काइली जेनर: सुमारे 474 कोटी रुपयांची ब्रा आणि फॅशन इंडस्ट्रीला पडलेला प्रश्न

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

फॅशन शो मधले कपडे, ट्रेंड्स नेहमीच चर्चेचा विषय ठरतात...कधी या कपड्यांचं कौतुक होतं तर कधी टीकाही. सध्या अशीच चर्चा सुरू आहे एका 'ब्रा' ची. त्याला कारणही तसंच आहे. 18 कॅरेट सोन्यापासून बनलेली ही ब्रा हिरेजडित आहे आणि ज्या व्यक्तीने ती परिधान केली होती, ती आहे प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार काइली जेनर.

काइली जेनरने 5 कोटी डॉलर (अंदाजे 474 कोटी रुपये) किमतीची ब्रा घालून 'व्हिक्टोरियाज सिक्रेट'च्या फॅशन शोमध्ये वॉक केला. हे तिचं रॅम्पवरचं पदार्पण होतं, ज्यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.

अंतर्वस्त्रांसाठी प्रसिद्ध असलेल्या 'व्हिक्टोरियाज सिक्रेट'च्या वार्षिक फॅशन शोमध्ये रविवारी (18 ऑक्टोबर) जेव्हा काइली रॅम्पवर उतरली, तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. तिने या शोमध्ये प्रसिद्ध 'फँटसी ब्रा' परिधान केली होती.

ही ब्रा 18 कॅरेट सोन्यापासून बनवण्यात आली असून, त्यावर 4,410 हिरे जडवण्यात आले आहेत, अशी माहिती तिच्या डिझायनरने दिली.

गेल्या अनेक वर्षांपासून 'फँटसी ब्रा' हे या फॅशन शोचे प्रमुख आकर्षण राहिले आहे. ही ब्रा परिधान करण्याची संधी मिळणं हे मॉडेल्ससाठी प्रतिष्ठेचं समजलं जातं. त्यांच्या करिअरमधला हा एक महत्त्वाचा टप्पा समजला जातो.

'द कार्देशियन्स' या रिअ‍ॅलिटी शोमुळे प्रसिद्ध झालेल्या 29 वर्षीय काइलीची ही ब्रा परिधान करण्यासाठी निवड झाल्याने तिच्या चाहत्यांना आनंद झाला. पण, मॉडेलिंग विश्वातून या निर्णयावर टीका झाली. एखाद्या अनुभवी सुपरमॉडेलला ही संधी का देण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला गेला.

मॉडेल्स की सोशल मीडिया स्टार?

सोशल मीडिया आणि मार्केटिंग क्षेत्रातील तज्ज्ञ जोएल मार्लिनार्सन यांच्या मते हा निर्णय विचारपूर्वक घेण्यात आला होता. मॉडेलिंग आणि सोशल मीडियाचं भवितव्य याविषयी यामुळे चर्चा सुरू झाली.

बीबीसी न्यूजबीटशी बोलताना त्यांनी म्हटलं, "काइली ही सेलिब्रिटींच्या नवीन जनरेशनचं प्रतिनिधित्व करते. सध्याच्या काळाता एखादी व्यक्ती पारंपरिक अर्थाने मॉडेलच्या प्रतिमेत चपखल बसते की नाही, यापेक्षा तिचे किती फॉलोअर्स आहेत याला ब्रँड्स प्राधान्य देत आहेत."

मार्लिनार्सन यांच्या मते, सोशल मीडियावर आणि कार्देशियन सिस्टर्ससोबतच्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये काइलीला पाहत मोठ्या झालेल्या तरुण प्रेक्षकांचे तिच्यासोबत वेगळं नातं आहे.

मात्र, नाओमी कॅम्पबेलसारख्या दिग्गज मॉडेल्सचा काळ पाहिलेल्या प्रेक्षकांना काइलीला मिळालेली ही संधी खटकू शकते. त्यांच्या मते हा निर्णय म्हणजे फॅशनच्या पारंपरिक मूल्यांशी केलेली प्रतारणा असू शकते, असंही मार्लिनार्सन म्हणतात.

"हे मार्केटिंगचं नवीन युग आहे. 'व्हिक्टोरियाज सिक्रेट'सारख्या जुन्या आणि प्रतिष्ठित ब्रँड्सना कोणतीही जोखीम घ्यायची नाही. अधिकाधिक बातम्या होतील, त्या माध्यमातून लोकांचे लक्ष वेधून घेता येईल आणि प्रेक्षकांची गर्दी आकर्षित करता येईल, याची खात्री तसंच क्षमता असलेल्या व्यक्तींनाच ब्रँड्स संधी देऊ इच्छितात. व्हिक्टोरियाज सिक्रेटने नेमकं हेच केलं," असं मार्लिनार्सन यांनी म्हटलं.

