You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'शिकले नसते तर मलाही ऊसतोडीला जावं लागलं असतं'; कातकरी समाजाच्या सपना वाघमारेचा लंडनपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
"आज जर मी शिकले नसते, तर मलाही ऊसतोडीसाठी जावं लागलं असतं…"
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एका छोट्याशा आदिवासी वाडीवर वाढलेल्या तरुणीचे हे शब्द आहेत. या एका वाक्यामागे केवळ तिचा संघर्ष नाही, तर संपूर्ण कातकरी समाजाचं वास्तव दडलं आहे.
ही कहाणी आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील चिंचवली गावातील सपना राजेश वाघमारे हिची. कातकरी समाजातील ही तरुणी आता उच्च शिक्षणासाठी थेट लंडनला जाणार आहे.
आदिवासी विकास विभागाच्या ग्लोबल स्कॉलरशिप प्रोग्रामअंतर्गत तिला परदेशात उच्च शिक्षणाची संधी मिळाली आहे. इंग्लंडमधील नामांकित युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स आणि क्वीन मेरी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथे एलएलएमसाठी तिची निवड झाली आहे.
कातकरी समाजातून वकील होणारी आणि परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणारी ती पहिलीच विद्यार्थिनी असल्याचं समाजातील लोक सांगतात. चिंचवलीच्या छोट्याशा आदिवासी वाडीपासून सुरू झालेला हा प्रवास आता थेट लंडनपर्यंत पोहोचला आहे.
खडतर परिस्थितीत पूर्ण केलं एलएलबीचं शिक्षण
रोहा तालुक्यातील चिंचवली आदिवासी वाडी येथील 25 वर्षीय सपना राजेश वाघमारे हिचं एलएलबीपर्यंत शिक्षण पूर्ण झालेलं आहे. नुकतीच तिने सनद घेण्यासाठी परीक्षा दिली आहे. तर पुढील एलएलएम शिक्षणासाठी ती लंडन विद्यापीठात जाणार आहे.
मात्र, सपनाचा शिक्षणाचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता.
लहानपणी आई-वडील ऊसतोडीच्या मजुरीसाठी स्थलांतरित झाल्यानंतर ती आजी-आजोबा आणि मामाकडे राहिली.
अत्यंत कठीण परिस्थितीत तिने रोहा येथील संतोषनगर जिल्हा परिषद शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण घेतलं.
त्यानंतर माणगाव तालुक्यातील उतेखोल येथील वनवासी कल्याण आश्रमशाळेत 5वी ते 10वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं.
पुढील शिक्षणासाठी ती पुण्यात गेली. उदरनिर्वाहासाठी खासगी नोकरी करत तिने पुण्यातील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं.
आता आदिवासी विकास विभागाच्या ग्लोबल स्कॉलरशिप प्रोग्रामअंतर्गत तिला उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली आहे.
इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स आणि क्वीन मेरी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन या दोन्ही विद्यापीठांकडून तिला कंडिशनल ऑफर लेटर मिळाले आहेत.
प्रवेशासाठी लागणाऱ्या काही कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण होईल. यानंतर संबंधित युनिव्हर्सिटीचे अनकंडिशनल ऑफर लेटर मिळेल आणि त्यानंतर मला तिकडे शिक्षणासाठी जाता येईल, असं तिने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
'मीही ऊसतोडीला गेले असते'
कातकरी समाजातील अनेक कुटुंबं आजही वीटभट्ट्या, कोळसा भट्ट्या, ऊसतोड आणि इतर मजुरीच्या कामांसाठी सतत स्थलांतर करत असतात.
सपनाचे आई-वडीलही कामासाठी बाहेर जात असत. अशा स्थलांतरामुळे अनेक मुलांचं शिक्षण अर्धवट राहतं. सपनाच्याही आयुष्यात हीच परिस्थिती होती.
आई-वडिलांच्या स्थलांतरानंतर तिचं शिक्षण थांबण्याची भीती होती. मात्र, वाडीत शेजारी राहणाऱ्या आजी-आजोबा आणि मामांनी तिच्यासह भावंडांची जबाबदारी घेतली. त्यांच्या आधारामुळेच तिचं शिक्षण सुरू राहिलं.
बीबीसी मराठीशी बोलताना सपना म्हणाली, "माझे आई-वडील कामासाठी बाहेर जायचे. मला मामाकडे सोडून गेले. आजी-आजोबा आणि मामा-मामी यांनी मला वाडीत ठेवून शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं. आश्रमशाळेत पाठवलं आणि पुढील शिक्षण दिलं. त्यामुळे मी एलएलबीपर्यंत शिक्षण पूर्ण करू शकले."
"समाजातील लोक मजुरीसाठी स्थलांतर करतात आणि त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होतो. माझ्याही बाबतीत तसंच होऊ शकत होतं. पण आजोबांनी आणि मामांनी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे सतत सांगितलं. त्यामुळे शिक्षणाची आवड वाढत गेली. मी शिकले नसते, तर मीदेखील ऊसतोडीसाठी गेले असते," असंही ती नमूद करते.
समाजातील वास्तवानेच वकील बनवलं
12वीनंतर सपना नोकरीसाठी पुण्यात गेली. मात्र, मर्यादित शिक्षणाची खंत तिच्या मनात कायम होती.
समाजातील परिस्थिती आणि काहीतरी वेगळं करण्याची जिद्द यामुळे तिने कायद्याचं शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.
