अंबानींची इलॉन मस्कसोबत स्पर्धा? भारतीय बाजारातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या IPO ची चर्चा

Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

गेल्या वर्षभरात भारतीय शेअर बाजारात झालेली सुमारे 13 टक्क्यांची घसरण आणि पश्चिम आशियातील युद्धाची कायम असलेली अनिश्चितता, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारताचे आघाडीचे उद्योगपती आणि रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी त्यांच्या जिओ प्लॅटफॉर्म्सचा आयपीओ बाजारात आणत आहेत.

कंपनी या आयपीओद्वारे बाजारातून सुमारे 30,188 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. त्यामुळे हा भारतीय शेअर बाजारातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरेल.

आयपीओ सोमवारी म्हणजेच 19 ऑक्टोबरपासून अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला करण्यात आला, तर उर्वरित गुंतवणूकदारांना 21 ऑक्टोबरपासून अर्ज करता येईल. आयपीओमध्ये अर्ज करण्याचा 23 ऑक्टोबर हा शेवटचा दिवस असेल.

अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो 21 ऑक्टोबर रोजी जामनगरमधील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तेल शुद्धीकरण कारखान्याला भेट देणार आहेत.

त्यामुळे, नवी दिल्लीऐवजी जामनगरला भेट देण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

शेअरची किंमत काय असेल?

रॉयटर्सच्या एका रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की, जर या कंपनीचा IPO पूर्णपणे यशस्वी झाला, तर भारतात परवडणारी 4G इंटरनेट सेवा सुरू करून मोठा बाजारातील मोठा वाटा मिळवलेली ही रिलायन्स जिओ कंपनी बाजारमूल्यानुसार भारतातील चौथी सर्वात मोठी लिस्टेड कंपनी होईल.

'जिओ प्लॅटफॉर्म्स' ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचा एक भाग असून, या आयपीओचे मूल्यांकन 3.2 अब्ज डॉलर्स आहे. याचा अर्थ कंपनीचं मूल्यांकन 108.3 अब्ज डॉलर्स होण्याची अपेक्षा आहे. लिस्टिंगची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु 28 ऑक्टोबरपासून शेअर बाजारात ट्रेडिंग सुरू होण्याची शक्यता आहे.

जेव्हा जिओ लिस्टेड होईल, तेव्हा ती रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल आणि एचडीएफसी बँक यांच्यानंतर चौथी सर्वात मोठी सूचीबद्ध कंपनी असेल, असं वृत्त रॉयटर्सनं दिलेलं आहे.

जिओचं व्यवस्थापन मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी करतो.

जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओसाठी प्रति शेअर 1065 रुपये ते 1119 रुपये असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 27 कोटी नवीन शेअर्स जारी केले जातील.

किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 12 शेअर्सच्या लॉटसाठी अर्ज करावा लागेल. म्हणजेच, एका लॉटची किंमत 13,428 रुपये असेल. किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त 14 लॉट किंवा 168 शेअर्ससाठी अर्ज करू शकतील, ज्यांचं मूल्य 1,87,992 रुपये असेल. रिलायन्स ग्रुपच्या कर्मचाऱ्यांना प्रति शेअर 54 रुपयांची सूट दिली जाईल.

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 500 कोटी रुपयांचे शेअर्स राखीव ठेवले आहेत, तर रिलायन्स इंडस्ट्रीजने (आरआयएल) पात्र भागधारकांसाठी 2,500 कोटी रुपयांपर्यंतचे शेअर्स राखीव ठेवले आहेत.

आतापर्यंतचे सर्वात मोठे आयपीओ

रिलायन्सचा जिओ प्लॅटफॉर्म्स आयपीओ हा आकाराच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा पब्लिक इश्यू असेल. यापूर्वी, 2024 मध्ये ह्युंदाई मोटर इंडियाचा 27,870 कोटी रुपयांचा पब्लिक इश्यू हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ होता.

याशिवाय, चालू वर्षात नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर आयपीओ देखील आला होता. त्याद्वारे कंपनीने 22,569 कोटी रुपये उभारले आणि आकाराच्या बाबतीत तो ह्युंदाईच्या आयपीओनंतर दुसऱ्या क्रमांकावर होता. आता, जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओनंतर, एनएसई पब्लिक इश्यू तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल.

2022 साली, सरकारी कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) देखील एक मेगा आयपीओ आला होता. त्याचा आकार सुमारे 21,000 कोटी रुपये होता. तर 2021 साली, 'One97 Communications (Paytm)' आयपीओचा आकार सुमारे 18,300 कोटी रुपये होता.

भारतातील इतर मोठ्या आयपीओंमध्ये, 2025 मधील टाटा कॅपिटलच्या 15,512 कोटी रुपयांच्या इश्यूचा, तर 2010 मधील कॉल इंडियाच्या 15,200 कोटी रुपयांच्या आयपीओचा समावेश आहे.

