देवेंद्र फडणवीस: 'शरद पवारांनी सत्तास्थापनेची ऑफर दिली, मग निर्णय बदलल्याने अजित पवार नाराज'

    • Author, नीलेश धोत्रे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजप सोबत येण्यासाठी थेट शरद पवारांनीच ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

पत्रकार राजू परुळेकर यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शरद पवार यांचं नाव न घेता थेट राष्ट्रवादीकडून ऑफर होती अजित पवारांकडून नाही, असे शब्द वापरले आहेत.

त्याचबरोबर अजित पवार यांच्याबरोबर स्थापन झालेल्या त्या 80 तासांच्या सरकारचे शिल्पकार अमित शाह होते, असं सांगत अमित शाहांनी त्यावेळी पाठिंबा दिला नसल्याच्या अफवांवर उत्तर दिलं आहे.

80 तासांच्या सरकार बाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे, "आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती, म्हणजे अजित पवार नाही... थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. त्यावेळी योग्य त्या चर्चा झाल्या होत्या. व्हायला पाहिजे त्या सर्व चर्चा झाल्या, पण त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी त्यांची भूमिका बदलली."

"त्यानंतर दोन-तीन दिवस आम्ही शांत होतो, त्यानंतर मात्र आम्हाला अजित पवारांकडून फिलर आला, त्यांच्याशी आमची चर्चा झाली. त्यांनी शरद पवारांची भूमिका मान्य नाही असं सांगितलं. तीन पक्षाचं सरकार चालू शकत नाही. भाजप-राष्ट्रवादी स्थिर सरकार देऊ शकतील म्हणून मी तयार आहे, असं अजित पवारांनी म्हटलं.

'त्यावेळी जे योग्य वाटलं तेच केलं'

अजित पवारांसोबत झालेल्या शपथविधीनंतरच्या घडामोडींमुळे आता त्या निर्णयाबद्दल काय वाटतं, या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, की त्यावेळचा तो निर्णय कदाचित चुकीचा असेल, आज मागे वळून पाहिल्यावर ते केलं नसतं तरी चाललं असतं असं वाटतं. पण जेव्हा सर्व लोक तुमच्या पाठीत खंजीर खुपसतात तेव्हा राजकारणात जगावं लागतं. मग गनिमी कावा करावा लागतो, त्यामुळे तो करण्यात आला. जर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात आला नसता तर आमचं सरकार टिकलं असतं. आमच्याकडे आकडे होते. यावेळी मी हे केलं होतं ते बरोबर होतं."

पण ऐन वेळी शरद पवार यांनी भूमिका का बदलली, तुम्ही फडणवीस आहात म्हणून त्यांनी भूमिका बदलली का, असा प्रश्न पुढे परुळेकरांनी फडणवीसांना केला. त्यावर उत्तर देताना त्यांनी म्हटलं, "फडणवीस आडनाव असल्याने काय काय भूमिका बदलतात हे मी आधीही पाहिलंय. अनेकांनी त्यांच्या भूमिका बदलल्यात. अनेकांनी माझ्या जातीचा उपयोग करून माझ्यावर हल्ला चढवलाय. ज्यांना माझ्यावर हल्ला करायला दुसरा कुठलाच मुद्दा गेल्या पाच वर्षात सापडलेला नाही त्यांनी जातीच्या आधारे माझ्यावर हल्ला केला आहे. त्यामुळे त्यांचा पुरोगामित्वाचा बुरखा फाटला आहे."

अमित शाह यांनी फारसं लक्ष न घातल्यामुळेच राज्यात भाजपच सरकार येऊ शकलं नाही या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते म्हणतात, "अजित पवारांबरोबर सरकार स्थापन करण्याचे शिल्पकार अमित शहा होते, ते माझ्या मागे भक्कम उभे आहेत."

दरम्यान राज्यात २३ ते २६ नोव्हेंबर २०१९ मध्ये घडलेल्या घडामोडींबाबत आता आपण स्वतः पुस्तक लिहिणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं आहे.

"त्या 80 तासांमध्ये नेमकं काय घडलं याबाबत सध्या अनेक लोक आता पुस्तकं लिहित आहेत, खरं पुस्तक मी लिहिणार आहे, पत्रकारांनी लिहिलेली पुस्तकं बऱ्याच गृहितकांवर आधारित आहेत," असा दावा सुद्धा फडणवीसांनी केला आहे.

'विश्वासघाताचा सात्विक संताप'

उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापनेच्या वाटाघाटी सुरू असताना आपला फोन घेतला नसल्याचा आरोप सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

तसंच पालघरच्या जागेची अदलाबदल करतानाचा शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देणार नाही हे उद्धव ठाकरे यांच्याकडे स्पष्ट करण्यात आलं होतं, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

शिवाय अमित शहा आणि उद्धव ठाकरे त्यांच्यात मुख्यमंत्रिपदाबाबत झालेल्या चर्चेत त्यांना कुठलंही आश्वासान देण्यात आलं नव्हतं याचाही फडणवीसांनी पुनरुरच्चार केला आहे.

शिवसेनेच्या वागण्याचा राग येतो का, या प्रश्नाचं उत्तर देताना फडणवीस म्हणतात.

