You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
साध्या वेशातील पोलिसांचा लाठीचार्ज आणि महिला आंदोलकांशी गैरवर्तनाचे आरोप
दिवस: सोमवार, 20 जुलै
ठिकाण: जंतर मंतर, जनपथ, कनॉट प्लेस
जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीने 20 जुलै रोजी संसदेपर्यंत मोर्चा काढण्याचं आवाहन केलं होतं. नीट पेपर परीक्षेतील अनियमितता आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या यासाठी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी आंदोलकर्त्यांची मागणी आहे.
या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम 63 अंतर्गत नवी दिल्ली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले होते. मोर्चासाठी ना परवानगी मागण्यात आली होती, ना ती देण्यात आली होती, असंही दिल्ली पोलिसांनी सांगितलं होतं.
पण 20 जुलैच्या सकाळपासूनच जंतर मंतर आणि आसपासच्या परिसरात मोठ्या संख्येने आंदोलक जमा होऊ लागले. काही वेळातच तिथे मोठी गर्दी झाली.
पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी मोठमोठे बॅरिकेड्स उभारले होते.
दुसरीकडे, शेकडो तरुण आंदोलक तिथे जमले होते आणि ते पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते.
पोलीस कारवाईचे व्हायरल व्हीडिओ
अशाच एका व्हीडिओमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे टेम्पोसारख्या एका वाहनावर बसलेले दिसतात. ते पोलिसांकडे बॅरिकेड्स हटवण्याची मागणी करत आहेत. यावेळी पोलीस त्यांना खाली उतरायला सांगत आहेत, तर खाली उभे असलेले आंदोलक त्याला विरोध करत आहेत.
आंदोलनादरम्यान त्या परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.
मात्र, त्या दिवशी जंतर मंतर, जनपथ, कनॉट प्लेस आणि आसपासच्या भागात जे काही घडलं, त्याचे व्हीडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या व्हीडिओ आणि फोटोंमधील दृश्यांमुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा मारा करण्यात आला तसेच सुरक्षा कर्मचारी त्यांच्यावर लाठीचार्ज करतानाही दिसत आहेत.
अनेक व्हीडिओंमध्ये पोलीस आणि रॅपिड अॅक्शन फोर्सच्या निळ्या गणवेशातील सुरक्षा कर्मचारी आंदोलकांना लाठ्यांनी मारत पळवून लावताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर असेही अनेक व्हीडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यात पोलिसांसोबत साध्या कपड्यांतील काही जण लाठ्या चालवताना दिसत आहेत. याबाबत त्यांना प्रश्न विचारल्यावर ते आक्रमकपणे लोकांना मारहाण करताना दिसतात.
दिल्ली पोलिसांनी त्याच दिवशी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं होतं, "आंदोलकांनी नवी दिल्ली परिसरात आक्रमक आणि हिंसक वर्तन केलं. पोलिसांनी वारंवार इशारा देऊनही त्यांनी तिथून जाण्यास नकार दिला. त्यांनी पोलिसांवर दगडफेक आणि इतर वस्तूंनी हल्ला केला, पोलीस बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला, पोलीस आणि सरकारी वाहनांवर हल्ला केला आणि मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला."
पुढे पोलिसांनी म्हटलं, "या घटनेत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 118 पोलीस कर्मचारी जखमी झाले तसेच सुमारे 60 आंदोलकही जखमी झाल्याची माहिती आहे. सुमारे 70 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू आहे."
ज्या मुलींना पोलिसांकडून निर्दयीपणे मारहाण करण्यात आली त्यांची मी माफी मागतो असे CJP चे संस्थापक अभिजीत दिपकेंनी म्हटले.
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या पोलीस कारवाईचा निषेध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी माफी मागावी, अशी मागणी केली.
या कारवाईबाबत पंतप्रधान शांत का आहेत, असा सवालही त्यांनी केला.
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बुधवारी लोकसभेत सांगितलं की, "विद्यार्थ्यांचे कपडे फाडले गेले, त्यांचे हात मोडले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला."
आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी म्हटलं की, "मोदी सरकारने ज्याला वाटेल त्याला ताब्यात घ्या, असे आदेश दिले होते. विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता."
