'गायीचं हृदय, यकृत आणि मध...'; जगप्रसिद्ध फुटबॉलपटूच्या व्यक्तिमत्त्वाची 5 खास वैशिष्ट्ये

अर्लिंग हालंड

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, डॅरिओ ब्रुक्स
    • Role, बीबीसी न्यूज मुंडो
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

नॉर्वेच्या संघाने शेवटचा फुटबॉलचा विश्वचषक 1998 मध्ये खेळला होता. विशेष म्हणजे, त्या वेळी अर्लिंग हालंड या खेळाडूचा जन्मही झाला नव्हता.

परंतु, आता हीच नॉर्वेची टीम 5 वेळा विश्वविजेता ठरलेल्या ब्राझीलचा पराभव करून विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली. या सामन्यात अर्लिंग हालंडने 2 गोल करत जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.

1.94 मीटर उंचीचा अर्लिंग हालंड सध्या या स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूच्या पुरस्कारासाठी अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी आणि फ्रान्सचा स्टार फुटबॉलर किलियन एम्बाप्पे यांच्याशी स्पर्धा करत आहे.

सेनेगलविरुद्ध 2 गोल केल्यानंतर हालंड हसत म्हणाला, "मलाही माहिती नाही, मला वाटतं गोल करणं हीच माझी खासियत आहे. ते माझ्याकडून अगदी सहज घडतं."

नॉर्वेच्या संघाने पहिल्यांदाच विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करून इतिहास रचला आहे. आता 12 जुलैला इंग्लंडला पराभूत करून संघ उपांत्य फेरीत पोहोचला, तर तो नॉर्वेसाठी आणखी एक मोठा विक्रम ठरेल.

आता नॉर्वेच्या सर्व आशा पुन्हा एकदा अर्लिंग हालंडवर आहेत. त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती नसलेल्या 5 रंजक गोष्टी जाणून घेऊया.

1. हालंडचा जन्म नॉर्वेत नाही, तर ब्रिटनमध्ये

हालंडचा जन्म 2000 साली ब्रिटनमधील लीड्स शहरात झाला. त्याचे वडील आल्फ-इंगे हालंड हे नॉर्वेच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाकडून खेळले होते.

त्यांनी 1994 मध्ये अमेरिकेत झालेल्या फुटबॉल विश्वचषकात नॉर्वेचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यावेळी ते इंग्लंडच्या लीड्स युनायटेड या क्लबकडून फुटबॉल खेळत होते.

अर्लिंग हालंड 4 वर्षांचा असताना त्याचे कुटुंब नॉर्वेच्या दक्षिण भागातील त्यांच्या मूळ गाव ब्रायने येथे परतले.

तिथेच हालंडने लहान वयात फुटबॉल खेळायला सुरुवात केली. त्याचबरोबर तो लांब उडी आणि सायकलिंगसारख्या इतर खेळांमध्येही सहभागी होत असत.

हालंडने वयाच्या 16 व्या वर्षी नॉर्वेच्या ब्रायने एफके या फुटबॉल क्लबकडून खेळण्यास सुरुवात केली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हालंडने वयाच्या 16 व्या वर्षी नॉर्वेच्या ब्रायने एफके या फुटबॉल क्लबकडून खेळण्यास सुरुवात केली.

"अर्लिंग 5 वर्षांचा असताना मी त्याला पहिल्यांदा पाहिलं होतं. त्यावेळी तो स्वतःपेक्षा एक वर्षांनी मोठ्या मुलांसोबत इनडोअर सराव करत होता," असे प्रशिक्षक आल्फ इंग्वे बर्न्टसन यांनी 'गोल' या वेबसाइटला सांगितले.

"त्याने पहिल्यांदा चेंडूला दोनदा स्पर्श केला आणि दोन्ही वेळा त्याचे गोलमध्ये रूपांतर झाले. यापूर्वी तो कोणत्याही क्लबकडून खेळला नव्हता, तरीही पहिल्याच दिवसापासून त्याच्यात जबरदस्त फुटबॉल कौशल्य असल्याचे दिसून आले."

"इतर खेळाडूंपेक्षा तो 1 वर्षांनी लहान असल्यामुळे सुरुवातीला त्याची उंची थोडी कमी होती. परंतु, समोरचे खेळाडू उंच असूनही तो सातत्याने गोल करत असत. तो 11-12 वर्षांचा असतानाच भविष्यात मोठा खेळाडू बनेल, हे आम्हाला लक्षात आलं होतं. त्याच्यात राष्ट्रीय संघासाठी खेळण्याची क्षमता आहे, हेही तेव्हाच आम्हाला समजलं होतं," असे बर्न्टसन यांनी नमूद केलं.

वयाच्या 15व्या वर्षी हालंडने नॉर्वेच्या ब्राइने एफके या फुटबॉल क्लबकडून खेळण्यास सुरुवात केली.

त्याच्या गोल करण्याच्या असाधारण क्षमतेमुळे हालंडला नॉर्वेच्या मोल्डे एफके या क्लबमध्ये खेळण्याची संधी मिळाली.

