एकाच वेळी 4 मुलींचा जन्म; चारही बाळांनी वापरली एकच वार

फोटो स्रोत, Metro North Health
- Author, एमी वॉकर
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
ऑस्ट्रेलियातील एका महिलेने कोणत्याही आयव्हीएफ किंवा इतर वैद्यकीय तंत्रज्ञानाची मदत न घेता नैसर्गिकरीत्या एकसारख्या दिसणाऱ्या चार बाळांना (आयडेंटिकल क्वाड्रुपलेट्स) जन्म दिला आहे.
रॉयल ब्रिस्बेन अँड वुमेन्स रुग्णालयाच्या मते, ही गर्भधारणा अत्यंत दुर्मीळ आणि खूपच धोकादायक अशी होती.
गर्भधारणेच्या 28 आठवडे आणि 4 दिवस पूर्ण झाल्यानंतर 14 जुलै रोजी सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे या चार मुलींचा जन्म झाला. या चारही मुली एकाच फलित स्त्रीबीजातून (मोनोझायगोटिक क्वाड्रुपलेट्स) तयार झाल्या होत्या. म्हणजे एकच फलित स्त्रीबीज चार वेगवेगळ्या भ्रूण किंवा गर्भांमध्ये विभागलं गेलं होतं.
रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, 34 वर्षीय जेनिटर ना'अमोआना आणि तिचे पती जोर्थम यांना आधीच चार मुले होती. डॉक्टरांनी त्यांना एकाच वेळी चार बाळांचा जन्म होणार असल्याचे सांगितले, तेव्हा दोघांनाही धक्का बसला आणि ते आश्चर्यचकित झाले.
गर्भधारणेच्या सुरुवातीपासून जेनिटर ना'अमोआनाची काळजी घेणाऱ्या डॉ. अॅलेक्सा बेंडॉल यांच्या मते, एकसारख्या दिसणाऱ्या चार बाळांचा जन्म हा सुमारे दीड कोटी गर्भधारणांपैकी फक्त एका प्रकरणात घडते.
'चारही बाळांना एकच वार'
त्यांनी सांगितले की, चारही बाळांनी एकाच वारेचा (प्लेसेंटा) वापर केला होता. ही घटना अत्यंत दुर्मीळ असून यापूर्वी अशा प्रकारचे प्रकरण कधी ऐकिवातही आले नव्हते.
मातृत्व आणि भ्रूण वैद्यक तज्ज्ञ तसेच प्रसूतीतज्ज्ञ डॉ. अॅलेक्सा बेंडॉल यांनी सांगितलं की, अशी गर्भधारणा खूप धोकादायक असते. त्यामुळे जेनिटर ना'अमोआनावर सातत्याने लक्ष ठेवता यावं, यासाठी तिच्या गर्भधारणेच्या 25व्या आठवड्यातच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

फोटो स्रोत, Jenitar Na’amoana/Gofundme
डॉ. बेंडॉल म्हणाल्या, "गर्भधारणा 28 आठवड्यांपर्यंत सुरक्षितपणे टिकली, तरी ते आमच्यासाठी मोठं यश असेल, असं आम्ही म्हणत होतो."
त्या पुढे म्हणाल्या, "28 आठवडे आणि 4 दिवसांच्या कालावधीत चारही मुलींचा सुरक्षित जन्म झाला आणि त्या सर्व निरोगी आहेत, याचा आम्हाला खूप आनंद आहे. हा खरोखरच एक अद्भुत अनुभव होता आणि त्याचा भाग होता आलं, हे अभिमानास्पद आहे."
बेंडॉल म्हणाल्या, "जेनिटरने पहिल्या दिवसापासून प्रत्येक आव्हानाला धैर्याने तोंड दिलं. तिने स्वतःसाठी आणि आपल्या बाळांसाठी प्रत्येक अडचण आणि धोक्याचा सामना केला."
'10 सीटर व्हॅनसाठी फंड रेझिंग कॅम्पेन'
या चार नवजात मुलींची नावं एमिली, हॅरिएट, कॅथरीन आणि अॅलेक्सा अशी ठेवण्यात आली आहेत. त्यापैकी एका मुलीचं नाव डॉ. अॅलेक्सा बेंडॉल यांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. गर्भधारणेच्या सुरुवातीपासून त्यांनी जेनिटर ना'अमोआची काळजी घेतली होती.
बेंडॉल यांनी सांगितलं की, चारही बाळांना पूर्ण वाढ होईपर्यंत नवजात अतिदक्षता विभागामध्ये (एनआयसीयू) ठेवले जाईल. सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे.

फोटो स्रोत, Metro North Health
जेनिटरला यापूर्वीच 1 ते 10 वर्षे वयोगटातील चार मुलं आहेत. आता कुटुंबात आणखी चार मुली आल्याने त्यांना मोठ्या वाहनाची गरज आहे. त्यामुळे किमान 10 जण बसू शकतील अशी व्हॅन खरेदी करण्यासाठी त्यांनी ऑनलाइन निधी संकलन मोहीम (ऑनलाइन फंडरेझिंग कॅम्पेन) सुरू केली आहे.
निधी संकलन मोहिमेसोबत दिलेल्या संदेशात जेनिटरने लिहिलं की, "आमच्या चारही मुलींचा सुरक्षित जन्म झाला आहे. त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. पण एकाच वेळी चार नवजात बाळांची काळजी घेणं हे आमच्यासाठी मोठं आव्हान ठरत आहे. असं होईल याची आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती."
आतापर्यंत या निधी संकलन मोहिमेतून 24 लाख रुपयांपेक्षा जास्त निधी मिळाला आहे.
कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय नैसर्गिकरीत्या एकसारख्या दिसणाऱ्या चार बाळांचा एकाच वेळी जन्म होणं ही अत्यंत दुर्मीळ घटना आहे. डॉक्टरांच्या मते, अशी घटना साधारण 7 लाख प्रसूतींपैकी फक्त एकदाच घडते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)























