तामिळनाडू : विजय यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती, शपथविधीची तारीख आणि वेळही ठरली

विजय

फोटो स्रोत, Lok Bhavan

वाचन वेळ: 2 मिनिटे

तामिळनाडूमध्ये अखेर विजय यांच्या नेतृत्वातील टीव्हीकेच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली असून आज (10 मे) सकाळी 10 वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे.

विजय यांना 13 मे रोजी किंवा त्याच्या पूर्वी विधीमंडळात बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.

सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेल्या आमदारांचा पाठिंबा मिळाल्यानंतर टीव्हीके नेता विजय यांनी शनिवारी सायंकाळी पुन्हा एकदा राज्यपालांची भेट घेतली.

विजय यांनी आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना दिलं आणि सत्तास्थापनेचा दावा केला. जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीत पक्षाच्या नेत्यांचाही समावेश होता.

विजय यांनी त्यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्याच्या पत्राबरोबरच काँग्रेस, भाकप, माकप व्हीसीके आणि आययूएमएलच्या आमदारांच्या पाठिंब्याचं पत्रही सादर केलं.

विजय

फोटो स्रोत, ANI

काँग्रेस, सीपीआय आणि सीपीएमनंतर आता एआययूएमएल आणि व्हीसीकेनेही रविवारी टीव्हीकेला पाठिंबा जाहीर केला. व्हीसीकेचे नेते थॉल तिरुमावलवन यांनी टीव्हीकेचे नेते अधव अर्जुन यांना पाठिंब्याचं पत्र दिलं.

पाठिंबा मिळाल्यानंतर अधव अर्जुन यांनी माध्यमांशी बोलताना काँग्रेस, डावे पक्ष आणि व्हीसीके यांचे आभार मानले. 'लोकशाहीचे रक्षण केले जाईल आणि विजय जनतेच्या पाठिंब्याने तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनतील', असे ते म्हणाले.

शुक्रवारी टीव्हीके प्रमुख विजय यांनी तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता.

तामिळनाडूत काँग्रेसने 5 जागा जिंकल्या आहेत, तर सीपीआय, सीपीएम, व्हीसीके आणि आययूएमएल यांनी प्रत्येकी 2 जागा जिंकल्या आहेत.

त्यामुळे आता टीव्हीकेसोबत असलेल्या सदस्यांचा एकूण 121 जागांचा आकडा झाला आहे, जो बहुमतासाठी आवश्यक असलेल्या आकड्यापेक्षा जास्त आहे.

काँग्रेसने प्रसिद्ध केलेले निवेदन

फोटो स्रोत, AICC

फोटो कॅप्शन, काँग्रेसने प्रसिद्ध केलेले निवेदन

234 जागांच्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीकेने 108 जागा जिंकल्या आहेत. विजय यांनी 2 जागा जिंकल्या असल्याने त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे टीव्हीकेची संख्या 107 राहील.

त्या वेळी सभागृहाची संख्या 233 इतकी होईल आणि बहुमतासाठी 117 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असेल.

तामिळनाडू विधानसभेची मुदत 10 मे रोजी संपत आहे. तत्पूर्वी बहुमत मिळवणे आवश्यक असल्याचं कायदेतज्ज्ञ सांगत होते.

स्टॅलिन यांचा डीएमके, एआयएडीएमके, आणि भाजप यांसारख्या पक्षांनी पाठिंबा दिला तरीही विजय तो स्वीकारण्याची शक्यता नाही, असंही शिवप्रियन यांनी सांगितलं होतं.

विजय

फोटो स्रोत, Getty Images

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)