बहिणींचा लैंगिक छळ करणाऱ्या वडिलांची मुलानेच केली हत्या; शिक्षा रद्द करावी म्हणून होतीये मागणी

फोटो स्रोत, Sara Martínez
- Author, व्हॅलेंटिना ओरोपेझा
- Role, बीबीसी न्यूज मुंडो
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
(इशारा: या लेखात लैंगिक, शारीरिक आणि भावनिक शोषणाचे तपशील आहेत. ते वाचकांना अस्वस्थ करणारे असू शकतात.)
सारा मार्टिनेझ तिचा 28 वर्षीय भाऊ मोशे याला विनवणी करत होती. अनेक वर्षांपासून तिचे वडील तिचं शोषण करत होते, छळ करत होते ही गोष्ट मोशेला समजली होती आणि त्याबाबत तो त्याच्या वडिलांना जाब विचारणार होता. तो त्याने विचारू नये म्हणून ती आपल्या भावाची समजूत काढत होती.
ही मे 2025 मध्ये मोन्टेव्हीडिओ या उरुग्वेच्या राजधानीच्या शहराच्या उपनगरात घडलेली घटना होती. मोशेच्या वडिलांनी आईचा तसेच त्याच्या दोन बहिणी जेव्हा लहान होत्या तेव्हा त्यांचा कथितरीत्या लैंगिक, शारीरिक छळ केला होता.
साराने ही गोष्ट त्याला सांगितली त्याच्या दुसऱ्या दिवशी मोशेनी त्याच्या वडिलांवर 14 गोळ्या झाडल्या. त्यानंतर दोन दिवस तो त्या मृतदेहाजवळ बसून होता. जेव्हा पोलीस आले तेव्हा त्याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.
या प्रकरणात मोशेला 12 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनवण्यात आली आहे. त्याच्यावरील खटला उरुग्वेमधील लोकांना यूट्यूबवरील थेट प्रक्षेपणाद्वारे पाहिला होता. त्यातून तिथे जनतेमध्ये मोठा संताप निर्माण झाला होता.
मोशेच्या बहिणी आणि त्याच्या आईला वाटतं की त्याला माफ करण्यात यायला हवं होतं. त्या आता त्याच्या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी लढत आहेत.
पत्नी, मुली आणि मुलाचा भयानक छळ
सारा आता 27 वर्षांची आहे. बीबीसीने तिला या घटनेविषयी विचारले. तिने आपल्या अश्रूंना आवर घालत मोशेला काय सांगितले होते याची माहिती दिली. मोशे आणि तिच्यातल्या चर्चेनंतरच गोळीबाराची घटना घडली.
तिला नेमकं त्याच वेळी कळलं की अनेक वर्षं त्यांचे वडील कार्लोस हे मोशेला मारहाण आणि शारीरिक छळ करत होते.
"त्याच्या मनावर किती तीव्र, जबरदस्त आघात झाला होता, हे मला पूर्णपणे कधीच समजलं नव्हतं," असं सारा म्हणाली.
"त्या खटल्याच्या वेळेसच आम्हाला अनेक गोष्टी समजल्या होत्या," असं ती पुढे म्हणाली.

फोटो स्रोत, Sara Martínez
साराच्या सांगण्यानुसार, मोशे आणि त्याच्या बहिणींना त्यांच्या वडिलांची प्रचंड भीती वाटायची. ती म्हणते, "ते जणूकाही एकाच वेळी सर्वत्र असल्यासारखे वाटायचे. अगदी ते अवतीभोवती जरी नसले, तरीदेखील आम्हाला त्यांच्याविषयी भीती, दहशत वाटायची."
"ते पहाटे उठायचे आणि आम्हाला बाथरुममध्ये घेऊन जायचे. मग ते शॉवर सुरू करायचे आणि त्या शॉवरच्या थंडगार पाण्याखाली आम्हाला कित्येक तास उभे ठेवायचे," असं सारा म्हणाली.
प्रत्येक छळ केल्यानंतर कुकीज देणारा कार्लोस
सारा म्हणते की कार्लोसनं तिचा आणि तिची मोठी बहीण ॲनाचा लैंगिक छळ केला होता.
तिनं मोशेला सांगितलं की छळ, शोषण केल्याच्या प्रत्येक घटनेनंतर तिचे वडील रडायचे. मग ते माफी मागायचे आणि तिला आवडणारा एक गोड पदार्थ आणून द्यायचे. तो पदार्थ म्हणजे अल्फाजोर. या भागात मिळणारे हे एक लोकप्रिय बिस्किट आहे. ते चॉकलेट आणि कॅरामलपासून बनतं.

