'गांजा' सेवनामुळं विमान उड्डाणावर असा होऊ शकतो परिणाम, एअर इंडियाच्या पायलटच्या कथित चाचणीनंतर चर्चेला उधाण

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
एअर इंडियाच्या एका पायलटची उड्डाणानंतर घेण्यात आलेली गांजा सेवनाबाबत चाचणी 'पॉझिटिव्ह' आल्याचं वृत्त आहे.
मात्र, या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यात अधिकृत दुजोरा मिळाला, तरीही वरकरणी वाटतो तसा हा निर्णायक पुरावा ठरेलच असंही नाही.
फुकेत ते दिल्ली प्रवास करणारं एअर इंडियाचं एअरबस A320 विमान 4 ऑगस्ट रोजी आकाशात उडत असताना अचानकच सुमारे 91 मीटरने (300 फूट) खाली आलं.
ते इतक्या वेगानं खाली आलं की, या घटनेत तेरा प्रवासी आणि चार कर्मचारी जखमी झाले. अखेर 137 प्रवासी आणि आठ कर्मचारी असलेलं हे विमान दिल्लीत सुरक्षितपणे उतरलं. पण, या घटनेची चौकशी सुरू आहे.
यानंतर दोन्ही वैमानिकांची उड्डाणानंतर सायकोअॅक्टिव्ह पदार्थांसाठी (अंमली पदार्थ किंवा नशा करण्यासाठी वापरले घट) नेहमीची चाचणी करण्यात आली, असं भारताच्या नागरी उड्डाण मंत्रालयानं सांगितलं.
प्राथमिक चाचणीच्या निकालानंतर त्याची खात्री करण्यासाठी 'कन्फर्मेटरी टेस्ट' आवश्यक आहे, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. पण तपास पूर्ण होईपर्यंत दोन्ही वैमानिकांना उड्डाणाची ड्युटी दिली जाणार नाहीये.
या आठवड्याच्या सुरुवातीला, सूत्रांचा हवाला देत अनेक माध्यमांनी कन्फर्मेटरी टेस्टमध्ये या विमानाचा कॅप्टन गांजाच्या सेवनाबाबतच्या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळल्याचं वृत्त दिलं आहे.
एअर इंडियानं याला दुजोरा दिलेला नाही. मात्र, या वृत्तांमुळं भारतातील वैमानिकांची अंमली पदार्थ सेवनाबाबतची चाचणी आणि एव्हीएशन सेफ्टीबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
आतापर्यंत, कॅप्टनच्या कथित चाचणीचा निकाल आणि विमान अचानक खाली येणं याबाबत काहीही अधिकृत संबंध आढळलेला नाही.
तपास अधिकारी या घटनेची टेक्निकल, ऑपरेशनल, मेडिकल आणि इतर सर्व अंगांनी चौकशी करत आहेत. विमान अचानक खाली का आलं? याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
मात्र, यामध्ये गांजाची काही भूमिका होती का? हा प्रश्न अगदीच रास्त ठरतो.
त्यातही ड्रग टेस्ट पॉझिटीव्ह येणं ही गोष्ट वैमानिकाच्या अगदी काही तासांपूर्वीच्या मानसिक स्थितीबद्दल नेमकं काय सांगते? हा अधिक गुंतागुंतीचा प्रश्न आहे.
कामगिरीवरील परिणाम
गुंतागुंतीची कामं करण्याच्या क्षमतेवर गांजाचा कसा परिणाम होतो याबद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे.
परंतु, वैमानिक नेमका कधी अकार्यक्षम अवस्थेत होता, हे ठरवण्यासाठी पॉझिटीव्ह ड्रग टेस्टचा वापर कसा केला जाऊ शकतो, याबद्दल फार कमी माहिती आहे.
यासंदर्भातील थेट पुरावे एकाच स्रोताकडून मिळू शकतात आणि ते म्हणजे खुद्द वैमानिकांकडून.
1997 च्या एका प्रयोगात, 10 वैमानिकांनी थोड्या प्रमाणात गांजाचं सेवन केलं आणि नंतर सिम्युलेटर उडवलं. त्याचा त्यांच्या कामगिरीवर परिणाम झाला आणि त्यामुळं उंची, दिशा आणि रेडिओ नेव्हिगेशनमध्ये चुका झाल्या.
हे परिणाम किमान दोन तास टिकले आणि साधारणपणे चार ते सहा तासांमध्ये नाहीसे झाले, असं अभ्यासात आढळून आलं.

