'मग परीक्षा घ्यायचीच कशाला? पैसे घेऊनच प्रवेश द्या ना'; पेपरफुटीवर विद्यार्थींचा संताप

विद्यार्थिनी
फोटो कॅप्शन, विद्यार्थिनी
Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

"आम्ही पेपर देऊन आलो आणि त्या रात्री आम्हाला कळलं की, प्रामाणिकपणे आम्ही जो पेपर दिला होता, तो लीक झालाय. हे ऐकून आम्हाला धक्का बसला. आम्ही एवढी मेहनत करून दिलेला पेपर लीक झाला. हे असं कसं होऊ शकतं?"

"आमच्यासोबत हा अन्यायच झाला आहे. आता आम्ही पुढे जी NEET होणार आहे, त्यासाठी पूर्ण प्रयत्न तर करूच, पण आतासारखी परिस्थिती पुन्हा एकदा होऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे, एक विद्यार्थी म्हणून."

पेपरफुटीचे आरोप होत असतानाच आता एनटीएने 3 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली NEET (UG) 2026 परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, ही परीक्षा पुन्हा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ही परीक्षा पुढे कधी होणार याबाबतच्या तारखा स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहेत.

एनटीएच्या या निर्णयानंतर विद्यार्थी तसंच पालकांनी आपली निराशा, संताप व्यक्त केला. बीबीसी मराठीशी बोलताना धाराशिवमधल्या एका विद्यार्थिनीने व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया प्रातिनिधीक आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागातील विद्यार्थी, पालक यांना अशाच प्रकारच्या भावना व्यक्त केल्या.

'जीवाचं रान करून परीक्षा दिल्यानंतर पेपर फुटतो हे धक्कादायक'

धाराशिवमधल्याच एका पालकांनी म्हटलं की, पेपर फुटणे हे चुकीचंच आहे.

दोन वर्षांपूर्वीही NEET चा पेपर फुटला होता, या गोष्टीचीही त्यांनी आठवण करून दिली.

त्यांनी म्हटलं की, देशात दोनदा NEET परीक्षेचा पेपर फुटल्याची घटना घडली आहे. शासनाने आणि जे केंद्र परीक्षा घेतं, त्या केंद्राने तो पेपर फुटू नये याची काळजी घ्यायला हवी, असंही त्यांनी म्हटलं.

पालक
फोटो कॅप्शन, पालक

विद्यार्थ्यांनी जीवाचं रान करून परीक्षेची तयारी केलेली असते आणि पेपर देऊन आल्यानंतर पेपर फुटतो हे धक्कादायक आहे असं म्हणत त्यांनी किमान चार ते पाच लाख रुपयांना पेपर फुटल्याचा आरोप केला.

परीक्षा रद्द करण्याचा आणि पुन्हा घेण्याचा निर्णय चांगला पण आहे आणि वाईटही अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

'विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल, पुढे काय सगळंच प्रश्नचिन्ह'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

धाराशिवमधल्याच एका पालकांनी पेपरफुटीनंतर हे प्रकरण सीबीआयकडे देण्यापेक्षा आधीच सीबीआयला या परीक्षा प्रक्रियेत सामावून घ्यायला हवं, अशी भूमिका मांडली.

त्यांनी म्हटलं की, 2024 साली असाच पेपर फुटला होता आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून याची सुनावणी घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांप्रमाणे NTA ने आपल्या प्रणालीमध्ये खूप सुधारणा केल्या होत्या.

याबद्दल बोलताना त्यांनी पुढे म्हटलं, "गेल्या वेळी त्यांनी NMCला सुद्धा या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं. यावर्षी आम्हाला अपेक्षा होती की, व्यवस्थितरित्या परीक्षा पार पडेल. पण पेपर झाल्यानंतर रात्रीच बातमी येते की, पेपर लीक झाला होता. ही अतिशय दुःखद बाब आहे."

"हे एमबीबीएसचे विद्यार्थी आहेत. त्यांच्यावर आता काय परिणाम होतील, त्यांनी पुढे काय करायचं हे सगळंच प्रश्नचिन्ह आहे. कारण या क्षणापर्यंत तरी NTA ने पुढची तारीख डिक्लेअर केली नाहीये ," असंही त्यांनी म्हटलं.

या अशा घटना घडल्यानंतर तपास सीबीआयकडे देण्यापेक्षा आधीपासूनच सीबीआयला या प्रक्रियेत सामावून घ्यायला हवं असं त्यांनी म्हटलं.

आपण घेतलेली परीक्षा रद्द करावी लागणं आणि ती पुन्हा घ्यावं लागणं ही नामुष्की असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.

