You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू; मुंबईतल्या साकीनाका इथं काय घडलं?
मुंबईमधल्या साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून, असलम इसाक शेख या 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. साकीनाका परिसरात खैराणी रोडवर गटाराच्या जाळीच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. तिथं ही घटना घडली.
अस्लम इसाक शेख हे साकीनाका इथल्या यादव नगरचे रहिवासी होते.
अस्लम मॅनहोलमध्ये पडल्यानंतर अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले होते. मात्र, त्यांना वाचवण्यात अपयश आलं.
या घटनेनंतर मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
घटनेच्या काही तासांनंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या अस्लम इसाक शेख यांच्या कुटुंबीयांना महापालिकेतर्फे 10 लाखांची मदत जाहीर केली.
तसंच, या घटनेला जबाबदार धरत, मुंबई महापालिकेच्या 'एल' विभागाचे सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांच्यासह सहायक/दुय्यम अभियंता (परिरक्षण, एल विभाग) दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता (परिरक्षण, एल विभाग) अभिजीत चौगुले, सहायक अभियंता (मलनिस्सारण प्रचालन) उत्तम पाटील यांना निलंबित करण्यात आलंय.
शिवाय, सुरक्षेच्या नियमांबाबत कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याचे आदेशही महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत.
या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी आणि महानगरपालिका क्षेत्रात अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी गठीत करण्यात आली आहे, अशीही माहिती भिडेंनी दिली.
दरम्यान, या उघड्या मॅनहोलवरून मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)