वायकिंग्ज : कोलंबसच्या 500 वर्षे आधी अमेरिकेत पोहोचण्याच्या त्यांच्या प्रवासाची रंजक गाथा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, फिओना मॅकडोनाल्ड
- Role, बीबीसी कल्चर
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
नॉर्स म्हणजेच वायकिंग्ज हे लोक साधारण 1 हजार वर्षांपूर्वी कॅनडात पोहोचले होते. उत्तर अमेरिकेत पुढील शोधमोहीमेसाठी त्यांनी तळ म्हणून कॅनडाचा वापर केला.
अटलांटिक महासागर ओलांडून अमेरिकेत पोहोचलेल्या पहिल्या युरोपीय लोकांचा हा 'विस्मृतीत गेलेला इतिहास' बीबीसीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
ख्रिस्तोफर कोलंबसने 1492 मध्ये समुद्रप्रवास केला आणि त्याच वर्षी 12 ऑक्टोबर रोजी तो बहामास बेटांवर पोहोचला.
परंतु, आज आपण ज्या प्रदेशाला अमेरिका (खंड) म्हणतो, तिथे पोहोचणारा तो पहिला युरोपीय व्यक्ती नव्हता.
कोलंबसच्या आधी अमेरिकेत पोहोचलेल्या लोकांचं मात्र विशेष कौतुक झालं नाही. त्यांच्या स्वागतासाठी राजांनी मोठ्या घोषणा केल्या नाहीत किंवा रस्त्यांवर गर्दीही जमली नव्हती. त्याचबरोबर, त्यांनी एका खंडातून दुसऱ्या खंडात जाण्यासाठी अथांग अटलांटिक महासागर थेट पार केला नव्हता.
त्याऐवजी, त्यांनी टप्प्याटप्प्याने प्रवास केला. वाटेत विश्रांती घेण्यासाठी आणि पुढचा प्रवास करण्यासाठी त्यांनी आइसलँड आणि ग्रीनलँडचा वापर केला.
त्यांच्या या मोहिमांची वर्णनं अनेक शतकांनंतर गाथांमधून (सागा) लिहिली गेली. पण, या गाथा इतिहासाच्या पुस्तकांपेक्षा वीरांच्या पराक्रमाच्या कथा म्हणून अधिक ओळखल्या जात होत्या.
ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिकेत पोहोचण्याच्या 500 वर्षे आधीच वायकिंग्जनी अमेरिकेच्या भूमीवर पाऊल ठेवलं होतं.
वायकिंग्जच्या वंशजांनी लिहून ठेवलेल्या त्यांच्या कथा म्हणजेच 'नॉर्स गाथा'. इतिहास समजून घेण्यासाठी या गाथांमधील माहिती विश्वासार्ह स्रोत मानली जाऊ लागली आहे.
फ्लॅटेयारबोक: वायकिंग्जच्या जुन्या कथांचा संग्रह
1966 मध्ये बीबीसीचे सादरकर्ते मॅग्नस मॅग्नुसन यांनी 14व्या शतकातील 'फ्लॅटेयारबोक' या ग्रंथाचं वर्णन 'अस्तित्वात असलेल्या सर्वांत मौल्यवान आइसलँडिक हस्तलिखितांपैकी एक' असं केलं होतं. या ग्रंथाला 'फ्लॅटे बेटाचं पुस्तक' असंही म्हटलं जातं.
"हा ग्रंथ किती मौल्यवान आहे, हे एका घटनेवरून लक्षात येतं," असं मॅग्नस मॅग्नुसन यांनी सांगितलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
"1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो इथं जागतिक प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. कोलंबसच्या प्रवासाला 400 वर्षं पूर्ण झाल्याच्या (उशिराने आयोजित केलेल्या) सोहळ्यासाठी आयोजकांना हा ग्रंथ हवा होता. त्या वेळी हा ग्रंथ डेन्मार्कमध्ये ठेवण्यात आला होता."