फोटो स्रोत, Uruguayan Press Association
"आता मी ते अल्फोजोर खाऊसुद्धा शकत नाही. मला अपराधीपणाचं वाटायचं. मला वाटायचं की निव्वळ ते अल्फाजोर खाण्यासाठी म्हणून मी त्यांना माझा छळ करू देते आहे," असं ती म्हणाली.
सारा म्हणते की तिची आई कामावर गेल्यानंतर तिच्या वडिलांनी रात्री तिचा लैंगिक छळ केल्याच्या जवळपास 60 घटना तिनं मोजल्या आहेत.
"मी त्या घटना मोजल्या. कारण मी स्वत:लाच सांगितलं होतं की एक दिवस असा येईल की त्याच्याबद्दल बोलण्याचं धैर्य माझ्यामध्ये असेल," असं सारा म्हणाली.
छोट्या सारानं पहिल्यांदा उठवला आवाज, कार्लोसला झाला तुरुंगवास
सारानं वयाच्या 12 व्या वर्षी, कार्लोस तिच्या बहिणीचा म्हणजे ॲनाचा लैंगिक छळ करत असल्याचं पाहिल्यानंतर याविरोधात आवाज उठवला. तिनं तिच्या शाळेत तिच्या वडिलांची तक्रार केली.
"मी एक कागदावर 'लैंगिक छळ' असं लिहिलं होतं आणि तो कागद मी माझ्या त्यावेळच्या जीवलग मैत्रिणीला दिल्याचं मला आठवतंय," असं सारा म्हणाली.
त्यानंतर तिच्या एका वर्गमित्रानं तो कागद शाळेच्या मुख्याध्यापिकेकडे नेला होता, असं तिनं पुढे सांगितलं.

फोटो स्रोत, Sara Martínez
यानंतर जे घडलं, ती अनेक आघात करणाऱ्या अनुभवांची मालिका होती. विशेषकरून तिला फॉरेन्सिक तज्ज्ञांनी जे प्रश्न विचारले होते तो अनुभव खूपच वेदनादायी होता, असं सारा सांगते.
या तपासानंतर कार्लोसला 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. मात्र त्यानं त्यातील फक्त एक वर्षाची शिक्षा भोगली.
"माझ्या दृष्टीनं ती शिक्षा खूपच छोटी होती. कारण मला या गोष्टीची जाणीव होती की माझ्या वडिलांनी तीन वर्षांहून अधिक काळ माझा छळ केला होता," असं सारा म्हणाली.
"माझे वडील दैत्यच होते. शाळेत त्यांनी स्वत:चा बचाव करताना एक कहाणी रचली होती. त्यात त्यांनी सांगितलं होतं की ते एक गरीब आणि असहाय्य माणूस होते. त्यांच्या वडिलांनी त्यांच्या बहिणीचा छळ केल्यामुळे त्यांनी किशोरवयातच घर सोडलं होतं," असं सारानं पुढे सांगितलं.
कार्लोसला कुटुंबानं पुन्हा जवळपास येऊ दिलं नाही
कार्लोसची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर, त्याला पुन्हा कधीही घरात येऊ दिलं नाही, असं या कुटुंबानं सांगितलं.
मात्र सारानं सांगितलं की, ती किशोरवयीन असताना, तिचे वडील वारंवार तिच्या शाळेत येत असत आणि ती मोठी झाल्यावर तिच्या कामाच्या ठिकाणीदेखील ते वारंवार येत असत.

