लव्ह, ड्रम आणि धोका : नवऱ्याला मारणाऱ्या पत्नीला आणि प्रियकराला फाशीची शिक्षा

फोटो स्रोत, SHIV PRAKASH
- Author, शेहबाज अन्वर
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
उत्तर प्रदेशातीलमेरठमधील एका न्यायालयाने पतीची हत्या करून त्याचा मृतदेह ड्रममध्ये लपवल्याप्रकरणी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.
बीबीसीचे वार्ताहर दिलनवाज पाशा यांनी सरकारी पक्षाने दिलेल्या माहितीच्या आधारे हे सांगितलं आहे.
जिल्हा न्यायाधीश अरविंद कुमार यांनी सुमारे दीड वर्षांनंतर हा निकाल दिला. दोन्ही आरोपींनी तुरुंगातून व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला हजेरी लावली. सुनावणीदरम्यान ते दोघेही शांत होते.
सरकारी पक्षाचे वकील विजय बहादूर यांनी सांगितलं, या हत्या प्रकरणात मुस्कान आणि साहिल यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असून न्यायालयाने त्यांच्यावर 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
याशिवाय इतर कलमांअंतर्गत त्यांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.
शिक्षेची घोषणा होण्यापूर्वी वरिष्ठ कारागृह अधीक्षक वीरेश राज शर्मा यांनी वृत्तसंस्था आयएएनएसशी बोलताना सांगितलं, "प्रथम सुनावणी झाली आणि दोन्ही आरोपींना स्वतंत्रपणे हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी त्यांना विविध मुद्द्यांवर प्रश्न विचारले. त्यात फॉरेन्सिक अहवालाशी संबंधित प्रश्नांचाही समावेश होता. मात्र नेमके कोणते प्रश्न विचारण्यात आले, याची माहिती मी देऊ इच्छित नाही."
ते म्हणाले, "दोन्ही आरोपी चिंताग्रस्त आणि अस्वस्थ दिसत होते. त्यांनी रात्रीचे जेवण आणि नाश्ता फार कमी केला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांना नीट झोपही लागत नव्हती. मुस्कान गेल्या तीन-चार दिवसांपासून तिच्या सुमारे सात वर्षांच्या मोठ्या मुलीला भेटण्याची मागणी करत होती. मात्र अद्याप त्या मुलीला तिची भेट घडवून आणण्यात आलेली नाही."
(सूचना : यातील काही मजकूर वाचकांना विचलित करू शकतो.)
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील मेरठमधून हे धक्कादायक हत्याकांड उघडकीस आलं होतं. शहरातील सौरभ राजपूत यांची त्यांच्या पत्नीने आणि तिच्या प्रियकराने हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी केला होता.
29 वर्षीय सौरभ राजपूत लंडनमध्ये काम करत होते आणि ते गेल्या महिन्यातच भारतात परतले होते.
सौरभ यांच्या कुटुंबीयांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार मेरठ पोलिसांकडे दाखल केली होती.
पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर या गंभीर गुन्ह्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली होती.
पोलिसांनी एक ड्रम ताब्यात घेतला होता आणि तो पोलीस ठाण्यात आणला होता. त्यानंतर कटरच्या साहाय्याने ड्रम कापून त्यामधून मृतदेह बाहेर काढण्यात आला होता.
सौरभ यांचे मोठे भाऊ राहुल उर्फ बबलू यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. 18 मार्च 2025 रोजी दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, @meerutpolice
मेरठ पोलिसांच्या माहितीनुसार, 28 वर्षीय मुस्कान रस्तोगी हिने तिचा प्रियकर साहिल शुक्ला याच्यासोबत मिळून 3 मार्च 2025 च्या रात्री पती सौरभ राजपूत यांची हत्या केली होती.
पत्रकार परिषदेत पोलिसांनी सांगितलं होतं की, हत्येनंतर मृतदेह एका ड्रममध्ये टाकण्यात आला होता आणि त्यात काँक्रीट भरलं गेलं होतं.
19 मार्च 2025 रोजी माध्यमांशी बोलताना पोलीस अधिकारी आयुष विक्रम सिंह यांनी सांगितलं होतं, "सौरभ राजपूत 4 मार्च 2025 पासून बेपत्ता होते. संशयाच्या आधारे त्यांची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं."
ते पुढे म्हणाले होते, "चौकशीदरम्यान साहिल आणि मुस्कान यांनी मिळून सौरभ यांची हत्या केल्याचं समोर आलं होतं. हत्येनंतर मृतदेहाचं डोकं आणि दोन्ही हातांचे तळवे कापून ड्रममध्ये टाकण्यात आले होते. त्यानंतर त्यामध्ये सिमेंट आणि वाळूचं मिश्रण भरलं गेलं होतं. त्यानंतर दोन्ही आरोपी शिमला, मनाली आणि कसौली येथे फिरण्यासाठी गेले होते."
मेरठच्या ब्रह्मपुरी भागात राहणाऱ्या सौरभ राजपूत यांनी 2016 मध्ये त्यांच्या घरापासून काही अंतरावर राहणाऱ्या मुस्कान रस्तोगी हिच्यासोबत प्रेमविवाह केला होता.
कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता दोघांनी लग्न केलं होतं. 2019 मध्ये मुस्कान यांनी एका मुलीला जन्म दिला होता.
घटस्फोटापर्यंत गेलं होतं प्रकरण
पोलिसांनी घटना उघडकीस आलेल्या वेळेस दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यानं सौरभचे त्याच्या पालकांशी मतभेद झाले होते. त्यानंतर तो शेजारच्या इंदिरा नगरमध्ये मुस्कानसोबत राहू लागला होता.
त्यानंतर सौरभच्या अनुपस्थितीत मुस्कान आणि साहिल शुक्ला यांच्यात जवळीक निर्माण झाली.
आयुष विक्रम सिंह म्हणाले की, "27 वर्षीय साहिल सौरभच्या घरापासून थोड्या अंतरावर राहत होता. तो आणि मुस्कान आठवीच्या वर्गात एकत्र शिकलेही होते. साहिलनं बी.कॉम पर्यंत शिक्षण घेतलंय आणि तो ऑनलाइन ट्रेडिंग व्यवसायात करत होता."

