'कॉक्रोच जनता पार्टी'विरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलं 'असं' वक्तव्य

कॉक्रोच जनता पार्टी

फोटो स्रोत, /CJP & Getty Images

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सोमवारी एका याचिकाकर्त्याला 'कॉक्रोच जनता पार्टी'चा मुद्दा इतक्या भावनिकतेनं न घेण्याचा सल्ला दिला.

एका वकिलानं या संदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी तात्काळ घेण्याची विनंती केली होती.

'लाईव्ह लॉ'च्या मते, वकील एन. के. गोस्वामी यांनी असा युक्तिवाद केला की, भारताच्या सरन्यायाधीशांनी 'कॉक्रोच'बाबत केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देऊनही, 'एक विकृत आणि द्वेषपूर्ण असे नरेटीव्ह' अजूनही चालूच आहे.

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी वकिलाला सांगितलं की, "हे प्रकरण इतक्या भावनिकतेनं घेऊ नका."

सरन्यायाधीश म्हणाले की, सध्या या प्रकरणाची सुनावणी घेण्याची तात्काळ गरज नाही तसेच योग्य वेळ आल्यावर याबाबतची सुनावणी होईल.

'कॉक्रोच जनता पार्टी' ही सोशल मीडियावर अलीकडेच सुरू झालेली एक उपहासात्मक चळवळ आहे. ती न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या एका वक्तव्यानंतर प्रतिक्रिया म्हणून उदयास आली आहे.

त्यांच्या या वक्तव्यामध्ये सरन्यायाधीशांनी म्हटलं होतं की, ऑनलाइन सक्रियतेच्या नावाखाली व्यवस्थेवर हल्ला करणाऱ्या बेरोजगार तरुणांना 'कॉक्रोच' अर्थात झुरळांसारखं मानलं जाऊ शकतं.

सरन्यायाधीशांनी नंतर स्पष्ट केलं की ते बनावट पदव्या धारण करणाऱ्या व्यक्तींबद्दल बोलत होते. त्यांचं हे विधान सर्व तरुणांबद्दल नव्हतं.

न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या वक्तव्यानंतर, अभिजीत दीपके नावाच्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या स्थापनेची घोषणा केली.

त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर झपाट्याने फॉलोअर्स वाढू लागले. काही तासांतच, त्याने इन्स्टाग्रामवर भाजप, काँग्रेस आणि इतर राष्ट्रीय पक्षांना मागे टाकलं.

नंतर त्याचं 'एक्स' अकाऊंट निलंबित करण्यात आलं. परंतु, काही तासांनंतर तो एका नवीन अकाऊंटसह 'एक्स'वर पुन्हा परतला.

'कॉक्रोच जनता पार्टी' कशी स्थापन झाली?

सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्यानंतर 'कॉक्रोच जनता पार्टी'बाबत चर्चेला सुरुवात झाली.

मूळच्या छत्रपती संभाजीनगरच्या अभिजीत दिपके या तरुणाने अमेरिकेच्या बोस्टनमध्ये बसून 'कॉक्रोच जनता पार्टी' नावाने एक वेबसाईट, इंस्टाग्राम हॅन्डल आणि एक्सचं खातं बनवलं.

आणि बघता बघता संपूर्ण देशभर ही कॉक्रोच जनता पार्टी अल्पावधीतच चर्चेचा विषय ठरली. इन्स्टाग्रामवर या पक्षानं 2 कोटींहून जास्त फॉलोअर्सचा टप्पा गाठला.

बीबीसी न्यूज मराठीने अभिजीत दिपक यांच्याशी सविस्तर संवाद साधला असून, त्यांनी अशी सोशल मीडिया मोहीम का सुरू केली हे स्पष्ट केले आहे.

कॉक्रोच जनता पार्टी

फोटो स्रोत, @abhijeet_dipke

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अभिजीत यांनी या मुलाखतीत म्हटलं की, कॉक्रोच पार्टीची ही कल्पना कुठलंही नियोजन करून, खूप विचार करून सुरू केली नव्हती.

त्यांनी सांगितलं, "मी सोशल मीडियावर भारताच्या सरन्यायाधीशांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भातील वाद वाचला. खरंतर ते वाचून रागही आला पण मग माझ्या मनात एक प्रश्न आला 'जर सगळे कॉक्रोच एकत्र आले तर?' मग मी एक्सवर एक पोस्ट केली, ज्यात असं लिहिलं, 'What if all cockroaches come together?' आणि तिथून ही गोष्ट सुरू झाली."

दिपके सांगतात की, त्या पोस्टला अनेकांचे रिप्लाय आले, शेकडो रीट्विट्स करण्यात आले. विशेषतः जेन झी (Gen-Z) वयोगटातील तरुणांकडून, 'आपण एकत्र आलो पाहिजे' अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यानंतर त्यांनी AI च्या मदतीने एक पोस्टर तयार केलं आणि 'कॉक्रोच पार्टी'चा सदस्य होण्यासाठीची एक नियमावली तयार केली.

