You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मान्सूनला एल निनोचा फटका, यंदा सरासरीपेक्षा 90 टक्केच पाऊस, राज्यात 'इथे' सर्वाधिक परिणाम
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या कालावधीत म्हणजे जून ते सप्टेंबर दरम्यान यंदा देशात बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा आणखी कमी म्हणजे सुमारे 90 टक्केच पाऊस पडेल, असं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं आहे.
यंदाच्या मोसमासाठीचा सुधारीत म्हणजे दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज हवामान विभागानं शुक्रवारी 29 मे रोजी जाहीर केला.
हवामानाचा हा अंदाज संपूर्ण मोसमासाठीचा आणि संपूर्ण देशभरासाठीचा आहे. यात (± 4%) फरक पडू शकतो.
याआधी 13 एप्रिल रोजी 2026 रोजी यंदाचा पहिला दीर्घकालीन अंदाज मांडताना सरासरीच्या 92 टक्के (± 5%) पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती.
हवामान विभागानं तो अंदाज आता वार्षिक सरासरीच्या 90% पर्यंत खाली आणला आहे. त्यामुळे यंदा 11 वर्षांतला सर्वात कमी पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याआधी 2015 साली भारतात सरासरीपेक्षा 90 टक्क्यांहून कमी पाऊस पडला होता. त्या वर्षी देशात मोठ्या प्रदेशात दुष्काळासारखी स्थिती निर्माण झाली होती आणि पिकांचं नुकसान झालं होतं तसंच पाण्याची कमतरता जाणवली होती.
यंदा मान्सूनच्या चारही महिन्यांत भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज जगभरातील हवामान संस्थांनी आधीच वर्तवला होता.
पण विशेषतः पेरणीच्या काळात म्हणजे जूनमध्ये सरासरीच्या 92 टक्के पाऊस पडेल असं आता हवामान विभागानं म्हटलं आहे, जे जास्त चिंताजनक ठरू शकतं.
कारण आधीच मध्यपूर्वेतील युद्धामुळे इंधनाच्या किंमतीत वाढ आणि महागाईचे संकट निर्माण झाले आहे. त्यात कमी पावसामुळे हे संकट तीव्र होऊ शकते, अशी भीती आता वर्तवली जाते आहे.
90 टक्के म्हणजे किती कमी पाऊस?
संपूर्ण भारताचा विचार केला, तर देशात दरवर्षी साधारणपणे सरासरी 87 सेंटीमीटर (870 मिलीमीटर) पाऊस पडतो. त्यातला 70 टक्के पाऊस जून-सप्टेंबर या नैऋत्य मान्सूनच्या काळात पडतो.
शेतीसोबतच, नद्या, धरणं, तलाव, विहिरी भरण्यासाठी हा नैऋत्य मान्सूनचा पाऊस महत्त्वाचा ठरतो. देशाची आर्थिक गणितंही याच पावसावर प्रामुख्यानं अवलंबून असतात.
विशेषतः मान्सून कोअर झोन म्हणजे महाराष्ट्र, गोवा, उत्तर कर्नाटक, तेलंगणा, ओडिसा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान ही राज्ये पूर्णतः नैऋत्य मान्सूनवर अवलंबून असतात.
त्यामुळे या कालावधीत पाऊस कमी पडला, तर त्याचे अनेक दूरगामी परिणाम दिसून येतात.
यंदा जून ते सप्टेंबरदरम्यान देशभरात मिळून 87 सेंटीमीटरच्या 90 टक्के म्हणजे सुमारे 78.3 टक्केच पाऊस पडेल, असं आकडेवारी सांगते.
अर्थात या पावसाचं वितरणही सगळीकडे सारखं नसेल.
आसाम, लडाख, ओडिसा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांत तिथल्या सरासरीएवढा किंवा त्यापेक्षा थोडासा जास्त पाऊस पडेल तर महाराष्ट्रासह इतर बहुतांश भागात सरासरीपेक्षा 90 टक्क्यांहून कमी पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटालगतचा प्रदेश आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल.
छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरात पावसाचं प्रमाण त्याहीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे, तर मराठवाड्याच्या काही भागांत सरासरीएवढा पाऊस पडू शकतो.
जूनमध्ये असं असेल हवामान
महिनावार पावसाचा विचार केला तर जून महिन्यात पावसाचं प्रणाम सरासरीच्या 92 टक्केच राहील.
जून महिन्यात देशात बहुतांश ठिकाणी कमाल आणि किमान तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी यंदा जूनमध्येही नेहमीपेक्षा जास्त दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब, बिहार, ओडिसा, छत्तीसगड, गुजरात, आंध्र प्रदेशमध्ये जास्त दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता जास्त आहे.
जुलै महिन्यासाठीचा अंदाज हवामान विभाग जून महिन्याच्या अखेरीस वर्तवेल.
एल निनोचा परिणाम
मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज वर्तवण्यासाठी काही वातवरणीय परिस्थिती आणि घटनांचा आधार घेतला जातो.
त्यातल्या तीन प्रमुख गोष्टी म्हणजे एल निनो, इंडियन ओशन डायपोल आणि उत्तर गोलार्धातील हिमवर्षाव.
एल निनो सदर्न ऑसिलेशन (ENSO) म्हणजे पॅसिफिक महासागरातील एल निनो प्रवाहाची स्थिती पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेच्या आसपास पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा वाढते आणि ते गरम पाणी या भागातजमा होते, तेव्हा त्या स्थितीला 'एल-निनो' असं संबोधलं जातं. ला निना ही त्याउलट स्थिती आहे.
या एल निनो आणि ला निना प्रवाहांचा जगभरातल्या हवामानावर आणि भारतातल्या मान्सूनवरही परिणाम होताना दिसतो.
साधारणपणे भारतात एल निनोच्या काळात कमी तर ला निनाच्या काळात जास्त पाऊस पडताना दिसतो.
सध्या पॅसिफिक महासागरातलं तापमान न्यूट्रल स्थितीत आहे, पण वेगानं तिथे एल निनो तयार होत असून, यंदा नेहमीपेक्षा जास्त तीव्र एल निनो तयार होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
इंडियन ओशन डायपोल (IOD) म्हणजेच हिंदी महासागरातील द्विध्रुव. अर्थात या महासागराच्या पूर्व आणि पश्चिम भागांतील पाण्याचं असमान तापमान.
IOD सकारात्मक असतो, म्हणजे हिंदी महासागराच्या पश्चिम भागाचं, आफ्रिकेजवळचं तापमान पूर्वेपेक्षा जास्त असतं, तेव्हा ती स्थिती भारतातमान्सूनला पोषक ठरताना दिसते.
यंदा सकारात्मक IOD तयार होण्याची शक्यता तर आहे, मात्र त्याची तीव्रता कमी असेल, असं भाकित काही हवामान मॉडेल्सनी वर्तवलं आहे.
मान्सूनवर परिणाम करणारी आणखी गोष्ट म्हणजे उत्तर गोलार्धात वसंत ऋतूत झालेला हिमवर्षाव. हा हिमवर्षाव कमी असतो, तेव्हा वर्षी मान्सूनच्या काळात भारतात पाऊस सहसा जास्त पडतो.
याशिवाय जेट स्ट्रीम या वातावरणाच्या वरच्या थरातील हवेच्या प्रवाहाचाही मान्सूनवर, विशेषतः मान्सूनच्या आगमनावर परिणाम होतो.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.