इराणच्या धोक्यामुळे केटरिंग ट्रकमधून ट्रम्प यांनी बदलले विमान, अमेरिकन मीडियाचा दावा

फोटो स्रोत, AFP via Getty Images
- Author, जेसिका रॉन्सले
- Role, बीबीसी न्यूज
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात तुर्कीतून NATO शिखर परिषदेहून अमेरिकेला परतत असताना आपले विमान गुप्तपणे बदलले होते.
हे विमान बदलण्याआधी ट्रम्प हे केटरिंग ट्रकमध्ये लपले होते. नंतर ते त्यातून उतरून विमानात बसले, असे दावा अमेरिकन मीडियाने आपल्या रिपोर्टमध्ये केला आहे.
वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष टीव्ही कॅमेरे सुरू असताना एअर फोर्स वनमध्ये बसले. नंतर त्यांना गुप्तपणे एका उंच एअरपोर्ट केटरिंग ट्रकमध्ये बसवण्यात आले आणि संभाव्य धोका ओळखून त्यांचे विमान बदलण्यात आले.
यावेळी विमानात उपस्थित असलेले पत्रकार आणि व्हाईट हाऊसच्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती नव्हती.

फोटो स्रोत, Reuters
दुसऱ्या विमानात कसे गेले?
अमेरिकन विमानावर इराणकडून क्षेपणास्त्र हल्ला होण्याची खात्रीलायक धमकी अमेरिकेला समजली होती, असं बीबीसीची अमेरिकेतील सहकारी वृत्तसंस्था CBS न्यूजने सांगितले.
ट्रम्प यांनी गुप्तपणे विमान बदलल्याच्या वृत्ताला व्हाईट हाऊसने दुजोरा दिला नाही.

याआधी, ट्रम्प यांनी तुर्कीतील अंकारा येथे शिखर परिषदेवेळी म्हटले होते की, ते 'इराणचे पहिल्या क्रमांकाचे लक्ष्य' आहेत.
इराण आणि अमेरिकेचे युद्ध थांबवण्यासाठी सुरू असलेल्या वाटाघाटी फिस्कटल्यानंतर अमेरिकेतील लष्कराने पुन्हा इराणवर हल्ले सुरू केले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी ही गोपनीय घटना घडली.
ट्रम्प हे कतारने भेट म्हणून दिलेल्या नव्या बोईंग 747-8 विमानाने तुर्कीत आले, पण त्यांनी घोषणा केली की 'जुन्या आठवणींना उजाळा' म्हणून मी जुन्या एअर फोर्स वन विमानाने परत जातोय.

फोटो स्रोत, Reuters
8 जुलैला व्हीडिओ फुटेजमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे अंकारा विमानतळावरून राष्ट्राध्यक्षांसाठी असलेल्या विमानात चढताना दिसले.
वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे की, पण त्यांना गुप्तपणे छोट्या C-32A या लष्करी विमानात बसवण्यात आले. हे विमान बोईंगचे 757 प्रकारचे होते, हे एक मॉडिफाईड विमान होते.
आधीच्या विमानातून दुसऱ्या विमानात नेण्यासाठी त्यांना केटरिंग ट्रकने नेण्यात आले. हे वाहन (केटरिंग ट्रक) विमानाच्या उंचीच्या प्रमाणात वर उचलण्यात आले होते. ट्रम्प आधी त्यात बसले आणि नंतर ते केटरिंग ट्रकमधून दुसऱ्या विमानात बसले.
सुरक्षा सचिव पीट हेगसेथ हे देखील C-32A या विमानात चढले. उड्डाण सामान्य वाटावे म्हणून त्यांनी विमानाला लावता येणाऱ्या बाह्य पायऱ्यांचा वापर केला होता, असे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.
नव्या विमानात बसल्यावर पत्रकारांशी चर्चा
काही पत्रकार आणि व्हाईट हाऊसचे कर्मचारी हे राष्ट्राध्यक्षांच्या एअर फोर्स वनमध्ये दाखल झाले. त्यांना विमानांच्या खिडक्यांचे पडदे खाली ओढून घ्यावेत, असे सांगण्यात आल्याचे समजते. त्यांना हे माहीत नव्हते की या विमानात आता राष्ट्राध्यक्ष नाहीयेत.
मग ट्रम्प हे युनायटेड किंगडम मार्गे अमेरिकेला रवाना झाले, ते पुन्हा एअर फोर्स वनच्या विमानात चढले आणि RAF Mildenhall या ठिकाणी विमान लँड झाल्यावर त्यांना (जुन्या) एअर फोर्स वनमधून उतरताना पाहण्यात आले. हे स्पष्ट नाहीये की, ते C-32A या विमानातून उतरून ते पुन्हा एअर फोर्स वनमध्ये कसे बसले.
त्यानंतर पुन्हा ट्रम्प हे कतारने गिफ्ट दिलेल्या नव्या एअर फोर्स वनमध्ये बसले आणि वॉशिंग्टनला रवाना झाले.
प्रवासादरम्यान ट्रम्प हे पत्रकारांशी बोलले. यावेळी त्यांनी इराणकडून मिळालेल्या धमक्यांची दखल घेतली. परंतु विमानांची अदलाबदली केल्याचा उल्लेख त्यांनी केला नाही.
त्यांना पत्रकारांकडून विचारण्यात आले की, तुर्कीहून निघालेल्या विमानाचे पडदे खाली ओढून घेण्याची सूचना आम्हाला का देण्यात आली होती.
त्यावेळी ट्रम्प म्हणाले होते की, कारण तुम्ही सर्वाधिक धोका असलेल्या विमानातून प्रवास करत आहात. कारण आपल्याला अशा लोकांशी दोन हात करावे लागत आहेत जे अप्रमाणिक आहेत.
ट्रम्प म्हणाले की, त्यांच्या जीवाला 'नेहमीच धोका आहे' आणि ते इराणच्या 'लिस्ट'वर 'पहिल्या क्रमांका'चे लक्ष्य आहेत.
'पण मला काही झालं तर तुम्हालाही होईल, बरोबर ना?' असं त्यांनी म्हटलं आणि पुढे ते पत्रकारांना म्हणाले, "कदाचित दुसरे प्रोफेशन निवडण्याबाबत तुम्ही विचार कराल."

