बाळाला जन्म दिला आणि स्मृतीच गेली; बाळंतपणानंतर समीना यांच्या आयुष्यात धक्कादायक बदल

Published
वाचन वेळ: 8 मिनिटे

"बाहेरून पाहता माझ्या गरोदरपणात कोणतीही समस्या दिसत नव्हती. त्यावेळी माझे वयही खूप कमी होते. शारीरिकदृष्ट्याही मी पूर्णपणे निरोगी होते. तरीही सुरुवातीपासूनच माझ्या मनात सतत अशी एक अजब भावना येत होती की, काहीतरी बिघडलंय. ती शंका माझी पाठ सोडतच नव्हती."

काहीतरी वाईट घडणार आहे, असं लेखिका समीना अली यांना लहानपणापासूनच वाटत होतं.

एका श्रद्धाळू मुस्लीम कुटुंबात जन्मलेल्या समीना यांचं बालपण भारतात गेलं, पण नंतरचा काळ अमेरिकेत गेला.

"समीना यांचा जन्म एका अशुभ दिवशी झाला आहे, त्यामुळे दुर्दैव आणि संकटं नेहमी त्यांच्यामागे राहतील," अशी त्यांच्या आई-वडिलांची धारणा होती आणि ही भीती त्यांना सतत सतावत असायची.

याच भीतीमुळे त्यांनी समीना यांना चांदीचं ताईत घातलं होतं आणि आपल्या परीने त्यांना प्रत्येक वाईट शक्तीपासून वाचवण्याचा प्रयत्न केला होता.

पण 1999 मध्ये जेव्हा समीना पहिल्यांदा गरोदर राहिल्या, तेव्हा डॉक्टरांना काळजी वाटण्यासारखं काही दिसलं नाही.

गर्भातील बाळाच्या स्कॅन रिपोर्टमध्ये सर्व काही नॉर्मल होतं आणि बाळाच्या हृदयाचे ठोकेही व्यवस्थित होते. त्यामुळे डॉक्टर अगदी निर्धास्त होते.

समीना यांनी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या 'आउटलूक' कार्यक्रमात सांगितलं की, "तिथे दुसरं काहीच नव्हतं, फक्त हृदयाच्या ठोक्यांचा आवाज ऐकू येत होता. ती धडधड एखाद्या धावत्या घोड्यांच्या टापांसारखी वाटत होती."

"बाळाच्या हृदयाचे ठोके पूर्ण रूममध्ये घुमत होते. ते ऐकून मला एका सेकंदासाठी वाटलं की, मी उगाच चिंता करतेय. पण गरोदरपणाचा सातवा महिना सुरू झाला आणि लक्षणं दिसू लागली. माझ्या पूर्ण शरीरावर खूप सूज आली. कॉम्प्युटरवर टाईप करताना बोटं एकमेकांना घासल्यासारखी वाटायची. सतत उलट्या व्हायच्या आणि हळूहळू दिसायचंही धुसर होऊ लागलं."

"तरीसुद्धा डॉक्टर हेच सांगत राहिले, तुम्ही तरुण आहात. तुम्ही एकदम फीट आहात. तुम्हाला कोणतीच अडचण नाही."

प्री-एक्लॅम्पसिया (Pre-eclampsia) म्हणजे काय?

त्या काळात आजच्यासारखी इंटरनेटवर एका क्षणात सविस्तर माहिती शोधता येत नव्हती. त्यामुळे समीना आणि त्यांचे पती स्कॉट यांनी सर्वात विश्वासार्ह मार्ग निवडला पुस्तकांचा. स्कॉटही लेखक आहेत.

समीना यांनी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या 'आउटलुक' कार्यक्रमात सांगितलं, "आम्ही पुस्तकांकडे वळलो. 'व्हॉट टू एक्स्पेक्ट व्हेन यू आर एक्स्पेक्टिंग' नावाचं पुस्तक वाचलं. त्याच्या शेवटी प्री-एक्लॅम्पसियाबद्दल एक पान होतं. त्यात दिलेल्या लक्षणांची यादी पाहिली तेव्हा समजलं की त्यातील अनेक लक्षणं माझ्यामध्येही होती."

