हर्निया घरगुती उपायांनी बरा होतो का? उपचार टाळल्याने महिलेवर कसं ओढावलं मोठं संकट?

फोटो स्रोत, Getty Images
पाच महिने जांघेजवळ सूज येत होती, पोटात अस्वस्थ वाटत होतं. त्याबरोबर पोट फुगणं, बद्धकोष्ठता असे त्रास होत होतेच. मुंबईतल्या मीना पाटील (नाव बदललं आहे) यांची ही गोष्ट. 55 वर्षाच्या मीना यांनी हे सगळे त्रास सुरू झाल्यावर डॉक्टरांचा सल्ला घेण्याऐवजी स्वतःच घरी उपचार करायचं ठरवलं. कधी हर्बल सप्लिमेंट्स घ्या, कधी एरंडाच्या तेलानं शेका असे उपचार त्या करत राहिल्या. पण यामुळे त्यांची स्थिती सुधारण्याऐवजी अधिकच बिघडली. त्यांना स्ट्रँग्युलेटेड फेमोरल हर्निया हा आजार झाला होता. त्यांच्यावर आपत्कालिन शस्त्रक्रिया करावी लागली मगच त्यांची यातून सुधारणा झाली.
मीना यांना डिसेंबर 2025 मध्ये मांडीच्या वरच्या भागात लहानशी सूज दिसल्याचे लक्षात आलं. ही सूज अधूनमधून दिसत असे आणि झोपल्यावर कमी होत होत असल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
जानेवारीपासून त्यांना पोटात अस्वस्थता, पोट फुगणं आणि बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवू लागला ; मात्र तो अपचनामुळे होत असल्याचे त्यांनी गृहीत धरले. फेब्रुवारीनंतर ही लक्षणं दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण करू लागली.
वेदना आणि अस्वस्थता वाढत असतानाही त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेण्याऐवजी विविध घरगुती उपचारांचा आधार घेतला. वेदना कमी करण्यासाठी एरंडेल तेलाच्या पट्ट्या, ओव्याचे गरम शेक तसेच त्रिफळा, बडीशेप, आले आणि ओवा यांच्या मिश्रणाचे सेवन केलं. याशिवाय कोरफडीचा रस, हळदीचे दूध, मेथीचं पाणी, जिरे-धणे काढा, अश्वगंधा सप्लिमेंट्स, लसूण घातलेलं कोमट पाणी आणि हिंगाचे पाणी यांचाही वापर केला. त्यांनी जड वस्तू उचलणं टाळलं, पोटाभोवती घट्ट कापड बांधले आणि तेलानं मालिशही केलं; मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही.
एप्रिलमध्ये ही सूज अधिक वाढत गेली आणि चालताना, खोकताना, घरातील कामे करताना किंवा शौचाच्या वेळी ताण दिल्यास त्यांना तीव्र वेदना होऊ लागल्या.
अखेर 2 मे रोजी वेदना असह्य झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. अपर्णा गोविल भास्कर म्हणाल्या, "या रुग्णाला तीव्र पोटदुखी, सतत उलट्या, पोट फुगणे, शौचास त्रास होणे आणि जांघेच्या भागात कठीण व वेदनादायक गाठ अशी लक्षणं होती. तपासणी आणि अल्ट्रासाऊंड तसेच सीटी स्कॅनमध्ये स्ट्रँग्युलेटेड फेमोरल हर्नियामुळे आतड्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्याचे निदान झाले. फेमोरल हर्निया हा प्रामुख्याने महिलांमध्ये दिसून येतो. वाढते वय, लठ्ठपणा, दीर्घकालीन बद्धकोष्ठता, वारंवार ताण येणे, पोटाचे स्नायू कमकुवत होणे आणि जड शारीरिक कामे ही त्याची जोखीम वाढवणारी कारणं आहेत."
त्या पुढे म्हणाल्या, "या रुग्णामध्ये हर्नियाची समस्या अनेक महिने उपचारांशिवाय राहिल्याने आतड्याचा भाग स्नायूंच्या कमकुवत भागात अडकला. सुरुवातीला ही अवस्था इन्कार्सरेशन म्हणून ओळखली जाते. त्यानंतर त्या अडकलेल्या भागाचा रक्तपुरवठा कमी होऊ लागला आणि स्ट्रँग्युलेशन निर्माण झाले. त्यामुळे तीव्र वेदना, उलट्या, पोट फुगणे आणि आतड्यांचा अडथळा निर्माण झाला. आणखी विलंब झाला असता तर आतड्याचा भाग निकामी होणे, गँगरीन, गंभीर संसर्ग किंवा सेप्सिससारख्या जीवघेण्या गुंतागुंती उद्भवल्या असत्या."
त्यांची गंभीर अवस्था लक्षात घेऊन 4 मे रोजी तातडीने लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान अडकलेले आतडे मोकळे करून त्याचा रक्तपुरवठा पूर्ववत करण्यात आला. तसेच पुन्हा हर्निया होऊ नये म्हणून जाळी (मेश) बसवून कमकुवत झालेले स्नायू मजबूत करण्यात आले. जवळपास दोन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेमुळे आतड्याचे कायमस्वरूपीचे नुकसान टाळणे शक्य झाले.
मीना यांच्यावर शस्त्रक्रिया होऊन त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली असली तरी हर्नियासारख्या आजाराकडे दुर्लक्ष करू नये आणि घरगुती उपचारांवर विसंबून राहू नये हे यातून अगदी ठळकपणे दिसतं. त्यामुळे हर्नियाची संपूर्ण माहिती आणि हर्नियाच्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी याची माहिती असणं आवश्यक आहे.
हर्निया म्हणजे काय?
हर्निया म्हणजे पोटाच्या भिंतीतील कमकुवत भागातून आतड्याचा किंवा इतर ऊतींचा काही भाग बाहेर येऊन सूज किंवा फुगवटा तयार होणे.
काही व्यक्तींमध्ये पोटाच्या भिंती जन्मजात कमकुवत असतात, तर काहींमध्ये वय वाढणे, लठ्ठपणा, गर्भधारणा, दीर्घकालीन खोकला, बद्धकोष्ठता, वारंवार जड वजन उचलणे किंवा पूर्वी झालेल्या पोटावरील शस्त्रक्रियेमुळे कालांतराने ती कमकुवत होते.
पोटातील वाढलेला दाब या कमकुवत भागांवर ताण निर्माण करतो आणि त्यामुळे ऊती बाहेर फुगून येतात.
हर्नियाचे सर्वाधिक आढळणारे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत:
- इंग्वायनल (Inguinal) हर्निया – जांघेच्या भागात होणारा आणि सर्वाधिक सामान्य प्रकार.
- फेमोरल (Femoral) हर्निया – मांडीच्या वरच्या भागात होणारा.
- अंबिलिकल (Umbilical) हर्निया – नाभीच्या आसपास होणारा.
- इन्सिजनल (Incisional) हर्निया – पूर्वी झालेल्या शस्त्रक्रियेच्या जखमेच्या ठिकाणी निर्माण होणारा.
- एपिगॅस्ट्रिक (Epigastric) हर्निया – पोटाच्या वरच्या भिंतीत होणारा.

