You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चांगली झोप लागण्यासाठी योग्य उशी कशी निवडाल, तज्ज्ञांकडून जाणून घ्या
- Author, जॉर्ज सँडमन
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
डॉ. ख्रिस मॅकार्थी म्हणतात, "मीही अशा लोकांपैकीच एक आहे. जे बाहेरगावी गेले तरी स्वतःची उशी सोबत घेऊन जातात."
तुम्ही विमानतळावर अशा लोकांना पाहिलं असेल- जे एका हाताखाली उशी आणि दुसऱ्या हाताने सुटकेस ओढत चेक-इन करण्यासाठी जात असतात.
कदाचित तुम्हीही असेच असाल- उशी मऊ आणि आरामदायी हवी, पण सकाळी तिचा आकार बदललेला नको, असं तुम्हाला वाटत असेल.
मॅकार्थी म्हणतात की, मी उशीबाबत फार चोखंदळ किंवा चिकित्सक नाही. मी फिजिओथेरपिस्ट आहे आणि चुकीच्या उशीमुळे मान दुखू शकते किंवा त्रास होऊ शकतो हे मला माहीत आहे.
ते परदेशात जाताना स्वतःची उशी सोबत नेत नाहीत. पण हॉटेलमध्ये पोहोचल्यावर ते उशीची जुळवाजुळव करून पाहतात.
अगदी साधी किंवा फारशी चांगली नसलेली उशीही झोपण्यासाठी आरामदायी कशी करता येईल, याची त्यांच्याकडे एक सोपी युक्ती आहे. तुमच्यासाठी योग्य उशी कशी निवडायची, याबाबत त्यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत.
तुम्ही कसं झोपता?
मॅकार्थी हे मँचेस्टर स्कूल ऑफ फिजिओथेरपीमध्ये असोसिएट प्रोफेसर आहेत. ते सांगतात की, आपल्यासाठी योग्य उशी आपण कोणत्या किंवा कशा पद्धतीने झोपतो, यावर अवलंबून असते.
ते बीबीसीच्या 'स्लाइस्ड ब्रेड' या पॉडकास्टमध्ये सांगतात की, बहुतेक लोक 3 प्रकारे झोपतात- कुशीवर, पाठीवर किंवा पोटावर.
मॅकार्थी पोटावर झोपण्याचा सल्ला देत नाहीत, कारण अशा वेळी मान बराच वेळ एकाच बाजूला वळलेली राहते.
ते म्हणतात, "असं केल्याने मानेला किंवा मानेच्या स्नायूंना ताण येतो आणि त्रास होऊ शकतो. मणक्याच्या दुखण्याबाबत फिजिओथेरपीच्या क्षेत्रात एक गोष्ट सर्वांना ठामपणे मान्य आहे- पोटावर म्हणजेच पालथं झोपू नका."
पाठीवर झोपणाऱ्यांनी उशी निवडताना आपल्या मानेच्या आणि पाठीच्या वरच्या भागाच्या वळणाचा विचार करावा. वयोमानानुसार हे वळण अनेक लोकांमध्ये नैसर्गिकरित्या वाढत जातं.
मॅकार्थी म्हणतात, "आपल्या पाठीचा वाकलेला भाग किंवा बाक जास्त असेल, तर पाठ सरळ असलेल्या व्यक्तीपेक्षा आपल्याला थोडी जाड उशीची गरज लागेल."
कुशीवर झोपणाऱ्यांनी उशी निवडताना आपल्या खांद्याची रुंदी लक्षात घ्यावी. साधारणपणे खांदे जितके रुंद, तितकी जाड उशी लागते. पण आपण कोणत्या गादीवर (मॅट्रेस) झोपतो, हेही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे.
तुमची गादी किती मऊ आहे?
गादीमध्ये आपलं शरीर किती खोलवर जातं, यावर उशीची जाडी किती असावी हे ठरतं, असं मॅकार्थी सांगतात.
"जर आपले खांदे रुंद असतील आणि गादी कडक असेल, तर जाड उशी वापरावी."
"गादी मऊ असेल, तर पातळ किंवा कमी जाडीची उशी वापरावी. कारण मऊ गादीत खांदा जास्त खाली जातो किंवा रुततो."
पाठीवर झोपणाऱ्यांसाठी हा मुद्दा फारसा महत्त्वाचा नाही, कारण कुशीवर झोपणाऱ्यांपेक्षा त्यांचं शरीर गादीत कमी खोल जातं किंवा खोलवर रुतत नाही.