"मी म्हणालो सरन्यायाधीश जे म्हणाले त्याला अनुसरून, तुम्ही आळशी असाल, बेरोजगार असाल आणि सतत ऑनलाईन राहत असाल तर तुम्ही आमच्या पार्टीचे सदस्य होऊ शकता. लोकांना याच्यात गंमत वाटली. पण त्याहून महत्त्वाचं, देशातल्या विशीतल्या अनेक तरुणांना हा पक्ष 'आपला' वाटू लागला. हजारो बेरोजगार मुलांना ही पार्टी त्यांची वाटली, " असं दिपके यांनी सांगितलं.

अभिजीत यांनी कॉक्रोच जनता पार्टी नावाची एक वेबसाईट बनवली. त्यात तुम्हाला सदस्य व्हायचं असेल तर एक फॉर्म दिला आणि याच्याच आधारे 20 मे पर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी या पार्टीचं सदस्यत्व घेतल्याचा दावा दिपके यांनी केला आहे.

या पक्षाबद्दल कुणी काय म्हटलं?

काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी 'एक्स'वर लिहिलं, "कॉक्रोच जनता पार्टीच्या झपाट्याने झालेल्या वाढीमुळे मी खूप व्यथित झालो आहे, ज्यांनी अवघ्या पाच दिवसांत इंस्टाग्रामवर 1.5 कोटींहून अधिक फॉलोवर्स मिळवले आहेत."

त्यांनी पुढे लिहिलं, "मी तरुणांची निराशा समजू शकतो आणि त्यांना या पक्षाशी का जोडले गेल्यासारखे वाटते हे मी समजू शकतो. म्हणूनच 'एक्स'वरील हे खाते निलंबित करणे अत्यंत हानिकारक आणि अविवेकी पाऊल आहे."

थरूर यांनी पुढे म्हटलं आहे, "तरुणांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ मिळायला हवे, त्यामुळे सीजेपीचे खाते बंद करण्याऐवजी ते चालू ठेवण्याची परवानगी दिली पाहिजे. लोकशाहीमध्ये मतभेद, विनोद, उपहास आणि अगदी संतापालाही वाव असला पाहिजे."

राजकीय विश्लेषणक योगेंद्र यादव म्हणाले की, "'कॉक्रोच जनता पार्टी' सोशल मीडियावर मीम म्हणून सुरू झाली, पण तो फक्त विनोद किंवा राग नाही. देशात एक अस्वस्थता आणि संताप जाणवत आहे, कारण व्यवस्थेतील अनेक संधी आणि मार्ग बंद झाले आहेत."

"अनेक वेळा विनोद हे खोलवरच्या वेदनांशी जोडलेले असतात, त्यामुळे याकडे फक्त विनोद म्हणून त्याचे विश्लेषण करता येत नाही. सरकारने यावर बंदी घातली, तर ते एक मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकते."

कॉकरोच जनता पार्टी

फोटो स्रोत, Getty and @abhijeet_dipke

सीपीआयएमएल लिबरेशननं एक्स वर पोस्ट करून कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा दिला आहे.

पक्षाने X वर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं की, "कॉक्रोच जनता पार्टीचे सोशल मीडिया हँडल ब्लॉक करून मोदी सरकार जेन झीला थांबवू शकते असे त्यांना वाटते का?"

कॉक्रोच जनता पार्टीने भाजप आणि नमो यांच्या हँडल्सविरुद्ध 'अनफॉलो मोहीम' सुरू केली तर काय होईल? X ने इंटरनेट स्वातंत्र्याचा आदर करून लगेचच कॉक्रोच जनता पार्टीचे हँडल पूर्ववत करावे.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांनीही 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या 'एक्स' हँडलवरील बंदीवर प्रतिक्रिया दिली. "ही हुकूमशाही आहे, लोकशाही नाही. आमचे सरकार या देशातील तरुणांना इतके घाबरते की ते एक ऑनलाइन आंदोलनसुद्धा सहन करू शकत नाही. विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून आम्हाला दररोज कोणत्या प्रकारच्या परिस्थितीचा आणि दबावांचा सामना करावा लागतो, हे समजून घ्या."

शिवसेना (उबाठा)च्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी 'एक्स'वर लिहिलं, "सीजेपीसारख्या सोशल मीडियाने तयार केलेल्या एका काल्पनिक पक्षाने 'जनरेशन झेड'च्या (Gen Z) कल्पना आणि भावनांवर ताबा मिळवला आहे, ही एक दुःखद बाब आहे की तरुण पिढी सध्याच्या विरोधी पक्षांवरील आशा गमावू लागली आहे."

"भाजपविरोधात नाराजी आहे हे स्पष्ट आहे, पण ही खेदाची गोष्ट आहे की मतदार प्रस्थापित विरोधी पक्षांऐवजी एका नवीन, काल्पनिक पक्षावर विश्वास ठेवणे पसंत करत आहेत."

कॉक्रोच जनता पार्टीची सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून, लोक त्यावर अजूनही प्रतिक्रिया देत आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)