फोटो स्रोत, Getty Images
याशिवाय हायटल (Hiatal) हर्निया हा आणखी एक प्रकार असून त्यामध्ये पोटाचा काही भाग डायफ्राममधून छातीच्या पोकळीत सरकतो. हा प्रकार पोटाच्या भिंतीवरील हर्नियापेक्षा वेगळा असून त्याचे निदान आणि उपचारही वेगळे असतात.
हर्नियाची लक्षणं कोणती?
हर्नियाचे प्रमुख लक्षण म्हणजे सूज किंवा फुगवटा. हा फुगवटा उभं राहिल्यावर, खोकताना किंवा जोर लावताना अधिक स्पष्ट दिसतो आणि झोपल्यावर अनेकदा कमी होतो.
काही रुग्णांमध्ये खालील लक्षणे दिसू शकतात:
- सौम्य वेदना
- अस्वस्थता
- जडपणा जाणवणे
- प्रभावित भागात ओढल्यासारखे वाटणे

फोटो स्रोत, Getty Images
काही रुग्णांमध्ये सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मात्र खालील परिस्थितीत तातडीने वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे:
- सूज अचानक खूप दुखू लागणे
- फुगवटा घट्ट होणे किंवा स्पर्शाने वेदना होणे
- फुगवटा आत ढकलता न येणे
- पूर्वी आत जाणारी सूज किंवा गाठ आता आत न जाणे
- तीव्र पोटदुखी
- मळमळ किंवा उलट्या
- पोट फुगणे
- ताप येणे
- सूज आलेल्या भागावर लालसरपणा दिसणे
ही लक्षणे इन्कार्सरेटेड (Incarcerated) किंवा स्ट्रँग्युलेटेड (Strangulated) हर्निया दर्शवू शकतात. अशा वेळी अडकलेल्या ऊतींना रक्तपुरवठा बंद होतो आणि ही शस्त्रक्रियेची तातडीची परिस्थिती असते.

