भारतीय खलाशांच्या मृत्यू प्रकरणी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचं वक्तव्य भारतासाठी 'इशारा' आहे का?

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आखातात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्यावर भारतानं अमेरिकेकडे निषेध नोंदवला, मात्र अमेरिकेच्या ताज्या वक्तव्यामुळे वाद आणखी वाढला आहे
Published
वाचन वेळ: 7 मिनिटे

ओमानच्या आखातात 3 भारतीय खलाशांच्या मृत्यूसंदर्भात अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी केलेल्या ताज्या वक्तव्यामुळे भारतात संताप निर्माण झाला आहे.

भारतातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि डिप्लोमॅटिक विषयांच्या जाणकारांनी हा भारतासाठी इशारा असल्याचं म्हटलं आहे.

अमेरिकेच्या नौदलानं 9 जूनला केलेल्या हल्ल्याची पुष्टी अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनंच (सेंटकॉम) केली होती. त्यानंतर भारताने अमेरिकेकडे यासंदर्भात निषेध नोंदवला. भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या विषयावर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी चर्चा केली.

जयशंकर म्हणाले की, या चर्चेत त्यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांकडे तीव्र निषेध नोंदवला आणि सांगितलं की याप्रकारे 'प्राणघातक हल्ला करणं योग्य' नाही.

त्यानंतर शनिवारी (13 जून) अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं एस जयशंकर आणि रुबिओ यांच्यात झालेल्या चर्चेची माहिती दिली.

यानुसार रुबिओ म्हणाले की, आखाती प्रदेशात अमेरिकेनं केलेल्या नाकेबंदीचं उल्लंघन करणं आणि इराणच्या कच्च्या तेलाची बेकायदेशीर वाहतूक करणं खपवून घेतलं जाणार नाही.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं शनिवारी (13 जून) वक्तव्य जारी करत म्हटलं, "परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतील ताज्या घडामोडींवर चर्चा केली."

मार्को रुबिओ यांनी केलेल्या या वक्तव्यावर भारतात कठोर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विरोधी पक्ष आणि माजी मुत्सद्द्यांनी म्हटलं आहे की, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी खेद व्यक्त करण्याऐवजी कठोर भाषेचा वापर केला आहे.

अमेरिकेच्या सैन्यानं 9 जूनला ओमानच्या समुद्रकिनाऱ्याजवळ 'सेटेबेलो' या व्यावसायिक जहाजावर हल्ला केला होता. या जहाजावर 24 भारतीय खलाशी होते. त्यापैकी 21 खलाशांना वाचवण्यात आलं होतं, तर 3 खलाशांचा मृत्यू झाला होता.

ही काही पहिलीच घटना नव्हती. याआधी 8 जून आणि 11 जूनला देखील आखाती प्रदेशात भारतीय खलाशी असलेल्या आणखी 2 जहाजांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात कोणाचाही मृत्यू झाला नाही. सर्व खलाशांना वाचवण्यात आलं होतं.

मार्को रुबिओ काय म्हणाले?

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वक्तव्यानुसार, "अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी (एस जयशंकर यांच्याबरोबरच्या चर्चेत) भर दिला की, सर्व व्यावसायिक जहाजांनी अमेरिकेच्या सैन्याच्या आदेशांचं लगेचच पालन केलं पाहिजे. कारण ते या सामुद्रधुनीत शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी प्रयत्न करत आहेत."

"अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या गोष्टीवर भर देत म्हटलं की, अमेरिकेनं केलेल्या नाकेबंदीचं उल्लंघन करणं आणि इराणच्या कच्च्या तेलाची बेकायदेशीर वाहतूक करणं खपवून घेतलं जाणार नाही."

याच्या आधी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीदेखील या चर्चेबद्दल एक्स या सोशल मीडियावर माहिती दिली होती.

मोदी - ट्रंप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकमेकांना मित्र म्हणवतात, मात्र अमेरिकेच्या वक्तव्यांमुळे अनेकदा भारताला अस्वस्थ केलं आहे

फोनवर झालेल्या या चर्चेबद्दल भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एक्सवर लिहिलं, "12 जूनला संध्याकाळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी चर्चा झाली. मी आखाती प्रदेशात अमेरिकेच्या नौदलानं केलेल्या हल्ल्यांविरोधात भारताचा तीव्र निषेध पुन्हा व्यक्त केला. या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झाला होता."

"व्यापारी जहाजांच्या वाहतुकीला लक्ष्य करणारी अशी प्राणघातक कारवाई कोणत्याही प्रकारे योग्य नाही."

