व्हेलच्या 'या' हृदयद्रावक फोटोनं जहाजांना वेग कमी करायला लावला; नेमकं काय घडलं होतं?

फोटो स्रोत, Rachel Moore
- Author, कॅथरीन लॅथम
- Published
- वाचन वेळ: 8 मिनिटे
(महत्त्वाचं: या लेखातील काही माहिती वाचकांना अस्वस्थ करू शकते.)
छायाचित्रकार रेचल मूर यांनी एका तरुण हंपबॅक व्हेलच्या डोळ्याचे हे जवळून सुंदर छायाचित्र काढलं होतं. काही दिवसांनंतर 'स्वीट गर्ल' नावाच्या या व्हेलला एका बोटीने धडक दिली. या धडकेत तिचा मृत्यू झाला. पण, तिची कहाणी इथेच संपली नाही.
हे एक विलक्षण आणि अत्यंत जवळून टिपलेलं छायाचित्र आहे. यात एक छायाचित्रकार आणि उत्सुकतेनं त्याच्याकडे पाहणारी तरुण व्हेल एकमेकांच्या डोळ्यांत पाहताना दिसतात.
छायाचित्रकार रेचल मूर यांनी 2024 मध्ये फ्रेंच पॉलिनेशियामधील व्हेलच्या हंगामात हे छायाचित्र काढलं होतं. त्यांनी हे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर करताच ते प्रचंड व्हायरल झालं होतं.
परंतु, त्यानंतर एक दुर्दैवी घटना घडली. मूर यांनी 'स्वीट गर्ल' असे नाव दिलेल्या या व्हेलला भरधाव वेगाने जाणाऱ्या जहाजाने धडक दिली. या धडकेत तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनं जगभरातील लोकांचं लक्ष वेधलं, याची मोठी चर्चा झाली. या घटनेनंतर व्हेलच्या संरक्षणासाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची मागणीही जोर धरू लागली.
ऑक्टोबर 2024 मध्ये रेचल मूर या मो'ओरिया या ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या बेटाच्या आसपासच्या उबदार समुद्रात डुबकी मारत होत्या. उन्हाळ्याच्या महिन्यांत हंपबॅक व्हेल या ठिकाणी येतात. प्रजनन करणं, पिल्लांना जन्म देणं आणि त्यांना वाढवणं यासाठी हे हंपबॅक व्हेलचं आवडतं ठिकाण आहे.
छायाचित्रकार मूर यांची 'स्वीट गर्ल' या व्हेलशी दोन वेळा भेट झाली. "पहिल्या दिवशी समुद्रात उतरताच ती व्हेल लगेचच माझ्या दिशेने आली. ती खूप वेगाने जवळ येत होती", असे मूर सांगतात.
या महाकाय व्हेलची भीती वाटल्याने त्या जवळपास तासभर तिच्यापासून दूर जाण्यासाठी पोहत होत्या.

फोटो स्रोत, Rachel Moore
End of podcast promotion
"साधारणपणे व्हेल शांत स्वभावाच्या असतात. मानवाला इजा पोहोचवण्याचा त्यांचा हेतू नसतो. परंतु, त्यांचा आकार प्रचंड मोठा असतो. त्यांचे पंख आणि शेपटीही खूप जड आणि शक्तिशाली असतात. त्यामुळे नकळत त्यांच्या धडकेत एखादी व्यक्ती जखमी होऊ शकते. म्हणूनच व्हेलसोबत समुद्रात उतरताना नेहमीच धोका असतो," असं त्या सांगतात.
हळूहळू मूर यांची भीती कमी झाली आणि त्यांनी व्हेलला स्वतःजवळ येऊ दिलं. त्या सांगतात, "काही वेळानंतर माझ्या लक्षात आलं की, ती जेव्हा माझ्या जवळ येत होती, तेव्हा ती आपले पंख शरीराजवळ दुमडून ठेवत होती. मी कुठे आहे, याचीही ती सतत काळजी घेत होती. ती खूप सावधपणे आणि जाणीवपूर्वक वागत होती. काही वेळा तर आम्ही एकमेकांना स्पर्श होणार नाही इतक्याच अंतरावर होतो."