"हा ग्रंथ अमेरिकेमध्ये आणण्यासाठी आयोजकांनी डेन्मार्कला युद्धनौका पाठवण्याची आणि अमेरिकेतून तो सुरक्षितपणे नेण्यासाठी चिलखती रेल्वेची व्यवस्था करण्याची तयारी दाखवली होती. तसंच, या ग्रंथाचा 10 लाख डॉलरचा विमाही उतरवण्याची तयारी होती."
"परंतु, इतकी खबरदारी घेण्याची तयारी असूनही डेन्मार्कच्या अधिकाऱ्यांनी हा मौल्यवान ग्रंथ पाठवण्याचा धोका पत्करायला नकार दिला."
अमेरिकेच्या लोकांना ग्रंथ उधार का हवा होता?
कारण या ग्रंथात "दहाव्या शतकात नॉर्स लोकांनी (वायकिंग्जनी) ग्रीनलँडमध्ये वस्ती कशी केली, याची माहिती आहे. इतकंच नव्हे, तर त्यानंतर काही वर्षांतच त्यांनी उत्तर अमेरिकेचा शोध कसा घेतला आणि तिथे वस्ती करण्याचा प्रयत्न कसा केला, याचीही कहाणी आहे. विशेष म्हणजे, हे सर्व कोलंबस अमेरिकेत पोहोचण्याच्या तब्बल 500 वर्षे आधी घडलं होतं."
1960 मध्ये कॅनडातील न्यूफाउंडलँड इथल्या लान्स ओ मेडोज या ठिकाणी वायकिंग्जनी प्रवासादरम्यान मुक्काम करण्यासाठी उभारलेल्या छावणीचे अवशेषही आढळून आले.
2021 मध्ये संशोधकांनी कालावधी निश्चित करण्याच्या एका नवीन पद्धतीचा वापर केला. त्यातून वायकिंग्जनी या ठिकाणी नेमक्या 1 हजार वर्षांपूर्वी, म्हणजेच इ.स. 1021 मध्ये वास्तव्य केलं होतं, असं समोर आलं.
उत्तर अमेरिकेच्या अंतर्गत भागात पुढे जाण्यासाठी या ठिकाणाचा वायकिंग्जनी मुख्य तळ म्हणजेच बेस कॅम्प म्हणून वापर केला असावा, असं मानलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
बीबीसीच्या 'टाइमवॉच' या माहितीपट मालिकेच्या 1997 मधील एका भागात रॉबिन एलिस म्हणाले होते, "ही एका विस्मृतीत गेलेल्या इतिहासाची सुरुवात आहे. अनेक शतकं युरोपीय लोक अमेरिकेला भेट देत होते. परंतु, त्यांच्या या प्रवासांची नोंद कुठेही लिहून ठेवली गेली नव्हती. त्यांच्या प्रवासाच्या खुणा केवळ समुद्राच्या पाण्यातच राहिल्या."
नॉर्स लोक (वायकिंग्ज) साधारण इ.स. 870 मध्ये आइसलँडमध्ये पोहोचले. त्यानंतर सुमारे 100 वर्षांनी ते ग्रीनलँडमध्येही पोहोचले.
ग्रीनलँडहून डेव्हिस सामुद्रधुनी ओलांडून सुमारे 200 मैलांचा (320 किलोमीटर) प्रवास केला की, सध्याच्या कॅनडातील बॅफिन बेटावर पोहोचता येत होतं. वायकिंग्जनी या बेटाला 'हेलुलँड' असं नाव दिलं होतं. याचा अर्थ 'दगडी पाट्यांची भूमी' किंवा सपाट दगडांचा प्रदेश असा होतो.
