'मी 6 वर्षांची असतानाच मासिक पाळी सुरू झाली'; भविष्यात यामुळे कोणते गंभीर आजार संभवतात?

फोटो स्रोत, Gabby
- Author, रेबेका थॉर्न
- Role, जागतिक आरोग्य प्रतिनिधी, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी गॅबीला पहिल्यांदा मासिक पाळी आली आणि तिच्या शरीरावर केसही येऊ लागले.
आपल्या मुलीमध्ये असे बदल होत असल्याचे पाहून तिची आई घाबरून गेली. त्या तिला लगेच डॉक्टरांकडे घेऊन गेल्या.
इंग्लंडमध्ये राहणाऱ्या गॅबीने बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसशी बोलताना सांगितलं की, "बालरोग तज्ज्ञांच्या टीमला माझ्या केसवर संशोधन करावं लागलं होतं कारण त्यांनी यापूर्वी असं प्रकरण कधीच पाहिलं नव्हतं."
"योग्य उपचारपद्धती शोधण्यासाठी डॉक्टरांना देशभरातील इतर रुग्णालयांशीही संपर्क साधावा लागला होता," असं त्यांनी सांगितलं.
गॅबी आता 26 वर्षांच्या आहेत. त्यांना 'सेंट्रल प्रिकॉशस प्यूबर्टी' (CPP) असल्याचं निदान नंतर झालं होतं.
ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये मुलींमध्ये वयाच्या आठव्या वर्षापूर्वी आणि मुलांमध्ये नवव्या वर्षापूर्वीच वयात येण्याची लक्षणं सुरू होतात.
हा आजार किती लोकांना होतो याविषयीची आकडेवारी प्रत्येक देशात वेगवेगळी पाहायला मिळते.
मुलींमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात पाहायला मिळते. जगभरात दरवर्षी दर 10,000 मुलींमागे 0.2 ते 26 नवीन प्रकरणं समोर येतात. तर 10,000 मुलांमध्ये हे प्रमाण 0.02 ते 0.9 दरम्यान असते.
लहान वयातच प्यूबर्टीची (वयात येण्याची) लक्षणे सुरू होणाऱ्या मुलांना फक्त तेव्हाच त्रास सहन करावा लागतो असं नाही. मोठं झाल्यावरही त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर आणि हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोकाही वाढतो.

फोटो स्रोत, Gabby
गॅबीमध्ये जेव्हा हे शारीरिक बदल सुरू झाले तेव्हा त्या इतक्या लहान होत्या की त्यांना त्या दिवसांबद्दल फारसं काही आठवतही नाही. पण जितकं आठवतंय ते खूप दुखद आणि मानसिक त्रास देणारं आहे.
गॅबी म्हणाल्या, "वेदना इतक्या असह्य व्हायच्या की मी अक्षरशः जमिनीवर तडफडत अंग एकवटून पडून राहायचे."
जवळपास एक वर्ष अनेक तपासण्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडे चकरा मारल्यानंतर शेवटी डॉक्टरांना त्यांच्या आजाराचं निदान झालं.
त्यांच्या मेंदूचा एमआरआय स्कॅनही केला गेला. पण या वेदनेमागचं नेमकं आणि स्पष्ट कारण त्यातही सापडत नव्हतं.
अखेर गॅबी यांना 'सेंट्रल प्रिकॉशस प्युबर्टी' (CPP) हा दुर्मिळ आजार असल्याचं निदान झालं आणि त्यानंतर लगेचच 'हार्मोन ब्लॉकर' म्हणजेच हार्मोन रोखणाऱ्या औषधांनी त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.
या औषधांना 'गोनाडोट्रॉपिन-रिलीझिंग हॉर्मोन ॲगोनिस्ट' (GnRH) असं म्हटलं जातं.
बालवयातल्या त्या कठीण दिवसांची आठवण सांगताना गॅबी म्हणाल्या की, "मला सतत असं वाटायचं की मी इतर मुलांपेक्षा खूप वेगळी आहे. माझ्या इतक्या प्रकारच्या तपासण्या सुरू असायच्या आणि शरीर वेळेआधीच मोठं होण्यापासून रोखण्यासाठी मला दर 3 आठवड्यांनी हॉर्मोनचे इंजेक्शन घ्यावे लागायचे."

