पहिलं प्रेम विसरणं इतकं कठीण का असतं? मेंदूमधल्या हार्मोन्सचा असा असतो संबंध

पहिलं प्रेम

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

अनेक लोकांसाठी आयुष्यात पहिल्यांदा प्रेमात पडण्याचा अनुभव हा त्यांच्यासाठी सगळ्यात अविस्मरणीय क्षणांपैकी एक असतो.

पण असं का होतं की, पहिलं प्रेम आणि पहिलं नातं अनेक वर्षं उलटून गेल्यानंतरही मनात ताजंच राहतं? त्या काळातील आठवणी मनात इतक्या खोलवर का कोरल्या जातात आणि त्या विसरणं इतकं कठीण का असतं?

खरंतर लहान वयात आपला मेंदू दीर्घकाळ टिकणाऱ्या आठवणी साठवतो.

बहुतेक लोकांना पहिल्या प्रेमाचा अनुभव किशोरवयात येतो. हा मेंदूच्या विकासाचा असा टप्पा असतो, जेव्हा आठवणी जतन करण्याची आणि त्या दीर्घकाळ टिकवून ठेवण्याची क्षमता सर्वोच्च स्तरावर असते.

वेस्टमिन्स्टर विद्यापीठातील न्यूरोसायकॉलॉजीच्या प्राध्यापिका कॅथरीन लोवी सांगतात, "या वयात आपल्या मेंदूमध्ये आठवणी अत्यंत अचूकपणे साठवून ठेवण्याची आणि त्या दीर्घकाळ जपून ठेवण्याची विलक्षण क्षमता असते."

त्या पुढे सांगतात की, भावना आणि संवेदनांशी संबंधित घटना तर मेंदू अधिक चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवतो.

त्यांच्या मते, एखादी घटना पहिल्यांदाच घडत असेल, आयुष्यावर खोल परिणाम करत असेल किंवा दुःख, वेदना, अस्वस्थता यांसारख्या तीव्र भावना निर्माण करत असेल, तर ती दीर्घकाळ स्मरणात राहण्याची शक्यता अधिक असते.

याशिवाय, एखादी आठवण जितक्या वेळा पुन्हा आठवली जाते किंवा तिचा विचार केला जातो, तितकी ती मेंदूत अधिक दृढपणे साठवली जाते.

यामुळेच भावनिक अनुभव सर्वात जास्त काळ स्मरणात राहतात.

प्रा. लोवी म्हणतात, "प्रत्येक वेळी आपण या आठवणी पुन्हा उजाळा देतो, तेव्हा त्यांच्याशी संबंधित न्यूरल कनेक्शन अधिक मजबूत होत जातात."

हार्मोन्स आणि पहिल्या प्रेमाचा संबंध

आनंद असो वा रोमान्स किंवा हृदयभंगाचे दुःख, पहिल्या प्रेमाशी निगडित भावना नेहमीच अत्यंत तीव्र आणि परिणामकारक असतात.

कॅथरीन लोवी यांच्या मते, किशोरवयात शरीर आणि मेंदूमध्ये अनेक हार्मोन्स आणि रासायनिक पदार्थ सक्रिय होतात, जे तीव्र भावनांना जन्म देतात.

सुरुवातीला इस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉनसारख्या हार्मोन्सची वाढ भावनिक आकर्षण निर्माण करते.

त्यानंतर जेव्हा एखादं नातं आकार घेऊ लागतं, तेव्हा मेंदूमध्ये सेरोटोनिन, डोपामाइन आणि ऑक्सिटोसिनसारखे रसायने स्रवतात. ही रसायने आनंद, बक्षीस मिळाल्याची भावना, भावनिक जिव्हाळा आणि जवळीक यांच्याशी संबंधित असतात.