हे लक्षात घेतलं पाहिजे की, अमेरिकेच्या मोहिमेतील ही पहिलीच घटना मानली जात आहेत, ज्यात त्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.

या घटनेमुळे अमेरिका आणि भारतामधील डिप्लोमॅटिक तणाव वाढला आहे.

मित्र इतका असंवेदनशील कसा काय असू शकतो - शशी थरूर

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलेलं वक्तव्यं असंवेदनशील असल्याचं म्हटलं आणि भारत-अमेरिकेच्या मैत्रीबाबत प्रश्न उपस्थित केले.

शशी थरूर यांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं, "अमेरिकेचं हे अधिकृत वक्तव्यं वाचून मोठा धक्का बसला आहे. त्यामध्ये निरपराध भारतीय मारले गेल्याबद्दल दु:ख किंवा सहानुभूतीचा थोडाही उल्लेख नाही. एखादा 'मित्र' आणि व्यूहरचनात्मक भागीदार इतका असंवेदनशील कसा काय असू शकतो?"

"नियमांचं पालन न करणाऱ्या व्यापारी जहाजाला कोणाचाही जीव जाणार नाही अशा इतर कोणत्याही मार्गानं रोखता आलं नसतं का? क्षेपणास्त्र हल्ला करून सर्वसामान्य खलाशांना मारण्याऐवजी जहाजाच्या प्रोपल्शन किंवा स्टीअरिंगला निकामी करता आलं नसतं का?" असा प्रश्न त्यांनी विचारला.

शशी थरूर यांची प्रतिक्रिया
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्यांनी पुढे लिहिलं, "या महत्त्वाच्या सागरी मार्गांवरून जाणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यापारी जहाजावर भारतीय खलाशी असतात. आता अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांसाठी ते सर्वजण देखील सोपं लक्ष्य मानलं जातील का?"

"ही भूमिका स्वीकारण्यासारखी नाही. मला आशा आहे की एस जयशंकर यांनी मार्को रुबिओ यांना ही बाब सांगितली असेल," असंही शशी थरूर यांनी नमूद केलं.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यामधील चर्चेची माहिती समोर आल्यानंतर काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी ही भारतासाठी 'लाजिरवाणी' गोष्ट असल्याचं म्हटलं.

पवन खेडा म्हणाले, "भारतानं मागणी करायला हवी होती की, अमेरिकेनं त्यांच्या हल्ल्यात 3 तरुण भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याबद्दल विनाअट माफी मागायला हवी. त्याऐवजी परराष्ट्र मंत्री रुबिओ यांनी कथितरित्या इशारा दिला आहे."

"यात म्हटलं आहे की, अमेरिकेच्या सैन्याच्या आदेशांचं पालन न केल्यास ते 'खपवून' घेतलं जाणार नाही. ही पश्चातापाची नाही, तर आदेशाची भाषा आहे."

अमेरिकेनं लोकांचे मृत्यू झाल्याचं स्वीकारलेलं नाही, जबाबदारी घेतलेली नाही आणि कोणताही पश्चाताप देखील व्यक्त केलेला नाही, असाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

निरूपमा राव यांची प्रतिक्रिया

पवन खेडा यांनी लिहिलं, "भारताच्या उत्तरामुळे हे प्रकरण आणखी लाजिरवाणं बनलं आहे. याला हल्ला म्हणण्याऐवजी परराष्ट्र मंत्र्यांनी फक्त असं म्हटलं की, व्यापारी जहाजांच्या वाहतुकीवर प्राणघातक कारवाई करणं 'योग्य नाही'."

"योग्य नाही? या शब्दाचा वापर तुम्ही विमानतळावर महागडं सँडविच विकत घेतल्यावर करता. ज्या लष्करी हल्ल्यात सर्वसामान्य लोक मारले जातात, त्यासाठी हे शब्द वापरले जात नाहीत," असं मत त्यांनी व्यक्त केलं.

पवन खेडा पुढे म्हणाले, "अमेरिकेनं केलेल्या कारवाईसाठी योग्य शब्द म्हणजे बेकायदेशीर, बेजबाबदार आणि मान्य नसणं. त्याऐवजी अशा शब्दांचा वापर करण्यात आला जे मारले गेलेल्यांच्या कुटुंबीयांना वगळता इतर कोणालाही आक्षेपार्ह वाटले नाहीत."

