'ओटीटी'वरून हटवलेला 'सतलज' चित्रपट पंजाबच्या गावागावांत मोठ्या पडद्यावर दाखवला जातोय; लोक काय म्हणत आहेत?

    • Author, हरमनदीप सिंग
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
    • Author, नवज्योत कौर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

"1989 मध्ये माझे पती बेपत्ता झाले. आजतागायत त्यांच्याबद्दल काहीही समजलं नाही. आयुष्यातील ते जुने दिवस पुन्हा एकदा पाहण्यासाठी मी इथे आले होते."

भावूक होत बलविंदर कौर यांनी हे शब्द उच्चारले. त्या मोगा येथील एका गुरुद्वारात जसवंत सिंग खालडा यांच्या जीवनावर आधारित 'सतलज' हा चित्रपट पाहण्यासाठी आल्या होत्या.

दिलजीत दोसांझची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 3 जुलै 2026 रोजी झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. परंतु, अवघ्या 48 तासांत तो तिथून हटवण्यात आला.

तेव्हापासून पंजाबमधील वेगवगेळ्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये लोकांनी हा चित्रपट स्वतः डाउनलोड करून मोठ्या एलईडी स्क्रीनवर दाखवण्यास सुरुवात केली आहे. लोक गुरुद्वारा आणि मोकळ्या जागांवर एकत्र जमून हा चित्रपट पाहत आहेत.

या प्रकरणाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी पंजाब भाजपाने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून गुरदासपूर, संगरूर, जालंधर, रूपनगर (रोपड), भटिंडा, फिरोजपूर, मोगा आणि पटियालासह अनेक जिल्ह्यांतील गावांमध्ये 'सतलज' चित्रपटाच्या स्क्रीनिंगचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत.

अशाच प्रकारच्या स्क्रीनिंगचे काही फोटो राजस्थानमधील श्रीगंगानगर भागातूनही व्हायरल झाले होते. दिलजीतने ते आपल्या इन्स्टाग्राम पेजवरूनही शेअर केले आहेत.

'चित्रपटात मी माझ्या पतीचा शोध घ्यायला आले आहे'

मंगळवारी (7 जुलै) मोगा येथील गुरुद्वारा बीबी काहन कौर जी येथे 'सतलज' चित्रपटाच्या स्क्रीनिंगला आलेल्या बलविंदर कौर यांनी बीबीसीचे प्रतिनिधी हरमनदीप सिंग यांच्याशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावेळी त्या भावूक झाल्या होत्या.

चित्रपट पाहिल्यानंतर बलविंदर कौर यांना अश्रू अनावर झाले. रडत-रडतच त्या म्हणाल्या, "कदाचित या चित्रपटामुळे माझ्या पतीबद्दलही काही समजेल. तो काळ मी स्वतः अनुभवला आहे. हा चित्रपट माझ्याच आयुष्यावर असल्यासारखं वाटलं. देव करो, अशी वेळ पुन्हा कधीही येऊ नये."

बलविंदर कौर यांचे पहिले पती 1989 मध्ये बेपत्ता झाले होते. ते पुन्हा कधी घरी परतले नाहीत. त्यानंतर आपला दुसरा विवाह मोगा येथे झाल्याचे बलविंदर कौर यांनी सांगितलं.

त्या म्हणाल्या, "1989 मध्ये मी माझ्या माहेरी तरन तारण येथे होते. माझे पती शिंपीचे काम करायचे. माझं लग्न चोहला साहिब येथे झालं होतं. त्यांचं नाव रविंदरपाल सिंग होतं. पहाटेच्या वेळी पोलीस त्यांना घरातून घेऊन गेले. त्यानंतर आजपर्यंत त्यांचा मृतदेहही आम्हाला मिळाला नाही."

"चित्रपटात दाखवल्याप्रमाणे त्या काळात कोणाचंही ऐकून घेतलं जात नव्हतं. आमच्यासोबतही अगदी असंच घडलं होतं. आम्ही खूप प्रयत्न केले, पण आजपर्यंत माझ्या पतीचा काहीच थांगपत्ता लागलेला नाही," असं बलविंदर कौर यांनी नमूद केलं.

मोगा येथे डॉ. सरबजीत कौर आपलं क्लिनिक बंद करून खास हा चित्रपट पाहण्यासाठी आल्या होत्या.

