You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार; जाणून घ्या पुढच्या तीन दिवसांचा अंदाज
- Author, छाया काविरे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र सध्या झारखंड आणि पश्चिम बंगालच्या भागावर केंद्रित झालं आहे.
पुढच्या 24 तासांत ही प्रणाली पश्चिम-वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. मात्र, या प्रणालीचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नाही.
त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरून अनेक भागांत उघडीप मिळण्याची शक्यता आहे.
तुमच्या जिल्ह्यात पुढचे तीन दिवस पावसाची स्थिती कशी असेल, हे जाणून घेऊया.
महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम होईल का?
सध्या झारखंड आणि पश्चिम बंगालच्या मैदानी भागांवर असलेली प्रणाली पुढच्या 24 तासांत पश्चिम-वायव्येकडे सरकून झारखंड आणि बिहार पार करण्याची दाट शक्यता आहे. ही प्रणाली पुढे सरकत हळूहळू कमकुवत होऊन कमी दाबाच्या क्षेत्रात (Well Marked Low Pressure Area) रुपांतरित होईल.
या प्रणालीचा महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम होईल का? तर नाही. महाराष्ट्रावर याचा काहीही थेट परिणाम होणार नाही.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, 18 ते 20 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातल्या बहुतांश भागांत पावसाचा जोर काहीसा ओसरलेला असेल. यलो किंवा रेड अलर्टऐवजी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
18 ते 20 ऑगस्टला तुमच्या जिल्ह्यात पाऊस किती?
भारतीय हवामान खात्याच्या जिल्हानिहाय अंदाजानुसार, 18 ऑगस्टला गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे.
तर जालना, नांदेड, सातारा, सांगली आणि साताऱ्याचा घाट माथा या ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता आहे.
19 ऑगस्टला गोंदिया, जालना, बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर यलो अलर्टवर आहेत.
जळगाव, धुळे, नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर, सांगली, रत्नागिरी, हिंगोली, परभणी आणि नांदेड या भागात हलक्या सरी बरसण्याची चिन्हं आहेत.
तर विदर्भ आणि कोकणातल्या इतर जिल्ह्यांमध्ये उकाडा राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडा आणि खान्देशातही पावसाची उघडीप पाहायला मिळेल.
20 ऑगस्टला राज्यात कुठेही रेड किंवा ऑरेंज अलर्ट नाही. संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे.
कोकण किनारपट्टीवर हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडतील, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात प्रामुख्याने उघडीप राहून काही ठिकाणीच हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
एकंदरीत, पूर्व भारतात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नसला तरी त्याचा किंचित प्रभाव राहून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसतील.
सध्या राज्यातील कोणत्याही भागात रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट नाही. तीव्र पावसाची स्थिती नसल्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी पावसापासून उघडीप मिळण्याची शक्यता आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)