फोनची चार्जिंग केबल वारंवार खराब होते का? 'या' पद्धतीने हाताळल्यास दीर्घकाळ टिकतील

फोटो स्रोत, Getty Images
- Author, थॉमस जर्मेन
- वाचन वेळ: 6 मिनिटे
चार्जिंग केबल ही आपण दैनंदिन आयुष्यात वापरत असलेल्या तंत्रज्ञानविषयक गोष्टींमधील सर्वात दुर्लक्षित बाब आहे. चार्जिंग केबल्स म्हणजे आपण फोन किंवा इतर उपकरणं चार्जिंग करण्यासाठी वापरतो ती केबल.
ही केबल जोपर्यंत तुटत नाही आणि तुमच्या फोनचं चार्जिंग न झाल्यानं तो बंद पडत नाही, तोपर्यंत आपण त्याकडे दुर्लक्षच करत असतो. या केबल वारंवार खराब होण्यासाठी आपणच जबाबदार असतो.
या चार्जिंग केबल्स योग्यप्रकारे कशा हाताळायच्या ते जाणून घेऊया.
मायकल पेक्ट चार्जिंग केबल अक्षरश: कशाही प्रकारे हाताळतात. एकप्रकारे ते या केबलचा छळच करतात. मेरिलँड विद्यापीठातील 'सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड लाईफ सायकल इंजिनीअरिंग'चे ते संस्थापक आहेत. वेगवेगळे गॅझेट्स खराब का होतात, हे जाणून घेण्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या या प्रयोगशाळेत ते गॅझेट्स पाठवतात.
"आम्ही एखाद्या शवागारासारखे आहोत, मात्र ते इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठीचं शवागार आहे," असं मायकल पेक्ट मला म्हणाले.

त्यांच्या टीमनं यूएसबी केबल्सची तपासणी करण्यासाठी त्यांची वाटेल तशी हाताळणी केली आहे. या केबल्स ठेचल्या आहेत, त्यांना ताणलं आहे, अनेक वेळा प्लग इन केलं आहे आणि इतर असंख्य गोष्टी केल्या आहेत. या केबल्सची इतक्या वाईट पद्धतीनं केलेली हाताळणी जणूकाही पुरेशी नव्हती, म्हणून ते नादुरुस्त झालेल्या केबल्सच्या नुकसानीचा अभ्यास करण्यासाठी त्यांना एक्स-रे खाली ठेवतात.
मी पेक्ट यांना फोन केला. मी त्यांना एक प्रश्न विचारला आणि माझ्या मते, तो एक अगदीच साधासोपा प्रश्न होता. तो म्हणजे चार्जिंगची केबल गुंडाळण्यासाठी सर्वात योग्य पद्धत कोणती?

फोटो स्रोत, Getty Images
आयुष्यभर मला वाटत होतं की ही केबल नेहमी सैलसर पद्धतीनं एकामागोमाग एक अशा वर्तुळाकार पद्धतीनं गुंडाळली पाहिजे. ती वर्तुळं किंवा गुंडाळी अगदी घट्ट नसावी.
कारण केबल खूपच घट्टपणे गुंडाळली किंवा त्या एकमेकात गुंतल्या तर त्या लवकर खराब होतात. माझ्या परिचयातील लोकांमध्ये आढळणारी ही एक सामान्य समजूत आहे. त्यामुळे केबल हाताळण्याच्या या पद्धतीला काहीतरी वैज्ञानिक आधार देणारा मुद्दा मला ऐकायला मिळेल, असं मला वाटलं होतं.
मात्र त्याऐवजी, मला असं समजलं की मी आणि कदाचित इतर लाखो लोकदेखील त्यांचा वेळ वाया घालवत होते.