त्यांनी म्हटलं, "ही काही बनावट किंवा खोटी गोष्ट नाही. हे तेच सत्य आहे, जे आम्ही स्वतः भोगलंय. जसं त्यावेळी जसवंत सिंग खालडा यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला, तसाच आता त्यांच्या चित्रपटालाही रोखण्याचा प्रयत्न होत आहे. जसवंत सिंग खालडा आपल्यामध्येच उपस्थित आहेत, असंच आम्हाला आजही वाटतं."

"आम्ही लहान असताना सर्वजण एकत्र बसून टीव्हीवर चित्रपट पाहायचो. आज पहिल्यांदाच गुरुद्वारात इतक्या लोकांसोबत बसून अशा प्रकारचा चित्रपट पाहिला. मोठ्या संख्येने आमच्या परिसरातील लोक हा चित्रपट पाहण्यासाठी आले आहेत," असं त्यांनी सांगितलं.

'चित्रपट पाहिल्यानंतर अनेक कुटुंबांची प्रतीक्षा संपली'

बीबीसीचे सहयोगी पत्रकार गुरप्रीत चावला यांच्या मते, गुरदासपूरमधील मानचोपडा गावात एकत्र येऊन सतलज चित्रपट पाहणाऱ्या लोकांनी या चित्रपटावरील बंदीबद्दल प्रश्न उपस्थित केले. तसेच, लोकांनी आपल्या स्तरावर चित्रपट दाखवण्याच्या निर्णयालाही पाठिंबा दिला.

चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका तरुणाने सांगितले, "हा चित्रपट दाखवण्यामागचा आमचा उद्देश म्हणजे लोकांना त्या काळात पंजाबमधील निष्पाप तरुणांना घरातून उचलून नेऊन कसं मारलं गेलं आणि त्यांच्या न्यायासाठी जसवंत सिंग खालडा यांनी कसा लढा दिला, हे समजावं."

"पहिल्यांदाच ही गोष्ट चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. पण सरकार हा चित्रपट प्रदर्शित होऊ देत नाही. म्हणून आम्ही आमच्या स्तरावर लोकांना हा चित्रपट दाखवत आहोत," असं त्यांनी सांगितलं.

गावामध्ये आपल्या स्तरावर चित्रपटाचे प्रदर्शन करणाऱ्या एका तरुणाने सांगितलं, "चित्रपट पाहिल्यानंतर ज्या कुटुंबांमधील सदस्य त्या काळात बेपत्ता झाले होते, त्यांची प्रतीक्षा संपली. पंजाबचा इतिहास आणि खालडा साहेबांबद्दलही अनेक गोष्टी आम्हाला पहिल्यांदाच समजल्या. आम्ही काहीही चुकीचं करत नाही. चित्रपट तयार झाला आहे, तर तो आम्हाला पाहू द्यावा. आम्ही सरकारला आवाहन करतो."

मोगा येथे पती आणि मुलांसोबत चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या वीरपाल कौर म्हणाल्या, "चित्रपट प्रदर्शित झाल्याचं कळल्यापासून तो पाहायची आमची इच्छा होती. परंतु, नंतर तो झी-5 वरून काढून टाकण्यात आला. मंगळवारी सायंकाळी गुरुद्वारात हा चित्रपट दाखवला जात असल्याचं आम्हाला समजताच आम्ही संपूर्ण कुटुंबासह मुलांना घेऊन तो पाहण्यासाठी आलो."

कायदेशीर कारवाई झाली तरी आम्ही तयार - आयोजक

परंतु, चित्रपटाचे दिग्दर्शक हनी त्रेहन आणि झी-5 यांनी प्रेक्षकांना चित्रपट पुन्हा प्रदर्शित होईपर्यंत वाट पाहण्याचं आवाहन केलं आहे.

दिग्दर्शक हनी त्रेहन यांनी अवैधरित्या चित्रपट डाउनलोड करून दाखवणाऱ्यांनाही असे करू नये, असे आवाहन केले आहे.

तरीही अनेक लोक, संघटना आणि तरुण स्वतःच्या स्तरावर पुढाकार घेत विविध गावांमध्ये हा चित्रपट दाखवत आहेत.

मोगा येथील गुरुद्वारा साहिबमध्ये चित्रपटाचे प्रदर्शन करणारे आयोजक राजवंत सिंग मल्ल म्हणाले, "जसवंत सिंग खालडा यांच्यावर आधारित चित्रपट प्रदर्शित होऊ दिला गेला नाही. आमच्यासाठी लढणाऱ्या आमच्या नायकाचा चित्रपट आम्हाला पाहू दिला जात नाही, याची खंत होती. त्यामुळेच गुरुद्वारा समितीच्या सहकार्याने आम्ही गुरुद्वारा साहिबमध्ये हा चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेतला."