प्री-एक्लॅम्पसिया (Pre-eclampsia) ही गरोदरपणादरम्यान निर्माण होणारी एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे. याची सुरुवात सहसा प्लेसेंटा (वार) मध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे होते. ही स्थिती का निर्माण होते याबद्दल डॉक्टरांना अजूनही पूर्ण माहिती नाही. परंतु, ही स्थिती गंभीर झाली तर ती फक्त एकाच अवयवाला नाही तर मेंदूला आणि त्यासोबत शरीराच्या इतर महत्त्वाच्या अवयवांनाही इजा पोहोचवू शकते.

कृष्णवर्णीय आणि दक्षिण आशियाई महिलांमध्ये या समस्येचा धोका तुलनेने जास्त असतो. उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर), तीव्र डोकेदुखी, लघवीमधून प्रोटीन जाणं आणि दृष्टी धुसर होणं ही याची मुख्य लक्षणं मानली जातात.

चिंता वाढल्यामुळे समीना आणि स्कॉट यांनी पुन्हा एकदा डॉक्टरांकडे धाव घेतली.

समीना यांनी सांगितलं, "माझ्या डिलिव्हरीला अजून एक आठवडा बाकी होता. या वेळी मी माझ्या पतीलाही सोबत घेऊन गेले. मला वाटलं की कदाचित त्यांनी सांगितलं तर डॉक्टर माझी गोष्ट गांभीर्याने घेतील."

तरीसुद्धा त्यांच्यावर उपचार करणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञाने फक्त इतकंच सांगितलं, "सर्व काही व्यवस्थित आहे. घरी जा आणि आराम करा."

'ती फक्त पोटातली कळ नव्हती'

समीना यांच्या पोटात दुखायला लागलं आणि त्यांच्या 'वाईट स्वप्ना'ला सुरुवात झाली.

त्यांनी सांगितलं, "मला इतक्या असह्य वेदना व्हायला लागल्या, की त्या नॉर्मल डिलिव्हरीच्या (लेबर पेन) कळा नव्हत्याच. माझ्या छातीत, डोक्यात असं वाटत होतं की, जणू कोणत्याही क्षणी डोकं फुटेल. संपूर्ण शरीर तुटून पडत असल्यासारख्या असह्य वेदना होत होत्या."

"माझी डिलिव्हरी करणाऱ्या डॉक्टर माझ्या प्रश्नांची उत्तरं टाळण्यासाठी नर्सेसच्या मागे जाऊन उभ्या राहायच्या. माझं बीपी खूपच धोकादायक पातळीवर पोहोचलं होतं. मी पुन्हा पुन्हा चक्कर येऊन पडायचे आणि परत शुद्धीवर यायचे. नर्सेस मला मदत करून बाळाला बाहेर काढायला सांगत होत्या. मला काहीच कळत नव्हतं की माझ्या बाबतीत नक्की काय चाललं आहे. त्या दरम्यान मला मेंदूचा झटका येत होता. छातीत होणाऱ्या तीव्र वेदना म्हणजे नंतर हार्ट अटॅक असल्याचं समोर आलं."

याच्यानंतर नक्की काय झालं, हे समीना यांना फारसं आठवतच नाही. बाळाची एक बारीकशी झलक आणि त्या सहन न होणाऱ्या वेदनांचे काही काही क्षणच फक्त त्यांच्या लक्षात राहिले होते.

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या 'आउटलुक' कार्यक्रमात त्यांनी सांगितलं, "मला एवढंच आठवतंय की, माझ्या मुलाचा जन्म झाला होता. नर्सेस त्याला आंघोळ घालण्यासाठी घेऊन जात होत्या आणि मी हॉस्पिटलच्या बेडवरून एक डोळा उघडा ठेवून त्याला पाहण्याचा प्रयत्न करत होते."

"माझ्या मुलाच्या जन्मानंतर अवघ्या 20 मिनिटांनी मला तीव्र झटका आला. तो जणू एखाद्या नैसर्गिक भूल (ॲनेस्थेशिया) दिल्यासारखा वाटला, जो माझ्या संपूर्ण शरीरात पसरला. त्या क्षणापासून मला कोणत्याही वेदना जाणवल्या नाहीत. त्यानंतर काय घडले हे मला अजिबात आठवत नाही."