या क्लबचे प्रशिक्षक प्रसिद्ध माजी फुटबॉलपटू ओले गुन्नार सोल्शर होते. त्यांना हालंडच्या फुटबॉल कारकिर्दीतील महत्त्वाच्या मार्गदर्शकांपैकी एक मानले जातात.

ऑस्ट्रियाच्या रेड बुल साल्झबर्ग या क्लबकडून खेळताना हालंडची जगभरात चर्चा होऊ लागली. त्यानंतर हालंडने जर्मनीच्या बोरुसिया डॉर्टमंड या क्लबमध्ये आपलं स्थान मजबूत केलं.

आज तो ब्रिटनच्या मँचेस्टर सिटी क्लबचा सर्वात महत्त्वाचा आणि स्टार खेळाडू आहे.

2. नॉर्वेच्या संघासाठी गोलचा वर्षाव करणारा खेळाडू

या विश्वचषकात हालंडवर केवळ नॉर्वेच्या नागरिकांच्याच अपेक्षा नाही, तर या स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न पूर्ण करू न शकलेल्या नॉर्वेच्या माजी खेळाडूंच्या अपेक्षांचंही मोठं ओझं आहे. हा सर्व विश्वास तो आपल्या खांद्यावर घेऊन खेळताना दिसतो.

1994 आणि 1998 मधील सलग 2 विश्वचषक स्पर्धांसाठी पात्र ठरल्यानंतर नॉर्वेला मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याची संधीच मिळाली नाही.

अर्लिंग हालंड

फोटो स्रोत, Getty Images

त्यानंतर बराच काळ त्यांचा संघ अशा स्पर्धांपासून दूर राहिला. त्यांनी शेवटची मोठी स्पर्धा 'युरो 2000' खेळली होती.

परंतु, आता नॉर्वेकडे एक मोठा स्टार खेळाडू आहे. गेल्या काही काळात त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे.

हालंडने आपल्या मागील 14 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रत्येक सामन्यांत गोल केला आहे. या काळात त्याने एकूण 27 गोल केले आहेत.

हालंडने आतापर्यंत एकूण 54 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तब्बल 62 गोल केले आहेत. म्हणजेच त्याने सरासरी प्रत्येक 71 मिनिटांनी एक गोल करत जबरदस्त कामगिरी नोंदवली आहे.

3. हालंडचा आश्चर्यकारक आहार

मैदानाबाहेर, हॉलंड आपल्या जीवनशैलीबद्दल आणि आहाराबद्दलची माहिती सोशल मीडियावर नियमितपणे शेअर करत असतो.

हा युवा खेळाडू दररोज सुमारे 6 हजार कॅलरीजचा आहार घेतो. त्याच्या आहारात प्रथिनांसाठी गायीचे (बीफ) हृदय, यकृत (लिव्हर), प्रक्रिया न केलेलं म्हणजे कच्चं मध आणि दूध यांचा समावेश असतो.

"सर्वोत्तम खेळाडू बनण्यासाठी जे काही शक्य आहे, ते सर्व करण्याचा प्रयत्न मी करतो," असे या युवा खेळाडूने एका व्हीडिओमध्ये म्हटले आहे.

हालंडला नेहमी काळजीपूर्वक निवडलेले आणि उच्च कॅलरी असलेले पदार्थ खाण्याची सवय आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हालंडला नेहमी काळजीपूर्वक निवडलेले आणि उच्च कॅलरी असलेले पदार्थ खाण्याची सवय आहे.

याशिवाय, तो रात्री सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करतो आणि दररोज किमान 10 तासांची झोप घेण्याचा नियमही काटेकोरपणे पाळतो.

परंतु, ही त्याच्यासाठी काही नवीन गोष्ट नाही. ऑस्ट्रियाच्या रेड बुल साल्झबर्ग क्लबमध्ये खेळत असतानाच, अगदी लहान वयातही त्याने फिटनेस आणि स्वतःची कामगिरी सुधारण्यासाठी घेतलेली मेहनत पाहून त्याचे सहकारी खेळाडूही आश्चर्यचकित झाले होते.

"तो खूप शिस्तप्रिय आणि व्यावसायिक खेळाडू आहे. आम्ही प्रवासात पत्ते खेळत असताना तो झोपलेला असायचा किंवा आहार आणखी चांगला कसा सुधारता येईल, याबद्दलचे वैज्ञानिक लेख वाचत असत."

"स्वतःची कामगिरी आणखी कशी सुधारता येईल, याचाच तो नेहमी विचार करत असत," असे त्याचा माजी सहकारी खेळाडू मॅक्सिमिलियन व्होबरने डीएझेडएन वाहिनीला सांगितले.

4. ब्रॉट आडनावाचा अभिमान

हालंडचा जन्म इंग्लंडमधील लीड्स येथे झाला असल्यामुळे त्याला इंग्लंडकडून खेळण्याची संधी होती. त्यामुळे युरोप आणि जगातील सर्वोच्च फुटबॉल स्पर्धांमध्ये खेळणं त्याच्यासाठी सोपं झालं असतं. पण, त्याने असा कधी विचार केला नाही.

