You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'आता घरीही सुरक्षित वाटत नाही'; मुंबईत पतंग उडवून पॅलेस्टाईनला समर्थन दिलेल्या तरुणीची पोलीस चौकशीनंतर प्रतिक्रिया
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
"पॅलेस्टाईन समर्थनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने पोलिसांनी नियम न पाळता, कोणत्याही वॉरंटशिवाय घरात घुसून चौकशी केली. यामुळे आम्हाला आता घरीही सुरक्षित वाटत नाही."
पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ पतंग उडवण्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थी हर्षदा बोराडे यांचा हा आरोप आहे.
मुंबईतील वांद्रे परिसरात पॅलेस्टाईन आणि गाझातील मुलांच्या समर्थनार्थ पतंग उडवण्याचा कार्यक्रम 15 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.
पण या कार्यक्रमानंतर पोलिसांकडून आपली चौकशी आणि घराची झडती घेण्यात आल्याचा दावा हर्षदा यांनी केला आहे.
पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा अधिकृत वॉरंट न दाखवता आपल्या घरात प्रवेश केला, तसेच घरासह वैयक्तिक साहित्याची तपासणी केली, असा आरोप हर्षदा आणि त्यांच्या मैत्रिणींनी केला आहे.
तर या प्रकरणाची चौकशी कायद्याने ठरवून दिलेल्या प्रक्रियेनुसार सुरू आहे. कोणत्याही व्यक्तीला बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आलेले नाही, असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
गाझात पतंग उडवण्यावर बंदी?
गाझामधील स्थानिक नागरी समित्या आणि पालकांनी लहान मुलांच्या पतंग उडवण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे.
रॉयटर्स आणि अल जझीराच्या वृत्तांनुसार गाझातील मुलांनी उडवलेले काही साधे कागदाचे पतंग वाऱ्याच्या प्रवाहामुळे इस्रायली हद्दीत जाऊन पडले होते.
त्यामुळं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी याला सुरक्षेचा मोठा धोका मानत ज्या भागातून पतंग उडले, तिथे थेट हवाई हल्ले करण्याची आणि तो परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला.
युद्धग्रस्त गाझामध्ये छावण्यांमध्ये राहणाऱ्या मुलांच्या मनोरंजनाचे पतंगबाजी हे एकमेव साधन उरले होते. मात्र, संभाव्य इस्रायली लष्करी हल्ल्यांपासून मुलांचे प्राण वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि पालकांनी मुलांकडून पतंग जप्त केले आहेत.
दरम्यान, लहान मुलांच्या खेळाच्या वस्तूला लष्करी कारवाईचा बहाणा बनवण्याच्या इस्रायलच्या या भूमिकेवर संयुक्त राष्ट्रांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यानंतर या मुलांच्या समर्थनार्थ जगभर पॅलेस्टाईन समर्थनार्थ पतंग उडवण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
मुंबईतील नेमकं प्रकरण काय?
गाझामध्ये मुलांच्या पतंग उडवण्यावर आलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर, जगभरात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ 'ग्लोबल काइट वीकेंड' साजरा करण्याची हाक देण्यात आली होती.
या मोहिमेचा उद्देश गाझामधील मुलांशी एकता व्यक्त करणे आणि त्यांना पतंग उडवण्यावर घालण्यात आलेल्या निर्बंधांचा निषेध करणे हा होता.
या मोहिमेअंतर्गत पॅलेस्टाईन समर्थनार्थ असलेल्या जगभरातील नागरिकांना पतंग उडवण्याचे आवाहन करण्यात आले होते.
याच मोहिमेचा भाग म्हणून मुंबईतील 'इंडियन पीपल इन सॉलिडेरिटी विथ पॅलेस्टाईन' (IPSP) या गटाच्या माध्यमातून वांद्रे परिसरातील एका इमारतीच्या गच्चीवर पतंग उडवण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन 15 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते.
या कार्यक्रमात पॅलेस्टाईन आणि गाझामधील मुलांच्या समर्थनार्थ तरुण-तरुणी तसेच मुंबईत राहणारे सर्वसामान्य भारतीय नागरिक सहभागी झाले होते.
मात्र, या कार्यक्रमानंतर मुंबई पोलिसांनी आयोजक तसेच सहभागी तरुणी आणि तरुणांची चौकशी सुरू केली आहे.
काही तरुणींनी पोलिसांनी कोणत्याही वॉरंटशिवाय घरांची झडती घेतल्याचा आणि वैयक्तिक साहित्याची तपासणी केल्याचा आरोप केला आहे.
'आम्ही आमच्या घरात सुरक्षित नाही'
या उपक्रमानंतर मुंबई पोलिसांना आलेल्या तक्रारीनुसार आणि काही गुप्त माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी या कार्यक्रमासंदर्भात माहिती घेण्यासाठी आणि सहभागी झालेल्या व्यक्तींचा शोध सुरू केला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. कार्यक्रमस्थळी तसेच आयोजकांच्या घरीही पोलिसांनी चौकशी केली.
पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा अधिकृत वॉरंट न दाखवता आमच्या घरात प्रवेश केला आणि तपासणीच्या नावाखाली वैयक्तिक साहित्याची तसेच घराची झडती घेतली, असा दावा या कार्यक्रमात सहभागी झालेल्या तरुणींनी केला आहे.
पोलिसांच्या या चौकशीमुळे परिसरात आणि सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या उपक्रमात सहभागी झालेल्या हर्षदा बोराडे मुंबई विद्यापीठात समाजशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण घेत आहेत. मुंबईतील सांताक्रुझ येथे त्या इतर मुलींसोबत राहतात. त्या कलाकारदेखील आहेत.
