तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
मुंबईत सीजेपी, तर दिल्लीत विरोधी पक्षांचं आंदोलन, 18 फोटोंमधून जाणून घ्या काय घडलं
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीनं (सीजेपी) आज (2 ऑक्टोबर) मुंबईत आंदोलन केलं.
SIR प्रक्रियेविरोधात आणि निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हे आंदोलन असल्याचं सीजेपीनं म्हटलं.
मुंबईशिवाय दिल्लीतही विरोधी पक्षांनी जंतरमंतरवर आंदोलन केले. यावेळी दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
दिल्लीत जंतरमंतरवर सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी नेते आंदोलनासाठी एकत्रित आले. परंतु, दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवरील आंदोलनाला परवानगी नाकारली होती.
त्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली जिल्ह्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले. तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला.
मुंबईतील आंदोलन आणि दिल्लीत लागू करण्यात आलेले निर्बंध यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त आणि SIR प्रक्रियेभोवतीचा राजकीय वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हं आहेत.
दरम्यान, मुंबई आणि दिल्लीतील आंदोलनात काय घडलं, जाणून घ्या या फोटोंमधून
कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके यांनी आज (2 ऑक्टोबर) सायंकाळी 4 वाजता मुंबईतील शिवाजी पार्क येथे जेल भरो आंदोलन केले.
या आंदोलनासाठी शिवाजी पार्क येथे सीजेपी समर्थकांची मोठी गर्दी जमली. यावेळी उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली.
कॉक्रोच जनता पार्टीने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, ठरलेल्या वेळेच्या 2 तास आधीपासूनच लोक शिवाजी पार्क येथे पोहोचू लागले होते. 2 ऑक्टोबरला मुंबई इतिहास घडवेल, असेही पक्षाने म्हटले होते.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवाजी पार्क आणि परिसरात मोठ्या संख्येने सुरक्षा बळ तैनात करण्यात आले.
मुंबईत शिवसेना भवनापासून शिवाजी पार्कच्या दिशेने मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावरून मोर्चा काढत दाखल झाले.
दिपके यांनी यापूर्वी सांगितले होते की, मुंबई पोलिसांनी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सीजेपीने आयोजित केलेल्या नियोजित आंदोलनाला परवानगी देण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी गांधी जयंतीच्या दिवशी संघटना 'जेल भरो आंदोलन' सुरू करणार असल्याची घोषणा केली.
मात्र, मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं की, 2013 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क येथे कोणत्याही सभेला परवानगी देण्याचा अधिकार पोलिसांना नाही. तसेच, हा परिसर शांतता क्षेत्र (सायलन्स झोन) असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
दरम्यान, सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी गुरुवारी (1 ऑक्टोबर) सांगितलं होतं की, मुंबईतील शिवाजी पार्क येथून आंदोलनाची सुरुवात केली जाणार असून त्यानंतर ते देशभर नेलं जाईल.
मुंबईच्या शिवाजी पार्कवर होत असलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने लोकं सहभागी झाले आहेत.
या आंदोलनासाठी सीजेपीने 3 प्रमुख मागण्या केल्या आहेत.
त्यामध्ये ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन त्यांच्यावर फौजदारी कारवाई व्हावी आणि त्यांना आदेश कोणी दिले हे जाहीर करावं, SIR प्रक्रिया स्थगित करावी, जानेवारी 2025 मधील मतदार यादी पुन्हा लागू करावी व स्वतंत्र चौकशी करावी, तसेच 2023 चा नियुक्ती कायदा रद्द करून नागरी समाजाच्या सहभागातून पारदर्शक नियुक्ती प्रक्रिया लागू करावी, या मागण्यांचा समावेश आहे.
सीजेपीच्या मागील आंदोलनाप्रमाणेच या आंदोलनातही मीम्स आणि विविध पोस्टर्सने लक्ष वेधून घेतले.
यापूर्वी कॉक्रोच जनता पार्टी, विद्यार्थी संघटना, आम आदमी पक्ष आणि इतर अनेक संघटनांनी 2 ऑक्टोबर, गांधी जयंतीच्या दिवशी आंदोलन करण्याची घोषणा केली होती.
सीजेपीने मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केली, तर दिल्लीत विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी जंतर-मंतरवर आंदोलनाची घोषणा केली.
दरम्यान, दिल्लीत जंतर-मंतर येथे प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली जिल्ह्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
सीजेपीने मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केली, तर इतर संघटनांनी लोकांना 2 ऑक्टोबरला दिल्लीतील जंतर-मंतर येथे पोहोचण्याचे आवाहन केले होते.
ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (आयसा), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आणि डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) यांच्या वतीने प्रस्तावित मोर्चाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. मात्र, त्यानंतरही या संघटनांनी आंदोलनासाठी जमण्याची योजना आखली होती.
आम आदमी पक्षाने लोकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
आपच्या आमदार आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी गुरुवारी (1 ऑक्टोबर) एक्सवरील पोस्टमधून लोकांना शुक्रवारी सकाळी 10 वाजता जंतर-मंतर येथे पोहोचण्याचे आवाहन केले होते.
"चला, 2 ऑक्टोबर 2026 ला सकाळी 10 वाजता जंतर-मंतरकडे जाऊया", अशी पोस्ट करत त्यांनी लोकांना जंतरमंतरवर पोहोचण्याचे आवाहन केले होते.
दरम्यान जंतर-मंतर येथे आंदोलन करण्यासाठी जमलेल्या विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं.
दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आम आदमी पक्षाच्या नेत्यांमध्ये पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज, दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या आतिशी आणि नेते संजीव झा यांचा समावेश आहे.
डाव्या विद्यार्थी संघटना आयसा, एसएफआय, सीपीएम, सीपीआयचे नेते आणि कार्यकर्ते सकाळपासूनच जंतर मंतरवर दाखल झाले होते.
ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये सीपीएमचे महासचिव एम. ए. बेबी यांचा समावेश आहे.
पोलीस सूत्रांच्या हवाल्याने पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरजवळ सुमारे 700 आंदोलकांना ताब्यात घेतले.
दिल्ली पोलिसांनी कलम 163 लागू केले असून जंतर मंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
आंदोलनाचे आवाहन करणाऱ्यांपैकी एक असलेले वकील प्रशांत भूषण म्हणाले की, मेट्रो स्थानके बंद करण्यात आली आहेत, प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत आणि इंटरनेट बंद करण्यात आले आहे, पोलिसांनी जंतर मंतरला घेराव घातला असून तेथे लोकांना ताब्यात घेतले जात आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)