दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आणि मुंबईतील ठाकरे बंधुंच्या मोर्चात नेमकं काय घडलं? पाहा फोटो

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीने बाराखंबा ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढण्याचं आवाहन केलं होतं.

या आवाहनानंतर दिल्लीत मोठ्या प्रमाणावर आंदोलक जमा व्हायला लागले. काँग्रेससह विरोधी पक्षाचे अन्य नेते दिल्लीत जमा झाले आहेत.

या मोर्चात विरोधी पक्षाचे खासदार मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांसह आहे.

आता राहुल गांधी, प्रियांका गांधी, नेहा बोरा तसेच असंख्य कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षाचे खासदार मंडी हाऊसपासून चालत सुप्रीम कोर्टापर्यंत गेले.

यापूर्वी राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भारताच्या सरन्यायाधीशांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला होता.

दरम्यान, सरन्यायाधीशांनी त्यांची भेट घ्यायला नकार दिला.

राहुल गांधी यांच्या पत्राला उत्तर देताना सरन्यायाधीशांनी म्हटलं की, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पत्रात उल्लेख केलेल्या मुद्द्यांवर प्रशासकीय स्तरावर कारवाई करण्याचा अधिकार संविधानानुसार सर्वोच्च न्यायालयाला नाही.

सरन्यायाधीशांच्या नकारानंतर राहुल गांधी आणि विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मतचोरीच्या मुद्द्यावरून कारवाईची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली.

या मार्चमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन राहुल गांधी यांनी केलं होतं. शक्य नसेल त्यांनी अगदी घरातूनही विरोध करावा असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.

दिल्लीमध्ये आज होत असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवरही मेट्रो प्रशासनाच्या वतीनं काही ठराविक स्थानकं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यान, दिल्लीमध्ये आंदोलन आणि धरणं आयोजित करण्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणांच्या यादीतून जंतरमंतरला वगळण्यात आलं आहे.

दरम्यान, मुंबईत ठाकरे बंधूंकडून आज पुन्हा आंदोलन झालं.

शिवाजी पार्कच्या गेट क्रमांक 6 बाहेर मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्ते जमले होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)