You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'एक चमत्कार'; व्हेनेझुएलातील भूकंपानंतर ढिगाऱ्याखाली 8 दिवस अडकलेल्या व्यक्तीची सुटका कशी झाली?
- Author, निकोल कोल्स्टर आणि व्हेनेसा सिल्वा
- Role, बीबीसी मुंडो
- Author, ला गुआइरा, व्हेनेझुएला आणि व्हेनेसा बुशश्ल्युटर,
- Role, बीबीसी न्यूज
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
व्हेनेझुएलामधील भूकंपांमुळे कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आठ दिवस अडकून पडलेल्या एका व्यक्तीची सुटका करण्यासाठी सात देशांतील मदत करणाऱ्या कार्यकत्यांनी 100 तासांहून अधिक काळ अखंड परिश्रम घेतले.
अंदाजे 40 वर्षांचे सुरक्षा रक्षक हर्नान गिल हे ला गुआइरा राज्यातील कातिया ला मार येथे तळघरातील एका छोट्याशा जागेत अडकून पडले होते.
त्यांना जिवंत असल्याचं शोध पथकाला पाच दिवसांनंतर कळलं आणि त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आणखी तीन दिवस लागले.
त्यांच्या पत्नीच्या मते, हा 'एक चमत्कार' आहे.
व्हेनेझुएला, चिली, कोस्टा रिका, एल साल्वाडोर, मेक्सिको, पोर्तुगाल आणि अमेरिका येथील पथकांनी गेल्या दोन दिवसांत त्यांना पाणी पुरवण्याचे आणि सुरक्षित मार्ग तयार करण्याचे काम केले.
"पाचव्या दिवशी आम्हाला ते सापडले. मदतकार्य करणाऱ्या पथकाच्या मदतीने आम्ही ते कुठे आहेत हे शोधू शकलो. आम्ही एक बोगदा तयार केला. त्यानंतर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला आणि कॅमेरा असलेली एक पाईप त्यांच्याजवळ पोहोचवली, ज्यामुळे त्यांची स्थिती पाहता आली," असे चिलीतून आलेले मदत कार्यकर्ते व्हिन्सेन्झो बोर्ग्ना यांनी बीबीसीला सांगितले.
"या कॅमेराऱ्याच्या मदतीने आम्ही एक नळी पोहोचवली आणि त्यामुळे त्यांना पाणी पुरवणे शक्य झाले," त्यांनी सांगितले.
अतिशय अस्थिर अशा ढिगाऱ्याखाली आणि नऊ मीटर खोल अडकूनही हर्नान यांनी धीर सोडला नाही. उलट, त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाच ते प्रोत्साहन देत होते.
"ही मोहीम अत्यंत गुंतागुंतीची आणि धोकादायक होती," असे बोर्ग्ना म्हणाले.
छोट्याशा जागेने वाचवला जीव
गिल हे कातिया ला मार येथील गॅलेरियास प्लाया ग्रांदे शॉपिंग सेंटरशेजारी असलेल्या पार्किंगच्या तळघरात काँक्रीटच्या एका छोट्या कक्षात होते.
24 जून रोजी व्हेनेझुएलाच्या या भागात 7.2 आणि 7.5 रिश्टर तीव्रतेचे सलग दोन भूकंप झाले तेव्हा ते तिथेच होते.
भूकंपाच्या वेळी भूमिगत असलेल्या त्या जागेमुळे त्यांना वेळेवर बाहेर पडता आले नाही. मात्र, याच छोट्या जागेने त्यांचे प्राण वाचवले.
"ती जागा जणू एखाद्या शवपेटीसारखी ठरली. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत ते पहिल्या काही दिवसांत जिवंत राहू शकले," असे मदतकार्य मोहिमेत सहभागी झालेल्या चिलीच्या अग्निशमन दलाचे समन्वय अधिकारी एझेकिएल गालार्डो यांनी बीबीसी मुंडोला सांगितले.
कोस्टा रिकाच्या रेड क्रॉसचे आपत्कालीन प्रतिसाद प्रमुख वॅग्नर लेईव्हा त्यांचा शोध लागल्याच्या क्षणाबद्दल सांगताना म्हणाले, "आम्ही काही काँक्रीटच्या स्लॅब कापत आणि हटवत होतो. तेव्हा कुणीतरी जिवंत असण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली.
आम्ही तळघरात गेलो. आमच्या एका सहकाऱ्याने आवाज दिला आणि प्रतिसाद ऐकला. त्यानंतर आम्हाला खात्री झाली की तिथे कुणीतरी जिवंत आहे."
100 तासांहून अधिक परिश्रम
गिल यांना बाहेर काढण्यासाठी आवश्यक असलेला मार्ग सोपा नव्हता, असे गालार्डो यांनी सांगितले.
