कार विकणारा तरुण अचानक राजपुत्र कसा झाला? एका ई-मेलनं कसं बदललं आयुष्य? वाचा

क्लेमें वँडेनकेर्कहोव्ह (उजवीकडे) आपल्या वडिलांसोबत, प्रिन्स लॉरेंट.

फोटो स्रोत, Clément Vandenkerckhove/Instagram

फोटो कॅप्शन, क्लेमें वँडेनकेर्कहोव्ह (उजवीकडे) आपल्या वडिलांसोबत, प्रिन्स लॉरेंट.
    • Author, पॉल किर्बी
    • Role, बीबीसी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

बेल्जियमचे राजपुत्र लॉरंट यांनी 26 वर्षीय माजी कार विक्रेते क्लेमें वँडेनकेर्कहोव्ह यांना आपला मुलगा आणि वारस म्हणून कायदेशीर मान्यता दिली आहे.

बेल्जियन गायिका वेंडी व्हॅन व्हँडेन आणि राजपुत्र लॉरंट हे त्यांचे माता आणि पिता आहेत.

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात कोणताही गाजावाजा न करता त्यांचा राजपुत्र लॉरंट यांच्या कुटुंबात समावेश करण्यात आला.

मात्र, यासंबंधीचे तपशील आता समोर आले आहेत.

यामुळे क्लेमें यांना अधिकृतपणे राजपुत्राचा दर्जा मिळाला आहे. मात्र, त्यांना राजघराण्यातील सदस्यांना दिला जाणारा सरकारी भत्ता मिळणार नाही.

आपले वडील राजघराण्यातील आहेत हे अनेक वर्षांपासून माहीत असतानाही, वडिलांचे "सॅक्से-कोबुर्ग" हे आडनाव स्वीकारण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही, असे क्लेमें यांनी सांगितले.

"कदाचित मला ते स्वीकारावेसे वाटू शकते. पण मला 'वँडेनकेर्कहोव्ह' या नावाचा अभिमान आहे. हे आडनाव सोडणे म्हणजे माझ्या आईने माझ्यासाठी केलेल्या सर्व गोष्टींशी द्रोह करण्यासारखे ठरेल," असे त्यांनी Het Nieuwsblad ला सांगितले.

राजकुमारी लुईस, राजपुत्र आयमेरिक आणि राजपुत्र निकोलस या आपल्या सावत्र भावंडांप्रमाणे क्लेमें यांचा बेल्जियमच्या सिंहासनाच्या उत्तराधिकार क्रमात समावेश होणार नाही.

तसेच, ते राजघराण्याच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही सहभागी होणार नाहीत.

क्लेमें हे बेल्जियमच्या नागरिकांना आधीपासूनच परिचित आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रसारित झालेल्या एका फ्लेमिश दूरचित्रवाणी माहितीपटात त्यांनी आपल्या वडिलांविषयी कसे समजले, याची माहिती दिली होती.

डीएनए चाचणी

राजपुत्र लॉरंट यांचे 2003 मध्ये राजकुमारी क्लेअर यांच्याशी विवाह करण्यापूर्वी वेंडी व्हॅन व्हँडेन यांच्याशी संबंध होते. वेंडी व्हॅन व्हँडेन यांचे खरे नाव आयरिस वँडेनकेर्कहोव्ह असे आहे.

2013 मध्ये एका शॉपिंग मॉलमध्ये राजपुत्र लॉरंट यांची अचानक भेट झाल्याचे क्लेमें यांनी त्या माहितीपटात सांगितले. त्यावेळी ते कोण आहेत, हे क्लेमें यांना माहीत नव्हते.

आपल्या वडिलांची ओळख आपण 16 वर्षांचे असताना आईने सांगितली, असे क्लेमें यांनी म्हटले.

चार वर्षांनंतर त्यांनी वडिलांशी संपर्क साधण्याचे धाडस केले. अनेक वेळा दूरध्वनीवर बोलल्यानंतर दोघांची प्रत्यक्ष भेट झाली. त्यानंतर डीएनए चाचणी करून घेण्याचा सल्ला राजपुत्र लॉरंट यांनी दिला.

"आम्ही दोघेही रुग्णालयात गेलो. मी घाबरू नये म्हणून 'मी आधी चाचणी करतो,' असे त्यांनी सांगितल्याचे मला आठवते," असे क्लेमें यांनी म्हटले.

यानंतर प्रयोगशाळेकडून आलेल्या ई-मेलमध्ये दोघांमध्ये 99.5% डीएनए जुळत असल्याचे सांगण्यात आले.

बेल्जियन कलाकार डेलफीन बोएल (डावीकडे) यांनी अल्बर्ट दुसरे हे आपले वडील असल्याचा दावा दीर्घकाळ केला होता.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, बेल्जियन कलाकार डेलफीन बोएल (डावीकडे) यांनी अल्बर्ट दुसरे हे आपले वडील असल्याचा दावा दीर्घकाळ केला होता.

राजपुत्र लॉरंट यांची डीएनए चाचणी त्यांच्या वडिलांचा आणि बेल्जियमचे माजी राजा दुसरे अल्बर्ट यांच्या प्रकरणाची आठवण करून देते.

दीर्घकाळ चाललेल्या न्यायालयीन लढाईनंतर 2020 मध्ये दुसरे अल्बर्ट यांनी विवाहबाह्य संबंधातून आपल्याला एक मुलगी झाल्याचे मान्य केले. त्यानंतर त्यांनी तिला अधिकृतपणे आपली मुलगी म्हणून मान्यता दिली.

दुसरे अल्बर्ट यांनी 2013 मध्ये राजेपदाचा त्याग केला होता. त्या काळात त्यांच्या मुलीशी संबंधित हा वाद राजघराण्यासाठी मोठा चर्चेचा विषय ठरला होता.

प्रसिद्ध कलाकार डेलफीन बोएल यांनी या प्रकरणातील कायदेशीर लढाई अखेर जिंकली. त्यानंतर त्यांना राजकुमारी हा किताब धारण करण्याचा अधिकार मिळाला. सध्या त्या स्वतःला "डेलफीन डी सॅक्से-कोबुर्ग" असे संबोधतात.

2013 मध्ये बेल्जियमच्या कायद्यात करण्यात आलेल्या बदलांनुसार, राजघराण्यातील निवडक सदस्यांनाच सरकारी भत्ता दिला जातो. राजा फिलिप, त्यांचे वडील आणि माजी राजा दुसरे अल्बर्ट, राजपुत्र लॉरंट आणि राजकुमारी अस्ट्रिड यांचा त्या यादीत समावेश आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.