फोटो स्रोत, @meerutpolice
त्यांच्या मते, जेव्हा सौरभला त्याची पत्नी आणि साहिल यांच्यातील संबंधांबद्दल कळलं तेव्हा त्यानं 2021 मध्ये घटस्फोटाचा कायदेशीर मार्ग स्वीकारला होता.
परंतु लहान मुलगी असल्यानं कुटुंबातील सदस्यांनी समजावून सांगितल्यानंतर त्यानं त्याचा निर्णय बदलला होता.
पण तरीही दोघांच्या नात्यात दुरावा तसाच कायम राहिला.
3-4 मार्चला नेमकं काय घडलं?
चौकशीदरम्यान मुस्काननं तिचा गुन्हा कबूल केल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं.
मुस्काननं पोलिसांना सांगितलं की, सौरभ दोन वर्षांपूर्वी कामासाठी लंडनला गेला होता. या काळात मुस्कान आणि साहिलमधील मैत्री आणखी वाढली.
मुस्काननं पोलिसांना सांगितलं की सौरभच्या पासपोर्टची मुदत संपणार होती आणि त्याच कामासाठी तो भारतात आला होता.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुस्कान आणि साहिलनं आधीच हत्येची संपूर्ण योजना आखली होती आणि त्यांनी चाकू आणि बेशुद्ध करण्याची औषधं देखील खरेदी केली होती.