इलॉन मस्कसोबत स्पर्धा?

अलीकडेच, प्रसिद्ध अमेरिकन उद्योजक इलॉन मस्क यांनी मुकेश अंबानींवर भारतात 'मोनोपॉली' अर्थात मक्तेदारी तयार केल्याचा आरोप केला आहे.

त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून प्रश्न विचारला आहे की, त्यांची स्टारलिंक कंपनी गेल्या पाच वर्षांपासून भारतीय कायद्यांचं पालन करत असूनही, तिला अद्याप परवाना का मिळालेला नाही. अंबानींचा सरकारवर प्रभाव आहे का?

अलीकडच्या सरकारी आकडेवारीनुसार, भारतातील दोन सर्वात मोठ्या खाजगी दूरसंचार कंपन्या, रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड आणि भारती एअरटेल यांच्याकडे सुमारे 910 दशलक्ष ब्रॉडबँड ग्राहक आहेत, जे देशाच्या एकूण बाजारपेठेच्या 80 टक्क्यांहून अधिक आहे.

भारतात एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात व्होडाफोन, आयडिया, एअरसेल, एअरटेल, आरकॉम, टाटा डोकोमो, टेलिनॉर इत्यादींसारख्या खाजगी कंपन्या कार्यरत होत्या. परंतु, 2016 मध्ये रिलायन्स जिओच्या आगमनानंतर दूरसंचार क्षेत्रात तीव्र दरयुद्ध सुरू झालं.

त्यामुळे बहुतेक लहान कंपन्या बंद पडल्या. सध्या जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कार्यरत खाजगी कंपन्या आहेत. दूरसंचार नियामक ट्रायच्या आकडेवारीचा हवाला देत 'आउटलूक बिझनेस'च्या एका अहवालानुसार, भारतीय दूरसंचार बाजारपेठेत जिओचा सुमारे 39 टक्के बाजारहिस्सा आहे. भारती एअरटेलचा 38 टक्के आणि व्होडाफोन आयडियाचा 15.4 टक्के बाजारहिस्सा आहे.

विशेष म्हणजे, गेल्या वर्षी जिओ आणि भारती एअरटेलने भारतात स्टारलिंक इंटरनेट सेवा आणण्यासाठी इलॉन मस्कच्या स्पेसएक्ससोबत स्वतंत्र करार केले होते. अलीकडच्या वर्षांत, जिओनं स्वत:ला फक्त एक दूरसंचार कंपनीपुरतं मर्यादीत ठेवलेलं नाहीये, त्या त्यापलीकडे जाऊन कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातही ही कंपनी विस्तार करत आहे.

या वर्षी जूनमध्ये, मेटा कंपनीनं घोषणा केली की ते गुजरातमध्ये रिलायन्सद्वारे उभारल्या जात असलेल्या एआय-आधारित डेटा सेंटरमधील कॅपेसिटी भाड्याने घेणार आहे. या सुविधेची क्षमता 168 गिगावॅट्स असण्याचा अंदाज आहे.

परदेशी माध्यमांमधील चर्चा

जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओची चर्चा परदेशी माध्यमांमध्येही होत आहे.

'ब्लूमबर्ग' या बिझनेस वेबसाइटच्या एका रिपोर्टनुसार, रिलायन्सनं आपल्या जवळपास 420,000 कर्मचाऱ्यांना 3.2 अब्ज डॉलर्सच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केलं आहे.

रिलायन्सने ऑक्टोबर महिन्याचा पगार सुमारे 15 दिवस आधीच दिला आहे, जेणेकरून कामगारांकडे आयपीओची रक्कम भरण्यासाठी निधी उपलब्ध होईल.

'वॉल स्ट्रीट जर्नल'च्या एका रिपोर्टनुसार, जूनमध्ये जिओचे 53.33 कोटी ग्राहक होते आणि भारतातील एकूण डेटा ट्रॅफिकमध्ये जिओचा वाटा सुमारे 60 टक्के आहे.

सध्याच्या कठीण काळातून जात असलेल्या शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सची कामगिरीही खालावली आहे. 1 जानेवारी 2026 पासून रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 23 टक्क्यांची घसरण झाली आहे.

यावर्षी रिलायन्सच्या भागधारकांना संबोधित करताना, 69 वर्षीय मुकेश अंबानी म्हणाले की, मूल्यनिर्मितीच्या दृष्टीनं जिओचा आयपीओ हा वर्षातील सर्वात मोठा कार्यक्रम असेल.

भारताव्यतिरिक्त, मुकेश अंबानी अमेरिकेतही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. मार्च 2026 मध्ये, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली की, 50 वर्षांनंतर टेक्सास राज्यात एक नवीन तेल शुद्धीकरण कारखाना उभारला जात आहे. त्यामध्ये रिलायन्स ग्रुपचे मुकेश अंबानी गुंतवणूक करतील.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)