ऑगस्टमध्ये तुमच्या भागात पाऊस कोसळणार की उकाडा वाढणार? जाणून घ्या हवामानाचा दीर्घकालीन अंदाज

फोटो स्रोत, Getty Images
सध्या देशातल्या हवामानात वेगाने बदल होत आहे. विशेषतः मध्य भारत आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानं जनजीवन विस्कळीत झाल्याचं बघायला मिळालं.
बंगालच्या उपसागरापासून सुरू झालेला हा पावसाचा प्रवास आता विदर्भ आणि मध्य प्रदेशच्या दिशेने सरकला आहे.
दरम्यान, आज (1 ऑगस्ट) कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. रायगडसह पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असून हवामान विभागाने येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
सध्या कमी दाबाचा पट्टा नेमका कुठे आहे आणि पुढील काही तासांत महाराष्ट्रासह इतर राज्यांत पावसाची काय स्थिती असणार आहे आणि ऑगस्ट महिन्याचा हवामानाचा दीर्घकालीन अंदाज काय आहे? जाणून घेऊयात.
हवामान विभागाच्या ताज्या अहवालानुसार, पूर्व विदर्भ आणि लगतच्या छत्तीसगडवर असलेला 'डिप्रेशन' म्हणजेच कमी दाबाचा पट्टा आता पश्चिम-वायव्य दिशेने सरकला आहे.

फोटो स्रोत, @RMC_Mumbai
31 जुलैला सकाळी 11.30 च्या सुमारास हा पट्टा पश्चिम विदर्भ आणि लगतच्या दक्षिण मध्य प्रदेशवर केंद्रित होता. मात्र, आता अमरावतीपासून पूर्व-ईशान्येकडे अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर, तर वर्धा आणि बेतुलच्या परिसरात हा पट्टा सक्रिय आहे.
साधारण 50 ते 65 किमी प्रति तास वेगाने हे कमी दाबाचं क्षेत्र पुढे सरकतंय. हा पट्टा आता आणखी पश्चिम-वायव्य दिशेने सरकून येत्या काही तासांत एका 'वेल मार्क्ड लो प्रेशर एरिया'मध्ये रूपांतरित होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सध्या दक्षिण मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, उत्तर कर्नाटक आणि उत्तर-पश्चिम तेलंगणावर विखुरलेले पण अतिशय दाट आणि तीव्र ढग तयार झाले आहेत.
त्या पार्श्वभूमीवर विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर हवामान खात्याकडून पावसाचा ऑरेंज तर काही भागातं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नद्यांच्या जलपातळीत वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलीय.
संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यंत सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
हवामान विभागाने 31 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान पुढील 5 दिवसांचा राज्यातील विविध जिल्ह्यांसाठीचा पावसाचा अंदाज जारी केला आहे.
आज (1 ऑगस्ट) पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून, ताशी 50 ते 60 किमी वेगाने वाहणारे वारे वाहण्याची शक्यता आहे.
नाशिक, धुळे आणि नंदुरबारच्या घाटमाथ्यासह काही भागांतही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे, कोल्हापूर आणि साताराच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पुढील काही दिवसांत बहुतांश भागांत पावसाचा जोर हळूहळू कमी होऊन हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
ऑगस्ट महिन्यात हवामान कसं असेल?
देशात ऑगस्ट महिन्यात आणि नैऋत्य मान्सूनाच्या उत्तरार्धात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
एकूण पाऊस पाहता महाराष्ट्रात नाशिकच्या आसपासचा परिसर वगळता जवळपास सर्वच भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
घाट क्षेत्रात आणि कोकणात नेहमीच्या सरासरीपेक्षा बराच कमी पाऊस पडू शकतो. तर, विदर्भ आणि मराठवाड्यात ॲागस्टमधल्या नेहमीच्या मासिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

फोटो स्रोत, @Indiametdept
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीत देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या 94 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यातही देशातील एकूण पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तापमानाबाबतही हवामान विभागाने महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. ऑगस्ट महिन्यात देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
मात्र, वायव्य भारत, मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पालगतच्या काही भागांत कमाल तापमान सरासरीएवढं आणि काही भागात सरासरीपेक्षा जास्त राहू शकतं.
किमान तापमान मात्र बहुतांश भागात सामान्य ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.

फोटो स्रोत, @Indiametdept
हवामान विभागाने सध्या विषुववृत्तीय प्रशांत महासागरात मध्यम स्वरूपाचा एल निनो सक्रिय असल्याचं सांगितलं आहे. तसेच मान्सूनच्या उर्वरित कालावधीत तो आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
दुसरीकडे, हिंद महासागरातील इंडियन ओशन डायपोल सध्या तटस्थ स्थितीत असून तो मान्सूनच्या उर्वरित कालावधीत कायम राहण्याची शक्यता आहे.
मात्र, सप्टेंबरमध्ये सकारात्मक इंडियन ओशन डायपोल विकसित होण्याचे संकेत काही आंतरराष्ट्रीय हवामान संस्थांनी दिले आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























