कुठं मुसळधार, तर कुठं अतिमुसळधार पावसाची नोंद; जाणून घ्या मुंबईसह महाराष्ट्रात कुठे किती पाऊस

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईसह पश्चिम उपनगरात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस आहे. पुढील 72 तासांत मुंबई शहर व उपनगरात पुढील 48 ते 72 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच, ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
या कालावधीत जुलै महिन्यात होणाऱ्या एकूण पावसापैकी जवळपास 50 टक्के पाऊस पडण्याची शक्यतादेखील हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, मुंबईसह उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले असून, सततच्या पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि आसपासच्या भागांत वाहतुकीवर परिणाम होण्याबरोबरच सखल भागांत पाणी साचून स्थानिक पातळीवर पूरस्थिती निर्माण होऊ शकते. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

फोटो स्रोत, @RMC_Mumbai
मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, रत्नागिरी, बुलढाणा, अमरावती, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
तसेच, पुढील 3 दिवस मुंबई, कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
कुठे किती पाऊस
मागील 24 तासांत म्हणजे 2 जुलैला सकाळी 8.30 ते 3 जुलै सकाळी 8.30 दरम्यान सह्याद्रीच्या घाटमाथा भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
रायगड आणि पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला असून, भिरा येथे सर्वाधिक 210 मिमी पावसाची नोंद झाली.
त्यानंतर ताम्हिणी येथे 170 मिमी, डोंगरवाडी 141 मिमी, लोणावळा कार्यालय 140 मिमी, दावडी 135 मिमी, शिरगाव 130 मिमी, धारावी 122 मिमी, लोणावळा 116 मिमी, आंबोणे 108 मिमी आणि खोपोली येथे 100 मिमी पाऊस झाला.
भिरा येथे आतापर्यंत तब्बल 1,675 मिमी पावसाची नोंद झाली असून, डोंगरवाडी (821 मिमी), ताम्हिणी (794 मिमी), पोफळी (729 मिमी), लोणावळा कार्यालय (659 मिमी), धारावी (632 मिमी), दावडी (615 मिमी) आणि शिरगाव (571 मिमी) येथेही लक्षणीय पाऊस झाला आहे.
घाटमाथ्यावर सुरू असलेल्या या जोरदार पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठी आवक होत असून, नद्या-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना घाट परिसरात आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.
पुढच्या 4 आठवड्यांचा अंदाज
दर गुरुवारी हवामान विभाग पुढच्या चार आठवड्यांचा विस्तारीत अंदाज जाहीर करतो.
2 जुलैच्या विस्तारीत अंदाजानुसार, पुढच्या 2 आठवड्यांत राज्यात आणि देशात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

फोटो स्रोत, Getty Images
2-9 जुलै या पहिल्या आठवड्यात राज्यात बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल.
9-16 जुलै या आठवड्यात उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त, पण इतर ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.
16 ते 23 जुलै आणि 23 जुलै ते 3 ऑगस्ट या आठवड्यात मान्सूनच्या पावसात खंड पडण्याची चिन्हं आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























