सोन्या-चांदीच्या दरात अचानक घसरण का होतेय? गुंतवणूकदार त्यातून पैसे का काढून घेतायेत?

सोनं
फोटो कॅप्शन, मार्च महिन्यात सोन्याच्या भावात गेल्या 40 वर्षांमधील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण नोंदवण्यात आली आहे
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

इराणविरुद्ध अमेरिका आणि इस्रायल युद्ध सुरू असताना शेअर बाजारापासून ते कच्चे तेल, सोने-चांदी आणि रुपयांपर्यंत प्रत्येक गोष्टीत प्रचंड अस्थिरता दिसून येते आहे.

गेल्या एका महिन्यात 30 शेअर्सचा समावेश असलेला सेन्सेक्स हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक जवळपास 10 टक्क्यांनी घसरला आहे. तर कच्च्या तेलाची किंमत जवळपास 60 टक्क्यांनी वाढली आहे. तसंच डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर पोहोचलं आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये बाजारात मोठी घसरण झाली आहे. विशेषकरून सोने आणि चांदीचा भाव विक्रमी पातळीवर पोहोचल्यानंतर ही घसरण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदार आश्चर्यचकित झाले आहेत, त्यांना धक्का बसला आहे.

सोनं हा 'गुंतवणुकीचा सुरक्षित' पर्याय म्हणून ओळखला जातो.

अमेरिका आणि इस्रायलनं 28 फेब्रुवारीला इराणवर हल्ले सुरू केल्यानंतर सोन्याच्या भावात लगेचच वाढ झाली होती. मात्र, आता त्यामध्ये मोठी घसरण झाली आहे.

अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा आता हा चौथा आठवडा सुरू होणार आहे. एकीकडे युद्धजन्य परिस्थिती असतानाच, सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे.

सोन्याच्या भावात गेल्या 40 वर्षांमधील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण नोंदवण्यात आली आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, युद्ध सुरू झाल्यापासून सोन्याच्या भावात 15 टक्क्यांहून अधिकची घसरण झाली आहे. सोन्याचा भाव 20 जानेवारीला 5,591 डॉलर प्रति औंसच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. मात्र तिथून सोन्याच्या भावात जवळपास 20 टक्क्यांची घसरण झाली आहे.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, 24 मार्चला 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1.39 लाख रुपये होता.

भावात घसरण होण्यामागचं कारण?

सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंच्या भावात घसरण होण्यामागे अनेक कारणं असल्याचं सांगितलं जात आहे.

पहिलं कारण म्हणजे, युद्धामुळे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

अशा परिस्थितीत, अमेरिकेचं फेडरल रिझर्व्ह (मध्यवर्ती बँक) दीर्घकाळ व्याजदर जास्त ठेवू शकतं. सोनं हा एक गुंतवणुकीचा असा प्रकार आहे, ज्याचं आकर्षण व्याजदरात वाढ झाल्यामुळे कमी होतं.

पारंपारिकदृष्ट्या सोन्याला सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानलं जातं. त्यामुळे युद्धाच्या काळात सोन्याच्या भावात वाढ व्हायला हवी. मात्र, प्रत्यक्षात याच्या उलट होतं आहे.

या महिन्यात सोन्याच्या भावात 20 टक्के घसरण झाली आहे. तर चांदीच्या भावात 32 टक्क्यांहून अधिकची घसरण झाली आहे.

सोनं
फोटो कॅप्शन, इराण युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे

सोनं आणि चांदीच्या भावात, 1983 नंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे. चांदीचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून जवळपास 40 टक्के खाली आला आहे.

मार्च महिन्यात सोने आणि चांदीच्या भावात झालेली घसरण, ही गेल्या 45 वर्षांमधील सर्वात मोठी मासिक घसरण होती. असं म्हटलं जाऊ शकतं की 2026 मध्ये या मौल्यवान धातूंच्या भावात झालेली वाढ पूर्णपणे खाली आली आहे.

अनिश्चितता किती काळ राहणार?

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बीबीसीशी बोलताना ऑगमोंट या बुलियन ट्रेडिंग कंपनीच्या संशोधन प्रमुख डॉ. रेनिशा चैनानी म्हणाल्या, "घसरण झाल्यानंतर सोने आणि चांदीच्या भावात काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. मात्र आता मध्य-पूर्वेतील तणाव कोणत्या दिशेनं जातो, यावर सर्वकाही अवलंबून आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील मार्ग खुला होण्याबाबत असलेल्या अनिश्चिततेमुळे महागाई वाढण्याचा धोका अधिक आहे."

त्यांचं म्हणणं आहे, "अलीकडच्या दिवसांमध्ये रोकड वाढवण्यासाठी सोने आणि चांदीची विक्री करण्यात आली होती. गुंतवणुकदार इतर ठिकाणी मार्जिन कॉलची भरपाई करण्यासाठी सोने आणि चांदीसारख्या फायदेशीर गुंतवणुकीतून पैसे काढून घेत आहेत. दीर्घकालावधीचा विचार करता मूलभूत तत्वांमध्ये बदल झालेला नाही. हा अल्पकालावधी पुरता असणारा मुद्दा आहे."

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी म्हणाले की सोन्याचा भाव त्याच्या उच्चांकी पातळीवरून 30 टक्क्यांहून अधिकनं खाली आला आहे. जोपर्यंत कच्च्या तेलाची किंमत स्थिर होत नाही आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत सोने आणि चांदीच्या भावावरील दबाव कायम राहील.

ते म्हणाले, "सोन्याच्या भावात जेव्हा घसरण होते, तेव्हा चीनसारखे देश सोने खरेदी करतात. चीननं गेल्या शुक्रवारी (20 मार्च) आणि सोमवारी (23 मार्च) देखील सोन्याची खरेदी केली होती."

सोनं
फोटो कॅप्शन, सोन्याच्या भावात चढ-उतार होण्याबरोबरच डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य नीचांकी पातळीवर पोहोचलं आहे

पृथ्वीराज कोठारी यांच्या मते, "कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे चांदीच्या भावात घसरण झाली आहे. आता युद्ध संपल्यावरच चांदीच्या भावात वाढ होऊ शकते."

सोने आणि चांदीच्या भावात घसरण होण्यामागचं एक कारण नफा वसूली करणं हेदेखील असल्याचं सांगितलं जातं आहे. म्हणजे सोने आणि चांदीच्या गुंतवणुकीतून मिळालेला नफा कमावणं. या दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावात इतकी वाढ झाली होती की ते उच्चांकी पातळीवर टिकू शकले नाहीत.

सोन्यातून कोणताही निश्चित स्वरुपाचा फायदा होत नाही. त्यामुळे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे व्याजदर कमी झाल्यावर सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता असते. मात्र फेडरल रिझर्व्हचे व्याजदर वाढल्यावर या धातूबद्दलचं आकर्षण कमी होतं. गुंतवणुकदार शेअर बाजारात झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी सोन्याची विक्री करत आहेत.

चांदीसाठी 2025 हे वर्ष खूपच फायदेशीर ठरलं. या वर्षात चांदीच्या भावात 170 टक्क्यांची वाढ झाली. तर जानेवारी, 2026 मध्ये चांदीच्या भावात 74 टक्क्यांची वाढ झाली.

मनी कंट्रोलनुसार, मार्च महिन्यात आतापर्यंत चांदीच्या भावात 20 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)