You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
होर्मुझमध्ये अमेरिका-इराण यांच्यात पुन्हा हल्ले सुरू, सौदीवर हूतींचे हल्ले: भारताच्या अडचणी का वाढू शकतात?
होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा एकदा अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. त्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती जवळपास 100 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत.
अमेरिकेने मंगळवारी इराणी तेलवाहू टँकरांवर हल्ले केले आणि हूती बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य केले.
मध्य पूर्वेत सुरू झालेला हा नवा संघर्ष गंभीर स्वरूपाचा मानला जातोय.
पर्शियन गल्फमधील अमेरिका-इराण संघर्ष आणि येमेनमध्ये सौदी अरेबिया व हूती यांच्यातही संघर्ष सुरू आहे. तसेच, रशिया-युक्रेन युद्धही सुरूच आहे, त्याचा परिणाम देखील कच्च्या तेलाच्या किमतीवर झाला आहे.
अमेरिकेच्या सेंटकॉमने म्हटले आहे की, 'अमेरिकन सैन्याने इराणच्या कच्च्या तेलाचे पाच टँकर नष्ट केले. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोरने (IRGC) गेल्या दोन दिवसांत दोन वेळा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या मदतीने अमेरिकेच्या युद्धनौकेला लक्ष्य केल्याच्या प्रत्युत्तरात ही कारवाई करण्यात आली.'
या संघर्षानंतर कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या. आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट सोमवारी बंद झाल्याच्या किमतीनुसार 2.4 टक्क्यांनी वाढून 99.34 डॉलर प्रति बॅरल झाला.
मंगळवारी सकाळी बाजारातील किमतीत 1.5 टक्क्यांनी वाढ झाली आणि कच्च्या तेलाच्या प्रति बॅरलची किंमत 99.44 डॉलर इतकी झाली.
अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे ऑगस्टच्या शेवटीपासून तेलाच्या किमतीत वाढ होत आहे. जूनमध्ये दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारामुळे काही काळासाठी संघर्ष कमी झाला होता.
याआधी, एप्रिलच्या शेवटी ब्रेंटची किंमत प्रति बॅरल 126 डॉलर इतकी झाली होती. जुलैमध्ये ही किंमत कमी होऊन प्रति बॅरल 70 डॉलर इतकी झाली होती.
भारताच्या अडचणी वाढू शकतात
कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढीमुळे भारताचा आयात खर्च वाढेल आणि भारतीय अर्थव्यवस्थेला याचा भार घेणं सोपं ठरणार नाही. भारत आपल्या आवश्यकतेच्या 90 टक्के तेल आयात करतो.
अशा वेळी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होणे म्हणजे भारताला त्याच प्रमाणात तेल खरेदी करण्यासाठी जास्त डॉलर्स खर्च करावे लागतील.
कच्च्या तेलाची सर्वाधिक आयात करणाऱ्या देशांमध्ये भारताचा जगात तिसरा क्रमांक आहे. आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीतील चढ-उताराचा परिणाम भारतावर थेट होतो.
तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ झाल्यामुळे भारताला जास्त डॉलर्स मोजावे लागतील. त्याचवेळी, व्यापार संतुलन तसेच रुपयाच्या किमतीवर देखील दबाव पडेल.
कच्च्या तेलाच्या किमतीचा परिणाम इंधन, वाहतूक आणि ऊर्जेशी संबंधित अन्य गुंतवणुकीवर पडतो. त्यामुळे याचा परिणाम अंतर्गत महागाईवर पडू शकतो.
सध्या रिटेल पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गेल्या तीन महिन्यांपासून स्थिर आहेत. गेल्या वेळी 25 मे रोजी किमतीत बदल करण्यात आला होता. त्यावेळी पेट्रोल 2.61 प्रति लीटर आणि डिझेल 2.71 रुपये प्रति लीटरने महाग करण्यात आले होते.
कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढीमुळे इंडियन ऑइल कार्पोरेशन, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड सारख्या कंपन्यांच्या मार्जिनवर ताण पडू शकतो.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, पश्चिम आशियातील संकटानंतर तेलाच्या वाढत्या किमतीचा भार पूर्णपणे ग्राहकांवर न टाकता आल्यामुळे त्या आधीच अडचणीत आहेत.
