हवाईदलाचं विमान कोसळलं; 2 अधिकारी आणि 'अग्निवीरां'सह 5 जणांचा मृत्यू

फोटो स्रोत, Avik
- Author, दिलीपकुमार शर्मा
- Role, बीबीसी न्यूज हिंदीसाठी
- Reporting from, गुवाहाटी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
भारतीय हवाईदलाचे एएन-32 हे मालवाहू विमान आज (13 जून) अपघातग्रस्त झाले आहे. आसामच्या जोरहाट येथे एअरपोर्ट स्टेशनवर ही घटना घडली.
भारतीय हवाई दलाने एक्सवर एक पोस्ट करून या अपघातात मृत्यू झालेल्या जवानांची माहिती दिली.
या अपघातात हवाई दलाच्या 5 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे भारतीय हवाई दलाने सांगितलं आहे.
यात स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंह, फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीर-वायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीर-वायू दानिश आलम यांचा समावेश आहे.
या आधी, अपघातानंतर हवाई दलाचे प्रवक्ते विंग कमांडर जयदीप यांनी बीबीसी न्यूज हिंदीला जोरहाट एअर फोर्स स्टेशनवर एएन-32 विमान अपघातग्रस्त झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.
भारतीय हवाई दलाने एक्सवर या अपघाताबाबत म्हटलं, "त्यांचे एएन-32 विमान जोरहाटमध्ये लँडिंग होताना (उतरत असताना) अपघातग्रस्त झाले. या अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशी समिती (कोर्ट ऑफ इन्क्वायरी) स्थापन केली जाणार आहे."
हवाई दलाने काय म्हटलं?

फोटो स्रोत, @IAF_MCC
भारतीय हवाई दलाने एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटलं , "आसाममधील जोरहाट येथे एएन-32 विमानाला झालेल्या अपघातात पाच जवानांचा मृत्यू झाल्याबद्दल आम्ही तीव्र शोक व्यक्त करतो."
"स्क्वॉड्रन लीडर प्रशांत सिंह, फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीर-वायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीर-वायू दानिश आलम यांनी आपले कर्तव्य पार पाडताना सर्वोच्च बलिदान दिले आहे."
"भारतीय हवाईदल शोकग्रस्त कुटुंबांबद्दल आपली तीव्र संवेदना व्यक्त करत असून दुःखाच्या या कठीण प्रसंगी त्यांच्यासोबत ठामपणे उभा आहे."

फोटो स्रोत, Avik
अपघाताबाबतच्या प्राथमिक माहितीनुसार, एएन-32 विमान हवाई तळाच्या परिसरात उतरत असताना कोसळले आणि त्यानंतर त्याला आग लागली.
असं असलं तरी, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हवाई दलाने या घटनेबाबत तर्कवितर्क टाळण्याचे आवाहन सर्वांना केले आहे.
भारतीय हवाई दलाने एक्सवर पोस्ट करून म्हटले, "अपघातस्थळी मदत कार्य आणि प्राथमिक तपास सुरू आहे. प्राथमिक तपासाचे निष्कर्ष हाती येईपर्यंत सर्वांनी तर्कवितर्क लावणे टाळावे, अशी विनंती आहे."
"या अपघातातील जीवितहानीबद्दल भारतीय हवाई दल तीव्र खेद व्यक्त करते आणि दुःखाच्या या प्रसंगी शोकाकुल कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे," असंही त्यांनी नमूद केलं.
भारतीय हवाई दलाने म्हटले आहे की, अधिक माहिती उपलब्ध झाल्यावर ती दिली जाईल.
एएन-32 काय आहे?
एएन-32 हे दोन इंजिन असलेले टर्बोप्रॉप लष्करी वाहतूक विमान आहे. ते मूळतः सोव्हिएत युनियनने (आता युक्रेनचे अँटोनोव्ह डिझाइन ब्युरो) तयार केले होते.
हे विमान भारतीय हवाई दलाच्या ताफ्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचा वापर प्रामुख्याने सैनिक वाहतूक, मदत पोहोचवणे आणि पॅराट्रूपर्सना हवाई मार्गाने उतरवण्यासाठी केला जातो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



