मित्र-मैत्रिणींकडून माहिती घेत तिने प्रवेश परीक्षा दिली आणि एलएलबीसाठी प्रवेश घेतला. नोकरी करतानाच तिने 3 वर्षांचा कायद्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
सपनाने कायद्याचं शिक्षण केवळ करिअरसाठी निवडलं नाही. त्यामागे समाजातील महिलांवर होणारे अत्याचार आणि अन्यायाचं वास्तव होतं.
ती म्हणाली, "आमच्या समाजात महिलांवर खूप अत्याचार होतात. पण त्या कोणाला सांगत नाहीत. सगळं मनातच ठेवतात. त्यांच्या समस्या मांडण्यासाठी समाजात कोणी वकील नाही. अनेक महिला स्वतःची बाजूही मांडू शकत नाहीत. मला त्यांच्या भाषेत त्यांच्याशी संवाद साधायचा आहे आणि त्यांच्यासाठी काम करायचं आहे. त्यामुळे मला वकील व्हावंसं वाटलं."
"रायगड जिल्ह्यातील कातकरी समाजातील पहिली महिला वकील होण्याचा मान सपनाने मिळवला आहे. आता परदेशात कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी जाणारी ती समाजातील पहिली महिला ठरत आहे," असं समाजात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आणि लोक सांगतात.
'समाजात शिक्षणापेक्षा बालविवाह जास्त दिसतात'
रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर आणि राज्यातील इतर अनेक भागांमध्ये कातकरी समाज आजही अत्यंत उपेक्षित परिस्थितीत जीवन जगत आहे.
हा समाज अनेक वर्षांपासून वीटभट्ट्या, कोळसा भट्ट्या, ऊसतोड आणि इतर मजुरीच्या कामांसाठी सतत स्थलांतर करत आला आहे. या भटक्या जीवनशैलीचा सर्वाधिक परिणाम मुलांच्या शिक्षणावर होतो.
त्यामुळे शिक्षण अर्धवट राहणं, बालविवाह, व्यसनाधीनता आणि महिलांवरील अत्याचार यांसारखे प्रश्न आजही मोठ्या प्रमाणात आहेत.
अशा परिस्थितीत या समाजातील एका मुलीने उच्च शिक्षण घेऊन थेट लंडनपर्यंत मजल मारणं ही केवळ तिची वैयक्तिक यशोगाथा नाही, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी बाब ठरत आहे.
सपना स्वतःच्या समाजाविषयी अभिमानाने बोलते, पण त्याचवेळी वास्तवही मांडते.
ती म्हणाली, "मला अभिमान आहे की मी कातकरी समाजाची आहे. पण दुःखही होतं की आमच्या समाजात व्यसनाचं प्रमाण खूप जास्त आहे. लोक ऊसतोडीला, कोळसा भट्ट्यांवर जातात. मुलांचं शिक्षण पूर्ण होत नाही. आमच्या समाजात बालविवाह मोठ्या प्रमाणात होतात. मुलीनं थोडं शिक्षण घेतलं की, तिचं लग्न लावून दिलं जातं."
त्यामुळे कातकरी समाजातील अनेक मुलींसाठी शिक्षण अजूनही मर्यादित स्वप्न ठरत आहे. अशा परिस्थितीत सपनाची लंडनपर्यंतची झेप अनेकांसाठी आशेचा किरण बनली आहे.
सपना सांगते, "माझ्यासाठी शिक्षण म्हणजे केवळ पदवी नव्हती. ते घर, समाज आणि आयुष्य बदलण्याचं साधन होतं."
'समाजासाठी काम करेल आणि बदल नक्की होईल'
सपनाच्या यशामागे तिचे मामा भिवा पवार यांची मोठी भूमिका आहे. भिवा पवार हे स्वतः शिक्षक आहेत आणि वनवासी कल्याण आश्रमाशी संबंधित आहेत.
स्वतःच्या मुलांप्रमाणेच त्यांनी मजुरीसाठी स्थलांतरित बहिणीच्या मुलांचं शिक्षणही महत्त्वाचं मानलं.
बीबीसी मराठीशी बोलताना भिवा पवार म्हणाले, "कातकरी समाज अत्यंत मागासलेला मानला जातो. व्यसन, निरक्षरता आणि बालविवाहाचं प्रमाण मोठं आहे. अशा समाजात प्रेरणा देणारं व्यक्तिमत्त्व तयार व्हावं, ती शिक्षणात हुशार असल्याने आम्ही तिला शिक्षण दिलं."
"महाराष्ट्रातील कातकरी समाजातील पहिली मुलगी वकील झाली आणि आता ती परदेशात शिक्षण घेणार आहे. ती शिक्षण पूर्ण करून परत आल्यानंतर समाजासाठी काम करेल. त्यामुळे समाजात नक्कीच बदल दिसेल," असं ते सांगतात.
लंडननंतरचा पुढचा प्रवास
लंडनमधून शिक्षण पूर्ण करून परतल्यानंतर समाजासाठी काम करण्याची इच्छा सपना व्यक्त करते.
ती म्हणाली, "मला आपल्या लोकांसाठी काम करायचं आहे. मजुरीसाठी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांसाठी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, बालविवाह रोखण्यासाठी, महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी आणि समाजात साक्षरतेचं प्रमाण वाढवण्यासाठी काम करायचं आहे. समाजातील लोकांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करायचं आहे."
पिढ्यानपिढ्या एका व्यवस्थेत अडकलेल्या समाजातून आलेली सपना आता थेट लंडनमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणार आहे. तिची ही झेप केवळ वैयक्तिक यश नाही, तर संपूर्ण कातकरी समाजासाठी नव्या बदलाची आशा मानली जात आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)