फोटो स्रोत, Bloomberg via Getty Images
गांजाचं सेवन केल्यानंतर 24 तासांनी दहा अनुभवी खासगी वैमानिकांची फ्लाइट सिम्युलेटरवर चाचणी घेण्यात आली.
एलिव्हेटर आणि एलरॉन नियंत्रण, लँडिंगची अचूकता, आणि लँडिंगच्या वेळी होणारे व्हर्टीकल आणि लॅटरल डेव्हिएशन यांसारख्या अनेक मापदंडांवर त्यांच्या कामगिरीमध्ये लक्षणीय घट झाली होती.
आपली कामगिरी खालावली आहे हे वैमानिकांच्या स्वतःच्याही लक्षातही आलं नाही, ही लक्षणीय बाब होती.
1991 मध्ये केलेल्या आणखी एका अभ्यासानं असाच इशारा दिला होता.
नऊ वैमानिकांनी 20 मिलीग्रॅम टीएचसी (टेट्राहायड्रोकॅनाबिनॉल) असलेली सिगारेट ओढल्यानंतर सिम्युलेटर उडवलं. टीएचसी हे गांजामध्ये आढळणारं मुख्य सायकोॲक्टिव्ह संयुग आहे.
ते नशेची भावना निर्माण करणारं रसायन असून मेंदू आणि शारीरिक हालचालींवर त्याचा परिणाम होत असतो.
15 मिनिटे, चार तास, आठ तास आणि 24 तासांनंतर त्यांच्या कामगिरीत घट झाल्याचं दिसून आलं.
अभ्यासात असं आढळलं की, 24 तासांनंतर नऊपैकी सात वैमानिकांमध्ये काही प्रमाणात सुधारणा दिसून आली. परंतु, त्यातील फक्त एकालाच हा ड्रगचा परिणाम आहे, याची जाणीव होती.
हे अभ्यास छोटे आणि कालबाह्य आहेत. शिवाय ते आधुनिक विमानांऐवजी एअरक्राफ्ट सिम्युलेटरवर करण्यात आले होते. एअर इंडियाच्या कॉकपिटमध्ये काय घडलं, हे ते आपल्याला सांगू शकत नाहीत.
परंतु, त्यातून काहीतरी उपयुक्त माहिती समोर येऊ शकते, असा तज्ञांचा विश्वास आहे.
उड्डाणासाठी आवश्यक असलेले मोटर कंट्रोल, एकाग्रता आणि अत्यंत गुंतागुंतीचं ह्युमन मशीन इंटरॅक्शन यांवर गांजा नक्कीच परिणाम करू शकतो.
परिणाम किती काळ टिकतात?
ऑस्ट्रेलियाच्या ट्रान्सपोर्ट सेफ्टी ब्युरोचे एव्हीएशन-मेडिसीन स्पेशालिस्ट डेव्हिड न्यूमन यांच्या एका अभ्यासामध्येही असाच निष्कर्ष काढण्यात आला आहे.
गांजाचा परिणाम वर्तणूक, विचार आणि मनो-शारीरिक कामगिरीवर डोसच्या प्रमाणानुसार होतो.
उड्डाणासारखी गुंतागुंतीची कामं फारच संवेदनशील असतात. या अभ्यासात 24 तासांपर्यंत परिणाम टिकल्याचे पुरावेही आढळले.
मात्र, जगाच्या अनेक भागांमध्ये गांजाचा वापर वाढल्याने आणि गांजा-आधारित उत्पादनांची तीव्रता वाढल्याने हा मुद्दा अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.
कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन दिएगो येथील थॉमस मार्कोट यांच्या नेतृत्वाखाली 2022 मध्ये झालेल्या एका रँडम मेडिकल टेस्टमध्ये गांजाचं नियमित सेवन करणाऱ्या 191 लोकांची तपासणी करण्यात आली.
ज्यांनी THC चे सेवन केलं होतं, त्यांनी एका सिम्यूलेटेड ड्रायव्हिंग टास्कमध्ये खराब कामगिरी केली होती.
मात्र, संशोधकांना असं आढळलं की गांजातील THC चं प्रमाण, वापरकर्त्यांचा पूर्वीचा अनुभव किंवा त्यांच्या रक्तातील THC ची पातळी यावरून त्यांच्या कामगिरीत किती घसरण होईल, याचा अंदाज लावता येत नाही.
या ड्रगमुळे सुरुवातीला कामगिरी खालावली. परंतु, सुमारे साडेचार तासांनंतर, ज्यांनी त्याचं सेवन केलं होतं, त्यांची कामगिरी ज्यांनी हे ड्रग घेतले नव्हतं त्यांच्याइतकीच चांगली होती.