बीएनएस हँडबुकमधील दिल्ली पोलीस अकादमीच्या कलम 195 (2) नुसार, एखाद्या सार्वजनिक सेवकावर हल्ला करणाऱ्या, त्याच्या कामात अडथळा आणणाऱ्या किंवा बेकायदेशीर जमाव पांगवताना, दंगल किंवा मारामारी थांबवण्याच्या प्रयत्नात कर्तव्य बजावणाऱ्या सार्वजनिक सेवकाविरुद्ध गुन्हेगारी बळाचा वापर करणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत कारावास, किमान 25 हजार रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
मात्र, सोमवारी दिल्लीच्या मध्यवर्ती भागात जे घडलं आणि ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली, त्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सुरक्षा रक्षक दलातील कर्मचाऱ्यांना झालेल्या दुखापती
आंदोलनादरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांना झालेल्या दुखापती दिसणारे काही फोटो आणि व्हिडीओही समोर आले आहेत.
संसद मार्ग पोलीस ठाण्याजवळील एका पोलीस कर्मचाऱ्याचा व्हीडिओ समोर आला आहे. त्यात त्यांच्या डोळ्याला दुखापत झाल्याचं दिसतं.
माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणतात, "दगड लागला. डोळ्याला दुखापत झाली आहे. आम्ही बॅरिकेडवर उभे होतो. समोरून दगड आला."
20 जुलै रोजी झालेल्या आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांनी एक निवेदन जारी केलं होतं.
दिल्ली पोलिसांनी म्हटलं होतं, "आज झालेल्या हिंसक आंदोलनादरम्यान विशेष पोलीस आयुक्त, संयुक्त पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांसह दिल्ली पोलीस आणि केंद्रीय पोलीस दलातील 118 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले."
पहिला मुद्दा: साध्या कपड्यांतील पोलिसांकडून लाठीचार्ज
जंतर मंतर येथील अनेक व्हिडीओंमध्ये साध्या कपड्यांतील कथित पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातात लाठ्या असल्याचं दिसतं. ते गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बळाचा वापर करताना दिसतात.
अशाच काही जणांना ते साध्या कपड्यांत का आहेत आणि त्यांनी चेहरा का झाकला आहे, असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिल्याचं व्हीडिओमध्ये दिसतं.
दुसरा मुद्दा: निर्दयी लाठीचार्ज
जंतर मंतरवरील पोलीस कारवाईत अतिप्रमाणात बळाचा वापर झाल्याचे आरोप करण्यात येत आहेत. आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी केवळ लाठीचार्जच केला नाही, तर पळणाऱ्या आंदोलकांवरही बळाचा वापर केल्याचा आरोप आहे.
याशिवाय अनेकांच्या डोक्याला, डोळ्यांना आणि छातीला दुखापती झाल्या आहेत. मात्र, मार्गदर्शक तत्त्वांनुसार लाठीचार्ज करताना कंबरेखाली प्रहार करण्याची सूचना असते, जेणेकरून दुखापत कमी होईल.
21 वर्षांची एक तरुणी दिल्लीतील आरएमएल रुग्णालयात दाखल असून ती गंभीर जखमी आहे. अनेक माध्यमांच्या वृत्तांमध्ये तिची प्रकृती इतकी गंभीर होती की तिला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं, असा दावा करण्यात आला आहे. आता त्या तरुणीची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.
तिसरा मुद्दा: महिलांशी गैरवर्तनाचे आरोप
काही व्हीडिओंमध्ये महिलांशी कथित गैरवर्तन झाल्याचं दिसत आहे. एका व्हीडिओमध्ये पोलीस अधिकारी एका तरुणीच्या कानशिलात मारताना दिसतात.
याशिवाय दिल्ली पोलिसांवर पेलेट गन वापरल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. मात्र, दिल्ली पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
पोलिसांनी म्हटलं, "दिल्ली पोलिसांनी शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर पेलेट गनचा वापर केला, हा दावा पूर्णपणे चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे. दिल्ली पोलिसांकडे पेलेट गन नाहीत आणि या आंदोलनादरम्यान त्यांचा वापरही करण्यात आलेला नाही."
बीबीसीने या व्हायरल व्हीडिओंविषयी आणि पोलिसांकडून होत असलेल्या अतिबळाच्या वापराच्या आरोपांबाबत दिल्ली पोलिसांच्या अनेक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यावर बातमीत घेण्यात येईल.
तज्ज्ञ काय म्हणतात?