एकमेकांवर हल्ले सुरू
इराण समर्थित बंडखोर मध्य पूर्वेतील एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चरला लक्ष्य बनवत आहेत. यामुळे पुरवठ्याचे संकट अधिक बिकट झाले आहे.
यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत महागाई वाढली आणि ग्लोबल शेअर मार्केटमध्ये सेल ऑफ देखील वाढले आहे.
सेंटकॉमनुसार ज्या ऑइल टँकरवर हल्ला झाला ते इराणच्या शॅडो नेटवर्कचा भाग होते. जे आयआरजीसी आणि स्थानिक सहकाऱ्यांना निधी पुरवत असत.
हल्ल्यांच्या आधी टँकरच्या चालकांना जहाज सोडण्यासाठी सांगितले होते. या जहाजांना इराणचे प्रमुख तेल निर्यात केंद्र खार्ग बेटांजवळ लक्ष्य करण्यात आले.
सेंटकॉमने म्हटले की ज्या अमेरिकन युद्धनौकेला इराणच्या बॅलेस्टिक मिसाइल्सने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला त्याला कुठलीही हानी पोहोचली नाही. त्यातील कोणताही अमेरिकन कर्मचारी जखमी झाला नाही.
अमेरिकेनी गेल्या चार दिवसांत इराणच्या आठ तेल टँकरवर हल्ले केले.
शनिवारी अमेरिकेनी म्हटले होते की त्यांनी इराणच्या तीन कच्च्या ऑइलच्या टँकरला लक्ष्य बनवले आहे.
तर इराणने अमेरिकेच्या दोन युद्धनौकांवर मिसाइल फायर केले होते. सेंटकॉमने सांगितले की एक जहाज आणि गायडेड मिसाइल डिस्ट्रॉयरने आयआरजीसीचा हल्ला चुकवला होता.
अमेरिकेच्या जहाजांवर हल्ला केल्याचा IRGCचा दावा
इराण रिव्होल्युशनरी गार्ड्स कोरने आपल्या ताज्या निवेदनात म्हटले आहे की त्यांनी अमेरिकेच्या दोन जहाजांवर आणि आठ तेल टँकरवर हल्ला केला.
बीबीसी पर्शियननुसार, आयआरजीसीने गेल्या काही तासांमध्ये जॉर्डन आणि बहारीन येथील अमेरिकन तळांवर मिसाइल हल्ले करण्यात आले आहेत. त्यांनी सांगितले की इराणच्या पाच तेल टँकरवर हल्ला करण्याच्या प्रत्युत्तरात हे हल्ले करण्यात आले आहे.
या निवेदनात आयआरजीसीने म्हटले आहे की त्यांनी 10 अशा जहाजांवर हल्ले केले के परवानगीशिवाय होर्मुझ सामुद्रधुनीतून निघण्याचा प्रयत्न करत होते.
या रिपोर्ट्सची स्वतंत्र स्रोतांकडून पडताळणी करण्यात आलेली नाही.
याआधी मंगळवारी आपल्या घोषणेत सेंटकॉमने म्हटले की त्यांनी पाच इराणी टँकर लक्ष्य केले होते. अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर त्याच्या प्रत्युत्तरात हा हल्ला करण्यात आला.
हैदराबाद येथील इराणी कॉन्सुलेटने 'एक्स'वरील नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, इराणी तेलवाहू टँकर आणि जहाजांविरोधात दहशतवादी सैन्याच्या आक्रमक कारवाया आणि शत्रुत्वपूर्ण कृत्यांना प्रत्युत्तर म्हणून आयआरजीसीच्या शक्तिशाली एअरोस्पेस फोर्सने" ही कारवाई केली आहे.
पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे, "आक्रमण करणाऱ्यांना शिक्षा देण्याच्या मोहिमेअंतर्गत डीडीजी-119 आणि डीडीजी-53 या युद्धनौकांवर शक्तिशाली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला. या युद्धनौकांवर क्रूझ मिसाइल्स आणि एजिस यंत्रणा तैनात आहेत. या हल्ल्यात जहाजांचे मोठे नुकसान झाले."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)