फोटो स्रोत, /LightRocket via Getty Images
हा निष्कर्ष विमानचालन चाचणीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. टेस्ट जर पॉझिटीव्ह आली तर शरीरात THC ची असल्याचं कन्फर्म होऊ शकतं.
परंतु, गांजाचं सेवन केव्हा झालं किंवा त्यावेळी त्या व्यक्तीवर त्याचा किती परिणाम झाला होता, हे त्यातून निश्चितपणे स्पष्ट होत नाही.
तज्ज्ञांच्या मते, सेवन केलेलं प्रमाण, वापरलेली पद्धत, वापराची वारंवारिता आणि व्यक्तीची शारीरिक स्थिती अशा अनेक घटकांवर हा संबंध अवलंबून असतो.
नियामकांना गांजाच्या बाबतीत अशा आव्हानांना सामोरं जावं लागतं, हे एक कारण आहे. एऱ्हवी अल्कोहोलच्या बाबतीत अशी कारणं नसतात.
"अल्कोहोलच्या बाबतीत, रक्तातील अल्कोहोलची पातळी आणि कार्यक्षमतेतील घट यांच्यात एक मजबूत संबंध आहे," असं मार्कोट यांनी बीबीसीला सांगितलं.
"परंतु THC च्या बाबतीत, हा संबंध अधिक गुंतागुंतीचा आहे. धूम्रपान केल्यानंतर, THC रक्तप्रवाहातून वेगानं काढून टाकलं जातं. THC ची पातळी आणि कार्यक्षमतेतील घट यांच्यात फारसा किंवा कोणताही संबंध नाही."
"कधीकधी सेवन करणाऱ्यांच्या बाबतीतही, शेवटच्या सेवनानंतर काही दिवस, कधीकधी आठवडे, रक्तात THC आढळू शकते. विशेषतः जे अधिक वेळा सेवन करतात, त्यांच्यामध्ये तत्काळ परिणाम ओसरल्यानंतर हे आढळून येतं."
गांजाचे परिणाम धूम्रपान केल्यानंतर साधारणपणे तीन ते पाच तास टिकतात. जेव्हा गांजा खाण्यायोग्य पदार्थांमध्ये मिसळला जातो, तेव्हा त्याचे परिणाम अधिक काळ टिकतात. साधारणपणे सहा ते आठ तास आणि कधीकधी त्याहूनही जास्त काळ टिकतात, असं अभ्यासातून दिसून आलं आहे.
विचार करण्याच्या क्षमतेवरील परिणाम
मार्कोट यांच्या मते, खाण्यायोग्य पदार्थांमधून गांजाचं सेवन करताना, मेटाबोलाइट 11-OH-THC (11-हायड्रॉक्सी-THC) चा विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होण्याची अधिक शक्यता असते, तर THC चे प्रमाण कमी असू शकते.
एखादी व्यक्ती विमान उडवण्यासाठी खूप जास्त अक्षम आहे की नाही हे सांगू शकेल, अशी कोणतीही चाचणी गांजासाठी उपलब्ध नाही.
कॅनडाने या मुद्द्यावर अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. 2018 मध्ये मनोरंजनासाठी गांजाच्या वापराला कायदेशीर मान्यता दिल्यानंतर, ट्रान्सपोर्ट कॅनडानं एक नियम लागू केला. त्यानुसार फ्लाइट क्रू आणि फ्लाइट कंट्रोलर्सना कर्तव्यावर रुजू होण्याच्या किमान 28 दिवस आधी गांजाचं सेवन करण्यास मनाई आहे.
नियामक संस्थेनं म्हटलं आहे की, गांजाचे परिणाम आणि तो शोधण्यासंबंधीची अनिश्चितता दूर करण्याच्या उद्देशानं हा नियम लागू करण्यात आला होता. एअरलाइन्स यापेक्षाही कठोर नियम लागू करू शकतात.
अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) ने 2018 ते 2022 दरम्यान अमेरिकेत नागरी विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वैमानिकांवर केलेल्या 2026 च्या अभ्यासात असं आढळून आलं की, 52.8 टक्के वैमानिक किमान एका अंमली पदार्थाच्या संपर्कात आले होते, तर 27.7 टक्के वैमानिक दोन किंवा अधिक अंमली पदार्थांच्या संपर्कात आले होते.