मूर यांनी 'स्वीट गर्ल' या व्हेलच्या डोळ्यांत डोळे घालून तिच्यासोबत 10 मिनिटे घालवली. मात्र, या काळात त्यांनी एकही छायाचित्र काढलं नाही. त्या सांगतात, "वन्यजीव छायाचित्रकार म्हणून मी पूर्णपणे अपयशी ठरले. पण हा माझ्या आयुष्यातील सर्वांत सुंदर आणि अविस्मरणीय असा अनुभव होता."
दुसऱ्या दिवशी मूर पुन्हा त्याच ठिकाणी गेल्या. सुदैवाने त्यांची त्या व्हेलशी पुन्हा भेट झाली. मूर सांगतात, "आम्ही एकमेकांच्या जवळ असताना स्वीट गर्ल किंचाळल्यासारखा पण अत्यंत हळुवार असा आवाज काढत होती."

यावेळी मूर यांनी आपला कॅमेरा उचलला आणि व्हेलच्या डोळ्यावर लक्ष केंद्रित केलं. ती तरुण व्हेल मूर यांच्याकडे पाहण्यासाठी वळली. आधी तिने एका डोळ्याने पाहिलं आणि नंतर दुसऱ्या डोळ्याने. मूर सांगतात, "त्याच क्षणी तिच्या डोळ्यावर पडणारा प्रकाश मी टिपला."
या भेटीनंतर काही वेळातच समुद्रात वादळ आले. लाटाही उंच होऊ लागल्या. "त्यानंतर ती व्हेल तिथून निघून ताहितीच्या दिशेने गेली", असं मूर सांगतात.
या भेटीनंतर अवघ्या 4 दिवसांनी मूर यांना बातमी समजली की, एका भरधाव प्रवासी फेरीबोटीने स्वीट गर्लला जोरदार धडक दिली होती. या धडकेनंतर ती किनाऱ्याजवळ वेदनेनं तडफडत होती.
मूर सांगतात, "तिचा खालचा जबडा पूर्णपणे मोडला होता. वरचा जबडा तुटून वेगळा झाला होता आणि श्वास घेण्याच्या मार्गालाही दुखापत झाली होती. ती हळूहळू पाण्यात बुडत होती."
मूर सांगतात की, स्वीट गर्लला अनेक तास वेदना सहन कराव्या लागल्या. तिच्या रक्तामुळे आकर्षित झालेले टायगर शार्क तिच्यावर हल्ले करत होते. अखेर गंभीर जखमांमुळे तिचा मृत्यू झाला. मूर म्हणतात, "हे सगळं पाहून माझ्या पोटात गोळा आला होता. त्या दिवशी जणू संपूर्ण समुद्रच तिच्या मृत्यूमुळे दुःखी झाला होता."
'सी शेफर्ड' या पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थेनं या व्हेलची वेदना दाखवणारा एक व्हीडिओ शेअर केला. या व्हीडिओमध्ये ती तरुण व्हेल वेदनेनं ओरडत असल्याचं ऐकू येतं.
"तिच्या मृत्यूबद्दल समजल्यानंतर मला जाणवलं की, या छायाचित्राचा उपयोग केवळ छायाचित्र म्हणून न राहता आणखी काही करण्यासाठी केला पाहिजे. या छायाचित्राच्या माध्यमातून लोकांचं लक्ष या समस्येकडे वेधून घेऊन बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत," असं मूर म्हणतात.
समुद्रातील अपघातांचे बळी
स्वीट गर्लचा मृत्यू ही काही अपवादात्मक घटना नाही. जहाजांची धडक हा व्हेलच्या जीवाला असलेल्या 4 प्रमुख धोक्यांपैकी एक आहे, असं वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या 'इंटरनॅशनल फंड फॉर ॲनिमल वेल्फेअर' (आयएफएडब्ल्यू) या संस्थेचे वैज्ञानिक सल्लागार रसेल लीपर सांगतात.