"जागतिक दर्जाचा स्टार खेळाडू असूनही हालंड आजही तसाच साधा आणि जमिनीवर राहणारा आहे," असे नॉर्वेचे क्रीडा पत्रकार आंद्रियास कोर्सुंड यांनी बीबीसी स्पोर्ट्सला सांगितलं.

"त्याला आपल्या पार्श्वभूमीची चांगली जाणीव आहे. तो नेहमी आपल्या रोगालँडमधील छोट्या गावाला भेट देत असतो. आपल्या मुळांचा त्याला खूप अभिमान आहे. त्याचबरोबर, राष्ट्रीय संघाकडून खेळताना तो नेहमी नॉर्वेजियन माध्यमांनाच आधी प्राधान्य देतो."

2026 च्या विश्वचषकासाठी हालंडने आपल्या जर्सीवर 'ब्रॉट' हे आडनाव लावण्याचा निर्णय घेतला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2026 च्या विश्वचषकासाठी हालंडने आपल्या जर्सीवर 'ब्रॉट' हे आडनाव लावण्याचा निर्णय घेतला.

नॉर्वेच्या वायकिंग इतिहासातून प्रेरणा घेणाऱ्या आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्याचा हालंडला खूप अभिमान आहे.

आपल्या मुळांशी असलेल्या या नात्यामुळेच हालंडने आपल्या राष्ट्रीय संघाच्या जर्सीवर 'ब्रॉट हालंड' हे पूर्ण नाव लिहिण्याचा निर्णय घेतला.

'ब्रॉट' हे त्याच्या आईचं माहेरचं आडनाव आहे. नॉर्वेमध्ये आई आणि वडिलांचे दोन्ही आडनाव वापरण्याची परंपरा आहे.

"हालंड हा नॉर्वेसाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे," असे कोर्सुंड सांगतात.

"आज जगातील सर्वात लोकप्रिय खेळात हालंडने मोठं नाव कमावलं आहे. केवळ 55 लाखांहून थोडी जास्त लोकसंख्या असलेल्या नॉर्वेसारख्या देशातून जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमधील एक खेळाडू घडणं, ही खरोखरच एक अभूतपूर्व अशी गोष्ट आहे."

5. इतरांपेक्षा वेगळा हालंड

1.95 मीटर उंची आणि लांब सोनेरी केसांमुळे हालंड हा फुटबॉल विश्वातील सहज ओळखता येणाऱ्या खेळाडूंपैकी एक बनला आहे.

मँचेस्टर सिटीकडून खेळायला लागल्यानंतर हालंडचे आकर्षक व्यक्तिमत्त्व अधिक खुलून निघाले. त्याचबरोबर, खास ब्रिटिश शैलीतील विनोदी स्वभावामुळे त्याने चाहत्यांच्या मनात घर निर्माण केलं आहे.

हालंड आपल्या यूट्यूब चॅनेलवर नियमित व्हीडिओ पोस्ट करत असतो. तसेच, 'विकविन्स' या ॲनिमेशन चित्रपटात 'हालंड' नावाच्या वायकिंग पात्राला त्याने आपला आवाजही दिला आहे.

"माझ्या मते, अर्लिंग हा सर्वसामान्य नॉर्वेजियन लोकांसारखा नाही," असे नॉर्वेचे पत्रकार लार्स सिव्हर्टसन म्हणाले.

अर्लिंग हालंड

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ते पुढे म्हणाले, "तो खूप आत्मविश्वासू आहे आणि कधीकधी थोडा उर्मटही वाटतो. त्याला स्वतःची किंमत आणि क्षमता चांगली माहीत आहे. त्यामुळे त्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे."

"स्कँडिनेव्हियन संस्कृतीत नम्रतेला खूप महत्त्व दिलं जातं. पण अर्लिंग हालंडला बेंचवर बसवलं तर तो त्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त करतो. ही बाब त्याला इतर नॉर्वेजियन लोकांपेक्षा थोडी वेगळी ठरवते... आणि नेमकी हीच गोष्ट त्याला आमच्यासाठी अधिक रंजक हिरो बनवते," असंही ते नमूद करतात.

त्याच्या वाढत्या लोकप्रियतेसोबत सुपरस्टारपदाचे इतर फायदेही समोर आले आहेत. त्याच्या जर्सीची विक्री वाढली आहे, विश्वचषकाबद्दल लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे आणि तो युवा पिढीसाठी मोठी प्रेरणा ठरला आहे.

सिव्हर्टसन म्हणतात, "आपल्या देशातील इतर क्रीडा नायकांपेक्षा हालंड आता खूप मोठा जागतिक स्टार झाला आहे."

"तरीही, आपल्या देशातील एक खेळाडू मैदानावर इतकी असाधारण कामगिरी करत आहे, याचा नॉर्वेच्या लोकांना प्रचंड अभिमानही आहे," असे सिव्हर्टसन सांगतात.

(अतिरिक्त माहिती: जेस अँडरसन आणि अद्वैत राजन, बीबीसी स्पोर्ट्स.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)