बेकायदेशीर अंमली पदार्थ सापडण्याच्या वाढीमागे THC हे मुख्य कारण होतं. मात्र, हा अभ्यास अंमली पदार्थांच्या उपस्थितीवर केंद्रित होता, वैमानिकांच्या क्षमतेवर परिणाम झाला होता की नाही यावर नाही, या गोष्टीवर NTSB ने जोर दिला.
गांजा चाचणी पॉझिटीव्ह येण्याचा अर्थ काय?
केवळ एखाद्याच्या शरीरात गांजा आढळल्यानं त्यामुळे एखादी घटना किंवा अपघात घडला हे सिद्ध होत नाही. परंतु अशी काही प्रकरणं आहेत ज्यामध्ये तपासकर्त्यांनी अधिक सखोल तपास केला आहे.
2011 मध्ये कॅनडात झालेल्या एका अपघातामध्ये, सेसना 208बी (Cessna 208B) या विमानाच्या वैमानिकाच्या रक्तात 50.1 नॅनोग्राम टीएचसी आढळलं होतं.
ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डने असा निष्कर्ष काढला की, सायकोअॅक्टिव्ह कॅनाबिनॉइड्सचे हे प्रमाण विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम करण्यासाठी आणि वैमानिकाच्या नियोजनावर व उड्डाण कार्यावर परिणाम करण्यासाठी पुरेसं होतं.
याउलट घटनांचीही नोंद झाली आहे.
2017 मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या एका हेलिकॉप्टर अपघातात, वैमानिकाच्या रक्तात टीएचसी आढळलं होतं. त्यानं दोन दिवसांपूर्वी गांजाचे सेवन केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
एका फॉरेन्सिक टॉक्सिकोलॉजिस्टने असा निष्कर्ष काढला की, अपघाताच्या वेळी वैमानिक नशेत असण्याची शक्यता कमी होती. तपासकर्त्यांनाही यात गांजाची भूमिका असल्याचं वाटलं नाही.
ड्रग टेस्टचा पॉझिटीव्ह निकाल काहीही दर्शवत नाही, असा त्याचा अर्थ नाही. तर उलट, वापरलेल्या गांजाच्या प्रमाणावर, तो केव्हा वापरला गेला, परिस्थिती काय होती आणि तपास अधिकाऱ्यांकडे असलेल्या इतर पुराव्यांवर त्याचा अर्थ अवलंबून असतो.
एअर इंडियाच्या या प्रकरणात, तपास अधिकाऱ्यांना केवळ कॅप्टनची कन्फर्मेटरी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, हे सिद्ध करण्यापेक्षा त्याहून अधिक सबळ असं काहीतरी सिद्ध करावं लागेल.
कोणत्या सॅम्पल्सची चाचणी करण्यात आली, त्यात THC किंवा त्याचे मेटाबोलाइट होते का, त्याचे प्रमाण किती होते, आणि यावरून वापराच्या वेळेबद्दल काय सूचित होतं, हे त्यांना जाणून घ्यावं लागेल.
या घटनेनंतर, एअर इंडिया आपल्या सर्व वैमानिकांची प्रतिबंधित पदार्थांसाठी तत्काळ चाचणी करत आहे. हा विद्यमान नियमांचाच एक विस्तार आहे. त्यानुसार किमान 10 टक्के वैमानिकांची रँडम टेस्ट करणं आवश्यक आहे.
मार्कोट यांच्या मते, मूत्र, रक्त आणि अगदी लाळेतूनही एखाद्या व्यक्तीनं THC चे सेवन केलेलं आहे की नाही हे कळू शकतं. मात्र, वापर कधी झाला किंवा काही तासांपूर्वी ती व्यक्ती आजारी होती का, हे त्यातून निश्चितपणे ठरवता येत नाही.
ते म्हणतात की लाळेच्या माध्यमातून अलीकडील वापराची शक्यता अधिक अधोरेखित होत असते. मात्र, सेवनानंतर अनेक तासांनी, कदाचित एक-दोन दिवसांनीही THC आढळू शकते.
तज्ज्ञांच्या मते, प्रश्न केवळ वैमानिक गांजा वापरत होता की नाही एवढाच नाहीये.
यामध्येही तीन पैलू आहेत. गांजाचे सेवन करण्यात आलं होतं का? उड्डाणादरम्यान वैमानिकाची प्रकृती ठीक नव्हती का? आणि त्या स्थितीमुळे विमानाची उंची अचानक कमी होण्यास काही भूमिका होती का? पहिल्या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळू शकेल. इतर दोन प्रश्नांची उत्तरं देणं अधिक कठीण आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























