तृणमूलचे 20 बंडखोर खासदार ज्या 'नॅशनॅलिस्ट सिटिझन पार्टी'त विलीन होत आहेत, त्या पक्षाबद्दल जाणून घ्या

Published
वाचन वेळ: 7 मिनिटे

ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टीमध्ये विलीनीकरणावर चर्चा केली.

तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी त्यांच्यासोबत पक्षाचे 20 खासदार असल्याचा दावा केला आहे.

त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे त्यांच्या गटाच्या खासदारांना सभागृहात स्वतंत्रपणे बसण्याची व्यवस्था असावी अशी मागणी केली आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या पराभवानंतर पक्षाचे लोकसभा खासदारांमध्ये पडलेली फूट आणि नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी चर्चेमध्ये आहेत.

अनेकजण नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टीबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत. हा कोणता पक्ष आहे आणि याची राजकीय ताकद किती आहे, ज्यामुळे टीएमसीचे 20 खासदार या पक्षात विलीनीकरण करण्याबद्दल बोलत आहेत.

तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते नीलांजन दास यांनी पक्षातील बंडखोर नेत्यांवर टीका करत एक्सवर लिहिलं, "या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (एनसीपीआय)च्या राष्ट्रीय अध्यक्ष सिउली कुंडू आहेत. त्या आता तृणमूल काँग्रेसच्या पक्षांतर करणाऱ्या 20 जणांच्या नेत्या आहेत."

त्यांनी पुढे लिहिलं आहे, "जे लोक ट्विन फ्लॉवर्स या निवडणूक चिन्हावर (टीएमसी) जिंकून आले होते, ते आता अशा पक्षात आश्रय घेत आहेत, ज्याच्याबद्दल बंगालनं कधीही ऐकलं नव्हतं. काकोली घोष दस्तीदार यांनी लोकसभा अध्यक्षांकडे एनसीपीआय (एनडीएचा घटक पक्ष) म्हणून मान्यता देण्याची मागणी करत दावा केला की त्यांच्यासोबत टीएमसीच्या संसदीय पक्षाचे 2/3 सदस्य आहेत."

नीलांजन दास यांच्यानुसार, "आतापर्यंत टीएमसीच्या कोणत्याही कार्यकर्त्यानं सार्वजनिकरीत्या या पक्षात सामील होण्याबाबत कोणताही रस दाखवलेला नाही. एनसीपीआयची पश्चिम बंगालमध्ये कोणतीही संघटना नाही आणि फेसबुकवर त्यांचे 72 फॉलोअर्स आहेत."

एनसीपीआयची स्थापना कधी झाली

रविवारी (14 जून) रात्री अचानक चर्चेत आलेल्या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टीच्या फेसबुकवरील फॉलोअर्सची संख्या वाढू लागली आहे. हा लेख लिहिला जाईपर्यंत त्याच्या फॉलोअर्सची संख्या 500 हून अधिक झाली आहे.

अर्थात हे फेसबुक पेज व्हेरिफाईड नाही आणि ऑफिशियलदेखील नाही.

निवडणूक आयोगानुसार, नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी हा पश्चिम बंगालमधील एक बिगर मान्यताप्राप्त रजिस्टर्ड राजकीय पक्ष आहे.

त्याची नोंदणी राज्यातील हावडा जिल्ह्यातील पत्त्यावर झालेली आहे. या पक्षाची नोंदणी 2022 मध्ये झाली होती.

निवडणूक आयोगानं 13 ऑक्टोबर 2022 ला या पक्षाच्या रजिस्ट्रेशनशी संबंधित अर्जाबद्दल माहिती दिली होती.

नियमानुसार निवडणूक आयोगानं या पक्षाच्या रजिस्ट्रेशनआधी जर कोणाला याच्यावर आक्षेप असेल तर त्यांना एक महिन्याच्या आत कारणासह कळवण्यास सांगितलं होतं.

या राजकीय पक्षाच्या संस्थापक अध्यक्ष म्हणून सिउली कुंडू, सरचिटणीस म्हणून सैकत दास आणि खजिनदार (ट्रेझरर) म्हणून सुदम जेट्टी यांचं नाव नोंदवण्यात आलेलं आहे.

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत 2023 मध्ये नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टीनं (एनसीपीआय) दोन जागांवर त्यांचे उमेदवार उभे केले होते. यात त्यांना एकूण 822 मतं मिळाली होती. या मतदारसंघांमध्ये झालेल्या एकूण मतदानाच्या ही फक्त एक टक्के मतं होती.

टक्केवारीनुसार या पक्षाला नोटा पेक्षाही कमी मतं मिळाली होती.

एनसीपीआयचं निवडणूक चिन्ह काय आहे?

एनसीपीआय आतापर्यंत एक खूपच छोटा राजकीय पक्ष आहे. नीलांजन दास यांनी याच्याबद्दल जी माहिती दिली आहे, त्यानुसार पेन हे या पक्षाचं चिन्ह आहे.