व्हेलसाठी इतर 3 मोठे धोके म्हणजे मासेमारीच्या जाळ्यांत अडकणे, अपघाताने होणारी शिकार, आणि पाण्याखाली होणारा आवाज. पाण्यातील आवाजामुळे व्हेलवर दीर्घकाळ ताण येतो. तर जाळ्यात अडकणे किंवा जहाजाची धडक बसणे यामुळे अनेकदा त्यांचा थेट मृत्यू होतो.
"अशा घटनांमध्ये व्हेल गंभीर जखमी होऊ शकतात. काही वेळा या जखमांमुळे त्यांचा लगेच मृत्यू होतो, तर काही वेळा जखमांमुळे त्यांना अनेक आठवडे किंवा महिने त्रास सहन करावा लागतो आणि अखेर त्यांचा मृत्यू होतो," असे लीपर सांगतात.
लीपर सांगतात की, अनेकदा व्हेलचा मृतदेह समुद्रकिनाऱ्यावर वाहून येतो, तेव्हा तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा दिसत नाहीत. परंतु, मृतदेहाची तपासणी म्हणजेच शवविच्छेदन (नेक्रोप्सी) केल्यानंतर जहाजाची धडक बसल्यामुळे झालेल्या जखमा समोर येतात.
"व्हेलच्या शरीरातील सर्व अवयवांना गंभीर इजा झालेली असते. तिची हाडेही मोडलेली असतात. जहाजाच्या धडकेमुळे शरीराच्या अंतर्गत भागात अनेक ठिकाणी गंभीर मार लागलेला असतो," असं ते सांगतात.
जहाजांच्या धडकेमुळे किती व्हेलचा मृत्यू होतो, याची अचूक आकडेवारी आपल्याकडे नाही, असे लीपर सांगतात. कारण अशा बहुतेक घटना कोणाच्याही लक्षात येत नाहीत आणि त्यांची नोंदही होत नाही.
एखाद्या मोठ्या जहाजाची व्हेलला धडक बसली, तरी जहाजावरील कर्मचाऱ्यांना त्याची जाणीवही होण्याची शक्यता फार कमी असते, असं ते सांगतात. अशा घटनांची नोंद तेव्हाच होते, जेव्हा कोणी ती घटना प्रत्यक्ष पाहतो किंवा व्हेलचा मृतदेह समुद्रकिनाऱ्यावर वाहून येतो.
"अशा प्रकारे नोंद झालेल्या घटना प्रत्यक्षात घडणाऱ्या घटनांच्या तुलनेनं खूपच कमी आहेत. जहाजांची धडक बसण्याच्या अशा किती घटना घडतात, हे आम्हालाही माहिती नाही," असं लीपर सांगतात.

फोटो स्रोत, Rachel Moore
ब्रिटिश अंटार्क्टिक सर्व्हेच्या संशोधक जेनिफर जॅक्सन सांगतात की, ही समस्या सहज लक्षात येत नाही.
त्या म्हणतात, "आपण रस्त्यावरून गाडीने जाताना एखाद्या वाहनाच्या धडकेत मृत्युमुखी पडलेले प्राणी पाहू शकतो. परंतु समुद्रात असं होत नाही. जहाजाची धडक बसून मृत्युमुखी पडलेले जीव समुद्राच्या तळाशी जातात. त्यामुळे ते आपल्या नजरेस पडत नाहीत."
जेनिफर जॅक्सन सांगतात की, अनेकवेळा गंभीर जखमी झालेले समुद्री जीव मोडलेल्या बरगड्या आणि शरीराच्या आतील अवयवांना झालेल्या दुखापतींसह समुद्रात पोहत राहतात. काहींचा हळूहळू आणि वेदनादायक मृत्यू होतो. पण, हे सर्व मानवाच्या नजरेपासून दूर घडत असतं.
त्या म्हणतात, "जहाजाच्या धडकेमुळे एखाद्या समुद्री जीवाचा लगेच मृत्यू झाला नाही, तरी त्याला होणारे गंभीर परिणाम मात्र खूप मोठे असतात."
ज्या समुद्रामध्ये जहाजांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते आणि जिथे व्हेलची संख्याही जास्त आहे, अशा ठिकाणी व्हेलला जहाजांची धडक बसण्याचा धोका सर्वाधिक असतो.