विद्यार्थी चळवळीत त्या सहभागी असून, पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ गेल्या काही वर्षांपासून विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेत आहेत.
या कार्यक्रमानंतर 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सांताक्रुझ-कालीना येथील त्यांच्या निवासस्थानी पोलीस चौकशी आणि झडतीसाठी दाखल झाले होते. त्या तेथे इतर मुलींसोबत राहतात.
या कारवाईबाबत माहिती देताना हर्षदा म्हणाल्या, "आम्ही अत्यंत शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने या उपक्रमात सहभागी झालो होतो. मात्र, पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा अधिकृत कायदेशीर वॉरंट न दाखवता, सुरुवातीला महिला पोलीस सोबत नसताना आमच्या निवासस्थानी प्रवेश केला.
तपासणीसाठी आलेले पोलीस अधिकारी साध्या वेशात होते आणि त्यांनी सुरुवातीला आपली अधिकृत ओळखही जाहीर केली नाही. आम्ही तपासणीची नोटीस किंवा वॉरंट आहे का, याबाबत विचारणा केली तरीदेखील मध्यरात्री तीन वाजेपर्यंत तपासणी आणि चौकशी करण्यात आली."
हर्षदा म्हणाल्या, "चौकशीच्या नावाखाली आमच्या वैयक्तिक सामानाची तपासणी करण्यात आली. इतकेच नव्हे, तर या कार्यक्रमाशी कोणताही संबंध नसलेल्या माझ्या रूममधील इतर तरुणींच्या साहित्याची आणि मोबाईलचीही झडती घेण्यात आली.
तसेच, माझ्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांना धमकावण्यात आलं. कायदेशीर नियमांचे योग्य पालन न करता करण्यात आलेल्या या चौकशीमुळे आम्हाला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे."
पुढे हर्षदा म्हणाल्या, "कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब न करता प्रशासनाकडून अशा प्रकारे होणारी दडपशाही चिंताजनक आहे. या चौकशीचा आम्ही निषेध करतो. आम्ही विचार करून कोणत्याही गोष्टीवर बोलू शकत नाही, अशी परिस्थिती आता निर्माण करण्यात आली आहे.
पोलीस थेट काही नियम न पाळता, कोणत्याही वॉरंटशिवाय व्यक्तीच्या खासगी जागेत घुसतात. आता आम्हाला घरीही सुरक्षित वाटत नाही. पोलिसांच्या या सगळ्या त्रासामुळे आम्हा मुलींना घरमालकांनी घर खाली करण्यास सांगितले आहे."
कार्यक्रमात सहभागी नसतानाही साहित्याची चौकशी
हर्षदा यांच्या रूम पार्टनर आणि मैत्रीण पूजा चिंचोळे या पतंग उडवण्याच्या कार्यक्रमात सहभागी नव्हत्या. त्या सध्या आपल्या गावी गेलेल्या असतानाही, त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या वैयक्तिक साहित्याची आणि सामानाची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली, असे पूजा आणि हर्षदा यांनी सांगितले.
पोलिसांच्या या चौकशीवर आक्षेप घेत पूजा चिंचोळे यांनी सांगितले, "ज्या कार्यक्रमाशी माझा संबंध नाही, त्या प्रकरणात मी उपस्थित नसताना माझ्या खासगी मालमत्तेची आणि साहित्याची तपासणी कोणत्या कायदेशीर नियमांतर्गत करण्यात आली?
नागरिकांना राज्यघटनेने दिलेले वैयक्तिक स्वातंत्र्य आणि गोपनीयतेचा अधिकार याबाबत या कारवाईमुळे प्रश्न निर्माण होतो. पोलिसांच्या या कृत्याचा आम्ही निषेध करतो."
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या वांद्रे आणि माहीम येथील एका महिला आणि एका पुरुषाचीही याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये बोलावून पोलिसांनी चौकशी केली.
नाव जाहीर न करण्याच्या अटीवर या दोघांनी बीबीसी मराठीला या घटनेची माहिती दिली.
या दोघांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की, "आम्हाला स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. तीन तास आमची चौकशी करण्यात आली. त्यानंतर आम्हाला सोडून देण्यात आलं.
पण अशा कार्यक्रमात शांततेत आणि संविधानिक मार्गाने सहभागी झाल्यानंतर आम्ही कोणताही गुन्हा केला नाही. तरीदेखील अशा पद्धतीने चौकशी केल्याने आम्हाला त्रास झाला."
पोलीस प्रशासनाची भूमिका
या संपूर्ण प्रकरणावर आणि करण्यात आलेल्या आरोपांवर मुंबई पोलिसांच्या वतीने परिमंडळ 9 चे पोलीस उपायुक्त (डीसीपी) मोहित कुमार गर्ग यांनी प्रशासनाची बाजू स्पष्ट केली आहे.
मोहित गर्ग यांनी सांगितलं की, "या प्रकरणाची चौकशी कायद्याने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार सुरू आहे. कोणत्याही व्यक्तीला बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आलेले नाही."
या घटनेमुळे मुंबईत पॅलेस्टाईन समर्थक उपक्रमांवर पोलिसांकडून ठेवली जाणारी नजर आणि नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन यावर आता उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
मात्र, पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ कार्यक्रमात सहभागी झालेल्या तरुणी आणि तरुण या अयोग्य कार्यवाहीविरोधात नाराजी व्यक्त करत आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.