"शिवसेनेनं विश्वासघात केल्याचा राग नक्की आला, लोकसभेला मी शिवसेनेच्या उमेदवारांसाठी मी काम केलं. विधानसभेला शिवसेनेच्या विरोधात भाजपच्या बंडखोरांनी भरलेले फॉर्म मागे घेण्यासाठी मी मेहनत घेतली. त्यांच्या अनेक उमेदवारांना मदत केली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी विधानसभेला फक्त त्यांच्या उमेदवारांचा प्रचार केला होता. पण मी तसं नव्हतं केलं. शिवसेनेच्या वागण्याचा मला राग आला, सात्विक संताप आला."

फडणवीसांचे शिक्कामोर्तब

23 ते 26 नोब्हेंबर 2019 महाराष्ट्रात घडलेल्या घडामोजडींबाबत आतापर्यंत तीन पुस्तकं बाजारात आली आहेत. या तीनही पुस्तकांबाबत बीबीसीनं आधी माहिती दिली आहे, ती तुम्ही इथं वाचू शकता.

त्यातीलच एक पुस्तक 'चेकमेट : हाऊ द बीजेपी वन अॅन्ड लॉस्ट महाराष्ट्र'चे लेखक आणि पत्रकार सुधीर सूर्यवंशी म्हणतात, "मी देवेंद्र फडणवीसांचे आभारच मानतो कारण 2017 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू होती, तसंच 2019 च्या निकालांनंतर शरद पवारच थेट भाजपशी सत्ता स्थापनेची चर्चा करत होते हे मान्य करून त्यांनी मी पुस्तकात लिहिलेल्या गोष्टींवर शिक्कामोर्तबच केलं आहे. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे गृहितकं कुठली आहेत यावर चर्चा होऊ शकते."

कशाला फोन उचलायचा?

उद्धव ठाकरे यांनी फोन उचलला नाही या फडणवीस यांनी केलेल्या दाव्यावर शिवसेनेचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत बीबीसी मराठीला प्रतिक्रिया दिली.

ते सांगतात, "या प्रकरणाचा मी प्रत्यक्ष साक्षी आहे. उद्धव ठाकरे यांचा सतत निरोप जात होता की, मुख्यमंत्रिपदाबाबत बोला, पण त्यांचे नेते मुख्यमंत्रिपद सोडा चार महत्त्वाची खातीसुद्धा देणार नाहीत असं बोलत होते, मीडियात त्याच्या बातम्या येत होत्या. त्यांचा प्लॅन वेगळा होता. गृहमंत्रिपद देणार नाही, हे देणार नाही, ते देणार नाही, असं ते बोलत होते. मग कशाला तुमचा फोन उचलायचा? उद्धव ठाकरेंचं एकच म्हणण होतं की, तुम्ही मीडियासमोर बोला की आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रिपद द्यायला तयार आहोत. पण यांचं म्हणणं होतं की, आधी चर्चेला सुरूवात करा. म्हणजे इतर दरवाजे बंद...इतकी काय शिवसेना दुधखुळी नाही."

"आमच्या मुख्यमंत्रिपदाबाबत एक जणही बोलत नव्हता, मग कशाला चर्चा करायची," असं सावंत यांनी पुढे म्हटलं.

शिवसेनेच्या उमेदवारांनी भाजपच्या लोकांविरोधात बंडखोरी केली होती या फडणवीसांच्या आरोपावर बोलताना सावंत म्हणतात, "गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी दीपक केसरकरांच्या विरोधात प्रचार केला होता याचं तुम्ही समर्थन करणार का? कोल्हापुरात शिवसेनेचे आमदार कसे पडतात, कुणी बंडखोरी केली होती. आम्हाला हे नाही जमत. आम्ही आरपार भूमिका घेतो."

फडणवीस यांची प्रतिक्रिया स्वाभाविक

देवेंद्र फडणवीस यांची मुलाखतीतून आलेली ही प्रतिक्रिया स्वाभाविक असल्याचं पत्रकार जितेंद्र दीक्षित सांगतात. दीक्षित यांनी '35 डेज: हाऊ पॉलिटिक्स इन महाराष्ट्रा चेंज फॉरेव्हर इन 2019,' हे पुस्तक लिहिलं आहे.

फडणवीस यांनी दिलेल्या माहितीमध्ये विरोधाभास असल्याचा दावा जितेंद्र दीक्षित करतात. ते म्हणतात, "देवेंद्र फडणवीसांनी त्यांनी ABP माझाला काही दिवसांपूर्वी दिलेल्या सांगितलं होतं की, अजित पवार यांनी ते जे काय करत आहेत त्याची शरद पवार यांना माहिती असल्याचा विश्वास फडणवीसांना दिला होता. पण आता मात्र ते बरोबर त्यापेक्षा वेगळं म्हणत आहेत. आता मात्र अजित पवारांना शरद पवार जे करत होते ते मान्य नव्हतं असं म्हणत आहेत."

ते पुढे सागंतात, "मी लिहिलेल्या पुस्तकात राजकीय नेत्यांची स्तुती करण्यात आलेली नाही, त्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लोकांसमोर आलेल्या राजकारण्यांना आवडणाऱ्या नाहीत, त्यामुळे ते स्वतःची बाजू मांडणारचं किंवा वेगवेगळे दावे करणारच. ते स्वाभाविक आहे. त्यांच्या अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या अपेक्षितच आहेत."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)