तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
स्पेन ट्रेन अपघातातील मृतांचा आकडा 69 वर; ट्रेन चालकाच्या संभाषणाची क्लिप बाहेर आल्यानंतर जनतेचा संताप
स्पेनची राजधानी माद्रिदच्या दक्षिणेला आज (28 ऑक्टोबर) सकाळी 2 हायस्पीड रेल्वेंची धडक झाली. स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजता मोरा आणि ऑर्गाझ या 2 नगरपालिका क्षेत्रांदरम्यान हा अपघात झाला.
या अपघातात किमान 69 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.
या घटनेच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी परिवहन विभागाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. दरम्यान रेल्वे वाहतूक नियंत्रण कक्ष आणि ट्रेन चालक यांच्यात झालेल्या संभाषणाची ऑडिओ रेकॉर्डिंगही समोर आली आहे.
रात्री परिवहन मंत्रालयाबाहेर निदर्शक जमले होते. रेल्वे अपघाताची जबाबदारी निश्चित करून दोषींना जाब विचारण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, या अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्पेनमध्ये तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळला जात आहे.
या काळात अतोचा रेल्वे स्थानकावर स्मारक उभारण्यात आले असून, देशातील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले आहेत.
दरम्यान, स्पॅनिश माध्यमांसमोर आलेल्या ऑडिओ रेकॉर्डिंगमधून युरोपच्या आधुनिक इतिहासातील सर्वांत भीषण रेल्वे अपघातांपैकी एका अपघाताच्या काही मिनिटे आधी ट्रेन चालक आणि रेल्वे नियंत्रण कक्ष यांच्यात झालेल्या संभाषणाची माहिती समोर आली आहे.
एका ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानंतर नियंत्रण कक्षातील ऑपरेटर एका ट्रेन चालकाला, "तुमचा प्रवास नेहमीच्या गतीने सुरू ठेवा," असं सांगताना ऐकू येते.
बीबीसी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये 'इर्यो' ट्रेनचा चालक ट्रेनचा नियंत्रण यंत्रणेशी संपर्क तुटल्याचे सांगतो. तसेच, आपण उर्दा येथे थांबलो असल्याचंही तो सांगतो.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्पेनमध्ये तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असतानाच ही ऑडिओ रेकॉर्डिंग्स समोर आली आहेत.
बुधवारी 28 ऑक्टोबररोजी सकाळी माद्रिदहून सेव्हिलला जाणाऱ्या एका ट्रेनची दुसऱ्या ट्रेनशी धडक झाली होती. प्राथमिक माहितीनुसार, दुसरी ट्रेन तिथे उभी असावी, असे दिसत होते.
या अपघातात किमान 69 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत.
बेपत्ता आणि मृत व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आपत्कालीन बचाव पथकांनी रात्रभर डब्यांचे पत्रे कापून शोधमोहीम सुरू ठेवली. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अनेकांची ओळख अद्याप पटलेली नाही.
बचावकार्याबाबत स्पेनच्या पंतप्रधानांनी काय सांगितलं?
बीबीसी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी सांगितलं की, रेल्वे अपघातानंतर दुर्घटनाग्रस्त परिसराच्या आसपास मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत.
पत्रकार परिषदेत बोलताना सांचेझ म्हणाले, अपघातातील पीडित तसेच त्यांच्या नातेवाइकांसह अपघाताच्या दिवशी घटनास्थळी उपस्थित असलेल्या कोणत्याही व्यक्तीला मानसिक आधार आणि समुपदेशनाची मदत उपलब्ध करून दिली जात आहे.
सांचेझ यांनी बचाव पथकांनी केलेल्या 'उत्कृष्ट कार्या'चे कौतुक केले. तसेच, या दुर्घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी स्पेन सरकार गांभीर्याने प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बीबीसी व्हेरीफायने या घटनेच्या व्हीडिओंचे विश्लेषण केले आहे. त्यांनी सांगितले आहे की एका ट्रेनचे डब्बे पटरीहून उतरून पलटलेले दिसत आहेत.
अपघातानंतर स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेज यांनी टोलेडो येथे झालेल्या या भीषण रेल्वे अपघातामुळे आपल्याला 'धक्का' बसल्याची प्रतिक्रिया बुधवारी दिली होती.
सांचेज यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सांगितलं की, ते परिवहन मंत्री आणि कास्तिया-ला मांचा प्रदेशाच्या प्रमुखांशी सतत संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं.
त्यांनी सांगितलं की, घटनास्थळी आपत्कालीन पथकांकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी आणि त्यांची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी सर्व संबंधित सरकारी यंत्रणा एकत्रितपणे काम करत आहेत.
