भारताकडे आताच्या घडीला इंधनाचा किती साठा शिल्लक? पेट्रोलियम मंत्रालयानं दिली माहिती

फोटो स्रोत, AFP via Getty Images
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 मे रोजी लोकांना वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आणि खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले. यानंतर पेट्रोलियम मंत्रालयाने भारताच्या पेट्रोलियम उत्पादनांच्या साठ्याविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, "आपल्या रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत."
"पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून घरगुती गरजांसाठी एलपीजीचा पुरवठा सुरू आहे," असं आश्वासन त्यांनी दिलं.
याव्यतिरिक्त, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी (11 मे) मध्य-पूर्वेतील परिस्थितीवर आयजीओएम बैठक घेतली. या बैठकीनंतर देशाकडे पुरेसा इंधनसाठा असल्याचे सांगण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणाच्या दौऱ्यावर असताना सिकंदराबाद येथील जाहीर सभेत बोलताना इराण युद्ध आणि जागतिक चिंता यावर भाष्य केलं.
पंतप्रधान मोदींनी लोकांना सोने न खरेदी करण्याचा आणि खाद्यतेल वाचवण्याचा सल्ला दिला. तसेच परकीय चलन वाचवण्याचंही आवाहन केलं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर, काँग्रेससह अनेक विरोधी नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी रविवारी (10 मे) आरोप केला की, भारताची ऊर्जा सुरक्षा कशी सुनिश्चित करायची हे पंतप्रधान मोदींना अजूनही समजलेले नाही.
आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल 11 मे रोजी म्हणाले, "हे आर्थिक आणीबाणीचे लक्षण आहे का? देश मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे का? देशात असे यापूर्वी कधीही घडले नाही."
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी (11 मे) पश्चिम आशियावरील आयजीओएमची बैठक घेतली. या बैठकीत या प्रदेशात सुरू असलेल्या संघर्षाशी संबंधित ताज्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
दरम्यान, पेट्रोलियम मंत्रालयाने देशातील पेट्रोलियम उत्पादनांच्या सध्याच्या साठ्याबद्दल माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली.
पेट्रोलियम मंत्रालयाने काय सांगितले?
पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा म्हणाल्या, "आपल्या रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. कोणत्याही रिटेल आउटलेटवर इंधनाच्या तुटवड्याची कोणतीही बातमी नाही."
"एलपीजी वितरकही सामान्यपणे काम करत आहेत आणि कुठेही गॅसच्या तुटवड्याची बातमी नाही. घरगुती गरजांसाठी एलपीजीचा पुरवठा अखंडितपणे सुरू आहे," असंही त्यांनी नमूद केलं.
पेट्रोल आणि डिझेलबाबत बोलताना त्यांनी देशात "पुरेसा साठा उपलब्ध आहे," असं सांगितलं.

