ज्या मुलाला सोडून दिलं होतं, त्यानं 65 वर्षांनंतर कुटुंबाला कसं शोधलं?

डेव्हिड स्टिव्हन्सन एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतात. कुटुंबाला भेटून आनंद झाल्याचं ते सांगतात.

फोटो स्रोत, Julie Stevenson

    • Author, शारिका अहमद आणि डॉटी मॅक्लिओड
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

पीटरबरोमध्ये राहणाऱ्या डेव्हिड स्टीव्हन्सन यांच्या मनात 65 वर्षे एकच प्रश्न घोळत होता. 'मी कुठून आलोय?' ज्याने त्यांचे पूर्ण आयुष्य बदलून टाकले.

जन्म होऊन अवघे काही दिवस झाले असताना, 1960 मध्ये लंडनच्या गोल्डर्स ग्रीन मधील एका फ्लॅटच्या पॅसेजमध्ये ते अनोळखी लोकांना सापडले. त्यांना सोडून देण्यामागे काय परिस्थिती होती याची माहिती कधीच समजू शकली नाही. नंतर स्टीव्हन्सन कुटुंबाने त्यांना दत्तक घेतले आणि त्यांचे पालनपोषण केले.

"लहानपणापासूनच मला माहित होते की मी सोडून दिलेले बाळ आहे. माझ्या दत्तक आई-वडिलांनी मला हे सांगितले होते. पण जेव्हा मला स्वतःची मुले झाली तेव्हा कुठे मी कुठून आलोय याचा विचार करायला सुरुवात केली," असं ते म्हणाले.

1960 मध्ये, 'डेली मेल' (Daily Mail) ने लंडनमधील एका इमारतीच्या गॅलरी मध्ये सापडलेल्या या बाळाबद्दल एक बातमी प्रसिद्ध केली होती.

फोटो स्रोत, Julie Stevenson

1960 मध्ये 'डेली मेल'ने लंडनच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सोडण्यात आलेल्या या "रेनबो बेबी"ची ओळख पटवण्यासाठी एक आवाहन प्रसिद्ध केले होते. नव्या माहितीचा शोध घेण्यासाठी या वृत्तपत्राने 2009 मध्ये या घटनेवर पुन्हा बातमी दिली होती.

कित्येक वर्षे शोध घेऊनही त्यांच्या दत्तक विधानाच्या नोंदींमध्ये जन्मदात्या आई-वडिलांबद्दल खूपच कमी माहिती होती, असे डेव्हिड यांनी सांगितले.

"हे म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखे होते," ते पुढे म्हणाले."

"पण माझ्या पत्नीने यात लक्ष घातले आणि तिच्या लक्षात आले की या नोंदींमध्ये एक पोलिस अहवाल आहे. मग ती माझ्या केसवर काम करणाऱ्या टेगवेन कर्ल नावाच्या महिला पोलिस अधिकाऱ्यापर्यंत पोहोचली. ज्या दिवशी मी सापडलो होतो त्या दिवसाची आणखी माहिती ती आम्हाला देऊ शकली," ते म्हणाले.

पीटरबरोच्या माजी नगरसेविका असलेल्या त्यांच्या पत्नी जुली स्टीव्हन्सन म्हणाल्या, "त्या महिला पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की त्या डेव्हिडची सुटका केल्याची ती घटना कधीच विसरल्या नाहीत. त्यांच्या कारकिर्दीतील ही सर्वात भावूक करणाऱ्या घटनांपैकी एक होती."

डेव्हिड स्टीव्हन्सन 17 वर्षांआधी टेगवेन कर्ल नावाच्या महिला पोलिसांना भेटले होते. त्यांनीच डेव्हिड सापडलेल्या दिवसाची माहिती देऊन त्यांची मदत केली होती.

फोटो स्रोत, Julie Stevenson

अखेर या शोधातून डेव्हिड यांच्या जन्मदात्या आईबद्दलची, म्हणजे पेट्राबद्दलची माहिती समोर आली. त्यांचा जन्म 1940 मध्ये नेदरलँड्समध्ये एका कॅथोलिक कुटुंबात झाला होता.