यानंतर समीना आणि त्यांचा मुलगा इस्माईल या दोघांना लगेच इमर्जन्सी विभागात हलवण्यात आलं. अशक्त इस्माईलला मॅटर्निटी वॉर्डात ठेवण्यात आलं, तर मेंदूला इजा झाल्यामुळे कोमात गेलेल्या समीना यांना न्यूरोलॉजी वॉर्डात व्हेंटिलेटर वर जिवंत ठेवण्यात आलं होतं.

पाच दिवसांनंतर ज्यांना उपचार करणारे न्यूरोलॉजिस्ट "अद्भूत मुलगी" म्हणायचे, त्या समीना शुद्धीवर आल्या. बालपणाच्या आठवणींच्या आधारे त्या आपल्या आई-वडिलांना आणि भाऊ-बहिणींना ओळखू शकल्या. आपली मातृभाषा उर्दूही बोलू शकत होत्या. पण इंग्रजी बोलताना त्यांना खूप अडचणी येत होत्या. त्या आपल्या पतीलासुद्धा ओळखू शकल्या नाहीत. एवढेच नाही तर आपण एका बाळाला जन्म दिला आहे ही गोष्टही त्यांच्या स्मृतीतून पूर्णपणे पुसली गेली होती.

समीना यांनी सांगितलं, "न्यूरोलॉजिस्टना वाटलं की मी माझ्या बाळाला भेटले तर कदाचित माझी स्मरणशक्ती परत येण्यास मदत होईल. त्यामुळे त्याला इन्क्युबेटरमधून बाहेर आणण्यात आले. माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या प्रतिक्रिया पाहून मला समजले की, हा खूप महत्त्वाचा क्षण होता. पण त्या वेळी माझ्या मेंदूला इतकी गंभीर दुखापत झाली होती की माझ्या आसपास नक्की काय घडतंय याचा मी विचारही करू शकत नव्हते."

"मला फक्त इतकंच वाटत होतं की काहीतरी खूप वेगळं किंवा विचित्र घडतंय, पण ते काय आहे हे मला काहीच कळत नव्हतं. पण त्या वेळी माझ्या मेंदूला इतकी गंभीर दुखापत झाली होती की माझ्या आसपास नक्की काय घडतंय, याचा मी विचारही करू शकत नव्हते. मला फक्त इतकंच वाटत होतं की काहीतरी खूप वेगळं किंवा विचित्र घडतंय. पण ते काय आहे हे मला काहीच कळत नव्हतं."

खरंतर एका आईने पहिल्यांदा आपल्या बाळाला जवळ घेणं हा क्षण आयुष्यभरातला सगळ्यात सुंदर क्षण असतो. पण समीना यांच्या आयुष्यात मात्र हा क्षण एका भयंकर स्वप्नासारखा बनून गेला.

त्यांनी सांगितलं, "नर्सेसने माझ्या बाळाला माझ्या अंगावर लावलेल्या तारा आणि नळ्यांवरच झोपवलं. आधीच त्या उपकरणांचा त्रास होत होता. त्यातच जवळजवळ 2.7 किलो वजनाचं बाळ अंगावर ठेवल्यामुळे वेदना सहन होईनाशा झाल्या."

"मला ठाऊकच नव्हतं की ते माझं बाळ आहे. मला फक्त इतकंच कळत होतं की मला प्रचंड वेदना होत आहेत. मला नर्सला सांगायचं होतं की बाळाला माझ्या अंगावरून बाजूला घ्या, पण मला बोलताच येत नव्हतं. माझ्या तोंडातून फक्त अस्पष्ट आवाज येत होते. शेवटी बाळ माझ्या हातातून घसरलं. एका क्षणापूर्वी जो आनंद होता तो क्षणात भीतीमध्ये बदलला. आमची पहिली भेट अशा प्रकारे खूपच वाईट पद्धतीने झाली."

