवतात किंवा ओळखता येतात.
शार्कच्या संपूर्ण शरीरावर 'पिट ऑर्गन्स' नावाचे छोटे संवेदनशील अवयवही विखुरलेले असतात. त्यामध्येही केसांसारख्या संवेदनशील पेशीही असतात. या अवयवांचं नेमकं काम अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. परंतु, संशोधकांना वाटतं की, ते पाण्यातील हालचाल आणि दाबातील बदल ओळखण्यास मदत करत असावेत.
याशिवाय, शार्कच्या डोक्यावर अम्प्युले ऑफ लॉरेन्झिनी नावाची शेकडो ते हजारो सूक्ष्म छिद्रं असतात. या छिद्रांमध्ये अतिशय संवेदनशील मज्जापेशी असतात. त्यांतील प्रत्येक छिद्र संवेदनशील चेतापेशींनी भरलेले असते.
त्यामुळे जवळच्या प्राण्यांच्या स्नायूंमधील हालचालींमुळे निर्माण होणारे विद्युत संकेत, अगदी हृदयाचे ठोकेही शार्क ओळखू शकतात. म्हणूनच ते पूर्ण अंधारात किंवा वाळूत लपलेले भक्ष्यही शोधू शकतात.
संशोधकांच्या मते, हीच संवेदना पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या मदतीने समुद्रात लांबचा प्रवास करताना दिशा शोधण्यासाठीही शार्कना उपयोगी ठरतात.

फोटो स्रोत, Larsvon Ritter Zahony/ Ocean Image Bank
9. 'झाडं नव्हती, तेव्हाही शार्क होते'
शार्क हे पृथ्वीवरील सर्वात प्राचीन जीवांपैकी एक आहेत. आजच्या शार्कच्या पूर्वजांचे सुमारे 45 कोटी वर्षांपूर्वीचे खवल्यांचे जीवाश्म सापडले आहेत. म्हणजे पृथ्वीवर पहिली झाडं उगवण्याच्या सुमारे 6 कोटी वर्षांपूर्वीच शार्क होते.
ते डायनासोरपेक्षा सुमारे 22 कोटी वर्षे, शनीच्या कड्यांच्या निर्मितीआधीचा 35 कोटी वर्षे आणि ध्रुवताऱ्यापेक्षाही सुमारे 38 कोटी वर्षे जुने आहेत.
शार्कसारखे पहिले दात सुमारे 41 कोटी वर्षांपूर्वी अस्तिवात आले. त्यानंतर सुमारे 38 कोटी वर्षांपूर्वी शार्कसारखे दिसणारे मासे विकसित झाले. हे सर्व मासे तांत्रिकदृष्ट्या शार्क नव्हते, पण त्यांचा शार्कशी जवळचा संबंध होता.
त्यानंतर साधारण 19.5 कोटी वर्षांपूर्वी आजच्या आधुनिक शार्कचा सर्वात जुना समूह विकसित झाला. या शार्कमध्ये लवचिक, पुढे येणारे जबडे आणि अधिक वेगाने पोहण्याची क्षमता होती.
आज जगभरात शार्कच्या सुमारे 500 प्रजाती आढळून येतात. परंतु, सुमारे 5 कोटी वर्षांपूर्वी त्यांच्या प्रजातींची संख्या यापेक्षाही जास्त होती. तरी आजही शार्कच्या नवीन प्रजातींचा शोध सातत्याने सुरूच आहे.
समुद्रातील या ताकदवान शिकाऱ्यांशी माणसाचंही एक नातं आहे. माणूस आणि शार्क यांचा सर्वात जवळचा पूर्वज सुमारे 44 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होता. तो दिसायला मानवापेक्षा शार्कसारखाच जास्त होता. त्यानंतर दोघांची उत्क्रांती वेगवेगळ्या दिशेने झाली. परंतु आजही पृथ्वीवरील आपलं आणि शार्कचं अस्तित्व एकमेकांशी अतूटपणे जोडलेलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