फोटो स्रोत, Sara Martínez
सारानं सांगितलं की, कुटुंबातील कोणत्याही सदस्यानं, त्यांना ज्या तीव्रतेचा आणि भयानक छळ भोगावा लागला होता, त्याबद्दल कधीही एकमेकांना सांगितलं नव्हतं.
आमच्या वडिलांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर मोशेला त्याच्या वडिलांबरोबरचं नात कायम ठेवायचं होतं, असं सारा म्हणाली.
'आईनेही सांगितलं की कार्लोस धमक्या देतोय'
मात्र मोशेला त्याच्या आई मर्सिडीज परेरा यांनी जेव्हा सांगितलं की कार्लोस तिला धमक्या देतो आहे. तसंच त्यांनी अनेक वर्षांपासून कथितरीत्या जो छळ, अत्याचार सहन केले होते, त्याबद्दल मोशेला सांगितलं. ते ऐकल्यानंतर मोशेनं लगेचच त्याच्या बहिणींशी यासंदर्भात बोलण्याकरता त्यांना भेटण्यासाठी धाव घेतली.
त्यानंतर त्यांच्यात जे बोलणं झालं, त्यानंतरच मोशेनं त्याच्या वडिलांची गोळ्या झाडून हत्या केली, असं सारानं सांगितलं.
"त्याला आमच्या वडिलांना भेटायचं होतं. त्याला त्यांना या छळाबद्दल माफी मागायला सांगायचं होतं. याबद्दलचं स्पष्टीकरण विचारायचं होतं. तसंच पुन्हा आमच्यासमोर कधीही न येण्यास सांगायचं होतं," असं सारा म्हणाली.
"मी मोशेला त्या दिवशी अनेक गोष्टी सांगितल्या. आमचे वडील काय करू शकतात, त्यांनी काय केलं आहे, हे त्याला कळावं हा त्यामागचा उद्देश होता. माझा हेतू त्याला त्यांच्याकडे जाण्यापासून रोखण्याचा होता. मात्र तरीदेखील तो त्यांच्याकडे गेलाच. त्यानंतर तिथे ही घटना घडली," असं सारा पुढे म्हणाली.
मोशेवरील खटल्याच्या वेळेस न्यायालयाची भूमिका आणि प्रचंड जनक्षोभ
या खटल्याचा निकाल न्यायाधीश मारिया नोएल ओड्रिओझोला यांनी दिला. तो देताना त्यांनी स्पष्ट केलं होतं की, उरुग्वेच्या दंड संहितेच्या कलम 36 अंतर्गत मिळणाऱ्या न्यायालयीन माफीचा पर्याय त्यांनी नाकारला आहे. ज्यावेळेस "कौटुंबिक हिंसाचारामुळे दीर्घकालीन वेदनांमुळे निर्माण झालेल्या तीव्र मानसिक धक्क्याच्या" प्रभावाखाली एखादी हत्या होते, तेव्हा या कलमातील तरतुदी लागू होतात.
कार्लोस मार्टिनेझ यांच्याविरोधात 15 वर्षात कोणीही तक्रार केली नव्हती. ही गोष्ट लक्षात घेऊन न्यायाधीश म्हणाल्या की त्या कुटुंबानं "प्राथमिक उपाय म्हणून कोणत्याही बचाव करणाऱ्या यंत्रणे"ची मदत घेतली नव्हती, असं मोशेचे वकील रॉड्रिगो रे यांनी सांगितलं.
मोशेला शिक्षा देण्यात आल्यामुळे तिथल्या जनतेमध्ये मोठा संताप उसळला. त्यातून कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये सरकारची भूमिका काय असावी, यावर उरुग्वेमध्ये देशव्यापी चर्चा सुरू झाली.
त्याचा इतका परिणाम झाला की, उरुग्वेचे राष्ट्राध्यक्ष यामांदू ओर्सी यांनी ॲना आणि सारा या दोघींना खासगी भेटीसाठी बोलावलं.
ज्या दिवशी मोशेला अटक झाली, त्या दिवशी ती जेव्हा पोलीस ठाण्यात गेली, तेव्हा तिनं तिच्या वडिलांचा मृतदेह पाहिला नाही. तिला मोशेला देखील भेटता आलं नाही, असं सारा सांगते.
"ते जेव्हा आम्हाला आमचे जबाब नोंदवण्यासाठी हत्येसंदर्भातील विभागात घेऊन गेले, तेव्हा मोशे कोठडीत होता. त्यामुळे आम्ही त्याला पाहू शकत नव्हतो. मात्र त्यानं मला एक संदेश पाठवला होता. त्यात त्यानं म्हटलं होतं की 'आता, मी शांतपणे अल्फाजोर खाऊ शकेन."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.



