'व्हिक्टोरियाज सिक्रेट'च्या इन्स्टाग्राम पेजवर काइलीच्या खास लूकचा व्हीडिओ शेअर करण्यात आला. त्यावर काही चाहत्यांनी तिचे कौतुक केले.

मात्र, अनेकांनी या निर्णयाला 'व्यावसायिक मॉडेल्सचा उघड अपमान' असे म्हटले. अनेक प्रतिभावान मॉडेल्स उपलब्ध असताना काइलीचीच निवड का करण्यात आली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

एका युजरने म्हटले की, "हा शो आता 'ग्लॅमरपेक्षा इन्फ्लुएन्सर्सचा तमाशा' झाला आहे.

सोशल मीडियावरील लोकप्रियतेने मॉडेलिंगमधील प्रतिभा, अभिजातता आणि रॅम्पवरील कौशल्याची यांची जागा घेतल्याची टीका काही युजर्सने केली.

व्हिक्टोरियाज सिक्रेटचे मुख्य क्रिएटिव्ह अधिकारी अ‍ॅडम सेलमन यांनी 'व्होग' मासिकाशी बोलताना म्हटलं, काइलीची निवड तिचा सांस्कृतिक प्रभाव लक्षात घेऊन करण्यात आली.

"काइलीचा प्रभाव फॅशन किंवा टीव्हीपुरता मर्यादित नाही. तो यापेक्षा जास्त आहे," असं त्यांनी म्हटलं.

"आमचा शोही असाच आहे. हा शो खूप मोठा आहे. तो खऱ्या अर्थाने मनोरंजनाचा भाग आहे आणि त्याला अधिक व्यापक बनवण्यासाठी काइली महत्त्वाची भूमिका बजावू शकते," असेही त्यांनी सांगितले.

या प्रसिद्ध ब्रा ची मॉडेल म्हणून काइली जेनरला निवडल्याबद्दल लोकांची नाराजी समजू शकते, असं ब्रिटिश मॉडेल समर नेसबथ यांनी सांगितले.

न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये रॅम्पवर चाललेल्या 25 वर्षीय ब्रिटिश मॉडेल समर नेसबथ यांनी न्यूजबीटशी बोलताना म्हटलं की, तरुण चाहत्यांशी जोडलेले राहण्यासाठी व्हिक्टोरियाज सिक्रेटने काइलीची निवड केली असावी.

"ती प्रचंड प्रभाव असलेली इन्फ्लुएन्सर आहे आणि आपण सोशल मीडियाच्या युगात जगत आहोत," असं त्यांनी म्हटलं.

व्हिक्टोरियाज सिक्रेटचा फॅशन शो 2018 मधील कार्यक्रमानंतर बंद करण्यात आला होता. त्या वर्षी शोला कमी प्रेक्षक मिळाले होते. त्याशिवाय, हा शो महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, कालबाह्य संकल्पना आणि विविधतेचा अभाव यांमुळे टीकेचा विषय ठरला होता.

2024 मध्ये हा शो पुन्हा सुरू करण्यात आला. यावेळी सर्व महिलांचा सन्मान करण्याचं आश्वासन देण्यात आलं. प्लस-साइज मॉडेल म्हणून अ‍ॅश्ली ग्रॅहमच्या सहभागासह विविध पार्श्वभूमीच्या मॉडेल्सना त्यावेळी संधी देण्यात आली.

काय आहे यंदाच्या 'फँटसी ब्रा' चे वैशिष्ट्यं?

यंदाची 'फँटसी ब्रा' दागिन्यांचा ब्रँड जेकब अँड कंपनीच्या सहकार्याने तयार करण्यात आली. कंपनीच्या मते, ही आतापर्यंत तयार करण्यात आलेली सर्वाधिक किमतीची 'फँटसी ब्रा' आहे. ती तयार करण्यासाठी 15 कलाकारांनी एक हजार तासांहून अधिक वेळ काम केले.

मात्र, या ब्रा वर दिला जाणारा भर पाहून आपण वास्तवापासून किती दूर गेलो आहोत, असे नेसबथ यांना वाटते.

त्यांनी म्हटलं, "लोकांना खायला अन्न मिळत नाही. अनेकांना घरातील वीजबिल भरणेही परवडत नाही."

"आपण आपले लक्ष कशावर केंद्रित करत आहोत आणि आपला पैसा कुठे खर्च करत आहोत, याबद्दल विचार करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत," असंही त्यांनी म्हटलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)