सुजाता शर्मा म्हणाल्या, "केवळ गेल्या 3 दिवसांत 1.26 कोटी बुकिंगपैकी 1.14 कोटी एलपीजी सिलिंडर वितरित करण्यात आले आहेत. या कालावधीत 17 हजार टनांहून अधिक व्यावसायिक एलपीजीची विक्री झाली. 762 टनांहून अधिक ऑटो एलपीजीचीही विक्री झाली."
"याव्यतिरिक्त या कालावधीत 1 लाख 40 हजारहून अधिक 5 किलोचे सिलिंडर विकले गेले. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी कंपन्यांनी सुरू केलेल्या अंदाजे 93 कॅम्पमध्येही 2 हजार 100 हून अधिक सिलिंडर विकले गेले," अशी माहिती शर्मा यांनी दिली.
अधिकाऱ्यांनी काय सांगितले?
मध्य-पूर्वेतील परिस्थितीवर झालेल्या आयजीओएम बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारताकडे पुरेसा इंधनसाठा आहे आणि या प्रदेशात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.
अधिकाऱ्यांच्या मते, भारताच्या ऊर्जा आयातीच्या गरजांपैकी सुमारे 90 टक्के गरजा प्रभावित प्रदेशातून पूर्ण केल्या जातात. असे असूनही, पुरवठ्यावरील परिणाम कमी करण्यासाठी सरकारने जलद पावले उचलली आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
सरकारने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अलीकडील आवाहन संभाव्य तुटवड्याचा इशारा देण्यासाठी नाही. जागतिक अनिश्चिततेच्या काळात ऊर्जा वाचवण्याचा आणि आर्थिक भार कमी करण्याचा हा एक प्रयत्न म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे.
भारताकडे किती दिवसांचे कच्चे तेल, एलपीजी साठा?
आयजीओएम बैठकीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशात पेट्रोलियम उत्पादने आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा नाही. भारताकडे 60 दिवसांचा कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा, तर 45 दिवसांचा एलपीजीचा साठा आहे.
या बैठकीत नमूद करण्यात आले की, जागतिक संकट असूनही भारतातील पेट्रोलियमच्या किमती स्थिर आहेत, तर अनेक देशांमध्ये किमती 30 ते 70 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तोटा होत असूनही ऑईल कंपन्या देशांतर्गत ग्राहकांवर बोजा टाकत नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाचा संदर्भ देत लोकांना सार्वजनिक वाहतूक, कारपूलिंग आणि इंधन बचतीचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अधिकाऱ्यांना ऊर्जा संवर्धन आणि जनजागृती मोहीम तीव्र करण्याचे निर्देश दिले.
आयजीओएम येथील अधिकाऱ्यांनी सांगितले की, खतांची पुरेशी उपलब्धता असून पुरवठा गरजेपेक्षा जास्त आहे. याला पुष्टी देण्यासाठी यावेळी उत्पादन आणि विक्रीची आकडेवारीही सादर करण्यात आली.
विरोधकांकडून प्रश्न उपस्थित
विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, हा अपयशाचा पुरावा आहे आणि आता जनतेला काय खरेदी करावे आणि काय करू नये हे सांगावे लागत आहे.
राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले, "मोदींनी जनतेकडून त्यागाची मागणी केली की, सोने खरेदी करू नका, परदेश प्रवास करू नका, पेट्रोलचा वापर कमी करा, खत आणि खाद्यतेल कमी वापरा, मेट्रोने प्रवास करा आणि घरून काम करा. हे उपदेश नाहीत; हा अपयशाचा पुरावा आहे."
त्यांनी पुढे म्हटले, "12 वर्षांत देश अशा टप्प्यावर पोहोचला आहे जिथे जनतेला काय खरेदी करावे, काय करू नये, कुठे जावे, कुठे जाऊ नये हे सांगावे लागत आहे. प्रत्येक वेळी, जबाबदारी टाळण्यासाठी ते जनतेवर जबाबदारी ढकलतात. देश चालवणे आता एका शरण गेलेल्या पंतप्रधानांच्या हातात राहिलेले नाही."

फोटो स्रोत, Elke Scholiers/Getty Images
समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले की, निवडणुका संपताच या संकटाची आठवण झाली.
अखिलेश यादव यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले, "अशा आवाहनामुळे व्यवसाय, व्यापार आणि बाजारपेठेत मंदी किंवा महागाईच्या शक्यतेमुळे भीतीसोबतच अस्वस्थता, चिंता आणि निराशा पसरेल. सरकारचे काम आपल्या विशाल संसाधनांचा वापर करून आणीबाणीवर मात करणे आहे, भीती किंवा अस्वस्थता पसरवणे नाही."
आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींच्या अर्थव्यवस्थेसंदर्भातील आवाहनावर प्रश्न उपस्थित केले.
केजरीवाल यांनी एक्सवर म्हटले, "हे आर्थिक आणीबाणीचे लक्षण आहे का? देश गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे का? असे यापूर्वी कधीही घडले नाही."
"पंतप्रधानांनी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वास्तविक स्थितीबद्दलचे सत्य राष्ट्रासमोर स्पष्टपणे मांडले पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.
काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी "सरकार काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे का?" असा प्रश्न विचारला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोमवारी (11) भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली.
बाजार उघडताच प्रमुख ज्वेलरी कंपन्यांच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांहून अधिक घसरण झाली.
सेनकोचे शेअर्स 7.85 टक्क्यांनी घसरून बंद झाले, तर स्काय गोल्डच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 12 टक्क्यांपर्यंतची घसरण झाली, तरीही बाजार बंद होताना ते 6.63 टक्क्यांनी खाली आले होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



