वायकिंग्जच्या गाथांनुसार, त्यांनी किनारपट्टीच्या दिशेने दक्षिणेकडे प्रवास सुरू ठेवला. ते सध्याच्या कॅनडातील लॅब्राडोर भागात पोहोचले. या प्रदेशाला त्यांनी 'मार्कलँड' असं नाव दिलं होतं. याचा अर्थ 'जंगलांची भूमी' किंवा वनांचा प्रदेश असा होतो. त्यानंतर ते आणखी दक्षिणेकडे गेले. या भागाला त्यांनी 'विनलँड' म्हणजेच 'वेलींची भूमी' असं नाव दिलं.
आइसलँड विद्यापीठातील एमिली लेथब्रिज यांनी 2016 मध्ये 'टाइमवॉच' या कार्यक्रमात सांगितलं होतं, "या गाथांमध्ये वायकिंग्ज केवळ एकाच ठिकाणी थांबले होते, असं म्हटलेलं नाही. ते अनेक ठिकाणी थांबल्याचंही वर्णन आहे."
"ते तिथे अनेक वर्षे राहिले. त्यांच्यासमोर शोध घेण्यासाठी एक संपूर्ण नवीन जग होतं."
एरिक द रेड: वायकिंग्जचा नेता
गाथांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, वायकिंग्जमधील सर्वांत प्रसिद्ध वसाहतकार एरिक द रेड हा साधारण इ.स. 960 मध्ये आइसलँडमध्ये पोहोचला. त्याच्या वडिलांना खुनाच्या आरोपावरून नॉर्वेमधून हद्दपार करण्यात आलं होतं. त्यानंतर ते आइसलँडमध्ये गेले होते.
इ.स. 932 मध्ये आइसलँडच्या लोकांनी 'अल्थिंग' नावाची संसद स्थापन केली होती.
ही संपूर्ण देशाची एका खुल्या मैदानात भरणारी सभा होती. कायदे करण्यासाठी आणि न्यायदानासाठी दरवर्षी उन्हाळ्यात 2 आठवडे ही सभा भरत असत. ही सभा एका खोल दरीत भरत असे. या दरीची रचना एखाद्या नैसर्गिक रंगमंचासारखी (ॲम्फीथिएटर) होती आणि तिथलं दृश्यही अतिशय सुंदर होतं.

फोटो स्रोत, Getty Images
लेथब्रिज यांनी बीबीसीला सांगितलं, "केवळ ध्वनीविषयक वैशिष्ट्यांमुळेच हे ठिकाण खास आहे असं नाही. ही एक नैसर्गिक भूगर्भीय भेग आहे. उत्तर अमेरिकेचा आणि युरेशियाचा भूभाग (टेक्टोनिक प्लेट्स) ज्या ठिकाणी एकमेकांना जोडला जातो, तिथे आपण उभे आहोत."
विशेष म्हणजे, उत्तर अमेरिकेचा शोध घेणाऱ्या पहिल्या युरोपीय लोकांनी या दोन खंडांच्या मध्ये असलेल्या भेगेमुळे तयार झालेल्या दरीत (रिफ्ट व्हॅली) आपली एक संसद स्थापन केली होती.
लेथब्रिज यांनी सांगितलं की, या संसदेमध्ये समाजाचे सर्व नियम मोडणाऱ्या लोकांना देशातून हद्दपार करण्याची शिक्षा दिली जात असत. अशा लोकांना इतर कुठेही राहण्याची परवानगी होती, परंतु हद्दपारीची शिक्षा लागू असेपर्यंत त्यांना आइसलँडमध्ये पाऊल ठेवता येत नव्हतं.
कोलंबसला विनलँडबद्दल माहिती होती का?
मध्ययुगीन काळातील समुद्रप्रवासाच्या इतिहासाच्या अभ्यासक कर्स्टन सीव्हर या 'टाइमवॉच' या कार्यक्रमात म्हणाल्या होत्या, "आज आपण ज्यांना ग्रीनलँड आणि उत्तर अमेरिका म्हणतो, त्या दोन्ही किनारपट्टींदरम्यान मध्ययुगाच्या संपूर्ण काळात समुद्रप्रवास होत होते, हे मानण्यामागे अनेक ठोस कारणंही आहेत."