फोटो स्रोत, SHIV PRAKASH
हत्येच्या दिवशी म्हणजे 3 मार्चच्या रात्री, मुस्काननं सौरभच्या जेवणात बेशुद्ध होण्याचं औषध मिसळलं.
त्यानंतर जेव्हा तो बेशुद्ध पडला तेव्हा साहिलनं सौरभचा हात धरला आणि मुस्काननं त्याच्यावर चाकूनं अनेक वार केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी मृतदेह बाथरूममध्ये नेला आणि त्याचे तीन तुकडे केले.
पुरावा नष्ट करण्यासाठी घरातील खोली ब्लीचिंग पावडरनं धुतली.
4 मार्च रोजी मुस्काननं बाजारातून एक ड्रम आणि सिमेंट विकत घेतलं. त्यात शरीराचे सर्व भाग टाकून तो ड्रम सिमेंटनं भरला.
असं उलगडलं रहस्य
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेह लपवल्यानंतर मुलीला आईकडे पाठवून मुस्कान साहिलबरोबर फिरायला निघून गेली.
लग्नानंतर सौरभच्या कुटुंबीयांनी त्याला दूर केलं होतं आणि त्याच्याशी त्यांचा फारसा संपर्कही नव्हता, त्यामुळेच हे प्रकरण बरेच दिवस कोणाला कळलं नाही, असंही पोलिसांनी सांगितलं होतं.

फोटो स्रोत, SHIV PRAKASH
दरम्यान, 17 मार्च रोजी मुस्कान परत आली, तेव्हा तिच्या सहा वर्षीय मुलीने वडील सौरभबद्दल विचारलं असता मुस्कान भावुक झाली.
ती माहेरी गेली आणि सासरच्यांवर सौरभच्या हत्येचा आरोप करू लागली. परंतु, मुस्कानच्या कटुंबीयांना त्यावर विश्वास बसला नाही आणि ते तिला पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
चौकशीदरम्यान मुस्कानने तिचा गुन्हा कबूल केला, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ड्रम जप्त केला.
सौरभच्या भावानं काय सांगितलं?
सौरभ तीन भावंडांमध्ये सर्वात लहान होता. त्याचा भाऊ राहुल उर्फ बबलू यांनी बीबीसीला सांगितलं की, "माझ्या भावाला निर्दयी लोकांनी ठार मारलं. मुस्काननेच माझ्या भावाला कुटुंबापासून तोडलं होते. यामागे मोठं कटकारस्थान असू शकतं. या कटात मुस्कानच्या सदस्यांचा सहभाग असल्याचा संशय मला आहे." दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भावना त्याने व्यक्त केली होती.
सौरभ राहत असलेल्या घराचे मालक ओमपाल सिंह बीबीसीसोबत बोलताना म्हणाले होते, "माझा अजूनही विश्वास बसत नाहीये की मुस्कान असं काही करू शकते."
स्थानिक नगरसेवक राजीव गुप्ता म्हणाले होते, "मुस्कानचे साहिलशी प्रेमसंबंध होते. सौरभ आणि मुस्कानच्या नात्यातही आधीच वितुष्ट आलं होतं, असंही त्यांनी सांगितलं होतं.

फोटो स्रोत, SHIV PRAKASH
दुसरीकडे, मुस्कानच्या कुटुंबीयांनीही तिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती..
मुस्कान रस्तोगीच्या आई-वडिलांनी त्यांच्या मुलीला समाजासाठी धोका असल्याचं सांगत तिला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मुस्कानचे वडील म्हणाले होते , "माझ्या मुलीने आपल्या मित्रासोबत मिळून स्वत:च्या पतीची हत्या केली. ती या समाजात राहाण्यासाठी योग्य नाही आणि इतरांसाठीही धोकादायक आहे, तिला फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी."
मुस्कानची आई एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाली होती की, सौरभ खूप चांगला मुलगा होता, आमच्या मुलीनं त्याच्यासोबत खूप वाईट केलं.
दरम्यान नंतर पोलीस साहिल शुक्ला आणि मुस्कान रस्तोगी या दोघांना सुनावणीसाठी कोर्टात घेऊन जात असताना काही वकिलांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र, पोलिसांनी त्यांना जमावापासून वाचवतं सुरक्षित बाहेर काढलं होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)




