तो क्षण किती मन हेलावून टाकणारा होता. हे समजण्याच्या परिस्थितीत समीना तेव्हा नव्हत्या.

'मी माझ्या पतीला माझ्या जवळही येऊ देत नव्हते'

मग अशा वेळी त्यांचे पती स्कॉट यांची परिस्थिती कशी होती?

समीना यांनी सांगितलं, "मी खूप आक्रमक झाले होते. ते माझ्या जवळ आले की, मी त्यांना दूर ढकलून द्यायचे. जेव्हा जेव्हा ते माझ्या जवळ यायचे तेव्हा मी घाबरून जायचे."

हळूहळू समीना यांना पुन्हा इंग्रजी भाषा आठवू लागली. रुग्णालयातून घरी सोडण्यात आले खरे, पण त्यांचे मन आणि स्मरणशक्ती अजून पूर्णपणे बरी झाली नव्हती.

त्या म्हणाल्या, "असं वाटत होतं की जणू डोकंच कोणीतरी फोडून टाकलंय"

"त्या सगळ्या विखुरलेल्या गोष्टी पुन्हा एकत्र आणायची जबाबदारी माझीच होती. पण ते किती कठीण काम आहे, हे फक्त ती परिस्थिती अनुभवणारी व्यक्तीच समजू शकते. पुन्हा उभं राहायला शिकणं, चालायला शिकणं, बोलायला शिकणं, आसपासचं जग समजून घ्यायला शिकणं, मला हे सगळं पुन्हा शून्यातून शिकावं लागलं."

समीना यांनी सांगितलं की, त्यावेळी त्यांची अवस्थाही त्यांच्या लहान बाळासारखीच झाली होती. त्या प्रत्येक गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून राहू लागल्या होत्या.

"मी जणू एक लहान बाळच बनले होते. तो खूप भीतीदायक अनुभव होता. मी अक्षरशः प्रत्येक गोष्ट नव्याने शिकत होते. माझं वय 30 वर्षं होतं. तरीसुद्धा जो माझा मुलगा शिकत होता, तेच मीही शिकत होते."

परिणामी त्यांच्या आईच्या वेळेसाठी आणि लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांच्यात आणि इस्माईलमध्ये एक विचित्र प्रकारची स्पर्धा सुरू झाली.

"मला प्रचंड राग यायचा," समीना यांनी सांगितलं.

"मला जगायचं होतं आणि त्यासाठी माझ्या आईची साथ खूप गरजेची होती. जेव्हा त्या मला मदत करू शकत नव्हत्या, तेव्हा माझा स्वतःवरचा ताबा सुटायचा. कधीकधी तर मी एखाद्या जंगली प्राण्यासारखी वागायचे."

समीना यांच्यावर उपचार करणाऱ्या न्यूरोलॉजिस्टना आशा होती की, त्या रुग्णालयातून घरी परतल्या, की ओळखीचे वातावरण पाहून त्यांच्या आठवणी हळूहळू परत येतील. परंतु त्याऐवजी त्यांचं स्वतःचंच घर परकं वाटायला लागलं.

त्यांनी सांगितलं, "माझ्या आजूबाजूला ऐकू येणारा प्रत्येक आवाज मला न समजणारा गोंगाट वाटायचा. असं वाटत होतं की, जणू संपूर्ण जग अचानक रिकामेपणाने भरून गेलं आहे."

लढल्या... आणि पुन्हा उभ्या राहिल्या...

"डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की, माझा मेंदू सामान्य स्थितीत येण्यासाठी एका वर्षापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. तोपर्यंत मला डोकेदुखीचा असह्य त्रास होत राहिला. थोडा वेळसुद्धा काही काम करायची ताकद माझ्यात नव्हती. कोणतीच गोष्ट नीट कळत नव्हती. मला असं वाटायचं की जणू माझा संपूर्ण मेंदू पूर्णपणे बंद पडला आहे . मी ज्या शरीरात राहत होते तेसुद्धा माझं स्वतःचं नाही असं मला वाटायचं."

या लग्नाच्या फोटोकडे त्या कितीतरी वेळा बघायच्या, पण तरीही कोणालाच ओळखू शकत नव्हत्या. त्याच फोटोमुळे एका दिवशी अचानक त्यांना सगळं काही आठवलं.

