You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चॅम्पियन्स लीग विजयाचा उन्मादी जल्लोष, फ्रान्समध्ये शेकडोंना अटक; पाहा 10 फोटो
फ्रान्समध्ये फुटबॉल चाहते आणि पोलीस यांच्यात झालेल्या संघर्षात 400 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.
शनिवारी पुस्कास एरिना येथे झालेल्या चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात पॅरिस सेंट-जर्मेनने (PSG) आर्सेनलचा पराभव केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत चाललेल्या जल्लोषादरम्यान हिंसाचार उसळला.
चाहत्यांनी फटाके फोडले, त्यात अनेक पोलीस जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला, त्यामुळं संघर्ष झाला.
पोलिसांनी सांगितलं की, या संघर्षात सहा वाहनं, दोन दुकानं आणि एका बस थांब्याचे नुकसान झालं.
आर्सेनलविरुद्ध चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात पॅरिस सेंट-जर्मेनच्या (PSG) विजयानंतर फ्रान्सभर मोठा उन्मादी जल्लोष पहायला मिळाला. त्यात 400 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.
राजधानी पॅरिसमध्ये बस, ट्रेन आणि रेल्वे सेवा विस्कळीत करणारी अशांतता प्रचंड मोठ्या प्रमाणावर पसरली होती. या अशांततेला आळा घालण्यासाठी हजारो पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले होते.
या गोंधळात फटाके आणि फ्लेअर्स फोडण्यात आले. या साऱ्या धुमश्चक्रीत अनेक पोलीस अधिकारी जखमी झाले.
शहराच्या मध्यवर्ती भागातील जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूराचा देखील वापर केला.
गेल्या वर्षी जेव्हा पीएसजीने (PSG) हीच ट्रॉफी जिंकली होती, तेव्हाही असाच हिंसाचार झाला होता. तेव्हाही जल्लोषाचे रूपांतर प्राणघातक घटनेत झालं होतं.
गृहमंत्री लॉरेंट नुनेझ यांच्या म्हणण्यानुसार, यावेळी प्रशासन अधिक चांगल्या प्रकारे तयार होतं आणि त्यांच्याकडे एक अत्यंत मजबूत आणि अतिशय भक्कम अशी यंत्रणा तयारीत होती.
फ्रेंच संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवल्यानंतर लगेचच पॅरिसच्या प्रतिष्ठित चॅम्प्स-एलिसीसवर चाहत्यांनी गर्दी केली.
शहरामधील ठिकठिकाणच्या फुटेजमध्ये बराच उन्माद दिसून येतो आहे. जल्लोष करणारे रस्त्यांवर फटाके फोडताना, इलेक्ट्रिक बाईक्स जाळताना आणि तसेच किमान एका दुकानाच्या काचा फोडताना दिसत आहेत.
दिवसाच्या सुरुवातीला, पीएसजीच्या पार्क डेस प्रिन्सेस इथे मोठ्या स्क्रीनवर अंतिम सामना पाहण्यासाठी आलेल्या समर्थकांमध्ये आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला होता.
पोलिसांनी सांगितलं की, या अशांततेदरम्यान सहा वाहनं, दोन व्यावसायिक दुकानं आणि एका बस थांब्याचं नुकसान झालं आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे 416 जणांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये पॅरिसमधील 280 लोकांचा समावेश आहे.
नुनेझ म्हणाले की, सात अधिकारी जखमी झाले असून, त्यांनी अशा प्रकारचा उन्माद आणि अशांतता हा पूर्णपणे स्वीकारार्ह नसल्याचं म्हटलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)