सांचेज म्हणाले, "या अपघातातील सर्व पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. या कठीण प्रसंगी मी त्यांच्या पाठीशी आहे."
सांचेज आणि स्पेनमधील इतर नेत्यांनी बुधवारी होणारे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. यात पुढील महिन्यात होणाऱ्या संसदीय निवडणुकीच्या प्रचाराचाही समावेश आहे.
हायस्पीड रेल्वेच्या अपघातात अनेकांच्या मृत्यूची भीती
माद्रिदच्या दक्षिणेला उर्दा येथे आज सकाळी झालेल्या हायस्पीड रेल्वेच्या अपघातातील मृतांची संख्या किमान 64 वर पोहोचली आहे. स्पेनच्या एफे या वृत्तसंस्थेला प्रादेशिक सरकारमधील सूत्रांनी ही माहिती दिली.
कास्तिया-ला मांचा येथील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, खासगी कंपनी इर्योच्या रेल्वेमध्ये 147 प्रवासी होते, तर दुसऱ्या हायस्पीड रेल्वेमध्ये 397 प्रवासी होते.
आतापर्यंत, उभी असलेल्या इर्यो रेल्वेला दुसऱ्या हायस्पीड रेल्वेने मागून धडक दिली होती का, याची अधिकाऱ्यांनी अद्याप पुष्टी केलेली नाही.
या अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्पेनमधील माध्यमांना सूत्रांनी सांगितलं की, गेल्या जानेवारी महिन्यात अदामुझ येथे झालेल्या रेल्वे अपघातापेक्षाही हा अपघात अधिक गंभीर असू शकतो. त्या अपघातात 46 जणांचा मृत्यू झाला होता.
'अनेकांना बाहेर पडता येत नव्हतं'
17 वर्षीय एडुआर्दाने 'कॅडेना सेर' या वृत्तवाहिनीला सांगितलं की, अपघातानंतर घटनास्थळी 'अराजकतेसारखी परिस्थिती' निर्माण झाली होती. अनेकांना डब्यांतून बाहेर पडता येत नव्हतं.
अपघाताच्या दृश्यांमध्ये अनेक रेल्वे डबे रुळांवरून घसरलेले दिसत असून, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात ढिगारा पसरल्याचं दिसत आहे.
मोबाईलवर चित्रित केलेल्या एका व्हीडिओमध्ये धडकेच्या तीव्रतेमुळे एका डब्याचा मागील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं दिसत आहे. तसेच, या अपघातग्रस्त डब्यांच्या ढिगाऱ्यांमध्ये काही लोक उभे असल्याचंही या व्हीडिओमध्ये दिसत आहे.
धावत्या रेल्वेने थांबलेल्या रेल्वेला धडक दिली?
परिवहन मंत्रालयाच्या हवाल्याने स्पेनच्या आरटीव्हीई या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, रेन्फे ट्रेनने इर्यो ट्रेनला मागून धडक दिली. त्यामुळे इर्यो ट्रेनचे दोन डबे रुळांवरून घसरले.
रेल्वे सेवा बंद, प्रवाशांची गर्दी
रेल्वे कंपनी रेन्फेने सांगितलं की, माद्रिद, सियुदाद रिअल आणि आंदालुसिया या भागांदरम्यानची रेल्वे सेवा अद्याप बंद आहे. दक्षिण स्पेनमधील सेव्हिया सांता जुस्टा रेल्वे स्थानकावर अधिक माहिती मिळण्याच्या प्रतीक्षेत अनेक प्रवासी थांबल्याचे दृश्य दिसत आहे.
अपघातस्थळी डबे आणि ढिगारा रुळांवर विखुरलेला
अपघातस्थळी अनेक डबे रुळांवरून घसरल्याचे आणि त्यांचे तुकडे व इतर साहित्य आजूबाजूला विखुरल्याचे दिसत आहे.
मोबाईलवर चित्रित केलेल्या व्हीडिओंमध्ये धडकेच्या तीव्रतेमुळे एका डब्याचा मागचा भाग तुटल्याचे दिसते. अपघातानंतर डब्यांच्या अवशेषांमध्ये काही लोक उभे असल्याचेही दिसत आहे.
अपघातग्रस्तांसाठी शस्त्रक्रिया रद्द
स्पेनच्या एफे या वृत्तसंस्थेनुसार, रेल्वे अपघातातील जखमींवर उपचार करण्यासाठी परिसरातील रुग्णालयांनी नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत.
अपघातातील जखमी मोठ्या संख्येने रुग्णालयात येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
टोलेडो, सियुदाद रिअल आणि अल्काझार दे सान हुआन येथील रुग्णालयांनीही काही शस्त्रक्रिया रद्द केल्याचे वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.