"तसं केल्यामुळे काहीही फरक पडत नाही. आम्ही काही मोठ्या कॉम्प्युटर कंपन्यांसाठी काम केलं आहे. मी हे सांगताच तुमच्या डोळ्यासमोर ज्या कंपन्यांची नावं येतात, अगदी त्याच कंपन्यांसाठी आम्ही काम केलं आहे. केबल्स चुकीच्या किंवा वेडावाकड्या पद्धतीनं गुंडाळल्यामुळे त्या खराब झाल्याचं आम्हाला आतापर्यंत कधीच आढळलेलं नाही," असं पेक्ट म्हणाले.
पेक्ट यांनी सांगितलेल्या या माहितीला, चार्जिंगच्या केबलविषयी माझी जी धारणा किंवा मत होतं, त्याच्याशी जुळवून घेणं मला खूपच कठीण जात होतं. इतकं की मी यासंदर्भात इतर तज्ज्ञांशी संपर्क साधला. त्या सर्वांनीदेखील मला हेच सांगितलं. ते म्हणजे चार्जिंगच्या केबल्स तुम्हाला हव्या तशा हाताळा, गुंडाळा.
अर्थात तरीदेखील माझ्या इतर काही वाईट सवयी अशा आहेत, ज्यामुळे माझ्या चार्जिंग केबल्सचं आयुष्य कमी होत होतं किंवा त्या लवकर खराब होत आहेत. या गोष्टी मी गेल्या अनेक दशकांपासून दररोज करतो आहे. माझ्या या सवयींचा त्रास त्या बिचाऱ्या केबल्सना झाला! मला ही माहिती आधीच मिळाली असती तर किती बरं झालं असतं.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र, यातील आनंदाची गोष्ट अशी की, मी जे शिकलो आहे, मला जे समजलं आहे, ते मी इथे तुम्हालादेखील सांगणार आहे. म्हणजे मी ज्या चुका केल्या, त्या तुम्हाला टाळता येतील. आपल्या केबल्स आपल्यासाठी खूप काम करत असतात.
मात्र जोपर्यंत त्या खराब होत नाहीत आणि आपली उपकरणं चार्ज करण्याचा कोणताही मार्ग आपल्याकडे शिल्लक राहत नाही, तोपर्यंत आपल्याला या गोष्टीची जाणीव क्वचितच होते. साहजिकच, या केबल्सची हाताळणी थोडीतरी व्यवस्थित करायला नको का किंवा त्यांना थोडंसं काळजीपूर्वक हाताळला नको का?
जर तुम्हाला हे अजूनही पटत नसेल, तर हे लक्षात घ्या की तुमच्या केबल्सची काळजी घेणं हे तुमच्या खिशासाठी आणि पर्यावरणासाठीदेखील चांगलं, फायद्याचं ठरतं.

"या जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक म्हणजे जे केबल्स खराब करतात आणि दुसरी म्हणजे जी खराब करत नाहीत," असं काईल वाइन्स म्हणतात. ते आयफिक्सिट या कंपनीचे सह-संस्थापक आहेत. ही कंपनी ग्राहकांचे अधिकार म्हणजे सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरणपूरकता यांची सांगड घालत काम करते.
आयफिक्सिट लोकांना त्यांची इलेक्ट्रॉनिक उपकरणं स्वत:च दुरुस्त करण्यास मदत करते. हे कबूल करणं वेदनादायी आहे. मात्र मला वाटतं की मी केबल्स खराब करणाऱ्या लोकांच्या गटात मोडतो. "जेव्हा केबल्स खराब होतात, तेव्हा त्या जवळपास नेहमीच अशा ठिकाणी खराब होतात, जिथे केबल आणि प्लग एकत्र जोडले जातात," असं ते म्हणाले.
केबल्सच्या अंतर्गत रचनेबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का? तुमच्या केबल्स धातूच्या तारांनी तयार झालेल्या असतात. त्यावर इन्सुलेशन गुंडाळलेलं असतं. तर दुसऱ्या टोकाला, त्या कनेक्टरमध्ये ओवलेल्या किंवा जोडलेल्या असतात. ज्याच्या टोकाला एक प्लग असतो. याच सांध्यावर किंवा जोडणीवर समस्या निर्माण होते. जर तुम्ही त्याबद्दल विचार केला, तर ते समजण्यासारखं आहे. जेव्हा तुम्ही केबल वापरत असता, तेव्हा कनेक्टर अँकरचं काम करतो. त्यामुळे केबल अगदी तिच्या टोकालाच वाकते.