जुली यांनी सांगितले की, वयाच्या 19 व्या वर्षी त्या 'ऑ पेअर' म्हणजे घरगुती कामात मदत करणारी व्यक्ती म्हणून काम करण्यासाठी आधी फ्रान्स आणि नंतर इंग्लंडला गेल्या जिथे 1960 मध्ये त्या डेव्हिडच्या वेळी गरोदर राहिल्या.

"लंडनला आल्यावर त्या गरोदर होत्या की नाही, हे जरी अस्पष्ट असले तरी त्यांनी पूर्ण नऊ महिने बाळाला पोटात वाढवले आणि गरोदरपणाच्या काळात त्यांना आसपासच्या लोकांचा पाठिंबा मिळाल्याचे दिसते," असे त्या पुढे म्हणाल्या.

'मला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते'

2015 मध्ये 'फाउंडलिंग म्युझियम'ला दिलेल्या भेटीदरम्यान डेव्हिड यांचा आयटीव्हीच्या 'लॉन्ग लॉस्ट फॅमिली' टीमसोबत पहिला संपर्क झाला.

"डीएनए आणि कौटुंबिक शोधाच्या माध्यमातून माझ्या जन्मदात्या आईचा शोध घेण्यात या शोला यश आले, हे खरोखरच कौतुकास्पद आहे," ते म्हणाले.

"दुर्दैवाने 2010 मध्येच त्यांचा मृत्यू झाला. पण माझ्या नवीन नातेवाइकांनी मला त्यांच्याबद्दल सांगितलेल्या आठवणींमुळे त्या माझ्या मनात पुन्हा जिवंत झाल्या. त्या खूप प्रेमळ स्त्री होत्या."

जुली आणि डेव्हिड स्टीव्हन्सन 2002 पासून एकत्र राहत आहेत.

फोटो स्रोत, Julie Stevenson

डेव्हिड पुढे म्हणाले, "माझा सांभाळ व्यवस्थित व्हावा म्हणून बहुधा त्यांनी काही सोय करून ठेवली होती. पण बहुधा त्या योजनेत काहीतरी गडबड झाली असावी आणि त्यामुळे मला बालसंरक्षण व्यवस्थेच्या ताब्यात जावे लागले."

"पण मला त्यांच्याबद्दल फक्त आणि फक्त सहानुभूती वाटते. 1950 आणि 60 च्या दशकात लग्न न होता आई होणे कोणत्याही मुलीसाठी सोपे नव्हते. त्यांनी त्यांना जेवढे शक्य होते तेवढे चांगले केले, असे मला वाटते."

जुली पुढे म्हणाल्या की, "त्या स्वतःहून समोर का आल्या नाहीत यामागे नक्कीच त्यांची काही कारणे असणार यावर आपण विश्वास ठेवायला हवा आणि त्यात काही चुकीचे नाही. न्याय करणारे आपण कोण? आपण काही त्यांचे आयुष्य जगलो नाही. ही फक्त घडून गेलेली एक अत्यंत दुःखद घटना होती."

जन्म होऊन अवघे काही दिवस झाले असतानाच, डेव्हिड स्टीव्हन्सन (सर्वात लहान मूल) यांना स्टीव्हन्सन कुटुंबाने दत्तक घेतले.

फोटो स्रोत, Julie Stevenson

डेव्हिड यांनी नंतर रोटरडॅममधील त्यांच्या आईची बहीण मॅरिएन आणि भावंडांशी पुन्हा संपर्क साधला. हा सर्व अनुभव त्यांनी "खूपच रंजक" असा सांगितला.

ते म्हणाले, "त्या कुटुंबाने आमचे खूप छान स्वागत केले, ती खूप चांगली माणसे आहेत. त्यांना भेटून मनापासून आनंद झाला.

"हे सगळे डीएनए तंत्रज्ञानामुळेच शक्य होऊ शकले. कॅनडामधील एका मुलीचा डीएनए एका वेबसाईटवर माझ्याशी मॅच झाला आणि तिथूनच आम्हाला या कुटुंबाचा शोध लागला. एवढेच नाही तर माझी पणजी इंडोनेशियन होती, हेही मला आता समजले."

"मी मूळचा कुठून आलो आहे हे समजणं खूपच समाधानकारक आहे. जरी अजूनही वडिलांच्या बाजूचा शोध घेणं बाकी आहे."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.