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचं वक्तव्यं समोर आल्यानंतर अनेक लोकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

उद्योगपती सबीर भाटिया यांनी लिहिलं, "यातून दिसून येतं की अमेरिका भारताला मित्र मानत नाही. भलेही आमचे महान परराष्ट्र मंत्री आम्हाला काहीही सांगत असोत."

झारखंड मुक्ति मोर्चानं एक्स या सोशल मीडियावर लिहिलं, "हे लाजिरवाणं आहे. खरोखरंच लाजिरवाणं आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी 3 खलाशांच्या हत्येवर खेददेखील व्यक्त केला नाही. त्याहून लाजिरवाणी बाब म्हणजे आमच्या लाल डोळे दाखवणाऱ्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारतीयांच्या हत्येचा उल्लेखदेखील केला नाही. फक्त 'यस सर', 'जो आदेश सर' असं म्हटलं."

'हा कसा मित्र आहे?'

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी एक्सवर लिहिलं, "कोणतीही सहानुभूती नाही. कोणताही खेद नाही. निर्दोष भारतीय खलाशांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या हल्ल्यावर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत या हल्ल्यांना फक्त अमेरिकेच्या नौदलानं केलेल्या नाकेबंदीच्या उल्लंघनाचा परिणाम म्हणत योग्य ठरवण्याचा प्रयत्न केला आहे."

"व्यापारी जहाजांना लक्ष्य करणं आंतरराष्ट्रीय कायद्याचं उघड उल्लंघन आहे. अमेरिकेच्या मुत्सद्द्यांना बोलावणं निश्चितच पुरेसं नाही. आता भारत सरकारसाठी फक्त 'लाल डोळे' दाखवण्यापलीकडे जाऊन काही करण्याची वेळ आलेली नाही का?"

इंडो पॅसिफिक विषयक तज्ज्ञ प्राध्यापक डेरेक जे ग्रॉसमॅन यांनी एक्सवर लिहिलं, "रुबिओ यांचं बोलणं असंवेदनशील होतं. यामुळे अमेरिका-विरोधी भावना आणखी वाढतील. त्यांनी भारतीयांच्या जीवितहानीबद्दल संवेदनादेखील व्यक्त केली नाही. ट्रम्प यांची अमेरिका भारताचा कशाप्रकारचा 'मित्र' आहे."

प्राध्यापक डेरेक जे ग्रॉसमॅन यांनी आणखी एका पोस्टमध्ये लिहिलं , "भारत अमेरिकेसमोर योग्यप्रकारे 'कायद्याच्या राज्या'चा मुद्दा उपस्थित करतो आहे. मात्र अडचण अशी आहे की, ट्रम्प यांच्या अमेरिकेचा आता प्रत्यक्षात यावर विश्वास नाही."

त्याचं म्हणणं आहे, "याऐवजी, ट्रम्प सरकारचा त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात 'जिसकी लाठी उसकी भैंस' या विचारसरणीवर विश्वास आहे. प्रत्यक्षात हे एक साम्राज्यवादी परराष्ट्र धोरण आहे."

ओमानच्या आखातात गेल्या जवळपास एक आठवड्यात 3 व्यापारी जहाजांवर हल्ले झाले आहेत, यामध्ये बहुतांश खलाशी भारतीय होते

फोटो स्रोत, @CENTCOM

फोटो कॅप्शन, ओमानच्या आखातात गेल्या जवळपास एक आठवड्यात 3 व्यापारी जहाजांवर हल्ले झाले आहेत, यामध्ये बहुतांश खलाशी भारतीय होते

भारताच्या माजी परराष्ट्र सचिव आणि परराष्ट्रविषयक विषयांच्या जाणकार निरूपमा राव यांनी प्राध्यापक डेरेक जे ग्रॉसमॅन यांच्या एक्स पोस्टला शेअर करत म्हटलं की, रुबिओ-जयशंकर यांच्यातील चर्चा आंतरराष्ट्रीय संबंधांमधील एका मोठ्या ट्रेंडची आठवण करून देते.

त्यांनी एक्सवर लिहिलं, "शक्ती (अमेरिका) पूर्ण ताकदीनं निर्बंध, ब्लॉकेड, टॅरिफ आणि जबरदस्तीची भाषा बालत आहे. याचे परिणाम समजवण्यासाठी डिप्लोमसीचा वापर करण्यात आला नाही. 3 भारतीय खलाशी मारले गेले आहेत. (अमेरिकेचं) अधिकृत उत्तर कायद्याच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करण्याबाबत आहे."