फोटो स्रोत, Getty Images
पेपर क्लिप म्हणजे कागदांच्या गठ्ठ्याला लावायच्या चिमट्याची कल्पना करा. ती क्लिप एकाच ठिकाणी वारंवार वाकवल्यास तुटते.
"सूक्ष्म पातळीवर विचार केल्यास, लवचिकतेच्या मर्यादेपलीकडे जर वस्तू वाकवली गेली, तर त्यामधील अणुंमधील बाँड म्हणजे बंध तुटतात. त्यांची जागा बदलल्यामुळे ते पुन्हा तयार होतात," असं रॉबर्ट हायर्स म्हणाले.
ते अमेरिकेतील वॉर्सेस्टर पॉलीटेक्निक इन्स्टिट्यूटमधील मेकॅनिकल अँड मटेरियल्स इंजिनीअरिंग विभागाचे प्रमुख आहेत.
"यामुळे दोष गोळा होतात, त्याला डिसलोकेशन्स म्हणतात. त्यात अणू एका रेषेत नसतात. ते गालिच्यावर सुरकुत्या पडण्यासारखं असतं," असं ते म्हणाले.
खूप जास्त प्रमाणात डिसलोकेशन्स झाले म्हणजे खूप दोष गोळा झाले तर, त्यामुळे धातूला काठिण्य येतं, तो ठणक होतो. त्यानंतर तो खटकन तुटतो आणि तुमची पेपर क्लिप खराब होते. केबलच्या आत असलेल्या धातूच्या तारांच्या बाबतीतदेखील असंच होतं.
त्या अणुंबद्दल तुम्हाला इतकं वाईट वाटेल की तुम्ही यातील काही समस्या टाळाल, अशी आशा वाटते.
"एक गोष्ट अनेकजण करतात आणि आळस आल्यावर कधीकधी मीदेखील करतो. ती म्हणजे केबलला प्लगमधून काढताना, त्याचा जो लांब भाग असतो त्याला धरून ओढतो. त्यामुळे त्या केबलचा कनेक्टर धरून तुम्ही ओढलं असतं, तर आता तिथे जो जास्तीचा ताण पडला, तो पडला नसता," असं पेक्ट म्हणाले.

या समस्येचं एक मुख्य कारण म्हणजे, काही केबल्स खूपच आखूड असतात, असं हायर्स म्हणतात. जर सॉकेटपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही केबल ताणत असाल, तर त्यामुळे केबलचं नुकसान होतं. तसंच फोन चार्जिंगला लावून तुम्ही अंथरुणात किंवा इतरत्र लोळत पडलेले असता, त्यावेळेस फोन वापरण्यासाठी तुम्ही जर त्याच्या चार्जरची पिन एका तीव्र कोनात ओढली, तर तुम्ही स्वत:च समस्या निर्माण करत आहात.
"आणखी एक गोष्ट करताना लोक दिसतात. ती म्हणजे फोन चार्जिंगला लावल्यावर त्याला आधार किंवा टेकू देण्यासाठी ते कारमधील कप होल्डरमध्ये ठेवतात. अशा परिस्थितीत फोन त्या केबलवरच असतो, तसंच कार चालवताना जाणवणाऱ्या धक्क्यांसह, त्या फोनचं सर्व वजन त्याच एका बिंदूवर पडत असतं," असं वाइन्स म्हणाले. अशाप्रकारची हाताळणी थांबवा. ते खरंच खूप चुकीचं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
तर मुद्दा असा आहे की, अनेक लांब, जड केबल तुम्ही कशाप्रकारे गुंडाळता, ते खरोखरंच महत्त्वाचं असतं. चित्रपट किंवा ऑडिओ क्षेत्रात काम करणाऱ्या कोणालाही याबद्दल विचारून पाहा. ते तुम्हाला केबल गुंडाळण्याच्या 'ओव्हर-अंडर' पद्धतीविषयी सांगतील. व्यावसायिकरित्या काम करणारे लोक त्याचाच वापर करतात.
मात्र वाइन्स आणि इतरांनी मला सांगितलं की जड केबलचे हे नियम तुमच्या ठिसूळ, नाजूक आणि लवचिक चार्जिंग केबल्सना लागू होत नाहीत.