रंजक बाब म्हणजे एनसीपीआयनं फेसबुक पेजवर सोमवारी (15 जून) एका पोस्टमध्ये दावा केला की त्यांच्याकडे पश्चिम बंगालच्या 42 लोकसभा खासदारांपैकी 20 खासदार आहेत.

निवडणूक आयोगाच्या ऑडिट रिपोर्टमध्ये काय?

पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या ऑडिट रिपोर्टमध्ये एनसीपीआयबद्दल थोडी माहिती मिळते.

पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या 2022-23 च्या आर्थिक वर्षासाठीच्या अहवालानुसार, या पक्षाला नऊ देणगीदारांकडून पार्टी फंडात पैसे मिळाले. ही एकूण रक्कम एक लाख रुपयांहून थोडी अधिक आहे.

तर 2023-24 च्या अहवालानुसार, एनसीपीआयनं त्या वर्षी मिळालेल्या देणग्या, त्यांचा वार्षिक ऑडिट रिपोर्ट आणि निवडणूक खर्चाबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

तर 2024-25 या वर्षासाठीच्या पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या वार्षिक अहवालात एनसीपीआयच्या नावाचासुद्धा उल्लेख नाही.

एनसीपीआयनं त्यांच्या नेत्याबद्दल काय सांगितलं

एनसीपीआयच्या ताज्या फेसबुक पोस्टनुसार, काकोली घोष दस्तीदार लोकसभेत या पक्षाच्या नव्या नेत्या आहेत. त्यांनी आणखी एका पोस्टमध्ये लिहिलं, "आमच्यासोबत आल्याबद्दल धन्यवाद."

विशेष गोष्ट म्हणजे एनसीपीआयनं तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचादेखील पक्षात स्वागत करतानाचा एक फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे.

काकोली घोष दस्तीदार यांच्यासोबत असलेले पक्षाचे खासदार सुदीप बंदोपाध्याय रविवारी (14 जून) म्हणाले, "आम्ही नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टीमध्ये विलीनीकरण करत आहोत. हा एक प्रादेशिक पक्ष आहे. हा एक मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहे. आता खरा तृणमूल काँग्रेस पक्ष कोणता आहे, याचा निर्णय न्यायालय करेल."

आतापर्यंत काय घडलं?

रविवारी (14 जून) दिल्लीत पोहोचल्यानंतर तृणमूलचे काही खासदार काकोली घोष आणि शताब्दी रॉय यांच्यासह लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटले. त्याआधी त्यांनी केंद्रीय मंत्री आणि पश्चिम बंगालचे भाजप प्रभारी भूपेंद्र यादव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

दरम्यान, सध्या ममता बॅनर्जी यांना पाठिंबा असल्याचा दावा करणारे पक्षाचे खासदार कीर्ती आझाद आणि सागरिका घोष यांनीही ओम बिर्ला यांच्या घरी जाऊन त्यांना एक पत्र सादर केलं. पक्षातील फूट संविधानाच्या विरोधात जाऊ शकत नाही, असं कीर्ती आझाद यांनी म्हटलं आहे.

पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनीही ओम बिर्ला यांना पत्र लिहलं आहे. सभागृहात केवळ तृणमूल काँग्रेसलाच पक्ष समजावं आणि इतर कोणत्याही गटाला मान्यता दिली जाऊ नये, असं त्यांनी म्हटलं आहे.

लोकसभेत टीएमसीचे 28 खासदार आहेत. पक्षाच्या 13 राज्यसभा खासदारांपैकी चौघांनी राजीनामा देऊन पक्ष सोडला आहे.

"आम्ही अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे (एआयटीसी) निवडून आलेले खासदार होतो. आम्ही एआयटीसीबद्दलची आमची नाराजी लोकसभा अध्यक्षांना सांगितली," असं काकोली घोष दस्तीदार यांनी ओम बिर्ला यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटलं.

'खरा तृणमूल पक्ष कोणता याचा निर्णय न्यायालय देईल'

निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, नॅशनॅलिस्ट सिटिझन्स पार्टी हा त्रिपुरामधील एक नोंदणीकृत, परंतु मान्यता नसलेला राजकीय पक्ष आहे.

नॅशनलिस्ट सिटिझन पार्टीबद्दल बोलताना काकोली घोष दस्तीदार म्हणाल्या की, "आम्ही संसदेत स्वतंत्रपणे बसण्याची मागणी केली आहे. तसंच नॅशनलिस्ट सिटिझन पार्टीमध्ये विलिन होत असल्याचंही सांगितलं आहे. आमच्यासोबत 20 खासदार आहेत. ते तृणमूल काँग्रेसच्या 28 खासदारांपैकी दोन-तृतीयांशपेक्षा जास्त आहेत. आम्ही एआयटीसीमधून बाहेर पडून एनडीएसोबत काम करू," असंही काकोली म्हणाल्या.

तसंच, तृणमूलचे बंडखोर खासदार सुदीप बंडोपाध्याय म्हणाले, "आम्ही नॅशनॅलिस्ट सिटिझन्स पार्टीमध्ये विलीन झालो आहोत. हा एक राजकीय पक्ष असून मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्ष आहे. खरी तृणमूल काँग्रेस कोणती, याचा निर्णय न्यायालयात होईल."

