ब्रेन फ्रीझ : आईस्क्रीममुळे होणाऱ्या डोकेदुखीतून तुमच्या आरोग्याबद्दल अनेक गोष्टी समोर येऊ शकतात

फोटो स्रोत, Getty Images
- Author, एलिझाबेथ ॲन ब्राउन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
जर आईस्क्रीम खाल्ल्यावर तुम्हाला वारंवार डोकेदुखीचा (ब्रेन फ्रीझ) त्रास होत असेल, तर हा तुमच्या कुटुंबातील अनुवांशिक आजार आहे का हे लक्षात घेणं आणि तुमच्या या 'ब्रेन फ्रीझ' म्हणजे थंड खाल्ल्यामुळे होणाऱ्या डोकेदुखीव्यतिरिक्त इतर डोकेदुखीकडेही पुन्हा लक्ष देणं महत्त्वाचं ठरू शकतं.
उन्हाळ्यातील रणरणत्या उन्हाचा दिवस असतो. तुम्ही तुमचा आवडता थंडगार पदार्थ खात असता. तेव्हा तुम्हाला अचानक आईसपीकनं (बर्फ फोडण्याचं टोकदार साधन) कपाळावर वार केल्यासारखं वाटतं.
मेंदूच्या आतून एक तीव्र, टोचल्यासारखी वेदना येत असल्यासारखं तुम्हाला जाणवतं. तुमचं आईस्क्रीम वितळून खाली ओघळत असताना, जोपर्यंत वेदना कमी होत नाही, तोपर्यंत स्वतःला दोष देत तिथंच बसून राहू शकता.
"आईस्क्रीमुळे होणारी डोकेदुखी खूप, खूपच सामान्यपणे आढळणारी बाब आहे. ती अपायकारक नाही. ती येते आणि जाते," असं अमाल स्टार्लिंग म्हणतात. त्या अमेरिकेतील मिनेसोटामधील मायो क्लिनिकमध्ये न्युरोलॉजिस्ट आहेत. त्यांना चॉकलेट आईस्क्रीम खायला आवडतं.
मग थंड पदार्थ खूप वेगाने खाल्ल्यावर आपल्याला अशी शिक्षा का मिळते? आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पिढ्यान् पिढ्या आईस्क्रीम आणि इतर थंड पदार्थ आवडीने खाणाऱ्यांना त्रास देण्याबरोबरच, 'ब्रेन फ्रीझ'ने अनेक दशकांपासून वैज्ञानिक संशोधनालाही मदत केली आहे. इतकंच नाही, तर या अनुभवातून तुमच्या आरोग्याबद्दलही तुम्हाला वाटतं त्यापेक्षा अधिक माहिती मिळू शकते.
'ब्रेन फ्रीझ' म्हणजे काय?
लहानपणी ज्याला आपण ब्रेन फ्रीझ किंवा आईस्क्रीममुळे होणारी डोकेदुखी म्हणत असतो, त्यालाच वैज्ञानिक कोल्ड-स्टिम्युलस हेडेक (थंड-उत्तेजक डोकेदुखी) असं म्हणतात, असं स्टार्लिंग म्हणाल्या.

फोटो स्रोत, Getty Images
संशोधकांना वाटतं की "टाळूला किंवा अगदी घशाच्या मागील भागात पटकन गारवा किंवा थंडावा निर्माण झाल्यामुळे" हे घडतं, असं स्टार्लिंग म्हणतात.
या थंडपणामुळे रक्तवाहिन्या अतिशय पटकन आकुंचन पावतात. त्यानंतर रक्ताभिसरण पूर्ववत करण्यासाठी त्यांना मूळ स्थितीत येण्यासाठी पुन्हा फुगावं लागतं म्हणजे प्रसरण पावावं लागतं.

फोटो स्रोत, Getty Images
रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर पेन फायबर्स म्हणजे वेदनांची संवेदना निर्माण करणारे तंतू असतात. ते ट्रायजेमिनल नर्व्हला जोडलेले असतात. तुमच्या कपाळावरून आणि चेहऱ्यावरून येणाऱ्या वेदनांच्या संकेतांवर याच नर्व्ह प्रक्रिया करतात, असं त्या म्हणाल्या. त्यामुळेच आईस्क्रीम हेडेक म्हणजे आईस्क्रीममुळे होणाऱ्या डोकेदुखीमध्ये तुमच्या तोंडात नाही तर तुमच्या मेंदूत किंवा कपाळावर दबाव आणि वेदना जाणवते.