'याचा परिणाम मुलांच्या मनोधैर्यावर'

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधल्या एका पालकांनी म्हटलं की, परीक्षेमध्ये घोळ होणं, परीक्षेचे पेपर फुटणं आणि मुलांना त्यांचा मनस्ताप होणं ही काही पहिलीच घटना नाही. अशा घटना वारंवार होत आहेत.

मुलांना पुन्हा पुन्हा परीक्षा द्यायला लावणं हे त्यांच्या मानसिकतेवरही परिणाम करणारं असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. शिवाय मुलांना तेच मार्क पुन्हा पडतील हे निश्चितपणे सांगता येणार नाही, असंही म्हटलं.

पालक
फोटो कॅप्शन, पालक

दापोलीतल्याच एका पालकांनीही मुलांच्या मनोधैर्यावर या गोष्टीचा परिणाम होऊ शकतो हा मुद्दा अधोरेखित केला.

त्यांनी म्हटलं, "एखाद्या परीक्षेसाठी मुलं वर्षभर कष्ट घेत असतात. अशा परिस्थितीत अचानकपणे पेपर रद्द झाला तर निश्चितच मुलांच्या मनोधैर्यावर परिणाम होतो आणि त्यामुळे पुन्हा परीक्षेमध्ये त्यांना नुकसान सोसावं लागतं."

या सगळ्यामुळे परीक्षेसाठी एक धोरण ठरवलं गेलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं.

'NEET ची परीक्षा घ्यायचीच कशाला? त्यापेक्षा पैसे घेऊनच प्रवेश द्या'

दुसऱ्या एका पालकांनी NEET ची परीक्षा रद्द होणं हे व्यवस्थेचं खूप मोठं अपयश असल्याचं म्हटलं.

त्यांनी म्हटलं, "NEET चा अभ्यास मुलं काही एका वर्षासाठी करत नसतात. ते आठवीला गेल्यापासून अभ्यास करत असतात आणि इतकं सगळं झाल्यानंतर ज्या मुलांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा दिली असेल त्या विद्यार्थ्याची मानसिकता काय झाली असेल पेपर लीक झाला आहे हे ऐकून?"

याचं गांभीर्य व्यवस्थेला जाणवतं नाहीये का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

पालक

ही काही याच वर्षीची गोष्ट नाहीये. दरवर्षी अशा घटना घडत असतात. जर असं असेल तर मग कशासाठी NEETची परीक्षा घ्यायची? त्यापेक्षा तुम्ही थेट पैसे घेऊनच मुलांना प्रवेश दिला तर बरं राहील, अशी संतप्त भावनाही त्यांनी व्यक्त केली.

नेमकं काय घडलं, पोलिसांनी काय सांगितलं?

पेपर फुटीचे आरोप होत असतानाच आता एनटीएने 3 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली NEET (UG) 2026 परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, ही परीक्षा पुन्हा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ही परीक्षा पुढे कधी होणार याबाबतच्या तारखा स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहेत.

या प्रकरणी राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून नाशिक पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. त्याला केंद्रिय तपास यंत्रणांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

विद्यार्थी

फोटो स्रोत, Getty Images

एनटीएने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करताना म्हटलं, "हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आणि ज्या विश्वासावर आपली राष्ट्रीय परीक्षा प्रणाली आधारलेली आहे, त्या विश्वासाचा मान राखून घेण्यात आला आहे."

"पुन्हा परीक्षा आयोजित केल्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना निश्चितच मोठा आणि प्रत्यक्ष त्रास सहन करावा लागेल, याची संस्थेला पूर्ण जाणीव आहे. एनटीए या त्रासाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे", असंही एनटीएनं नमूद केलं.

तपास संस्थांनी एनटीएला तपासातील निष्कर्ष सांगितल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर एनटीएनं या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखली जावी यासाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं.

तपासातील निष्कर्षावरून ही सध्याची परीक्षा प्रक्रिया कायम ठेवणे योग्य ठरणार नाही, हे सिद्ध झाले आहे, असंही एनटीएनं नमूद केलं आहे.

नाशिक पोलिसांनी काय सांगितलं?

नाशिक शहर पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सांगितलं, "सकाळी राजस्थान पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेण्याविषयी विनंती आली होती. त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. तो आरोपी नीट प्रकरणातील आहे अशी माहिती मिळत आहे."

"क्राइम ब्रांच युनिट 2 च्या पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. ते पथक आल्यावर या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल," अशी माहिती त्यांनी दिली.

"आरोपीने त्याचा वेश बदलला होता, केस कापले होते. त्यामुळे त्याची माहिती मिळत नव्हती. मात्र, तांत्रिक कौशल्य आणि जिकिरीने तपास करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं," असंही त्यांनी नमूद केलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)