त्या म्हणाल्या, "एका क्षणात मला सगळं काही परत आठवलं."

"अखेर माझे आयुष्य... माझे घर... सर्व काही पुन्हा आठवले. मला खूप मोठा दिलासा मिळाला. परंतु त्याच क्षणी हेही समजलं की मी किती काही गमावून बसले आहे. मला माझ्या स्वतःच्या शरीरावरच राग आला. असं वाटलं की त्यानेच माझ्याशी विश्वासघात केला आहे."

परंतु, या भयंकर घटनेपूर्वीच्या आयुष्यात पुन्हा परतणं जवळपास अशक्य बनलं होतं. विशेषतः त्यांच्या वैवाहिक आयुष्यात.

समीना यांनी सांगितलं, "मला असं वाटायचं जणू माझा पुनर्जन्म झाला आहे."

"मी जशी जशी बरी होत गेले तसतसं स्कॉटला कळायला लागलं की माझा हा प्रवास मला हळूहळू त्यांच्यापासून दूर घेऊन चाललाय."

त्या वेळी समीना एक कादंबरीही लिहीत होत्या.

त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की, जिथे लिखाण थांबलं होतं, तिथून ते परत सुरू करणं जवळजवळ अशक्यच आहे.

रोज सकाळी त्या कॉम्प्युटरसमोर बसायच्या. स्वतःच लिहिलेली वाक्यं वाचायच्या, पण त्याचा अर्थसुद्धा त्यांना कळायचा नाही. असं वाटायचं की जणू त्यांचंच डोकं/मेंदू त्यांच्याशी गद्दारी करत आहे. तरीसुद्धा समीना यांनी हार मानली नाही.

त्या म्हणाल्या, "मी लिहायचं सोडलं नाही, कारण तीच एक गोष्ट मला जिवंत ठेवत होती. हिंमत म्हणजे नक्की काय असतं, हे मला तेव्हा खऱ्या अर्थाने कळलं. आयुष्य आपल्याला उद्ध्वस्त करते, आपण जमिनीवर कोसळतो. पण परत उभं राहायचं की नाही, हा निर्णय शेवटी आपलाच असतो."

पाच वर्षांनंतर समीना यांनी त्यांची पुरस्कार मिळालेली कादंबरी 'मद्रास ऑन रेनी डेज' प्रकाशित केली.

हे पुस्तक पब्लिश होणं त्यांच्या पूर्णपणे बरं होण्याच्या प्रवासातला एक खूप मोठा टप्पा ठरला. यासोबतच मुलगा इस्माईल याच्यासोबतचं नातंही त्यांनी एका नव्या दृष्टिकोनातून समजून घेण्यास सुरुवात केली.

त्यांनी सांगितलं, "माझ्या आयुष्यातील आठवणी परत आल्यानंतर मला त्याच्यासोबत एका खूप घट्ट आणि मजबूत नात्याचा अनुभव आला."

"तो जेव्हा लहान होता आणि बोलायचा प्रयत्न करायचा तेव्हा मला कळायचं की ते किती कठीण असतं. जेव्हा चालायला शिकताना तो पडायचा तेव्हा ते दुखणं मलाही जाणवायचं. एक वेळ अशी होती जेव्हा मला त्याचा राग यायचा किंवा तो आवडायचा नाही. पण हळूहळू त्याच भावनेचं रूपांतर खूप तीव्र प्रेमात झालं. आजही आमच्या दोघांमध्ये तेच घट्ट आणि जिव्हाळ्याचं नातं कायम आहे."

या घटनेला आज जवळजवळ तीन दशकं (30 वर्षं) उलटून गेली आहेत. इस्माईलच्या जन्मानंतर दहा वर्षांनी समीना यांनी एका मुलीलाही जन्म दिला. आज जेव्हा त्या मागचा काळ आठवून बघतात तेव्हा हे स्पष्ट दिसतं की त्या फक्त परत उभ्याच राहिल्या नाहीत, तर त्यांनी ती हिंमत आयुष्यभर कायम जपून ठेवली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)