जेनिफर जॅक्सन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 4 प्रकारच्या व्हेलचा अभ्यास केला. यामध्ये हंपबॅक, ब्लू व्हेल, फिन व्हेल आणि स्पर्म व्हेल यांचा समावेश होता. या व्हेलची संख्या कोणत्या भागात जास्त आहे, याचा अभ्यास करून त्यांनी त्या भागामधील जहाजांच्या वाहतुकीशी तुलना केली.
या अभ्यासात असं आढळून आलं की, जगभरातील ज्या 92 टक्के समुद्री भागांत या व्हेल आढळून येतात, त्या भागांतून जहाजांचीही वाहतूक होते.
"जगभरातील अशा धोकादायक (हॉटस्पॉट) समुद्री भागांपैकी 7 टक्क्यांपेक्षाही कमी भागांना संरक्षण दिले गेले आहे किंवा त्यांचे योग्य व्यवस्थापन केले जाते," असं जॅक्सन सांगतात.
परंतु, समुद्राच्या एकूण क्षेत्रापैकी आणखी केवळ 2.6 टक्के भागात संरक्षणाचे उपाय केले, तर व्हेलला जहाजांची धडक बसण्याचा सर्वाधिक धोका असलेले सर्व भाग सुरक्षित करता येतील, असंही त्या सांगतात.
लीपर यांचंही म्हणणं आहे की, "जहाजे आणि व्हेल यांना एकमेकांपासून दूर ठेवणं हाच धोका कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे." पण, हे शक्य नसेल तर जहाजांचा वेग कमी केल्यानेही धोका बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो.
त्या सांगतात, "जहाजाचा वेग जितका जास्त, तितका व्हेलला धडक बसण्याचा धोका अधिक असतो. जहाजांचा वेग ताशी 10 नॉट्स किंवा त्यापेक्षा कमी ठेवल्यास धडक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो."
याला संशोधनातूनही दुजोरा मिळाला आहे. न्यूझीलंडमधील हौराकी आखातात जहाजांचा वेग 25 टक्क्यांनी कमी करून ताशी सुमारे 10 नॉट्स करण्यात आला. यानंतर अवघ्या 2 वर्षांत ब्रायड्स व्हेलला जहाजांची धडक बसून मृत्यू होण्याचा धोका जवळपास निम्म्याने कमी झाल्याचे आढळून आले.
"हे या उपायाचे सर्वांत मोठं यश म्हणता येईल," असे लीपर सांगतात.
1996 ते 2014 या काळात न्यूझीलंडमधील हौराकी आखातात जहाजांच्या धडकेत दरवर्षी सरासरी 2 ब्रायड्स व्हेलचा मृत्यू होत असल्याचा अंदाज होता. परंतु, जहाजांचा वेग मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर जहाजांच्या धडकेची एकही घटना नोंदवली गेलेली नाही.

फोटो स्रोत, Rachel Moore
जहाजांचा वेग कमी ठेवल्यामुळे व्हेलला जहाज येत असल्याचा आवाज ऐकू येतो आणि बाजूला होण्यासाठी अधिक वेळ मिळतो. तसेच, जहाजाची धडक बसलीच तरी व्हेलचा मृत्यू होण्याची शक्यता कमी होते, असे लीपर सांगतात.
"ज्या व्हेल अनेक वर्षांपासून जहाजांची वर्दळ असलेल्या भागात राहतात, त्यांना जहाजांची सवय झालेली असते. त्यामुळे त्या जहाजांच्या अगदी जवळही जातात. जहाज जवळ आल्यावर त्या शेवटच्या क्षणीच बाजूला होतात. अशा वेळी जहाजाचा वेग किती आहे, याला खूप महत्त्व असतं."
परंतु, हा प्रश्न सोडवणं तितकं सोपं नाही, असे लीपर सांगतात. जगभरातील 80 टक्क्यांपेक्षा जास्त मालाची वाहतूक जहाजांमधून होते. जहाजांचा वेग कमी केल्यास प्रवासासाठी अधिक वेळ लागतो आणि मालही उशिरा पोहोचतो. "माल वेळेवर पोहोचवणं आणि जहाजांच्या वाहतुकीशी संबंधित अडचणी या वेग कमी करण्यातील मुख्य अडथळे आहेत," असं ते सांगतात.