दिल्लीतील आंदोलकांवर झालेल्या कारवाईची दखल अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने घेतली आहे. पोलिसांची ही कारवाई मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.
अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियाचे बोर्ड अध्यक्ष आकार पटेल म्हणाले, "जंतर मंतरवरील आंदोलनातील फोटो आणि अहवालांमधून शांततापूर्ण आंदोलन कसं दडपलं जातं हे दिसून आलं."
ते पुढे म्हणाले, "दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे गंभीर प्रश्न निर्माण होतात. आंतरराष्ट्रीय मानवी हक्कांच्या निकषांनुसार ही कारवाई कायदेशीर, आवश्यक आणि योग्य होती का, हा प्रश्न उपस्थित होतो. आम्ही दिल्ली पोलिसांना संयम बाळगण्याचं आणि शांततापूर्ण आंदोलकांविरोधात बेकायदेशीर बळाचा वापर तत्काळ थांबवण्याचं आवाहन करतो."
"बेकायदेशीर वर्तनाच्या सर्व आरोपांची तातडीने, स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होईल, याची अधिकाऱ्यांनी खात्री करावी. या आरोपांमध्ये पोलिसांनी लाठी, अश्रुधुराचे गोळे आणि दगडांचा अतिप्रमाणात वापर केल्याचाही समावेश आहे," असं आकार पटेल यांनी म्हटले.
अशा आंदोलनांदरम्यान घटनास्थळी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांनी काय करावं, गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे नियम काय आहेत आणि कमीत कमी बळाचा वापर कसा केला जावा, याबाबत बीबीसीने उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक ओपी सिंह यांच्याशी संवाद साधला.
ते म्हणाले, "भारतात नागरिकांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, भारतीय राज्यघटनेनुसार काही निर्बंधांसह हा अधिकार दिला जातो, कारण देशाची सुरक्षाही महत्त्वाची आहे. त्यामुळे कोणालाही अमर्याद अधिकार देण्यात आलेले नाहीत. आंदोलनाचं नियमन करण्याची जबाबदारी प्रशासनामार्फत पोलिसांवर असते."
ओपी सिंह म्हणाले, "सर्वप्रथम आंदोलनासाठी मार्ग निश्चित केला जातो. आंदोलन कुठून सुरू होईल, कुठपर्यंत जाईल आणि त्यापुढे जाण्याची परवानगी नसते."
"परिस्थिती बिघडल्यास गर्दी पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला जातो. त्यानंतरही गर्दी पुढे येत राहिली तर लाठीचार्ज केला जातो. मात्र, त्याआधी इशारा देणं आवश्यक असतं."
साध्या कपड्यांतील पोलीस कर्मचाऱ्यांना गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार असतो का, असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, "गुप्तचर विभागातील कर्मचारी साध्या कपड्यांत काम करतात, कारण त्यांचं मुख्य काम माहिती गोळा करणं असतं."
साध्या कपड्यांतील पोलीस कर्मचाऱ्यांबाबत काय नियम आहेत?
साध्या कपड्यांतील पोलीस कर्मचारी लाठीचार्ज करू शकतात का, याबाबत ओपी सिंह म्हणाले, "नाही. तसं करता येत नाही. साध्या कपड्यांतील कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष पोलीस कारवाई करण्याची परवानगी नसते. ते लाठीचार्ज करू शकत नाहीत, गोळीबारही करू शकत नाहीत."
मात्र, त्यांनी काही अपवादांचाही उल्लेख केला.
ते म्हणाले, "कधी कधी परिस्थिती अचानक बदलल्यास वरिष्ठ पोलीस अधिकारी साध्या कपड्यांत घटनास्थळी पोहोचू शकतात. त्यांची ओळख पटू शकते. गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्या कारवाईचं चित्रीकरणही पोलीस करतात, जेणेकरून नंतर आरोप झाल्यास ते पुरावा म्हणून उपयोगी पडू शकेल."
लाठीचार्जबाबत पोलिसांना कोणत्या सूचना दिल्या जातात, यावर ओपी सिंह म्हणाले, "लाठी नेमकी कुठे मारायची हे सांगितलं जात नाही. मात्र, 'किमान बळाचा वापर' हे कायदेशीर तत्त्व पाळण्याच्या सूचना दिल्या जातात. म्हणजेच शरीराच्या अशा भागावर प्रहार करावा, ज्यामुळे जीवघेणी दुखापत होणार नाही."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.