You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
MPSC : 'आम्ही शेतकऱ्यांची लेकरं, नाईलाजानं रस्त्यावर उतरावं लागतंय'; विद्यार्थ्यांच्या मागण्या काय?
"आम्ही गेले चार ते पाच वर्षांपासून MPSC ची तयारी करतो. आणि आम्ही इतकी वर्षे आयोगावर विश्वास ठेवत आलो आहोत आणि तेच जर आमच्यासोबत अशा प्रकारचा अन्याय करत असतील, पेपर फोडला जात असेल, तर हा आमच्यावरचा अन्याय आहे. याच्यावरती आयोगाला उत्तर देणं गरजेचंच आहे. ऑफिसमधूनच पेपर फुटत असेल तर याला आयोग जबाबदार नाही, असं म्हणता येईल का?"
"विद्यार्थ्यांनी पेपर फोडलेला नाहीये, पेपर तर आयोगानं फोडलाय ना? नितीमत्ता ठेवून यांनी जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. आम्ही आमचे हक्क मागतोय, बाकी काहीच मागत नाहीये. आम्ही गोरगरीब शेतकऱ्यांची कष्ट करणारी लेकरं आहोत. पण नाईलाजानं आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतंय."
MPSC परीक्षेची तयारी करण्याऱ्या मुली छत्रपती संभाजीनगरमधील आंदोलनामध्ये पोटतिडकीने बोलत होत्या.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात ठिकठिकाणी MPSC विद्यार्थी आंदोलनं करत आहेत.
7 सप्टेंबरला पुण्यात, 8 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये तर आज (9 सप्टेंबर) नागपूर आणि नाशिकमध्ये होत आहे.
या आंदोलनांच्या माध्यमातून MPSC च्या कथित पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि सरकारवर रोष व्यक्त केला आहे.
'सरकारने तरीही दुर्लक्ष केलं तर हा आक्रोश आणखी वाढेल'
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
त्यांनी आपल्या फेसबुकवर म्हटलंय की, "आतातरी सरकारने MPSC चे अध्यक्ष आणि सचिवांना पदावरून हटवावं आणि पेपरफुटीप्रकरणात अटक झालेल्या आरोपींच्या कार्यकाळात झालेल्या सर्व परीक्षांची सखोल चौकशी करावी. अन्यथा आज दिसत असलेला विद्यार्थ्यांचा आक्रोश हळूहळू रोषात रुपांतरीत होईल आणि ते सरकारला परवडणार नाही. त्यामुळं सरकारने एमपीएससीच्या परीक्षेत भ्रष्टाचाराची भेसळ करणाऱ्यांना तातडीने खड्यासारखं बाजूला सारून तिथं स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी आणि त्यांच्या इतरही मागण्यांकडं लक्ष द्यावं."
पुढे त्यांनी म्हटलंय की, "महत्त्वाचं म्हणजे राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांचे असे विराट मोर्चे निघत आहेत. आता लिहून दिलेला मजकूर कॉपी करुन ट्विट करणारे भाजपाचे नेते आणि 40 पैसे कमेंटवर पोट भरणारे बाजारू मोर्चातील या सामान्य परिवारातील मुलांच्या आक्रोशालाही नौटंकी म्हणणार का?
"मी कालच बोलताना स्पष्ट केलं की, विद्यार्थ्यांचा हा आक्रोश पुण्यापुरता मर्यादित राहणार नाही तर प्रत्येक जिल्ह्यात तो दिसेल आणि आज लगेचच तो छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसला. सरकारने तरीही दुर्लक्ष केलं तर हा आक्रोश थांबेल असं नाही तर यापुढं तो प्रत्येक जिल्ह्यात दिसल्याशिवाय राहणार नाही."
काय आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या?
विद्यार्थ्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आयोगाच्या कार्यपद्धतीविषयी मोठी नाराजी आणि अविश्वासाची भावना निर्माण झाली आहे."
विद्यार्थ्यांच्या मागण्या -
- आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेऊन त्यांची उच्चस्थरीय चौकशी करावी.
- मुंबई क्राईम ब्रँच यांनी आयोगाला सुपुर्द केलेला प्राथमिक चौकशी अहवाल सार्वजनिक करण्यात यावा.
- तपासाची विश्वासार्हता टिकवण्यासाठी तपासातील महत्त्वाच्या घडामोडी आणि निष्कर्ष वेळोवेळी सार्वजनिक करण्यात यावेत.
- MPSC मार्फत घेण्यात आलेल्या इतर काही परीक्षांच्या निकालांबाबत विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेल्या शंकांची दखल घेऊन त्या परीक्षांचीही स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात यावी.
- गट ब परीक्षेच्या बाबतीत जे काही आक्षेप असतील त्यावर 8 दिवसाच्या आज MPSC ने स्पष्टीकरण द्यावे व काही गैरप्रकार झाला आहे का, याची चौकशी करावी
- राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025, कृषिसेव परीक्षा, यांच्यासारख्या वर्णनात्मक पेपर तपासणीत मानवी चुका निदर्शनास येत आहेत त्याची चौकशी करावी.
- उत्पादन शुल्क (विभागीय) परीक्षा तसेच पोलीस उपनिरीक्षक (विभागीय) परीक्षेतील गैरप्रकाराचा तपास करून दोषींवर कारवाई करावी.
यांसह, राज्यभर कार्यरत असल्याचा संशय असलेल्या पेपर विक्रीच्या एजंट नेटवर्कचा, आणि त्याच्याशी संबंधित सर्व व्यक्तींचा, आर्थिक व्यवहार, कॉल रेकॉर्ड, डिजिटल पुरावे आणि संपर्क साखळीचा विशेष तपास करण्यात यावा, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
MPSC पेपरफुटी प्रकरणावर आयोगाचे अध्यक्ष काय म्हणाले?
MPSC पेपरफुटी प्रकरणावर आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी आयोगाची जबाबदारी पूर्ण पारदर्शकता, निष्पक्षता आणि सचोटीने पार पाडण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असं म्हणत स्पष्टीकरण दिलंय.
त्यांनी म्हटलंय की, "महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या संदर्भात माझ्याविरोधात काही वैयक्तिक आरोप करण्यात येत असून, माझ्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर काही वस्तुस्थिती जनतेसमोर स्पष्ट करणे मला आवश्यक वाटते."
"औषध निरीक्षक परीक्षेशी संबंधित प्रश्नपत्रिका फुटीची घटना जानेवारी 2026 मध्ये घडल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने यासंदर्भात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. भविष्यात अशाप्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व सुरक्षा उपाय सुचविण्याकरिता आयोगाने अंतर्गत उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. तसेच, एकूणच परीक्षा प्रक्रियेत आवश्यक समग्र सुधारणा सुचविण्यासाठी शासनानेही उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे," असंही त्यांनी म्हटलंय.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)