पण, जहाजांचा वेग कमी करण्याचे आणखीही फायदे आहेत. त्यामुळे जहाजांमधून होणारे प्रदूषण कमी होईल आणि समुद्राखाली होणारा आवाजही (ध्वनी प्रदूषण) कमी होईल, असे लीपर सांगतात.
गेल्या काही वर्षांत जहाज वाहतूक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये बदल करण्याची तयारी दिसून येत आहे, असे लीपर सांगतात.
ते म्हणतात, "काही कंपन्या स्वतःहून आमच्याकडे येतात आणि काय करायला हवं, ते सांगा, आम्ही तसं करू, असं म्हणतात."
स्वीट गर्लच्या दुर्दैवी मृत्यूमुळे लोकांमधून संताप व्यक्त झाला आणि या घटनेकडे जगभरातील लोकांचं लक्ष वेधलं गेलं. त्यानंतर काही दिवसांतच मूर यांनी एक ऑनलाइन याचिका सुरू केली. त्यात त्यांनी स्वीट गर्लचे काढलेलं छायाचित्र वापरलं होतं. व्हेलचा हंगाम सुरू असताना बोटींचा वेग मर्यादित ठेवावा, अशी मागणी त्यांनी फ्रेंच पॉलिनेशिया सरकारकडे या याचिकेद्वारे केली होती.
मूर प्रश्न उपस्थित करतात, "जमिनीवर शाळा किंवा बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी माणसांच्या सुरक्षिततेसाठी वाहनांचा वेग कमी ठेवला जातो. मग व्हेलसाठी धोकादायक असलेल्या समुद्रातील भागांतही असा नियम का असू नये?"
त्या पुढे सांगतात, "फेरीबोटींनी संपूर्ण प्रवासात वेग कमी ठेवावा, अशी आमची मागणी नव्हती. ताहिती आणि मो'ओरिया या बेटांदरम्यान अनेक स्थानिक लोक कामासाठी किंवा शाळेत जाण्यासाठी दररोज प्रवास करतात. व्हेल ज्या ठिकाणी मोठ्या संख्येनं येतात आणि विश्रांती घेतात, फक्त अशाच ठिकाणी बोटींचा वेग कमी करावा, इतकीच आमची मागणी होती."
या मोहिमेला सुमारे 50 हजार लोकांनी पाठिंबा दिला. त्यानंतर 2025 मध्ये बोटींच्या वेगाबाबत नवीन नियम लागू करण्यात आले. या नियमांनुसार, व्हेलच्या स्थलांतराच्या हंगामात बेटांपासून एक नॉटिकल मैल अंतराच्या परिसरात 12 मीटरपेक्षा जास्त लांबीच्या मोठ्या बोटींचा वेग ताशी 10 ते 12 नॉट्सपर्यंत मर्यादित ठेवणं बंधनकारक करण्यात आलं.
मूर सांगतात, "एक वर्षभर प्रयत्न केल्यानंतर सरकारने बोटींचा वेग मर्यादित करणारे कठोर नियम मंजूर केले. धोरणात बदल घडवून आणण्यात आम्हाला मोठं यश मिळालं. एखादं छायाचित्र आणि त्यामागची कहाणी लोकांपर्यंत पोहोचवली, तर त्यातून खरोखर बदल घडू शकतो, याची जाणीव या अनुभवातून झाली."
2025 मध्ये या छायाचित्रासाठी मूर यांना संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) जागतिक महासागर दिनाच्या (यूएन वर्ल्ड ओशन्स डे) छायाचित्र स्पर्धेचे विजेता म्हणून घोषित करण्यात आलं.
"या प्राण्यांचं सौंदर्य, त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांचा स्वभाव लोकांसमोर आणला, तर त्यांच्या संरक्षणाची गरज लोकांना अधिक चांगल्या प्रकारे समजेल आणि त्यासाठी ते देखील अधिक प्रयत्न करतील, असं मला वाटलं".
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)




