फोटो स्रोत, Reuters
व्हाईट हाऊसचे कम्युनिकेशन्स डायरेक्टर स्टिव्हन च्युएंग यांनी या वृत्ताला ना दुजोरा दिला, ना हे वृत्त फेटाळले.
पण ते म्हणाले की, एअर फोर्स वनचे नवे विमान अद्ययावत आहे. हे विमान 'state-of-the-art aircraft' आहे आणि राष्ट्राध्यक्ष तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्वथा योग्य आहे.
सीबीएस न्यूजने सांगितले की, याआधी ट्रम्प किंवा त्यांच्या विमानावर हल्ला होण्याची धमकी आल्याचे अमेरिकन गुप्तहेर विभागाला समजले होते आणि त्यांनी याआधी त्याची सूचना दिली होती.
कतारने गिफ्ट दिलेल्या विमानाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करणारी बातमी 'द न्यू यॉर्क टाइम्स'ने दिली होती. नाटो शिखर परिषदेहून परतताना ट्रम्प यांना विमान बदलण्याची विनंती गुप्तहेर विभागाने केली होती, असेही या बातमीत म्हटले होते.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अनेक संस्थांच्या पत्रकारांना जबाबासाठी बोलवण्यात आले, त्यांच्याकडून शपथपूर्वक जबाब घेण्यात आले.
त्यानंतर, न्याय विभागाने बीबीसीला सांगितले की, अवैधरीत्या माहिती लीक झाल्याच्या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
कतारने गिफ्ट दिलेले बोईंग 747-8 विमान राष्ट्राध्यक्षांच्या प्रवासासाठी योग्य बनवण्यासाठी अंदाजे 400 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 3 हजार 816 कोटी रुपये) अमेरिकेकडून खर्च करण्यात आले.
क्षेपणास्त्राचा मारा झाल्यानंतर तो निकामी करण्यासाठी असलेली लेजर टेक्नॉलॉजी जुन्या एअर फोर्स वनच्या विमानात असल्याचे सुत्रांनी सीबीएस न्यूजला सांगितले. हे स्पष्ट नाहीये की कतारने गिफ्ट दिलेल्या नव्या विमानात कोणते तंत्रज्ञान आहे.
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेव्हिट यांनी सांगितले, "नवं एअर फोर्स विमान हे राष्ट्राध्यक्षांच्या प्रवासासाठी पूर्ण सुरक्षित आहे. नजीकच्या काळात त्यात काही अधिकच्या सुधारणा आणि सोयी-सुविधा करण्यात येतील. हे काम पूर्ण होण्यासाठी अंदाजे एक महिना लागेल."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