पहिलं प्रेम म्हणजे नातेसंबंध समजून घेण्याची सुरुवातही असते. मानवी नातेसंबंध हे आपल्या आयुष्याचा आणि सामाजिक अस्तित्वाचा मूलभूत भाग आहेत.

पहिलं प्रेम

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

एका तरुणासाठी पहिलं प्रेम हे आयुष्यातील महत्त्वाचं वळण असतं, कारण तो प्रथमच आपल्या कुटुंबाच्या आणि मर्यादित सामाजिक वर्तुळाच्या बाहेर एखाद्या व्यक्तीशी खोल भावनिक नातं निर्माण करत असतो.

कॅथरीन लोवी पहिल्या प्रेमाला 'मानवी नातेसंबंधांशी संबंधित आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या अनुभवांपैकी एक' मानतात. त्या म्हणतात, "आपल्याला आपल्या परिचित वर्तुळाबाहेरील व्यक्तीवर विश्वास ठेवायला शिकावं लागतं. आयुष्याला एका नव्या दिशेने नेण्याचं हे पाऊल असतं."

त्यांच्या मते, पहिलं प्रेम हा केवळ भावनिक अनुभव नसून, विश्वास ठेवणं, जवळीक अनुभवणं आणि नवीन नातेसंबंध निर्माण करणं शिकवणारी एक प्रक्रिया आहे.

जुने प्रेम पुन्हा भेटल्यावर काय होतं?

1993 मध्ये अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डॉ. नॅन्सी कालिश यांनी अशा लोकांवर संशोधन केलं, ज्यांनी अनेक वर्षांनंतर आपल्या जुन्या प्रियकर किंवा प्रेयसीशी पुन्हा संपर्क साधला होता. यांपैकी बहुतेक जण अविवाहित होते किंवा त्यांनी जीवनसाथी गमावले होते.

अनेक जोडप्यांनी काही आठवड्यांतच आपलं नातं पुन्हा सुरू केलं. त्यांपैकी 72 टक्के लोकांनी नंतर एकमेकांशी विवाहही केला.

इंटरनेट आल्यानंतर जुन्या प्रेमाचा शोध घेणं आणि त्यांच्याशी संपर्क साधणं पूर्वीपेक्षा खूपच सोपं झालं.

2004 मध्ये झालेल्या आणखी एका अभ्यासात नॅन्सी कालिश यांनी आढळलं की, जुन्या प्रियकर किंवा प्रेयसीशी पुन्हा संपर्क साधणाऱ्या 62 टक्के लोकांमध्ये पुन्हा प्रेमसंबंध निर्माण झाले. तर त्यांपैकी केवळ पाच टक्के नात्यांचं रूपांतर विवाहात झालं.

पहिलं प्रेम

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

पहिलं प्रेम आयुष्यभर का लक्षात राहतं?

कॅथरीन लोवी यांचं संशोधन फक्त पहिल्या प्रेमापुरतं मर्यादित नाही. त्या लोकांच्या संपूर्ण आयुष्यातील आठवणींचा अभ्यास करतात.

त्यांच्या मते, पहिल्या प्रेमाच्या आठवणींचं स्थान वेगळंच असतं.

त्या म्हणतात, "मी 70 आणि 80 वर्षांच्या लोकांशीही संवाद साधला आहे. त्यांपैकी अनेकजण आजही पहिल्या प्रेमाशी संबंधित आठवणींना त्यांच्या आयुष्यातील सर्वात स्पष्ट आणि महत्त्वाच्या आठवणी मानतात."

पहिलं प्रेम

फोटो स्रोत, Getty Images

त्यांच्या मते, अनेक लोकांसाठी पहिलं प्रेम हा केवळ भूतकाळातील एक अध्याय नसतो.

तो असा अनुभव असतो, जो अनेक वर्षे आणि कधी कधी अनेक दशके त्यांच्या मनात आणि भावविश्वात जिवंत राहतो.

जुन्या प्रेमाच्या आठवणी सध्याचं नातं कसं मजबूत करू शकतात?

