You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तोंडाने पेपर सोडवून बनला 10 वी बोर्डाचा टॉपर, हात-पाय चालत नव्हते तरी कसा केला सराव?
- Author, मोहम्मद सरताज आलम,
- Role, बीबीसी हिंदी (गोड्डा)
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
'सेरेब्रल पाल्सी' या आजाराने ग्रस्त असलेल्या मोहम्मद फैजानउल्लाचा 10 वी बोर्डाचा निकाल लागला तेव्हा त्याच्या एका व्हीडिओने लाखो लोकांच्या मनाला स्पर्श केला आहे. या व्हीडिओमध्ये फैजानउल्ला तोंडाने पेन धरून पेपर सोडवताना दिसतो आहे.
सेरेब्रल पाल्सीमुळे लहानपणापासूनच फैजानउल्लाचे हात-पाय काम करत नव्हते. मात्र, शारीरिक मर्यादांवर मात करून त्यानं कुटुंबाच्या साथीनं शिक्षणाचा ध्यास सोडला नाही. त्याची ही जिद्द अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ठरत आहे.
झारखंड बोर्डाच्या 10 वीच्या परीक्षेत फैजानउल्लाने 93 टक्के गुण मिळवून दिव्यांग श्रेणीत राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
विशेष म्हणजे, परीक्षेत लिहिण्यासाठी मदत घेण्याची सोय असतानाही त्यानं जिद्दीने आपले पेपर स्वतःच लिहिले.
सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त असलेला गोड्डा शहरात राहणारा फैजानउल्ला आजारपणामुळे इतर मुलांप्रमाणे कधीही शाळेत जाऊ शकला नाही.
मात्र, प्रतिकूल परिस्थिती असूनही त्याच्या कुटुंबाने आणि शिक्षकांनी त्याला मोलाचे सहकार्य दिले. त्याच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले.
मोहम्मद फैजानउल्लाने बीबीसी न्यूज हिंदीशी बोलताना सांगितलं की, मी कधीही शाळेत जाऊन प्रत्यक्ष वर्गात बसून शिकू शकलो नाही. पण आता मला त्याचं दुःख वाटत नाही. कारण माझे गुण सिद्ध करतात की अभ्यासाच्या बाबतीत मी सामान्य मुलांपेक्षा कुठेही मागे नाही.
फैजानउल्लाचं कुटुंब एका अत्यंत छोट्या घरात राहतं. त्यापैकी एका खोलीत दुकान आहे.
फैजानउल्ला सहा महिन्यांचा असताना त्याच्या आजाराबद्दल कुटुंबाला समजले. शरीरात कोणतीही हालचाल होत नसल्याचे पाहून डॉक्टरांचा सल्ला घेतला तेव्हा त्याला 'सेरेब्रल पाल्सी' असल्याचं निदान झालं.
'माझा मुलगा एका गंभीर आजाराने त्रस्त असल्याचे डॉक्टरांनी सांगितले,' असे त्याचे वडील मोहम्मद अनवार आलम भावूक होत सांगतात.
मोहम्मद अनवार आलम यांना सुरुवातीला या आजाराबद्दल कोणतीही कल्पना नव्हती. मात्र, डॉक्टरांच्या निदानानंतर मुलगा जन्मापासूनच एका गंभीर आजाराचा सामना करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
नातेवाईकांच्या सल्ल्यानुसार त्यांनी कोलकाता येथे फैजानउल्लावर उपचार सुरू केले. मात्र, अनेक वर्षे उलटूनही त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा दिसून आली नाही.
फैजानउल्लाच्या आई नजमा यांच्या मते, फैजान इतर मुलांप्रमाणेच योग्य वयात बोलू लागला, तेव्हा त्यांच्या मनात आशेचा किरण तेव्हा निर्माण झाला .
"फैजानला स्वतःहून हलता येत नव्हते. उठण्या-बसण्याची शक्ती त्याच्यात नव्हती. पण वयानुसार त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली तीही फक्त त्याच्या बोलण्यात. त्याचं सामान्य मुलांसारखं बोलणंच आमच्यासाठी भविष्यातील आशेचा आधार बनलं," असं त्या म्हणाल्या.
फैजानउल्लाचे वडील मोहम्मद अनवार एका खाजगी मदरशामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी फैजानउल्ला पाच वर्षांचा असतानाच त्याला घरीच तोंडी शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यांनी त्याला उर्दू, अरबी, हिंदी, इंग्रजी आणि गणित या विषयांचे प्राथमिक धडे दिले.
फैजानउल्ला आठ वर्षांचा झाल्यावर त्याचं नाव स्थानिक प्राथमिक शाळेत नोंदवण्यात आलं. मात्र शारीरिक मर्यादांमुळे त्याला दररोज शाळेत जाणं शक्य नव्हतं. त्यामुळं जवळ राहणारे आदिल हुसैन या शिक्षकांनी त्याला घरीच शिकवण्यास सुरुवात केली.
केवळ तोंडी शिक्षण पुरेसे नसल्याचं मोहम्मद अनवार आलम यांना ठाऊक होतं. पण फैजानला लिहिणं शिकवण्यात त्यांना यश येत नव्हते.
अखेर जेव्हा फैजानउल्लाला दुसऱ्या शाळेत दाखल करण्यात आलं, तेव्हा शिक्षक जितेंद्र कुमार भगत हे त्याच्या आयुष्यात देवदूतासारखे धावून आले.