(अधिक गांभीर्यानं घ्यायची बाब म्हणजे, डेटामधून दिसतं की थंड खाद्यपदार्थ किंवा पेयांमुळे हृदयाची धडधडदेखील वाढू शकते. याला 'कोल्ड ड्रिंक हार्ट' असं म्हणतात. तसंच मध्यमवयीन पुरुषांमध्ये हार्ट अरिथमिया म्हणजे अनियिमित स्वरुपात हृदयाची धडधड जाणवणं, अशा गोष्टी उद्भवू शकतात.)
कोल्ड-स्टिम्युलस हेडेक (थंड-उत्तेजक डोकेदुखी) म्हणजे थंड पदार्थांमुळे होणारी डोकेदुखी टाळण्यासाठी थंड पदार्थ किंवा पेयांचं पटापट सेवन करण्याऐवजी ती हळूहळू घ्या, असं स्टार्लिंग म्हणतात. हे पदार्थ खाल्ल्यामुळे जे वेगानं कूलिंग होतं म्हणजे थंडपणा येतो, त्यामुळेच ब्रेन फ्रीझ होतो असं दिसतं.
त्यामुळे हे पदार्थ खाताना किंवा पिताना तुमच्या टाळूला त्या थंडपणातून सावरण्याचा थोडासा वेळ दिल्यास हे टाळता येईल. म्हणजेच प्रत्येक घोट घेताना, आईस्क्रीम खाताना ते थोडा वेळ टाळूजवळ ठेवून, थोडं गरम किंवा सामान्य स्थितीत येऊ दिल्यास ही डोकेदुखीची समस्या टाळता येईल.
परंतु आईस्क्रीम खाण्यासाठी तुम्ही जर अधीर झाला असाल (कोण होत नाही!) आणि तुम्हाला ही आईस्क्रीममुळे होणारी डोकेदुखी आधीच सुरू झाली असेल, तर या डोकेदुखीचा कालावधी कमी करण्यासाठी आणि ती कमी वेदनादायी करण्यासाठी काही हमखास उपाय आहेत, असं स्टार्लिंग म्हणाल्या.
यासाठी त्या सल्ला देतात की तुमच्या जिभेचा खालचा भाग वापरून तुमच्या तोंडाच्या आतील वरच्या भागाला म्हणजे टाळूला पुन्हा उबदार करा. किंवा जर तुमच्या जिभेच्या दोन्ही बाजू थंड झाल्या असतील तर तुमचा अंगठा किंवा कोमट पेयाचा वापर करा.
डोकेदुखींमधील एक आश्चर्यकारक संबंध
तरीदेखील काही जणांना ब्रेन फ्रीझचा त्रास का होतो. तर काहीजण कोणतीही अडचण न येता, त्रास न होता मिल्कशेक गटागट पिऊ शकतात?
आयरिन टोल्डो, इटलीतील पादुआ विद्यापीठात बाल मज्जाशास्त्र (चाईल्ड न्युरोलॉजी) आणि मानसोपचारशास्त्राच्या (सायकॅट्री) प्राध्यापिका आहेत. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 4 दशकांच्या वैज्ञानिक संशोधनाचा आढावा घेतला आणि त्याचा अभ्यास केला. (त्यांना विशेषकरून लिकोरिस जिलाटो हा गोड पदार्थ आवडतो.)
जगभरातील संशोधनातील माहिती, निष्कर्ष यांचं एकत्रीकरण त्यांची मांडणी केल्यावर टोल्डो यांना अनेक पॅटर्न आढळले. या अभ्यासांमध्ये तैवान, जर्मनी, कॅनडामधील शालेय मुलांवरील अभ्यास तसंच ब्राझील, तुर्किये आणि यूकेमधील डझनभर मायग्रेनग्रस्तांवरील अभ्यासांचा समावेश आहे.