निरूपमा राव यांच्या मते, "अमेरिका खूप जास्त कठोर भूमिका घेते आहे. ते सौम्यपणे बोलायलाही तयार नाहीत."

भारताच्या भूमिकेबद्दल व्यूहरचनात्मक विषयांचे प्रसिद्ध विश्लेषक ब्रह्मा चेलानी म्हणाले, "ओमानजवळ भारतीय खलाशी असलेल्या 3 व्यापारी तेलवाहू जहाजांवर अमेरिकेच्या नौदलानं वारंवार केलेल्या हल्ल्यांमध्ये 3 व्यापारी खलाशांचा मृत्यू झाला. मोदी सरकारच्या यावरील कमकुवत प्रतिक्रियेच्या विरोधातील जनतेच्या नाराजीनंच कदाचित या मागणी आणि अधिकृत विरोधाला जन्म दिला आहे."

त्यांनी पुढे लिहिलं, "तरीदेखील प्रतिक्रिया (भारताची) कमकुवतच आहे. याला 'योग्य नाही' असं म्हटलं आहे. जणूकाही निशस्त्र खलाशांची हत्या म्हणजे फक्त चर्चा करण्याचीच बाब आहे आणि ती अशी घटना नाही ज्याची जबाबदारी निश्चित करायला हवी."

"अजूनही अमेरिकेकडे माफी मागण्याबद्दल किंवा पीडितांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याची कोणतीही मागणी करण्यात आलेली नाही. तसंच असा कोणताही संकेत नाही की भारत या प्रकरणाला सामान्य डिप्लोमॅटिक औपचारिकतांच्या पलीकडे नेऊ इच्छितो," असंही त्यांनी नमूद केलं.

भारताला इशारा?

अमेरिकन वृत्तपत्र 'द न्यूयॉर्क टाइम्स'चे राजनैतिक वार्ताहर एडवर्ड वोंग यांनी मार्को रुबियो यांच्या भूमिकेचा उल्लेख एका सोशल मीडिया पोस्टमध्ये 'भारताला इशारा' असा केला आहे.

त्यांनी म्हटले, "ट्रम्प प्रशासन भारताला संताप आणणाऱ्या कृती करत आहे. विशेषतः ओमानजवळ एका व्यापारी जहाजावर झालेल्या अलीकडच्या लष्करी हल्ल्यात 3 भारतीय खुलाशांचा मृत्यू झाला. आता, रुबियो यांनी भारताला इशारा दिला आहे."

'द हिंदू'च्या राजनैतिक संपादक सुहासिनी हैदर यांच्या मते, जयशंकर आणि रुबियो यांच्यातील संभाषणाबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या निवेदनातून दोघांमधील तीव्र मतभेद दिसून येतात.

त्यांनी म्हटलं, "सामुद्रधुनीमध्ये शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या सर्व व्यापारी जहाजांनी अमेरिकेच्या लष्करी आदेशांचे तात्काळ पालन केले पाहिजे. तसेच अमेरिकेच्या नाकेबंदीचे उल्लंघन आणि इराणी तेलाची अवैध वाहतूक सहन केली जाणार नाही, यावर रुबियो यांनी जोर दिला."

सेटेबेलो जहाजावरील हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झाला होता

फोटो स्रोत, @FSUIINDIA

फोटो कॅप्शन, सेटेबेलो जहाजावरील हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झाला होता

संरक्षण तज्ज्ञ मेजर जनरल जी. डी. बक्षी यांनी भारतीय खलाशांच्या मृत्यूवर आणि भारत व अमेरिका यांच्यातील संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका विस्तृत पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, "इराणचे 90 टक्के तेल चीनला जाते. वृत्तांनुसार, 100 हून अधिक चिनी जहाजांनी नाकेबंदी तोडली आहे. कोणत्याही चिनी किंवा रशियन जहाजावर हल्ला झाला नाही."

"भारताने अमेरिकेशी मैत्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण अमेरिकेने भारतीय खलाशांना ठार मारून प्रत्युत्तर दिले," असं मत त्यांनी व्यक्त केलं.

"किसिंजर यांचे म्हणणे बरोबर होते की, अमेरिकेचा शत्रू असणे धोकादायक आहे, पण मित्र असणे जीवघेणे आहे. एक अशी मानसिकता आहे, जिला गरीब भारतीयांच्या मृत्यूची फारशी पर्वा नाही. त्यांचा असा विश्वास आहे की, त्यांच्या मृत्यूमुळे युरोपमधील (जी-7) आनंदात व्यत्यय येऊ नये," असंही त्यांनी नमूद केलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)