उशी खूप पातळ वाटत असेल, तर तिच्या खाली घडी केलेला टॉवेल ठेवा. उशी किती उंच हवी आहे, हे पाहण्यासाठी टॉवेलच्या घड्या कमी-जास्त करण्याचा सल्ला ते देतात. यावरून नवीन उशी निवडताना आपल्याला किती उंचीची उशी हवी, याचा अंदाज येईल.
उशीचा योग्य आकार कोणता?
विशेष प्रकारच्या उशींना कॉन्टूर्ड, एर्गोनॉमिक किंवा ऑर्थोपेडिक असं सांगून विकलं जातं. परंतु, या उशी खरोखर किती उपयोगी आहेत, हे अद्याप पूर्णपणे सिद्ध झालेलं नाही, असं मॅकार्थी सांगतात.
"कुशीवर झोपणाऱ्यांसाठी मानेजवळ थोडी जाड किंवा उंच असलेली उशी उपयोगी ठरू शकते, असं काही पुरावे सांगतात."
उशीचा पुढचा भाग थोडा उंच असेल तर झोप चांगली लागते का, हे पाहण्यासाठी मॅकार्थींची टॉवेलची युक्ती वापरून पाहा. टॉवेल गुंडाळून तो उशीखाली ठेवू शकता.
ते कुशीवर झोपणाऱ्यांना पाठ सरळ राहील अशा पद्धतीने झोपण्याचा सल्ला देतात.
पाठीवर झोपणाऱ्यांसाठी काही कंपन्या मधोमध खोलगट आणि बाजूने उंच असलेल्या उशांची जाहिरात करतात.
मॅकार्थी यांच्या मते, अशा उशीमुळे झोपण्याची स्थिती योग्य राहते. पण, त्यांच्या काही रुग्णांना अशा उशीत झोपताना 'थोडं अस्वस्थ किंवा गुदमरल्यासारखं' वाटलं.
ज्यांचं डोकं मोठं आणि जड असेल, तर जाड आणि थोडी कडक उशी वापरावी, असं ते सांगतात.
पिसांची उशी की फोमची?
मॅकार्थी सांगतात की, उन्हाळ्यात पंख आणि मऊ पिसांची (डाउन) उशी डोकं थंड ठेवण्यास मदत करते, कारण त्यातून डोक्याची उष्णता बाहेर जाते.
परंतु, रात्री झोपताना ही उशी आपला आकार बदलू शकते. झोपलेली व्यक्ती जास्त हालचाल करत असाल, तर उशी सरकून बेडच्या मागच्या बाजूला म्हणजे हेडबोर्डकडे जाऊ शकते.
"सुरुवातीला उशी सपाट आणि आरामदायी असते, पण नंतर तिचा आकार बदलून ती एका बाजूने उंच होते. त्यामुळे मान वाकडी करून झोपावं लागतं."
हॉलो फायबर आणि मायक्रोफायबरच्या उशा त्यांचा आकार चांगला टिकवून ठेवतात. पण, त्या उशांमधून डोक्याची उष्णता पंखांच्या उशांइतकी सहज बाहेर जात नाही, असं मॅकार्थी सांगतात.
काही उशांच्या खालच्या भागात थोडं कडक किंवा घट्ट मटेरियल असतं. त्यामुळे रात्री झोपताना उशीचा आकार टिकून राहण्यास मदत होते.
मॅकार्थी यांनी 5 वर्षांपूर्वी सुमारे 50 पौंडांना (सुमारे 6300 रुपये) फोमची उशी घेतली होती. या उशीत हवा खेळती राहण्यासाठी छोटे पोकळ भाग आहेत. ते कुशीवर झोपतात आणि उशीची उंची कमी-जास्त करण्यासाठी तिच्या खाली घडी केलेला टॉवेल ठेवतात.
प्रत्येकाला एकच उशी आरामदायी वाटेल असं नाही. त्यामुळे कंपन्या उशी वापरून पाहण्याची संधी देत असतील, तर ती जरूर वापरून पाहा, असं ते म्हणतात.
ते सांगतात, "सर्वांसाठी आणि सगळ्या प्रकारे झोपणाऱ्यांसाठी एकच उशी योग्य ठरू शकत नाही. आपल्यासाठी योग्य उशी आपणचच ठरवली पाहिजे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.