MPSC टॉपर दर्शना पवार हत्या प्रकरण : आई म्हणाली, 'माझी मुलगी तर गेली, इतर 10 मुलींचं असं होऊ नये'

    • Author, मानसी देशपांडे
    • Role, बीबीसी मराठीसाठी
    • Reporting from, पुणे
  • Published

MPSC टॉपर दर्शना पवार हत्या प्रकरणी पोलिसांनी दर्शनाचा मित्र राहुल हांडोरे याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पुण्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली आहे.

26 वर्षीय दर्शना पवार हिचा मृतदेह पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील राजगडाच्या पायथ्याजवळ 18 जून 2023 रोजी सापडला होता.

दर्शना पवार मूळची अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी होती. दर्शनानं MPSC परीक्षेत यश मिळवलं होतं. परिक्षेत पास झाल्यानंतर ती सत्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात आली होती. पण 10 जूनपासून तिचा कुटुंबीयांशी संपर्क तुटला.

अखेर, तिचा राजगड किल्ल्यावर खून करण्यात आल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. यानंतर फरार असलेला तिचा मित्र राहुल हांडोरे याला चार दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली आहे.

कुटुंबीयांनी काय म्हटलं?

या प्रकरणातील आरोपी असलेला दर्शनाचा मित्र राहुल हांडोरे याला पोलिसांनी काल (21 जून) रात्री उशीरा मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्टेशनवरून अटक केली.

राहुलच्या अटकेची माहिती मिळताच यावर दर्शनाच्या आईची प्रतिक्रिया समोर आली आहे.

"माझी मुलगी तर गेली, पण इतर 10 मुलींचं असं होऊ नये," असं दर्शनाच्या आईने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं.

दर्शनाची आई म्हणाली, "माझ्या मुलीची हत्या त्याने केली. तो आता राहिलाच नाही पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. माझी मुलगी तर गेली, इतर 10 मुलींचं असं होऊ नये. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षाच व्हावी.

"दोघांमध्ये साधी मैत्रीही नव्हती. ती फक्त अभ्यासाविषयी त्याच्याशी दोन शब्द बोलायची. त्याने तिचा घात केला," असं आईने म्हटलं.

पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?

वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी सांगितलं की, दर्शना पवार यांच्या मृतदेहाचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला आहे.

मनोज पवार यांच्या माहितीनुसार, "पोस्टमार्टममध्ये डोक्यावर जखम असल्याचे पुरावे समोर आले आहेत. तसंच, शरीरावर जखमाही आढळल्या आहेत. या प्राथमिक अहवालावरुन तिची हत्या झाली असावी, असं स्पष्ट होतंय. त्यामुळे आम्ही अज्ञात व्यक्तीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास सुरु आहे."

"आमचं संपूर्ण पोलीस ठाणे या प्रकरणाच्या तपासावर काम करतंय. तिच्या मित्राचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. हत्येचा गुन्हा दाखल केला असला तरीही तो कुणी केला आणि का केला यासंदर्भात आम्ही तपास करतोय," अशीही माहिती मनोज पवार यांनी दिली.

नेमकं झालं काय?

दर्शना पवार यांचे वडील दत्ता पवार यांनी पोलीस जबाबात दिलेल्या माहितीनुसार, दर्शना 9 जूनला पुण्यात एका खासगी कोचिंग क्लासच्या सत्कार समारंभात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर त्या कुटूंबीयांच्या संपर्कात होत्या. 10 जूननंतर त्यांचा कुटूंबीयांशी संपर्क झाला नाही. त्यामुळे 12 जूनला त्यांचे कुटुंबीय पुण्यात आले आणि कोचिंग क्लासमध्ये जाऊन चौकशी केली.

कोचिंग क्लासमधून कुटुंबीयांना असं कळलं की, दर्शना त्यांच्या एका मित्रासोबत सिंहगड आणि राजगड फिरायला गेल्या होत्या.

यानंतर कुटुंबीयांनी सिंहगड पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. या सगळ्या घडामोडींनंतर 18 जून रोजी दर्शनाचा मृतदेह सापडला.

दर्शना यांचा मृतदेह कसा सापडला?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वेल्हे तालुक्यातील गुंजवणी गावातील स्थानिकांमध्ये काहीतरी कुजल्यासारखा वास येत असल्याची कुजबूज सुरु झाली. स्थानिकांनी पोलीस पाटलांनी कळवलं आणि त्यानंतर ही माहिती वेल्हे पोलिसांपर्यंत आली.

जिथून वास येत होता, तिथे शोध घेतल्यावर एक मृतदेह सापडला.

वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मनोज पवार यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, “रविवारी राजगडाच्या पायथ्याशी कुजलेला वास येत असल्याची माहिती मिळाली. शोध घेतल्यावर एक मृतदेह सापडला. मृतदेहाजवळ काही वस्तूही सापडल्या. त्यामध्ये फोन, बॅग अशा गोष्टींचा समावेश होता. सिंहगड पोलीस हद्दीत एक मिसिंग पर्सन तक्रार दाखल होती. त्यावरुन नातेवाईकांशी संपर्क साधला त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली."

"मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे. पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलाय. पुढचा तपास सुरु आहे,” अशी माहिती मनोज पवार यांनी दिली.

योग्य दिशेने तपास करुन दर्शनाला न्याय द्यावा - सुप्रिया सुळे

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेची दखल घेत, योग्य तपास करण्याची मागणी केलीय.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)