"इ.स. 1480 मध्ये त्यांनी जाणीवपूर्वक उत्तर अमेरिकेकडे जाण्याचा प्रयत्न केला होता, हे आपल्याला माहीत आहे. त्या काळात ते या भागाला 'ब्राझील बेट' असं म्हणत असत."
"परंतु, हा त्यांचा उत्तर अमेरिकेकडे जाण्याचा पहिलाच प्रवास नव्हता. ग्रीनलँडमार्गे जाण्याऐवजी थेट उत्तर अमेरिकेकडे जाण्याचा हा त्यांचा पहिलाच प्रयत्न होता. तोपर्यंत समुद्रप्रवासासाठी ग्रीनलँड हा त्यांचा नेहमीचा मार्गदर्शक टप्पा किंवा संदर्भ स्थान होता."
सीव्हर यांनी एका दस्तऐवजाचाही उल्लेख केला. त्यावरून असं लक्षात येतं की, ख्रिस्तोफर कोलंबसलाही अशा समुद्रप्रवासांबद्दल माहिती होती.
1497-98 च्या हिवाळ्यात जॉन डे नावाच्या एका इंग्रजाने ख्रिस्तोफर कोलंबसला पत्र लिहिलं. त्यात त्याने 1497 मध्ये जॉन कॅबोटने उत्तर अमेरिकेपर्यंत केलेल्या यशस्वी समुद्रप्रवासाची माहिती दिली.

फोटो स्रोत, Getty Images
या पत्रात त्याने आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला. कोलंबसलाही ही गोष्ट माहीत होती की, इंग्लंडमधील ब्रिस्टल शहरातील खलाशी अनेक वर्षांपासून उत्तरेकडील मार्गाने उत्तर अमेरिकेपर्यंत समुद्रप्रवास करत होते.
1492 मध्ये ख्रिस्तोफर कोलंबस बहामासच्या किनाऱ्यावर पोहोचला, तेव्हा वायकिंग्ज ज्या प्रदेशाला 'विनलँड' म्हणत, त्या ठिकाणाची माहितीही कदाचित त्याला आधीपासूनच असावी.
याशिवाय, काहींचं असंही मत आहे की, युरोपीय लोकांनी आधीच शोधलेल्या या भूमीपासून कोलंबस जाणीवपूर्वक दूर राहण्याचा प्रयत्न करत होता.
"आजच्या काळातील कोणत्याही अनुभवी खलाशाप्रमाणे कोलंबसलाही त्यावेळी हे चांगलं माहीत होतं की, उत्तर गोलार्धात समुद्र पार करायचा असेल, तर आधी उत्तरेकडे जावं लागतं. तिथे समुद्र पार करण्याचं अंतर कमी असतं. त्यामुळे लवकर समुद्र पार करून मग पुन्हा दक्षिणेकडे वळता येतं," असं मॅकगी यांनी 'टाइमवॉच'ला सांगितलं.
"परंतु, कोलंबसने थेट समुद्र पार करण्याचा लांबचा मार्ग निवडला. कदाचित त्याला कॅनडाचा प्रदेश टाळायचा होता. त्याला विनलँडपासूनही दूर राहायचं असेल, कारण त्याला त्या प्रदेशाचा शोध घ्यायचा नव्हता. माझ्या मते, कोलंबसला अमेरिका टाळून थेट सुदूर पूर्वेकडील देशांमधील संपत्तीपर्यंत पोहोचायचं होतं," असं ते म्हणाले.
अमेरिकेतील अनेक नागरिक दरवर्षी 12 ऑक्टोबर हा दिवस साजरा करतात. पण, त्याआधीही अटलांटिक महासागर पार करून अनेक प्रवास झाले होते, हे त्यांनी विसरू नये.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)




