पहिली गोष्ट म्हणजे संशोधनातून असं दिसून आलं की ब्रेन फ्रीझ ही कुटुंबांमध्ये असणारी अनुवांशिक समस्या आहे. जर तुमच्या पालकांना आईस्क्रीम खाल्ल्यामुळे डोकेदुखी होत असेल, तर तुम्हालाही तसा त्रास होण्याची शक्यता असते. (आतापर्यंत हे निष्कर्ष फक्त परस्परसंबंधित आहेत आणि वैज्ञानिकांनी यासाठी जबाबदार असू शकणारी विशिष्ट जनुकं अद्याप निश्चित केलेली नाहीत.)

फोटो स्रोत, Getty Images
ब्रेन फ्रीझमुळे होणारा त्रास किंवा जाणवणारी वेदना व्यक्तीपरत्वे कशी बदलते, याबद्दल सांगायचं तर यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुम्हाला आईस्क्रीमशिवाय डोकेदुखीचा त्रास होतो का आणि मायग्रेनचे झटके येतात का, हे पाहणं. मायग्रेन म्हणजे अतिशय तीव्र स्वरुपाची डोकेदुखी जी काही किंवा काही दिवसदेखील राहू शकते.
"ज्या लोकांना मायग्रेनचा त्रास असतो, त्यांना सहसा याप्रकारच्या डोकेदुखीची तीव्रता अधिक जाणवते," असं टोल्डो म्हणतात. यासंदर्भातील 1970 च्या दशकातील एका छोट्या अभ्यासातून असं आढळलं की ज्या लोकांना मायग्रेनचा त्रास होता, त्यापैकी 93 टक्के लोकांना आईस्क्रीममुळे होणाऱ्या डोकेदुखीचाही त्रास झाला होता. यातील बहुतांश जणांना मध्यम ते तीव्र स्वरुपाचा त्रास होता.
तर ज्यांना मायग्रेनचा त्रास नव्हता अशांपैकी फक्त एक तृतियांश लोक असे होते, ज्यांना कधीतरी आईस्क्रीममुळे होणारी डोकेदुखी झाली होती.
स्टार्लिंग यांना स्वत:ला मायग्रेनमुळे होणारी डोकेदुखी आणि आईस्क्रीममुळे होणारी अतिशय वेदनादायी डोकेदुखी या दोन्हींचा अनुभव येतो. "मला होत असलेल्या मायग्रेनच्या त्रासामुळे माझी ट्रायजेमिनल नर्व्ह खूपच संवेदनशील झाली आहे. त्यामुळे...जेव्हा ती थंड गोष्टींच्या संपर्कात येते, तेव्हा ती अधिक लक्षणीयरित्या सक्रिय होऊ शकते," असं त्या म्हणाल्या.
शेवटी, जर तुम्हाला किंवा तुमच्या अपत्याला विशेषकरून ब्रेन फ्रीझच्या वेदना होत असतील तर तुमच्या डोकेदुखीचा इतिहास तपासून पाहणं आणि तुम्हाला ब्रेन-फ्रीझ व्यक्तिरिक्त होणाऱ्या डोकेदुखींकडे पुन्हा एकदा लक्ष देणं, त्याचा आढावा घेणं हे फायद्याचं ठरेल. ज्याला तुम्ही आतापर्यंत एक सामान्य किंवा नेहमीची बाब म्हणून स्वीकारलं असेल, ती एक कदाचित एक गंभीर स्वरुपाची मात्र उपचार करणं शक्य असलेली समस्या असू शकते. त्याकडे तुम्ही नक्कीच लक्ष दिलं पाहिजे.
"दर 6 पैकी एका महिलेला मायग्रेनचा त्रास होतो. तर दर 11 पैकी एका बालकाला आणि दर 10 पैकी एका पुरुषाला मायग्रेनचा त्रास असतो," असं स्टार्लिंग म्हणतात.
"मायग्रेनचा त्रास असलेले 50 टक्क्यांहून अधिक लोक त्यांच्या या त्रासाविषयी डॉक्टरांशी कधीच बोललेले नसतात. यावर निदान उपलब्ध आहे. तसंच त्यावर उपचारही उपलब्ध आहेत," असं स्टार्लिंग पुढे म्हणतात.