फोटो स्रोत, Getty Images
हर्नियाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं, त्याचं वेळीच निदान झालं नाही तर गुंतागुंत निर्माण होते. त्यातही घरगुती उपायांवर विसंबून राहिलं तर मोठं नुकसान होऊ शकतं.
काही घरगुती उपायांमुळे बद्धकोष्ठतेसारख्या तक्रारींमध्ये तात्पुरता आराम मिळू शकतो; मात्र हर्निया बरा होत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
बहुतेक प्रौढांमधील हर्निया स्वतःहून बरा होत नाही, कारण पोटाच्या भिंतीतील कमजोरी नैसर्गिकरीत्या भरून येत नाही. उपचार न केल्यास बहुतेक हर्निया हळूहळू मोठे होतात आणि त्रास वाढतो, असं डॉ. संजय सोनार सांगतात.
डॉ. संजय सोनार हे मुंबई सेंट्रल इथल्या वोकहार्ट हॉस्पिटल्समध्ये जनरल सर्जरी व लॅप्रोस्कोपी विभागात सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. सोनार सांगतात, "हर्नियाचं निदान प्रामुख्याने क्लिनिकल तपासणीद्वारे केलं जातं. शल्यचिकित्सक रुग्णाला उभे करून सूजेची तपासणी करतात आणि खोकण्यास किंवा जोर लावण्यास सांगतात, त्यामुळे हर्निया अधिक स्पष्ट दिसतो."
ते सांगतात,
निदानाबाबत शंका असल्यास किंवा हर्निया लहान असल्यास पुढील तपासण्या सुचवल्या जाऊ शकतात:
- अल्ट्रासाऊंड
- सीटी स्कॅन
पुन्हा नव्याने झालेल्या, गुंतागुंतीच्या किंवा निदानास कठीण असलेल्या हर्नियामध्ये या तपासण्या विशेष उपयुक्त ठरतात आणि शस्त्रक्रियेचे नियोजन करण्यास मदत करतात, असं डॉ. सोनार सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
हर्नियातून उद्भवणाऱ्या गुंतागुंतीबद्दल डॉ. संजय सोनार अधिक माहिती देतात.
ते सांगतात, "हर्नियाकडे दुर्लक्ष केल्यास कालांतराने गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. सुरुवातीला हर्नियाची सूज किंवा फुगवटा आकाराने वाढतो आणि त्यामुळे अस्वस्थता, वेदना तसेच दैनंदिन कामांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. या आजारातील सर्वात गंभीर गुंतागुंत म्हणजे इन्कार्सरेशन आणि स्ट्रँग्युलेशन. इन्कार्सरेशनमध्ये बाहेर आलेला आतड्याचा किंवा ऊतींचा भाग पुन्हा आत ढकलता येत नाही, तर स्ट्रँग्युलेशनमध्ये त्या अडकलेल्या भागाचा रक्तपुरवठा बंद होतो. रक्तपुरवठा थांबल्याने ऊतींचा मृत्यू होऊ शकतो, आतड्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, गंभीर संसर्ग होऊ शकतो आणि काही प्रसंगी रुग्णाचा जीवही धोक्यात येऊ शकतो. अशा परिस्थितीत तातडीने शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र हर्नियाचे निदान वेळेत होऊन योग्य उपचार घेतल्यास नियोजित पद्धतीने शस्त्रक्रिया करता येते, रुग्ण लवकर बरा होतो आणि गंभीर गुंतागुंतींचा धोका मोठ्या प्रमाणात टाळता येतो."
हर्नियावर उपचार काय?
बहुतेक हर्नियासाठी शस्त्रक्रिया हा कायमस्वरूपी आणि प्रभावी उपचार आहे.
रुग्णाची प्रकृती, हर्नियाचा आकार व स्थान यानुसार पुढील शस्त्रक्रिया पद्धती वापरल्या जातात:
- ओपन शस्त्रक्रिया
- लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया
- रोबोटिक सहाय्याने शस्त्रक्रिया
बहुतेक पोटाच्या भिंतीवरील हर्नियामध्ये कमकुवत भाग मजबूत करण्यासाठी सर्जिकल जाळी (Surgical Mesh) वापरली जाते, त्यामुळे हर्निया पुन्हा होण्याचा धोका कमी होतो.