फोटो स्रोत, Gabby
जीएनआरएच (GnRH) चे नियमित इंजेक्शन घेतल्यानं वयात येण्याची प्रक्रिया काही काळासाठी थांबवता येते. यामुळं मुलांची शारीरिक वाढ त्यांच्या वयानुसार योग्य आणि सामान्य गतीनं होत राहते.
साधारणपणे वयाच्या 11 ते 12 वर्षांदरम्यान हे औषध बंद केलं जातं. त्यानंतर वयात येण्याची नैसर्गिक प्रक्रिया पुन्हा नेहमीप्रमाणे सुरू होते.
या औषधांनी गॅबी यांच्या शारीरिक वाढीला लगाम घालण्यात तर यश मिळालं, पण तोपर्यंत वयात येताना शरीरात होणाऱ्या बदलांचा त्रास त्या तब्बल वर्षभर सोसत होत्या.
"आरशासमोर उभं राहून स्वतःला पाहिल्यावर मला नक्की मी आहे तरी कोण? असा प्रश्न पडायचं. मी मनानं जेवढी लहान होते त्याहून कितीतरी पटीने मी वयाने मोठी दिसत होते."
"मला वाटतं की, याच गोष्टीमुळे माझ्यावर वयाच्या आधीच खूप समजूतदार बनण्याचं दडपण आलं होतं," असं त्या म्हणाल्या.
लवकर वयात येण्यामागचे मूळ कारण काय?
जेव्हा ओव्हरीज (अंडाशय) ठरलेल्या वेळेच्या आधीच सेक्स हार्मोन्स तयार करू लागतात तेव्हा 'पेरिफेरल प्रिकॉशस प्यूबर्टी' (PPP) होते.
या प्रक्रियेत मेंदूचा 'हायपोथॅलॅमस' नावाचा भाग सहभागी नसतो. हायपोथॅलॅमस हे शरीरातील हार्मोन्सचे मुख्य नियंत्रण केंद्र असते.
बहुतेक वेळा ही समस्या दुसऱ्या एखाद्या आजारामुळे निर्माण होते. जसं की ओव्हरीमध्ये ट्यूमर असणे, ॲड्रिनल ग्लँडशी निगडित आजार असणे किंवा शरीराला बाहेरून मिळणारे सेक्स हार्मोन्स.
तर 'सेंट्रल प्रिकॉशस प्यूबर्टी' (CPP) मध्ये शरीरात प्यूबर्टीचे बदल नेहमीसारखेच घडून येतात. फक्त हे बदल ठरलेल्या वयापेक्षा खूप लवकर सुरू होतात.
मुलांमध्ये वयाआधीच प्यूबर्टीची लक्षणे दिसण्याच्या प्रकरणांमध्ये हाच प्रकार सर्वात जास्त पाहायला मिळतो. बहुतांश प्रकरणांमध्ये हे नक्की कशामुळं घडतं याचं ठोस कारण समजू शकलेलं नाही.
डेन्मार्कमध्ये 1998 ते 2017 या काळात 8,596 मुलांवर अभ्यास करण्यात आला होता. 2020 मधील या रिसर्चनुसार, दरवर्षी दर 10,000 मुलींमागे सरासरी 9.2 मुली तर 10,000 मुलांमागे 0.9 मुले या आजाराने ग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले.
20 वर्षांच्या या कालावधीत मुलींमध्ये याचे प्रमाण जवळपास तिप्पट झाले. तर मुलांमध्ये हे प्रमाण जवळपास दुप्पट झाले, असंही संशोधकांना आढळून आलं.

फोटो स्रोत, Getty Images
दक्षिण कोरियातील 2008 ते 2014 या काळातील नॅशनल इन्शुरन्स डेटाच्या अभ्यासानुसार, दर 10,000 मुलींमागे 26.28 मुलींना सीपीपी असल्याचं समोर आलं, तर मुलांच्या बाबतीत 10,000 मुलांमागे हा आकडा फक्त 0.7 एवढाच होता.
हा आजार मुलींमध्येच जास्त प्रमाणात का दिसतो याचं उत्तर मात्र संशोधक अजूनही शोधत आहेत. पर्यावरणातील बदल आणि शरीरातील जैविक कारणं एकत्र आल्यामुळे हे होत असावं, असं तज्ज्ञांचं मत आहे.
पूर्वीच्या तुलनेत आताच्या मुलींमध्ये प्यूबर्टीची लक्षणं कमी वयातच दिसू लागली आहेत, याचाच हा एक संकेत असू शकतो.