'गोठलेलं मायग्रेन' आणि त्यावरचं संशोधन
डोकेदुखीचा हा आश्चर्यकारक संबंध लक्षात घेता, किमान 1960 च्या दशकापासून वैज्ञानिकांनी मायग्रेनच्या समस्येचा अभ्यास करण्यासाठी संशोधनात सहभागी होणाऱ्यांना मुद्दाम ब्रेन फ्रीझच्या वेदनेचा अनुभव घेण्यास सांगितलं आहे. जगभरातील अपंगत्वाच्या प्रमुख कारणांपैकी मायग्रेन हे एक कारण आहे.
या आजाराची सर्वत्र व्याप्ती असूनही, संशोधकांना मायग्रेनचा त्रास होतानाची स्थिती एमआरआय आणि सीटी स्कॅनद्वारे जाणून घेणं किंवा त्याचं निदान करणं आव्हानात्मक ठरतं. कारण या डोकेदुखीचा अंदाज लावणं कठीण असतं. या वेदना इतक्या तीव्र स्वरुपाच्या असतात की संशोधनात सहभागी झालेल्या लोकांना मायग्रेनच्या मध्यात प्रयोगशाळेत पोहोचणंदेखील कठीण ठरू शकतं.
अशा स्थितीत ब्रेन फ्रीझ म्हणजे आईस्क्रीममुळे होणारी डोकेदुखी प्रत्यक्षात उपयुक्त ठरू शकते, असं स्टार्लिंग म्हणतात.
कोल्ड-स्टिम्युलस हेडेक किंवा डोकेदुखी गोड पदार्थ खाऊन (आणि कमी आनंददायकरित्या, बर्फाचे तुकडे आणि खूप थंड पाणी वापरून) आवश्यकतेनुसार निर्माण केली जाऊ शकते. कारण मायग्रेनच्या डोकेदुखीत ज्या मज्जातंतूंच्या समूहावर म्हणजे ट्रायजेमिनल नर्व्हवर परिणाम होतो.
त्यामुळे अशा डोकेदुखी मायग्रेनच्या डोकेदुखीदरम्यान असलेल्या प्रत्यक्ष स्थितीचं वैज्ञानिक सूचक (सायन्टिफिक प्रॉक्सी) म्हणजे संबंधित घटक म्हणून काम करू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
"डोकेदुखीवरच्या औषधांच्या सुरुवातीच्या काळात, जेव्हा संशोधक डोकेदुखीमागचं मूळ कारण, प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा ब्रेन फ्रीझ हे एक सोयीचं प्रायोगिक मॉडेल होतं," असं स्टार्लिंग म्हणतात. यामळे वैज्ञानिकांना रक्तप्रवाह आणि विविध मज्जातंतूंच्या समूहाची भूमिका समजून घेण्यास मदत झाली, असं त्या नमूद करतात.
मात्र अलीकडच्या काळात संशोधक मायग्रेनवरील नवीन किंवा पुढील पिढीतील औषधं विकसित करण्यासाठी माणसांमध्ये मायग्रेनच्या वेदना निर्माण करण्यासाठीच्या इतर मार्गांवर अवलंबून राहिले आहेत. यात नायट्रोग्लिसरीन देण्याचाही (इन्फ्युजन) समावेश आहे. (होय, नायट्रोग्लिसरीन म्हणजे तोच घटक जो स्फोटकं बनवण्यासाठी वापरला जातो).
ज्या लोकांना मायग्रेनचा त्रास आहे, अशा लोकांनी ब्रेन फ्रीझच्या भीतीनं थंड पदार्थ टाळण्याची किंवा ते वर्ज्य करण्याची आवश्यकता नाही. "तुम्ही आईस्क्रीम खाणं बंद करण्याची आवश्यकता नाही. त्यावेळची स्थिती कशी हाताळायची हे तुम्ही शिकू शकता," असं टोल्डो म्हणतात.
सुदैवानं, सर्वांसाठी याबाबतचा सल्ला सारखाच आहे. तो म्हणजे, आईस्क्रीम खात असताना थोडं सावकाश, थोडं अधिक वेळ घेऊन खा, म्हणजे तुम्हाला त्याच्या चवीचा अधिक चांगला आस्वाद घेता येईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