शिक्षकांनी करून घेतला सराव
झारखंड शिक्षण प्रकल्पांतर्गत गोड्डा येथील 'ब्लॉक रिसोर्स सेंटर'मध्ये दिव्यांग मुलांना शिकवण्यासाठी जितेंद्र कुमार भगत यांची विशेष शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
जितेंद्र कुमार सांगतात की, 'जेव्हा मला फैजानउल्ला शाळेत न येण्याचे कारण समजले तेव्हा मी स्वतः त्याच्या घरी गेलो. तिथल्या भेटीत फैजानची बुद्धिमत्ता (IQ Level), त्याचा आत्मविश्वास आणि प्रबळ इच्छाशक्ती पाहून मी थक्क झालो.'
जितेंद्र सरांनी ठरवले की काहीही झाले तरी फैजानला शिकवायचेच. म्हणून त्याच्या घरी जाऊन त्याला शिकवण्यास सुरुवात केली असे जितेंद्र कुमार सांगतात.
त्यांच्यासमोर सर्वात मोठी अडचण होती ती, फैजानला लिहिता येत नव्हतं. सुरुवातीला त्यांनी पेन धाग्याला बांधून त्याच्याकडून लिहून घेण्याचे प्रयत्न केले, पण त्यांना यश मिळत नव्हतं.
जितेंद्र सरांनी 2022 मध्ये एक नवीन प्रयोग केला. त्यांनी फैजानच्या तोंडात पेन देऊन त्याला कागदावर रेषा ओढायला शिकवले असे जितेंद्र कुमार सांगतात.
हळूहळू हा प्रयत्न यशस्वी झाला आणि फैजानला लिहिता येऊ लागले. इतकेच नाही तर त्याचे अक्षरही सुधारले.
'आठवीत पोहोचेपर्यंत माझे अक्षर इतके वळणदार झाले की, माझ्या आणि एखाद्या सामान्य विद्यार्थ्याच्या वहीत कोणीही फरक करू शकत नव्हता,' असे फैजानउल्ला अभिमानाने सांगतो."
शिक्षक जितेंद्र कुमार भगत यांची मेहनत आणि फैजानउल्लाची जिद्द फळाला आली. 8 वीची बोर्ड परीक्षा आणि 9 वीची परीक्षा स्वतः लिहून त्याने शाळेतील सर्व श्रेणीतील विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
या यशानंतर त्याचा आत्मविश्वास अधिकच वाढला. फेब्रूवारी 2025 मध्ये जिल्हा शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या 'शिक्षणाचे महत्त्व' या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत त्याने प्रथम पारितोषिक मिळाले आणि बक्षीस म्हणून लॅपटॉप मिळाला.
"माझ्या हाताची बोटे हालचाल करू शकत नाहीत पण माझी दोन बोटे एकमेकांना स्पर्श करू शकतात. लॅपटॉपचा कीबोर्ड वापरण्यासाठी हे पुरेसे आहे," असे फैजानउल्ला सांगतो.
लॅपटॉप मिळाल्यानंतर त्याने एमएस एक्सेल, पॉवर पॉईंट आणि एआय (AI) चा वापर करायलाही सुरुवात केली आहे. आता त्याच्या जिद्दीला आधुनिक तंत्रज्ञानाची मोलाची साथ मिळत आहे.
अभ्यासासाठी मी एनसीईआरटी (NCERT) च्या प्रत्येक धड्याची पीडीएफ चॅटजीपीटीवर अपलोड करून त्यातून प्रश्न तयार करून घ्यायचो आणि ते स्वतः सोडवायचो असे फैजानउल्ला सांगतो.
त्याच्या या पद्धतीमुळं तो दिवसेंदिवस प्रगती करत गेल्याचं त्याचे शिक्षक सांगतात. दहावीत असतानाच फैजानला आपण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ असा आत्मविश्वास वाटू लागला होता.
फैजान सांगतो की, 'जितेंद्र सरांनी माझ्याकडून खूप सराव करून घेतला. मी काहीही विसरू नये म्हणून ते प्रत्येक उत्तर माझ्याकडून 10-10 वेळा लिहून घ्यायचे.
अशा परीक्षांमध्ये जे विद्यार्थी लिहिण्यास असमर्थ असतात त्यांच्यासाठी लेखकाची (Writer) सोय उपलब्ध असते. मात्र, फैजानउल्लाने स्वतःला पूर्णपणे त्यावर अवलंबून ठेवले नाही.
काही विषयांच्या पेपरवेळी जेव्हा तोंडात पेन धरून लिहिताना त्याला खूप थकवा यायचा तेव्हाच तो काही काळासाठी लेखकाची मदत घ्यायचा असे त्याने सांगितले.
स्वतः लिहिण्यात जे समाधान मिळते ते सांगून लिहून घेण्यात मिळत नाही. गणितासारखा विषय सांगून कसा लिहून घेणार? म्हणूनच मी गणिताचा पेपर स्वतःच लिहिण्याचा निर्णय घेतला असे फैजानउल्ला सांगतो.
गणितात 98 गुण मिळवणाऱ्या फैजानउल्लाची आता झारखंडचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना भेटण्याची इच्छा असून भविष्यात नागरी सेवा परीक्षा (UPSC) उत्तीर्ण होण्याचे त्याचे स्वप्न आहे.
फैजानउल्लाच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका एल. एफ. मरांडी म्हणतात, "हा आम्हा सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. एका बाजूला आम्हाला फैजानउल्लासारखा जिद्दी विद्यार्थी मिळाला तर दुसरीकडे त्याला गेल्या 5 वर्षांत घडवणारे शिक्षक जितेंद्र कुमार भगत लाभले. हे दोन्ही आमचे अनमोल हिरे आहेत. दोघांनाही भविष्यासाठी खूप शुभेच्छा.'
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)