2025 मधील 44 वेगवेगळ्या संशोधनाच्या निष्कर्षांनुसार, 1977 ते 2013 या काळात मुलींमध्ये स्तनांचा विकास सुरू होण्याचं सरासरी वय दर 10 वर्षांनी सुमारे तीन महिन्यांनी कमी झालं आहे.
मुलांमध्येसुद्धा प्यूबर्टीचे बदल पूर्वीपेक्षा लवकर घडून येत असल्याचे या अभ्यासांतून समोर आलं आहे. अर्थात मुलांमधील या बदलाचे प्रमाण मुलींच्या तुलनेत थोडे कमी आहे.

फोटो स्रोत, Bruno Bernardi
ब्राझीलमधील साओ पाउलो युनिव्हर्सिटीच्या एंडोक्रायनॉलॉजिस्ट डॉ. ॲना पिन्हेरो माशादो कँटन म्हणाल्या की, त्यांनी अगदी एक वर्षाच्या लहान बाळामध्येही ही समस्या पाहिली असून त्याच्यावर उपचार केले आहेत.
त्यांच्या सांगण्यानुसार, अशा अतिगंभीर केसेसमध्ये मेंदूतील हायपोथॅलॅमस या भागात जखम असणे किंवा काही बिघाड असणे हीच मुख्य कारणं असू शकतात.
काही केसेसमध्ये मेंदूतील ट्यूमरमुळेसुद्धा मुलांमध्ये लहान वयातच प्यूबर्टीची लक्षणे दिसू लागल्याचे समोर आले आहे.
डॉ. कँटन आणि त्यांच्या संशोधन टीमच्या मते, या समस्येमागे काही बाह्य कारणेही असू शकतात. यामध्ये आहार आणि पर्यावरणाशी संबंधित घटकांचा समावेश आहे.
"मुलांमधील वाढता लठ्ठपणा हे असं एक कारण आहे ज्याकडं आपल्याला गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. मुलांचे वजन प्रमाणापेक्षा जास्त असेल तर त्यांच्यामध्ये प्यूबर्टीचे बदल खूप वेगाने घडून येऊ शकतात," असं त्या सांगतात.
शरीरात असणाऱ्या फॅट टिश्यूज म्हणजेच चरबीयुक्त ऊती इस्ट्रोजनसह अनेक सेक्स हार्मोन्सचे प्रमाण वाढवू शकतात असं संशोधनातून समोर आलं आहे.
फॅट टिश्यूजमुळे शरीरात 'लेप्टिन' नावाचे हार्मोन वाढते, जे हाडांची वाढ होण्यासाठी मदत करते. संशोधकांच्या मते, काही मुलांमध्ये घडून येणारे हेच बदल लहान वयात प्यूबर्टीचे बदल दिसण्यामागे जबाबदार असू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
अनुवंशिक कारणंही या समस्येला कारणीभूत असू शकतात. 2013 मध्ये प्रोफेसर ॲना क्लाउडिया लॅट्रॉनिक आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी यासंदर्भात एक मोठा शोध लावला होता.
त्यांच्या अभ्यासानुसार, 'MKRN3' नावाच्या जीन्समध्ये बदल झाल्यामुळे आणि इतर अनुवंशिक घटकांमुळे लहान वयात 'सेंट्रल प्रिकॉशस प्यूबर्टी' सुरू होऊ शकते.
10 वर्षांची लारा आणि आठ वर्षांची बीट्रिज या दोन्ही मुलींमध्ये हा म्युटेशन आढळला. लाराच्या शरीरात वयाआधीच स्तनांचा विकास होण्याची लक्षणं दिसू लागल्यानंतर ही बाब समोर आली.
त्यांची आई लेइया बर्नार्डी म्हणाल्या, "त्यावेळी माझी मुलगी फक्त पाच वर्षे 10 महिन्यांची होती. त्यामुळं हे सगळं पाहून मी खूप घाबरले होते. असा त्रास सहन करायला ती खूपच लहान होती."
जेनेटिक तपासणीद्वारे डॉ. कँटन आणि त्यांच्या टीमने शोधून काढले की, हे म्युटेशन (जनुकांमधील बदल) मुलींना त्यांच्या वडिलांच्या नातेवाईकांकडून मिळाले होते.
या चाचणीत लाराची लहान बहीण बीट्रिज हिलासुद्धा हा आजार होण्याचा धोका जवळपास नक्की असल्याचे स्पष्ट झाले.