फोटो स्रोत, Getty Images
स्ट्रँग्युलेटेड हर्नियाच्या निदानासाठी शारीरिक तपासणीबरोबरच अल्ट्रासाऊंड, सीटी स्कॅन आणि काही वेळा रक्त चाचण्यांची मदत घेतली जाते. अशा परिस्थितीत लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया प्रभावी ठरू शकते. या पद्धतीत लहान छिद्रांद्वारे हर्नियाची दुरुस्ती केली जाते, त्यामुळे वेदना आणि रक्तस्राव कमी होतो, रुग्णालयात कमी दिवस राहावे लागतात आणि रुग्ण लवकर बरा होतो. वेळेत उपचार झाल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येते आणि रुग्ण काही आठवड्यांत पुन्हा नियमित आयुष्य जगू शकतो.
फेमोरल हर्निया म्हणजे काय? महिलांनी काय काळजी घ्यायची?
फेमोरल हर्निया हा हर्नियाचा तुलनेने दुर्मिळ, पण फेमोरल कॅनॉल हा मार्ग अरुंद असल्यामुळे ऊती अडकण्याचा आणि रक्तपुरवठा बंद होण्याचा धोका अधिक असलेला प्रकार मानला जातो. यामध्ये आतड्याचा काही भाग किंवा चरबीच्या ऊती जांघेच्या मुळाजवळील भागाखाली असलेल्या फेमोरल कॅनॉलमधील कमकुवत जागेतून बाहेर येतात.
इन्ग्वायनल हर्नियाच्या तुलनेत हा प्रकार कमी प्रमाणात आढळतो, मात्र ज्या अरुंद मार्गातून या ऊती बाहेर येतात, त्यात त्या अडकण्याची आणि त्यांचा रक्तपुरवठा बंद होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे फेमोरल हर्निया अधिक गंभीर मानला जातो.
एकूण हर्निया पुरुषांमध्ये अधिक आढळतात; मात्र फेमोरल हर्निया हा प्रकार तुलनेने महिलांमध्ये अधिक दिसून येतो. पेल्विक फ्लोअरमधील फरकामुळे फेमोरल हर्निया महिलांमध्ये तुलनेने जास्त दिसून येतो. विशेषतः जांघेच्या मुळाजवळील भागात सूज, वेदना किंवा अस्वस्थता जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.

फोटो स्रोत, Getty Images
वरती नमूद केलेल्या रुग्ण मीना पाटील यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी अधिक माहिती दिली. त्या मुंबईतल्या मेटाहिल क्लिनिक येथे लॅप्रोस्कोपिक आणि बॅरियाट्रिक सर्जन आहेत.
बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "महिलांमध्ये फेमोरल हर्नियाचा धोका अधिक असण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे ओटीपोट नैसर्गिकरित्या अधिक रुंद असते. परिणामी फेमोरल कॅनॉलचे आकारमान तुलनेने मोठे असते. गर्भधारणा, प्रसूती, लठ्ठपणा, दीर्घकालीन बद्धकोष्ठता, सततचा खोकला आणि वाढते वय यांमुळे या भागातील ऊती कमकुवत होऊ शकतात आणि हर्नियाचा धोका वाढू शकतो."
त्या पुढं सागंतात, "सुरुवातीच्या टप्प्यात हर्निया 'रिड्युसेबल' असू शकतो, म्हणजे बाहेर आलेला भाग पुन्हा आत ढकलता येतो. मात्र कालांतराने हा भाग फेमोरल कॅनॉलमध्ये अडकू शकतो. या अवस्थेला 'इन्कार्सरेशन' म्हणतात. पुढे अडकलेल्या भागाचा रक्तपुरवठा बंद झाल्यास 'स्ट्रँग्युलेटेड फेमोरल हर्निया' निर्माण होतो. ही अत्यंत गंभीर आणि जीवाला धोका निर्माण करणारी स्थिती असून तातडीच्या शस्त्रक्रियेची गरज भासते. उपचारास विलंब झाल्यास आतड्याला गँगरीन होणे, छिद्र पडणे, गंभीर संसर्ग, सेप्सिस किंवा मृत्यूचाही धोका निर्माण होऊ शकतो."

फोटो स्रोत, Getty Images
घरगुती उपचारांवर विसंबून राहाणाऱ्या रुग्णांना त्या महत्त्वाचा सल्ला देतात.
डॉ. अपर्णा सांगतात, "घरगुती उपाय, हर्बल सप्लिमेंट्स किंवा जीवनशैलीतील बदलांमुळे हर्निया पूर्णपणे बरा होत नाही. वजन नियंत्रणात ठेवणे, बद्धकोष्ठता टाळणे किंवा जड वजन उचलणे टाळणे यामुळे लक्षणांमध्ये काही प्रमाणात आराम मिळू शकतो, मात्र हर्नियावरील कायमस्वरूपी आणि प्रभावी उपचार म्हणजे शस्त्रक्रिया. हर्नियाची सूज कडक होणे, तीव्र वेदना होणे, सूज आत न जाणे, मळमळ, उलट्या, ताप, पोट फुगणे किंवा शौचास त्रास होणे ही धोक्याची लक्षणे मानली जातात आणि अशावेळी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते."
जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल, औषधे घ्यायची असतील तर तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.
आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे. डॉक्टरांना न दाखवता स्वतःच उपचार करणे धोकादायक ठरू शकते.
(सूचना : हा लेख केवळ माहितीस्तव आहे. आरोग्यासंबंधी कोणताही निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे आवश्यक आहे.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

