वाइन्स म्हणतात की, तुमच्या चार्जिंग केबल्स खूप घट्टपणे गुंडाळणं हे निश्चितच योग्य नाही. मात्र जोपर्यंत तुम्ही विचित्रपणे केबलला टोकदार कोनात दुमडत नाही किंवा त्याचा कनेक्टर ओढत नाही किंवा गुंडाळताना तिचे वेटोळे करत नाही, तोपर्यंत चुकीच्या पद्धतीनं गुंडाळल्यामुळे केबलमध्ये समस्या निर्माण होण्याची खूपच कमी शक्यता असते. केबल खराब होण्याची समस्या कनेक्टरवर खूप ताण दिला किंवा तो चुकीच्या पद्धतीनं हाताळला तर निर्माण होते.
केबलच्या त्या भागाला अतिशय सांभाळून हाताळा. तसं केलं तर ती केबल माझ्यापेक्षा अधिक काळ टिकेल, असं हायर्स म्हणाले. म्हणजेच केबल खूप काळ टिकेल.
मात्र असं तेव्हाच होतं, जेव्हा केबल सुरुवातीपासूनच चांगल्या दर्जाच्या आणि काम करण्यास सोयीच्या असतात. मी बोललेल्या प्रत्येकानं मला सांगितलं की स्वस्त आणि निकृष्ट दर्जाच्या केबल्स हे या समस्येमागील एक मोठं कारण आहे. रस्त्यावर किंवा इतर काही ठिकाणी विकल्या जाणाऱ्या हलक्या किंवा निकृष्ट दर्जाच्या अतिशय स्वस्त केबल्सना तुम्ही टाळायला हवं. त्याऐवजी अधिक मजबूत आणि टिकाऊ केबल्स विकत घ्या. त्यामुळे त्या केबल्स वारंवार बदलण्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागणार नाही. त्यातून तुमचे पैसे वाचतील.

फोटो स्रोत, Getty Images
एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ती म्हणजे ब्रेडेड केबल्स म्हणजे वेणीप्रमाणे गुंफलेल्या केबल्स. यामध्ये प्लास्टिकचं बाह्य आवरण वापरण्याऐवजी तारांवर घट्ट कापड किंवा नायलॉनची जाळी विणलेली असते.
"तो एक चांगला सर्वसाधारण नियम आहे. अगदी ॲपल ही कंपनीनं देखील त्यांच्या अलीकडच्या नवीन मॉडेल्समध्ये अशा ब्रेडेड केबल्सचा वापर केला आहे. कारण ब्रेडेड केबल्समध्ये तारा विणलेल्या असल्यामुळे त्यांची मजबूती आणि कवच यामुळे तारांचं अधिक चांगल्या प्रकारे रक्षण होतं," असं वाइन्स म्हणाले.
वस्तुनिष्ठपणे पाहिलं, तर या सर्व बारीकसारीक गोष्टी आहेत. तंत्रज्ञानाचं क्षेत्र, उपकरणं यांचा विचार करता केबल्स या तुमच्या आयुष्यातील सर्वात कमी आकर्षक गोष्ट आहेत. त्यांचं अस्तित्व फक्त कार्यक्षम वापरासाठी असतं. त्यामुळे जर त्या चांगल्या प्रकारे किंवा कार्यक्षमपणे वापरात असतील, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



























