You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'कॉक्रोच आहोत, असंच जाणार नाही,' प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दिपके यांनी दिली अशी प्रतिक्रिया
NEET-UG प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलकांनी जल्लोष केला.
"वी हॅव डन इट, वी हॅव डन इट," अशा घोषणा देत कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) अभिजित दिपके यांनी हा आंदोलनाचा पहिला विजय असल्याचं म्हटलं.
मात्र, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि 20 जुलैच्या पोलिसांच्या कारवाईबाबत कारवाई या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
'इथून असंच जाणार नाही'
धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावरून आपल्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर जंतर-मंतरवरील आंदोलनस्थळी आनंदाचं वातावरण निर्माण झालं. राजीनाम्याची माहिती मिळताच आंदोलकांनी घोषणा देत जल्लोष केला.
आंदोलकांना संबोधित करण्यापूर्वी अभिजित दिपके यांनी NEET प्रकरणाशी संबंधित आत्महत्या केलेल्या 21 विद्यार्थ्यांचे फोटो दाखवत सर्वांना दोन मिनिटं स्तब्ध उभं राहण्याचं आवाहन केलं. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे या विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्याचं त्यांनी म्हटलं.
"जर तुम्ही सरकारसमोर झुकलात नाही, त्यांना घाबरलात नाही, तर मोठमोठ्या लोकांचेही राजीनामे घेतले जाऊ शकतात. हा त्याचा पुरावा आहे. ही लोकशाही आहे, घाबरण्याची गरज नाही," असं दिपके म्हणाले.
"धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तर झाला आहे. पण आमच्या आणखी दोन प्रमुख मागण्या आहेत. आम्ही येथून असंच जाणार नाही. कॉक्रोच आहोत, एकदा घुसलं की असंच जाणार नाही."
"लोकशाहीत बोलण्याची भीती वाटत असेल तर ती लोकशाहीच कशी? आपण आवाज उठवला तरच सत्ताधारी जबाबदारीने वागतील. ते स्वतःला राजा समजत असतील, पण ते जनतेमुळेच त्या खुर्चीवर बसले आहेत," असंही त्यांनी म्हटलं.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं स्वागत करतानाच सीजेपीच्या इतर मागण्या अद्याप प्रलंबित असल्याचं दिपके यांनी सांगितलं. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी पुन्हा केली.
तसंच, 20 जुलै रोजी आंदोलनादरम्यान झालेल्या कारवाईबाबत संबंधित पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. "एक राजीनामा झाला आहे. आता कॉक्रोचशी पंगा घ्यायचा नाही," असं म्हणत त्यांनी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संकेत दिले.
मला मागील एक महिन्यांपासून मोठमोठे राजकारणी, प्रसारमाध्यमांतील मोठी लोकं तू हे काय करत आहेस, कधीपर्यंत असं बसशील, हे लोकं राजीनामे देणार नाहीत, हे खूपच निर्दयी सरकार आहे, हे सरकार कोणाचंच ऐकत नाही, आपली मनमानी करतात, असं म्हणत होते.
या देशातील विद्यार्थ्यांनी खूप धाडसाचं काम केलं आहे. लाठ्या खाल्ल्या, डोकं फोडून घेतलं. 20 जुलैपासून जेवढ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत, ते सर्वच्या सर्व मागे घेतले गेले पाहिजेत.
ही लोकशाही आहे. भारताच्या नागरिकांचे आम्ही आभारी आहोत.
दिल्ली पोलिसांवर संताप
अभिजित दिपके यांनी यावेळी भाजप आणि पोलिसांवर टीका केली. पोलीस आणि भाजपचे गुंड हे आंदोलन विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
20 जुलैच्या कारवाईनंतर त्यांचं मन भरलेलं नाही. आज पुन्हा मुलांना मारायचं आहे का, असा सवाल त्यांनी केला.
पोलिसांनी आधीच यावर आपण नियमाप्रमाणे कारवाई करत असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच शनिवारीही पोलिसांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली.
शांततेत होणारे आंदोलन हीच आपली ताकद आहे. आपण इथेच असंच शांत राहणार आहोत. आपल्याला कायदा सुव्यवस्था राखायची आहे, असं आवाहन त्यांनी आंदोलकांना केलं.
'मला हिरो करू नका'
अभिजित दिपके यांनी पंतप्रधान मोदी यांना उद्देशून म्हटलं की, "सुबह हो गयी मामू...लोकशाहीची सकाळ झाली आहे. देशातील जनता जागी झाली आहे. ही पहिली विकेट आहे. आता तर केवळ सुरूवात झाली आहे."
दिपके यांनी विद्यार्थ्यांच्या हिमतीला सलाम केला. ते म्हणाले, "मी त्या सर्व कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांना सलाम करतो. उन्हा-तान्हात, पावसात ते इथे बसले होते. पोलिसांनी पाणी बंद केलं गेलं, जेवण बंद केलं, तुमची हिंमत तोडण्याचा प्रयत्न केला गेला. पण तरीही तुम्ही तिथे बसलात. तुम्हाला सलाम."
अभिजित दिपके यांनी मला हिरो बनवू नका, असं म्हटलं. ते म्हणाले की, "एका व्यक्तीलाच हिरो बनवण्याच्या नादात देशाची अवस्था वाईट करून टाकली आहे. एका व्यक्तीला संविधानापेक्षा मोठं केलं. जेव्हा एका व्यक्तीला संस्थांपेक्षा, संविधानापेक्षा मोठं केलं जातं, तेव्हा देशाचा 'कबाडा' (भंगार) होतो," असं त्यांनी म्हटलं.
अभिजित दिपके यांनी यावेळी सर्वांना आपापल्या राज्यात, जिल्ह्यात ज्या नीटच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्यासाठी कँडल मार्च काढण्याचं आवाहन केलं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन