महालक्ष्मी एक्सप्रेस : महालक्ष्मी एक्सप्रेस- NDRF च्या पथकांच्या प्रयत्नांनी सर्व प्रवाशांची सुटका

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

बदलापूर आणि वांगणीदरम्यान अडकून पडलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमधल्या सगळ्या 1050 प्रवाशांची सुखरूप सुटका झाली आहे.

मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. सगळ्या प्रवाशांची सुटका झाल्यामुळे आता रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं आहे.

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं की, एनडीआरएफ, नेव्ही, आयएएफ आणि राज्य पोलिसांनी मिळऊन महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील सगळ्या 700 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. 

या सर्वांना इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी बसेसचीही व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली आहे.

सर्व प्रवासी सुखरुप असल्याचंही पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे गेल्या बारा तासांपासून बदलापूर आणि वांगणीदरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस अडकून पडली आहे.

प्रवाशांच्या सुटकेसाठी NDRF च्या बोटी तसंच नौदलाची मदत घेण्यात आली आहे.

रेल्वे सुरक्षा दल आणि पोलिस कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले असून अडकलेल्या प्रवाशांना बिस्कीट तसंच पाणी पुरविण्यात आलं आहे.

गाडीमध्येच प्रसूती वेदना

दरम्यान, या गाडीमध्येच एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या आहेत. रेश्मा कांबळे असं या महिलेचं नाव आहे. डॉक्टरांची टीम घटनास्थळी पोहोचल्याने त्यांनी मदत मिळाली असल्याचं शिवाजी पाटील यांनी सांगितलं.

या महिलेला महिलेला अंबरनाथ इथल्या सुश्रुत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय.

या ट्रेनमध्ये नऊ गरोदर महिला आहेत. त्यांची विशेष काळजी घेतली जात आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवाहन

ट्रेनमधून खाली न उतरण्याचं आवाहन मध्य रेल्वेने महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना केलं आहे. "ट्रेनमध्ये तुम्ही सुरक्षित आहात. रेल्वे कर्मचारी, आरपीएफ आणि स्थानिक पोलीस तुमच्या मदतीसाठी आहेत. एनडीआरएफ आणि इतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांच्या सल्ल्याची वाट पाहा." असं आवाहन मध्य रेल्वेने केलं आहे.

एनडीआरएफ आणि इतर यंत्रणांकडून मदत उपलब्ध होत आहे. कुणीही गोंधळून जाऊ नये. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत गाडीत पाणी येणार नाही. यदाकदाचित पाणी आलंच, तर तुम्हाला सुरक्षित ठिकाणी नेण्याची जबाबदारी पोलीस घेतील, असा दिलासा पोलिसांनी एक्स्प्रेसमध्ये जाऊन प्रवाशांना दिला.

कल्याणहून कर्जत-खोपोलीला जाणारे मार्ग सोडले तर मध्य रेल्वेच्या अन्य मार्गांवरील वाहतूक सुरू असल्याची माहितीही मध्य रेल्वे कडून देण्यात आली आहे.

...तर पाणी डब्यांमध्ये घुसेल

प्रकाश पवार हे महालक्ष्मी एक्सप्रेसमधून प्रवास करत आहेत. तिथे सध्या काय परिस्थिती आहे, याबद्दल त्यांनी बीबीसी मराठीला माहिती दिली.

"रात्री 8.20 च्या गाडीने आम्ही मुंबईहून कोल्हापूरला निघालो होतो. आधी अंबरनाथला गाडी थांबली. मग दोन अडीच वाजल्यापासून आम्ही बदलापूर आणि वांगणीच्या मध्ये अडकलो आहोत. ट्रॅकवर पाणी वाढत जाऊन चौथ्या पायरीपर्यंत आलं आहे. अजून थोडा पाऊस पडला तर पाणी गाडीत येईल अशी भीती आम्हाला वाटते आहे. इथून साठ फुटांवरच मोठी नदी वाहते आहे. जवळची झाडंही पाण्यात आहेत, किमान दहा पंधरा फूट तरी पाणी असावं. रेल्वेची माणसं सकाळी आली होती. आमच्या डब्यात सत्तर माणसं आहेत. असे वीस डबे आहेत. म्हणजे 1400-1500 माणसं नक्कीच गाडीत असतील. NDRF ची टीम लवकरात पोहोचावी," असं प्रकाश पवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं.

ठाणे-नवी मुंबईत मुसळधार

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागात पाणी तुंबल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

पावसाचा परिणाम मध्य रेल्वेवर झाला. कर्जतच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली.

बदलापूर, अंबरनाथमध्ये रेल्वे स्थानकात पाणी घुसलं. उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे पाणी रेल्वे रुळावरही आलं.

बदलापूर स्थानकात रेल्वे रुळावर पाणी अडकल्यामुळे अनेक प्रवासी अडकून पडले होते. NDRF च्या मदतीनं या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे.

"गेल्या 24 तासात मुंबई उपनगरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. आज (शनिवारी) सकाळी 7 वाजेपर्यंत 150 ते 180 मिमी पाऊस, तर मुंबई शहरात 50 ते 100 मिमी पावसाची नोंद झाली आहे. नवी मुंबई आणि ठाण्यातही अशीच स्थिती आहे." अशी माहिती हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसळीकर यांनी ट्वीटद्वारे दिली.

बदलापूर जलमय, बैठ्या चाळींमधील घरात पाणी शिरलं

उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बदलापूर शहरात सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. विशेषत: शहरातील नाल्यांशेजारील भागात पाणी साचण्याचं प्रमाण वाढलं आहे.

रमेशवाडी, सानेवाडी, हेंद्रेपाडा, बेलवली, शनी नगर, वालीवली भागातील बैठ्या चाळींमध्ये दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचलं आहे. तर रेल्वेस्थानक परिसराला जोडणारा मांजर्ली स्मशानभूमीजवळचा रस्ता, साई कृपा हॉस्पिटल जवळचा रस्ता पाण्याखाली गेल्याने बदलापूर गावाशी संपर्क तुटला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)