तर, तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष हे अद्याप ममता बॅनर्जी यांच्यासोबतच आहेत.

कुणाल घोष म्हणाले, "ते कोणत्या पक्षात जात आहेत किंवा कोणाशी हातमिळवणी करत आहेत, हे आम्हाला माहीत नाही. पण इथले हे सर्वजण ममतादीदींचे उमेदवार होते आणि भाजपविरोधी मतांवर निवडून आले होते. दिल्लीत संसदेत पाठवणाऱ्या मतदारांनी त्यांना भाजपच्या विरोधात मतदान केले होते. म्हणूनच, जर ते आता भाजपच्या गोटात सामील होत असतील, तर तो पूर्णपणे विश्वासघात ठरेल. याचा ममतादीदी किंवा तृणमूल काँग्रेसशी काहीही संबंध नाही. हा प्रत्येक मतदाराशी केलेला विश्वासघात आहे."

कीर्ती आझाद यांनी बंडखोर खासदारांविषयी काय म्हटले?

दुसरीकडे, टीएमसीचे खासदार कीर्ती आझाद आणि सागरिका घोष यांनीही ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली.

कीर्ती आझाद म्हणाले की, "आम्ही ओम बिर्लांना पत्र दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या आणि 10 व्या अनुसूचीच्या कलम 4 नुसार, पक्षात स्वतंत्र गट किंवा फुटीसाठी कोणतीही तरतूद नाही. असं पाऊल घटनाबाह्य आहे."

तर सागरिका घोष म्हणाल्या की, "ममता बॅनर्जी आणि पक्षाच्या चिन्हाच्या जोरावर निवडणुका जिंकणारे अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे नेते पराभवानंतर पक्ष सोडून जात आहेत, ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. तुमची तत्त्वं विचारसरणी कुठे आहे?"

"संपूर्ण निवडणूक प्रचारात तुम्ही भाजपवर टीका केली आणि आता सत्तेसाठी त्यांच्याच मागे लागला आहात. भाजपने पैसा आणि बळ वापरून राजकीय पक्ष फोडले आहेत, पण खरी लाजीरवाणी गोष्ट म्हणजे अनेक लोकप्रतिनिधींसह टीएमसीच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजपमध्ये सामील होण्यासाठी आपल्या मूल्यांशी तडजोड केली. जनता हे सर्व पाहत आहे. ते सर्व काही लक्षात ठेवतात आणि वेळ आल्यावर प्रत्युत्तर देतील," असंही त्यांनी म्हटलं.

तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात, काकोली घोष दस्तीदार यांच्या नेतृत्वाखालील गटाला वेगळे बसू देऊ नये, तर त्यांना सभागृहात एकच राजकीय पक्ष म्हणून मान्यता द्यावी असं म्हटलं आहे.

"तृणमूल काँग्रेसकडे सध्या सर्व कायदेशीर अधिकार आहेत. संविधानाच्या दहाव्या अनुसूचीनुसार (पक्षांतरबंदी कायदा) योग्य ती कारवाई करण्याच्या अधिकाराचा समावेश त्यात आहे. कोणत्याही खासदाराचं वर्तन या तरतुदींचं उल्लंघन करणारं आढळलं, तर पक्ष त्यांच्याविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कारवाई करू शकतो," असंही त्यांनी म्हटलं आहे.

तृणमूल काँग्रेसमधील फुटीची मालिका

तृणमूल काँग्रेसच्या 80 आमदारांपैकी 60 आमदार आधीच ऋतब्रता बॅनर्जी यांच्यासोबत गेले आहेत. हा गट ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना विरोध करत आहे.

पक्षाच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी 28 पैकी 20 खासदार त्यांच्यासोबत आहेत, असा दावा केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये 35 वर्षे जुन्या डाव्या आघाडी सरकारला सत्तेवरून हटवून सत्तेवर आलेल्या ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसकडे 15 वर्षे राज्याची सत्ता होती.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर, ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाला त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे.

पक्षाचे नेते एका पाठोपाठ पक्ष सोडत आहेत. आधी ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपान साहा यांनी विधानसभेत बंड केलं. त्यानंतर राष्ट्रीय नेत्यांच्या राजीनाम्यांची मालिका सुरू झाली.

कोलकाताचे महापौर आणि ममता बॅनर्जी यांचे आणखी एक जवळचे विश्वासू फिरहाद हकीम यांनी ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत वैयक्तिकरित्या आपला राजीनामा देण्याचा प्रस्ताव ठेवला.

पक्षाच्या राज्यसभा खासदार सुष्मिता देव यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून राज्यसभा सदस्यत्वही सोडलं आहे. सुष्मिता देव यांच्यापूर्वी टीएमसीचे राज्यसभा खासदार सुखेंदू शेखर राय यांनीही राज्यसभेचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

पक्षात झालेल्या मोठ्या बंडानंतर, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेप्रमाणे हा पक्ष त्यांचे निवडणूक चिन्ह वाचवू शकेल का, अशा चर्चांना सुरुवात झाली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)