या आधीच झालेल्या तपासणीमुळे मोठा फायदा झाला. मुलगी सात वर्षांची असताना तिच्यात प्यूबर्टीची लक्षणे दिसताच लगेच ट्रीटमेंट सुरू करण्यात आली.
लेइया म्हणाल्या, "मी खूप अस्वस्थ झाले होते, कारण या आजारामुळं माझ्या लहान मुलांचं बालपणच जणू हिरावून घेतलं गेलं असं मला वाटत होतं."
कॅन्सर आणि हृदयविकाराचा धोका
डॉ. कँटन इशारा देतात की, 'सेंट्रल प्रिकॉशस प्यूबर्टी'वर वेळेत उपचार केले नाहीत, तर त्याचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
या सांगतात, "विचार करा, जर एखाद्या मुलीमध्ये वयाच्या 6 व्या किंवा 7 व्या वर्षीच स्तनांचा विकास सुरू झाला तर ती तिच्या मैत्रिणींपेक्षा आणि शाळेतील तिच्या वयाच्या इतर मुलींपेक्षा खूप वेगळी दिसू लागते. ही परिस्थिती तिच्यासाठी अत्यंत कठीण आणि त्रासदायक असू शकते."
शारीरिकदृष्ट्या पाहिल्यास ज्या मुलांमध्ये प्यूबर्टीचे बदल लहान वयातच दिसू लागतात. त्यांची उंची तुलनेने कमी राहण्याची शक्यता असते.
कँटन यांच्या मते, "हाडांची मजबूत वाढ होण्यात सेक्स हार्मोन्सची मोठी भूमिका असते. म्हणूनच प्यूबर्टी वेळेआधी सुरू झाल्यास हाडांची वाढसुद्धा खूप वेगाने घडून येते."
पण यामुळे हाडांची ही वाढ ठरलेल्या वेळेआधीच पूर्णपणे थांबते आणि परिणामी मुलांची पूर्ण उंची वाढू शकत नाही, असे त्या म्हणाल्या.
मोठ्या प्रमाणावर केलेल्या अभ्यासांतून असेही समोर आले आहे की, लहान वयात प्यूबर्टी सुरू झाल्यामुळे पुढे जाऊन हृदयविकार आणि हार्मोन्सशी संबंधित काही कॅन्सर होण्याचा धोका वाढू शकतो. जसं की ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाचा कॅन्सर.
मात्र डॉ. कँटन सांगतात की, जर या आजाराचे वेळेवर निदान झाले आणि योग्य वेळी उपचार सुरू केले, तर हे धोके मोठ्या प्रमाणावर कमी करता येऊ शकतात.
"आम्ही गेल्या 30-40 वर्षांपासून हेच उपचार करत आहोत आणि तिचे खूप चांगले परिणाम दिसून आले आहेत," असे डॉ. कँटन यांनी स्पष्ट केले.

फोटो स्रोत, Bruno Bernardi
सुरुवातीला खूप भीती आणि चिंता वाटत असली, तरी आता लेइया आणि ब्रुनो यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या दोन्ही मुली आता इतर लहान मुलांसारखेच आपले बालपण आनंदात जगत आहेत.
लेइया म्हणाल्या, "जेव्हा लारा वयात येऊ लागली, तेव्हा तिला वाटायचे की हे सगळं माझ्यासोबतच का होतंय? मी बाकीच्यांपेक्षा वेगळी का आहे? मलाच ही औषधं का घ्यावी लागत आहेत?"
आपला हा अनुभव शेअर करून इतर पालकांना जागरूक करता येईल आणि योग्य वेळी मदत घेण्यासाठी त्यांना धीर देता येईल अशी आशा या आई-वडिलांना आहे.
गॅबीसुद्धा या विषयावर मोकळेपणाने बोलण्याबाबत खूप जागरूक आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या लोकांना मदत करतात, जेणेकरून या आजाराबाबत कोणालाही मनात अजिबात संकोच किंवा लाज वाटू नये.
"या विषयावर खूपच कमी माहिती उपलब्ध असल्याचा मला राग यायचा," असं त्या सांगतात.
"जेव्हा मी पाहिलं की खूप लोक माझ्याशी जोडले जात आहेत आणि स्वतःचे अनुभव सांगत आहेत तेव्हा मला विश्वास वाटला की माझी गोष्ट जगाला सांगण्याचा निर्णय अगदी बरोबर होता."
(पॉला अॅडामो इडोएटा यांचे अतिरिक्त वृत्तांकन.)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
