"हा चित्रपट दाखवल्यामुळे आमच्यावर कायदेशीर कारवाई होणार असेल, तर आम्ही त्यासाठी तयार आहोत. पण मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या व्यक्तीवरील चित्रपटच लोकांना पाहू दिला जात नसेल, तर हाच सर्वात मोठा गुन्हा आहे. आम्हाला अपेक्षेपेक्षाही खूप जास्त लोकांनी पाठिंबा दिला आहे," असं त्यांनी म्हटलं.

सार्वजनिक स्क्रीनिंगला दिलजीतचा पाठिंबा

अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ याने आपल्या इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून विविध ठिकाणी होत असलेल्या चित्रपटाच्या सार्वजनिक प्रदर्शनाला पाठिंबा दिला.

इन्स्टाग्राम लाइव्हदरम्यान युझर्सशी संवाद साधताना तो म्हणाला, "आता हा चित्रपट थांबणार नाही. तो लोकांपर्यंत पोहोचला आहे."

याशिवाय, दिलजीत दोसांझच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जवळपास दररोज अशा स्टोरीज शेअर करत आहेत, ज्यामध्ये बंदी असूनही देशातील विविध भागात लोक स्वतःच्या पुढाकाराने हा चित्रपट पाहत असल्याचे दिसत आहे.

दुसरीकडे, चित्रपटाचे दिग्दर्शक हनी त्रेहन यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरीद्वारे लोकांना चित्रपट डाउनलोड करून पाहू नका, असे आवाहन केले होते. त्यांनी लोकांना संयम राखण्याची विनंती करत हा चित्रपट पुन्हा सर्वांसाठी उपलब्ध होईल, अशी ग्वाही दिली होती.

परंतु, या प्रकरणी अद्यापर्यंत पोलिसांनी आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केल्याचे वृत्त समोर आलेले नाही.

परवानगीशिवाय चित्रपट दाखवण्याबाबत कायदा काय सांगतो?

चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांप्रमाणे झी-5सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर थेट प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांसाठी सेन्सॉर बोर्डाच्या (सीबीएफसी) प्रमाणपत्राची आवश्यकता नसते.

परंतु, हे ओटीटी प्लॅटफॉर्म भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 आणि माहिती तंत्रज्ञान नियम 2021 यांच्या कक्षेत येतात.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, भारत सरकारने 'सतलज' हा चित्रपट भारतातून हटवण्याचे आदेश देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (आयटी ऍक्ट) कलम 69ए चा वापर केला आहे.

या कलमानुसार, सरकारला ऑनलाइन मजकूर किंवा सामग्री ब्लॉक करण्याचा किंवा हटवण्याचा अधिकार आहे.

या आदेशानुसार कोणताही चित्रपट भारतात सार्वजनिकरित्या दाखवता येत नाही. या नियमाचं उल्लंघन केल्यास 7 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा आणि दंड होऊ शकतो.

'सतलज'च्या स्क्रीनिंगमध्ये राजकीय पक्षही मैदानात

शिरोमणी अकाली दलाचे (बादल) अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी बुधवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं, "'सतलज' हा चित्रपट पंजाबच्या गावागावांमध्ये आणि कानाकोपऱ्यात दाखवणार आहोत. त्यामुळे आमच्या मुलांना आणि पुढच्या पिढीला समाजावर झालेल्या अत्याचारांची माहिती मिळेल."

दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीनेही दिल्लीत या चित्रपटाचे सार्वजनिक प्रदर्शन आयोजित करण्याची घोषणा केली आहे. तसेच, जसवंत सिंग खालडा यांच्या जीवनाविषयी लोकांमध्ये जनजागृती केली जाईल, असेही समितीने म्हटले आहे.

शिरोमणी अकाली दलाकडूनही (वारिस पंजाब दे) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी सुरू आहे.

या प्रकरणी पंजाब भाजपचे अध्यक्ष केवल सिंग ढिल्लन म्हणाले की, चित्रपट ओटीटीवरून हटवल्यानंतर त्यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली.

ढिल्लन यांच्या म्हणण्यानुसार, वैष्णव यांनी त्वरीत 3 सदस्यांची पुनरावलोकन समिती स्थापन करण्याबाबत सांगितलं आहे. ही समिती संपूर्ण प्रकरणाची बारकाईने चौकशी करून आपला अहवाल सरकारला सादर करणार असल्याचे ते म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)