अमेरिकेत लॉरेन्स बिश्नोई गँगसह काही टोळ्यांवर कारवाई, 24 जणांना अटक

फोटो स्रोत, ANI
- Author, जेसिका मर्फी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
अमेरिकेतील सरकारी वकिलांनी अमेरिका, कॅनडा आणि युरोपमधील 24 संशयितांच्या अटकेची घोषणा केली आहे. या आरोपींवर लॉरेन्स बिश्नोई टोळीसह भारताशी संबंधित तीन संघटित गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध असल्याचा आरोप आहे.
या आरोपींवर अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत. यामध्ये 2023 मध्ये कॅनडातील ब्रिटिश कोलंबियामधील एका गुरुद्वाराबाहेर शीख नेते हरदीप सिंग निज्जर यांची हत्या करण्याचा कट रचल्याच्या आरोपाचाही समावेश आहे.
लॉस एंजेलिसमधील फेडरल सरकारी वकिलांनी सांगितलं की, या अटकेची कारवाई अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या तपासाचा परिपाक आहे.
हा तपास लक्ष्य करून हत्या करणे, खंडणी उकळणे आणि अमली पदार्थांची तस्करी करणे यांसारख्या गुन्ह्यांचा आरोप असलेल्या भारतीय गुन्हेगारी टोळ्यांवर केंद्रित होता.
मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या तीन आरोपपत्रांमध्ये एकूण 37 आरोपींवर आरोप ठेवण्यात आले आहेत.

फोटो स्रोत, Reuters
अमेरिकेचे प्रथम सहाय्यक सरकारी वकील बिल एसायियन म्हणाले की, "भीती, अमली पदार्थ आणि हिंसाचार पसरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्यांना न्यायव्यवस्थेची ताकद आणि फेडरल सरकारच्या संपूर्ण शक्तीचा सामना करावा लागेल."
पुढे ते म्हणाले की, "या गुंडांसाठी कोणतीही सुरक्षित जागा नाहीये."
निज्जर यांच्या हत्येचा आरोप
45 वर्षीय निज्जर यांची तीन वर्षांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
व्हँकुव्हरच्या पूर्वेस सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या सरे शहरातील 'गुरु नानक शीख गुरुद्वारा'च्या गजबजलेल्या पार्किंगमध्ये, दोन बुरखाधारी हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनातच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.
निज्जर एक प्रमुख शीख फुटीरतावादी नेते होते. त्यांनी खलिस्तानच्या मागणीचे जाहीरपणे समर्थन केले होते.
अमेरिकेच्या सरकारी वकिलांनी भारताच्या 33 वर्षीय लॉरेन्स बिश्नोई आणि 32 वर्षीय सतिंदरजीत सिंग (उर्फ गोल्डी ब्रार) यांच्यावर निज्जर यांच्या हत्येचे आदेश दिल्याचा आरोप ठेवला आहे.
सरकारी वकिलांनी निज्जरचा उल्लेख 'HSN' या नावाने केला आहे.
ब्रार अजूनही मोकाट आहे, तर लॉरेन्स बिश्नोई 2015 पासून भारतीय तुरुंगात कैद आहे.

फोटो स्रोत, FB/VIRSA SINGH VALTOHA
गेल्या वर्षी कॅनडाने बिश्नोई टोळीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. यामुळे अमेरिकेच्या सरकारला या गटाची मालमत्ता जप्त करण्याचे आणि देशांतर्गत त्यांचे निधी रोखण्याचे अधिकार मिळाले आहेत.
2024 मध्ये या हत्येप्रकरणी चार भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर कॅनडा आणि भारत यांच्यात मोठा राजनैतिक वाद निर्माण झाला होता.
मंगळवारी सरकारी वकिलांनी असाही आरोप केला आहे की, बिश्नोई टोळीच्या सदस्यांनी हिंसाचारासाठी प्रमुख धार्मिक आणि राजकीय नेत्यांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर, त्यांनी समाजातील सदस्यांकडून खंडणी उकळण्याचाही प्रयत्न केला.
सरकारी वकिलांनी असा आरोप केला आहे की, बिश्नोई, ब्रार आणि इतर आरोपींनी कॅलिफोर्नियातील लोकांकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात एका व्यक्तीकडे 50 लाख डॉलर्सची मागणी केली होती.
कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितलं की, तपासदरम्यान त्यांनी सुमारे 1,000 किलोग्रॅम (2,200 पाउंड) कोकेन आणि एक किलोग्रॅम हेरॉईन जप्त केले. याव्यतिरिक्त, 40,000 डॉलर्सची रोकड आणि सुमारे डझनभर शस्त्रेही हस्तगत करण्यात आली.
या तपासामध्ये एफबीआय (FBI), लॉस एंजेलिस पोलीस, रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलीस आणि अमेरिकेचे सीमा शुल्क व सीमा सुरक्षा अधिकारी सहभागी झाले होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

