त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी काँक्रीटचे स्लॅब अत्यंत काळजीपूर्वक फोडावे लागले, जेणेकरून त्यांच्यावर पुन्हा ढिगारा कोसळणार नाही.
"त्यांनी परिस्थितीचा चांगला सामना केला. आम्ही 72 तासांपेक्षा कमी काळात त्यांना 11 लिटर द्रवपदार्थ देऊ शकलो," असे बोर्ग्ना यांनी सांगितले.
ढिगाऱ्यामध्ये अडकलेल्या गिल यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या छोट्या कॅमेराने टिपलेल्या दृश्यांमध्ये एक चिलीचा अग्निशमन कर्मचारी त्यांना कॅमेऱ्याकडे चेहरा वळवण्यास सांगताना ऐकू येतो.
त्यांचा एक डोळा लाल झाला होता आणि त्यांनी मास्क घातला होता. मदत करणाऱ्यांनी तो आधीच एका छोट्या फटीतून त्यांच्यापर्यंत पोहोचवला होता, जेणेकरून मदतकार्यादरम्यान निर्माण होणाऱ्या धुळीपासून त्यांचे संरक्षण होईल.
अग्निशमन कर्मचाऱ्याने त्यांना डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल्स घालण्यासही सांगितले.
सुरक्षा कर्मचारी, स्वयंसेवक आणि मदत करणारे कार्यकर्ते अशा सुमारे 200 लोकांनी अखंड परिश्रम करून सुरक्षित मार्ग तयार केला.
वॅग्नर लेईव्हा यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले की, मदतकार्य अत्यंत धोकादायक असल्याने त्यांना अत्यंत सावधगिरीने आणि संथ गतीने काम करावे लागले.
"काल रात्री सुमारे दहा वाजता (स्थानिक वेळेनुसार) आम्हाला हर्नान यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधता आला."
गुरुवारी सकाळी, पहिला संपर्क प्रस्थापित झाल्यानंतर 100 तासांहून अधिक कालावधीनंतर गिल यांना चांगल्या शारीरिक स्थितीत बाहेर काढण्यात यश आले.
कोस्टा रिकाच्या रेड क्रॉसचे पॅरामेडिक अॅलन माद्रिगाल यांनी त्यांच्याशी काही शब्द बोलले.
"मी त्यांना एवढंच सांगितलं की, देवाने त्यांच्यासाठी काहीतरी मोठं उद्दिष्ट बाकी ठेवलेलं आहे," असे त्यांनी बीबीसी मुंडोला सांगितले.
'नखालाही धक्का नाही'
कोस्टा रिकाच्या रेड क्रॉसचे रिकार्डो एरियास यांनी सांगितले की, ढिगाऱ्याखालून सापडल्यावर गिल यांची प्रकृती स्थिर होती.
त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांच्या नखालाही इजा झाली नाही. मेक्सिकोच्या रेड क्रॉसचे मार्को अँटोनियो फ्रँको यांनी गिल यांचं वर्णन 'आनंदी स्वभावाचा माणूस' असं केलं.
सुटका होण्यापूर्वी त्यांनी मेक्सिकोतील मिलेनियो या वृत्तसंस्थेला सांगितले होते की, "त्यांनी स्वतःला आवडणाऱ्या विशिष्ट चवीच्या स्पोर्ट्स ड्रिंक्सची मागणी केली होती, आणि अर्थातच आम्ही ती त्यांच्यापर्यंत पोहोचवली."
"तेच आम्हाला धीर देत होते आणि पुढे काम करत राहण्याचं प्रोत्साहन देत होते. ते आमच्या पथकातील सदस्यांना ओळखायचे आणि म्हणायचे, 'तुम्ही पुन्हा आलात, माझ्यासोबत आहात, हे खूप छान आहे.'"
फ्रँको यांच्या मते, संपूर्ण मदतकार्य मोहिमेदरम्यान गिल आणि मदत करणाऱ्यांमध्ये त्यांच्या कुटुंबाबाबत आणि ही मोहीम किती अवघड आहे याबाबत सतत संवाद सुरू होता.
पॅरामेडिक अॅलन माद्रिगाल यांच्या मते, ही सुटका म्हणजे सामूहिक प्रयत्नांचं यश होतं.
"हे कोणत्याही एका पथकाचं यश नाही. आम्हाला अन्न आणि पाणी देणाऱ्या लोकांपासून सुरक्षाव्यवस्था, लॉजिस्टिक्स, शोध आणि मदत करणाऱ्या पथकांपर्यंत प्रत्येकाचा यात वाटा आहे. हे व्हेनेझुएलाच्या लोकांचं यश आहे," असे त्यांनी उत्साहाने सांगितले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.