जुन्या प्रेमाची आठवण काढणं म्हणजे नेहमीच हरवलेल्या नात्याची इच्छा असं नसतं. उलट ते सध्याचं नातं अधिक मजबूत बनवू शकतं.

ह्यूस्टन विद्यापीठातील प्राध्यापक अॅडम फेटरमन 'रोमँटिक नॉस्टॅल्जिया' या संकल्पनेवर संशोधन करतात. त्यांच्या मते, हा भूतकाळाविषयीचा प्रेमळ ओढा असतो, जो सध्याच्या नात्याच्या संदर्भात निर्माण होतो.

फेटरमन सांगतात की, नात्यातील खास क्षण पुन्हा अनुभवणं, उदाहरणार्थ, पहिल्या भेटीत पाहिलेला चित्रपट पुन्हा एकत्र पाहणं, लोकांना त्या आनंददायी भावना पुन्हा अनुभवायला मदत करतं.

त्यांच्या मते, जे लोक आपल्या नात्यातील अशा सामायिक आठवणींना वारंवार उजाळा देतात, त्यांना आपल्या जोडीदाराशी अधिक भावनिक जवळीक वाटते. त्यामुळे प्रेम आणि आपुलकीही वाढते.

पहिल्या नजरेतलं प्रेम आणि आठवणी

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

केट आणि गुन्टर यांची भेट 1989 मध्ये झाली. त्यावेळी दोघेही ब्रिटनमधील डेव्हॉन येथे सुट्टी घालवत होते. पहिल्याच भेटीत ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

मात्र, गुन्टरला जर्मनीला परत जावं लागलं. दोघांनी भेटी सुरू ठेवल्या आणि पत्रांद्वारे संपर्क कायम ठेवला. तरीही त्यांना एकत्र राहण्याचा मार्ग सापडला नाही.

केट सांगतात, "मी त्यांच्यासोबत राहू शकत नाही, हे सांगणं माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय होता."

सुमारे दोन वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी जड अंतःकरणाने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सुमारे 30 वर्षांनी केटला कपाटात गुन्टरची जुनी पत्रं सापडली आणि सर्व आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.

त्या म्हणतात, "मी सतत रडत राहिले. मग मला वाटलं, मी एका विलक्षण माणसाचं हृदय तोडलं आणि त्यामागचं कारणही कधी सांगितलं नाही."

त्यानंतर त्यांनी गुन्टरच्या कौटुंबिक व्यवसायाचा पत्ता शोधून त्यांना पत्र लिहिलं. त्यांना उत्तर मिळेल, अशी फारशी अपेक्षा नव्हती. पण गुन्टरने उत्तर दिलं.

"22 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजून 36 मिनिटांनी फोन वाजला. जर्मनीहून कॉल आला आहे हे पाहताच माझ्या हृदयाची धडधड वाढली," असं केट म्हणाल्या.

पहिलं प्रेम

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

दोघांनी तासन् तास संवाद साधला. काही आठवड्यांनी गुन्टर त्यांना भेटण्यासाठी मँचेस्टरला आले.

केट म्हणतात, "त्यांना पाहताच असं वाटलं, जणू आम्ही कधीच वेगळे झालो नव्हतो."

नंतर गुन्टर त्यांना त्या टेकडीवर घेऊन गेले, जिथे ते 30 वर्षांपूर्वी एकत्र चढले होते. तिथेच त्यांनी केटला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर दोघांनी विवाह केला.

केट म्हणतात, "आयुष्यात प्रत्येकाला दुसरी संधी मिळत नाही. पण आता जेव्हा मी त्यांच्याकडे पाहते, तेव्हा मला कोणत्याही गोष्टीची खंत वाटत नाही."

गुन्टरही याला सहमती देतात. ते म्हणतात, "आता मी त्यांना पुन्हा कधीच गमावणार नाही."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)